“श्रद्धा और सबुरी – सबुरीका फल हमेशा मिठाहि होता है”.
म्युचुअलफंडाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचे कडे पैसे हि असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेश्या प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. शेअर बाजारात स्वतः गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल्स अॅनेलिसीस व फंडामेंटल अॅनेलिसीस करता येणे गरजेचे असते, त्याच प्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दिर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. या व्यतिरिक्त आपण शेअर बाजारात व्यवहार करत असताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.
आपल्या देशात प्रथमत: भारत सरकारचे सहभागाने युनिटट्रस्ट ऑफ इंडियाचा असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मध्ये करण्यात आली. आपल्या पैकी बरेच जणांनी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हीच भारतातील पहिली म्युचुअल फंड कंपनी. १९८६ मध्ये सार्वजनिक बँकांना म्युचुअल फंड स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली.१९९३ पासून खाजगी म्युचुअल फंडांना परवानगी मिळाली. सध्या आपल्या देशात ४३ म्युचुअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा एकटे नसता.जेव्हा तुम्ही म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्या सारखी अनेकजण त्या योजनेत गुंतवणूक करत असतात यामुळे एक मोठी रक्कम (शेकडो करोड रुपये) त्यायोजनेत जमा होत असतात.यामुळे फंडमॅनेजरला अनेकविविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात. यामुळेच दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडातून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.
तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक केली कि तुमच्या सारख्या ध्येय असणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैशा सोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात तुम्हाला युनिट्स अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मूल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिट्स) मग हे पैसे म्युचुअल फंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स, डिबेंचर्स ते मनीमार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवतात. त्याला कॅार्पस किंवा असेटस अंडर मॅनेजमेंट या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणुकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मूल्य (NAV) जाहीर केले जाते. म्युचुअल फंडाची संपूर्ण माहिती AMFI च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग (शेअर ), गुंतवणुकदार या युनिट्सचा मालक असतो.
NAV = Net Asset value म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.
Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV
शेअर बाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकन सुद्धा वाढते, या उलट जर शेअर बाजाराखाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मूल्यांकन सुद्धा कमी होते. हि अशी मूल्य वृद्धी किंवा मूल्य घट शेअर बाजाराच्या काळाप्रमाणे नियमित पणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो. म्हणून रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पाहत बसू नये तर वर्ष सहामहिन्यातून कधी तरी एकदाच पहावे. म्युचुअलफंडात गुंतवणूक केल्यावर संयमाची आवश्यकता असते. यासाठी श्री साईबाबांचे एक वचन श्रद्धा और सबुरी हे कायम लक्षात ठेवावे. जर का तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी केली तर प्रत्येकालाच येथे पैसे मिळतात, नशीब वैगरे काही लागत नाही. म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदी गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवावी. म्युचुअल फंडात नियमित दर महिना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.तेजी मंदी हा शेअर बाजारचा अविभाज्य भागच आहे मात्र दीर्घ मुदतीत तोवरच जात असतो. एक लक्ष्यात ठेवा कि सेन्सेक्स १९७९ साली १०० अंकांनी सुरु झाला तो दिनांक 20 जुलै २०१८ रोजी ३६४९६ च्या पेक्ष्या जास्त झाला होता. गेल्या ३८ वर्ष्यात सेन्सेक्सने वार्षिक १७% चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे कि जरी सेन्सेक्सचा प्रवास १०० ते ३७५०० असा झालेला असला तरी तो सतत वर गेलेला नाही.या कालखंडात बाजाराने अनेक मोठे चढ उतार पाहिलेले आहेत.तसे पहिले तर बाजार रोजच वर खाली होतच असतो त्यामुळे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे मुल्यसुद्धा रोजच कमी जास्त होत असते.