प्रकरण ६ वे
६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?
सर्वसामान्य माणूस शेअर बाजारातील तज्ञ होऊ शकतो काय?
होय, निश्र्चितच होऊ शकतो.
लोकांचा मात्र असा समज असतो कि सध्याच्या अस्थीर बाजारात काय आपला निभाव लागणे शक्य नाही. तसाच दुसरा असा समज आहे कि हे काम फक्त तज्ञ व्यक्तीच करु शकतात, माझे ते काम नव्हे, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हि गोष्ट खरीच आहे, अशावेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हेच तुमच्यासाठी योग्य होईल कारण तज्ञ फंड मँनेजर तुमच्यावतीने तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करत असतो, मात्र त्याच्यावर काही बंधने असतात, त्यातील महत्वाचे म्हणजे योजनेच्या उदिष्ठांनुसारच त्याला गुंतवणूक व्यवस्थापन करावे लागते, म्हणूनच म्युच्युअल फंडाची योजना निवडताना तिचे उदिष्ठ व मागील कामगीरी तपासून पहा. यासाठी चांगल्या म्युच्युअल फंड वितरकाची मदत घ्या.
मात्र जर तुम्ही स्वत: तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यास वेळ देऊ शकत असाल तर तुम्हीच तज्ञाप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. तुम्ही हे निश्र्चितच करु शकता. त्यासाठी ह्या लेखातील व या पुढे मी देत असलेले लेख काळजीपुर्वक वाचा व त्याचा उपयोग तुमच्या गुंतवणूक व्यवस्थापनासाठी करा. प्रथमत: तुम्ही ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करु इच्छित आहात त्याची माहिती नीट होण्यासाठी खालील बाबी कशा तपासाव्या हे मी तुम्हाला प्रथम सांगतो.
विक्रीतील वाढ
कंपनीची विक्रीत दर वर्षी होणारी वाढ हा एक महत्वाचा घटक आहे. मागील वर्षापेक्षा किती टक्के विक्री वाढली आहे हे तपासा. नियमीत वाढ हे कंपनीच्या चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. जर विक्रीत घट झाली असेल तर त्याचे कारण तपासा, हा बदल तात्पुरता आहे कि दिर्घकाळ परिणाम करणारा आहे याची माहीती घ्या. विक्रीत होणा-या वाढीचा दर हा प्रत्येक सेक्टरसाठी वेगवेगळा असू शकतो उदा. एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्याच्या विक्रीची वाढ हि १०% दराने साधारणपणे होत असल्यास चांगली समजली जाते तर आयटी कंपनीची वाढ हि २०% पेक्षा जास्त असणे चांगले समजले जाते. हा निकष प्रत्येक सेक्टरसाठी वेग-वेगळा असतो. विक्रीच्या वाढ/घटीचा परिणाम शेअर्सच्या किंमती कमी/जास्त होण्याशी असतो. अपवाद बाजारातील तात्तपुर्ती तेजी/मंदी. नेहमी विक्रीत वाढ होणारी कंपनी तुम्हाला दिर्घकाळात तुमच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा देऊ शकते. मात्र विक्रीतील वाढ एवढा एकच निकष पुरेसा नाही अन्य गोष्टी सुध्दा तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्या आता एक एक करुन पाहुया.
बॉटम लाईन ग्रोथ
बॉटम लाईन ग्रोथ म्हणजेच कंपनीच्या निव्वळ (नेट) नफ्यात होणारी वाढ. निव्वळ नफ्यात नियमीतपणे होणारी वाढ कंपनीची प्रगती दाखवते व याचा परिणाम शेअर्सच्या किंमतीत वाढ होण्यात होतो. नफ्यातील वाढ हिसुध्दा सेक्टरनुसार वेगवेगळी असते. उदा. आयटी सेक्टरमधील चांगल्या कंपनीच्या नफ्यातील वाढ हि गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ ते ७०% असू शकते तर एफएमसीजी व जुन्या कंपन्यांच्या बाबत हि वाढ १० ते १५% सुध्दा चांगली मानली जाते.
आरओआय – रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट अर्थात गुंतवणूकीवरील परतावा:
म्हणजेच कंपनीने गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात किती परतावा मिळाला हे पहाणे. जर का एखाद्या कंपनीने रु.१०० कोटी मशिनरी, जमीन,मनुष्यबळ व अन्यत्र भांडवली गुंतवणूक केलेली असेल व जर त्या कंपनीला निव्वळ नफा रु.२५ कोटी वर्षात झालेला असेल तर आरओआय होईल २५%. परत आरओआय हा सुध्दा कंपनीच्या प्रकारावर पाहिला पाहिजे. आयटीसाठी तो ३५ ते ४० टक्के चांगला असेल तर भांडवली पीएसयुसाठी तो १० ते १५% चांगला समजला जातो.
व्हॉल्युम (उलाढाल):
काही तज्ञ कंपनीच्या शेअर्सच्या बाजारातील होणा-या रोजच्या रोजच्या व वर्षातील दररोजच्या सरासरी उलाढालीला महत्व देतात. यामुळे असे कळते कि त्या कंपनीच्या शेअर्सची रोज खरेदी विक्री किती संखेत होते. जर कंपनीच्या संबंधी एखादी महत्वाची बातमी बाजारात येते तेव्हा अचानकपणे त्या कंपनीच्या शेअर्सची उलाढाल वाढते कारण मागणी एकतर चांगली बातमी असली तर वाढते व वाईट बातमी असेल तर मागणी कमी होते व याचा परिणाम शेअरच्या किंमतीत होणा-या वाढ-घटीवर होतो. शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या संखेने हेही समजते कि त्या शेअरची तरलता किती आहे. ज्या शेअरची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असे शेअर विकणेही सुलभ असते (कारण गि-हाईक समोर असते) तसेच यांच्या खरेदीवर होणारा खर्चही अल्प असतो. याच्या उलट ज्या शेअर्सची कमी किंवा क्वचीतच उलाढाल होते अशा शेअर्सच्या किंमतीत होणारा बदलही मोठा असतो म्हणून अश्या शेअर्सच्या शक्यतो वाटेलाच जाऊ नये. उलाढालीमुळे शेअर्सच्या मागणी व पुरवठ्याचीसुध्दा कल्पना येते ज्यामुळे किंमत कमी होणार आहे कि वाढणार आहे याचा प्राथमीक अंदाज येतो. जेव्हा अचानकपणे एखाद्या शेअरची किंमत वाढू लागली कि त्याचे कारण तपासले पाहिजे, एक कारण असे असू शकते कि कोणतातरी संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअर्सची खरेदी करु लागला असेल. तसेच किंमत कमी होण्याचे कारण याच्या उलट असते, तेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री करत असतात.
मार्केट कँपिटलाझेशन (भांडवली बाजार मुल्य)
कंपनीच्या सर्व मिळून शेअर्सचे होणारे त्या वेळचे बाजार मुल्य (एकूण शेअर्स गुणीले प्रती शेअरचा दर). यामुळे कंपनी मोठी, मध्यम कि लहान आहे हे कळते. तसेच त्या शेअरची तरलतासुध्दा यामुळे अजमावता येते, जेवढे भांडवली बाजार मुल्य जास्त तेवढी तरलता जास्त असण्याची शक्यता असते. आपल्याला जर नियमीत व स्थिर परतावे मिळावे असे वाटत असेल म्हणजेचे तुलनेत कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर ज्या कंपनीचे भांडवली बाजार मुल्य सर्वात जास्त आहे अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, जर मध्यम जोखीम घ्यावयाची असेल तर मध्यम आकाराच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व जर जास्तच जोखीम घ्याव्याची असेल तर लहान कंपन्याचे शेअर्स घ्यावेत. म्हणजेच भांडवली बाजारमुल्य आपणास शेअर खरेदी करताना आपली जोखीम ठरविण्यास मदत करते.
कंपनी व्यवस्थापन
खरे पहाता कंपनीचे व्यवस्थापन कोणत्या व्यक्तींच्या किंवा समुहाच्या हाती आहे हे पहाणे सर्वात महत्वाचे असते. यामुळे या व्यवस्थापनाच्या अन्य कंपन्या असल्यास त्यांची कामगिरी तुलनेसाठी फारच उपयुक्त ठरते. कंपनीचे व्यवहार किती पारदर्शक आहेत हे त्या कंपनीच्या व्यवस्थापनावरुनच समजते. त्यांची कंपनीकडे पहाण्याची दृष्टी कशी आहे हेही फार महत्वाचे असते. म्हणूनच टाटा, बिर्ला, या समुहाला सर्वमान्यता जास्त असते. कंपनी कशी चालवावी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री. नारायण मुर्ती यानी चालवलेली इन्फोसीस हि कंपनी व व्यवस्थापन कसे नसावे याचे उदा. सत्यम कंपनी (आता ती महिंद्र गृपने घेतल्याने जुन्या भागधारकाना दिलासा मिळाला हि गोष्ट वेगळी). कंपनी कामगिरी कशी करणार हे पुर्णत: व्यवस्थापनावरच अवलंबून असते. जर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणा-या व्यक्ती या कार्यकुशल, प्रामाणिक व विश्वासार्ह असतील व ते जर अन्य चांगल्या कार्यरत असणा-या कंपनीच्या व्यवस्थापनेचा भाग असतील तर अशा कंपनीला मोठे गुंतवणूकदार नेहमीच प्राधान्य देत असतात. तसेच कंपनीचा एमडी कोण आहे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते. यामुळेच आपण शेअर्स खरेदी करताना व्यवस्थापन कोणाचे आहे याला प्राधान्य दिले पाहिजे.
आता पुढील प्रकरणात आपण महत्वाचे रेशो कसे पहावेत याची माहिती घेऊ.