१. प्रकरण पहिले: गुंतवणूक सुरु करण्यापुर्वी
गुंतवणूक !! म्हणजे काय?
प्रथमत: गुंतवणूक करणे हे किती शहाणपणाचे आहे हे तुम्हाला सांगणयाची गरज नाही कारण यात तुम्हाला अभिरुची असल्यामुळेच तुम्ही या माझ्या संकेतस्थळावर/ब्लॉगवर आला आहात. तुमचे येथे मन:पुर्वक स्वागत व तुमच्या योग्य निर्णयाबद्दल तुमचे अभिनंदन. मी तुम्हाला खात्रीने सांगतो कि गुंतवणूक विषयक सारी माहिती, ज्ञान व गुंतवणूकीचे शास्त्र व गुंतवणूकीची कला मी तुम्हाला येथे समजावून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. ज्ञान हिच मुळी एक ताकद आहे. पैसा हा हुषारीनेच गुंतवला पाहिजे तरच गुंतवणूकीची ताकद समजू शकते. तुम्ही जर गुंतवणूकीबाबत अनभिज्ञ असाल तर,शेअर्स, बॉंण्डस्, बदला, उंधा बदला, परतावा, पी/इ रेशो हे शब्द म्हणजे तुम्हाला एखाद्या परभाषेतीलच वाटू शकतात. रिलँक्स. गुंतवणूकीची कला जर एखाद्याला खरोखर आत्मसात करावयाची असेल तर त्यासाठी तुम्हाला वेळ हा द्यावाच लागेल कारण हि गोष्ट शिकण्यासाठी काही वर्षेसुध्दा लागु शकतात. सुरुवात करण्यापुर्वी व गुंतवणूकीबाबत निर्णय घेण्यासाठी तुम्हाला अनेक बाबींची व पर्यायांची माहिती जमा करणे अत्यावश्यक आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि याबाबत तुम्ही परिपुर्ण केव्हाच होऊ शकत नाही. सतत शिकत रहाणे, अनुभव घेणे हा गुंतवणूकीची कला शिकण्याचा एक भागच आहे. सुरुवात करण्यासाठी स्वत: उत्सुक असणे हि पहिली पायरी आहे. आवश्यक तेवढा वेळ व थोडी शिस्त पाळली तरच तुम्ही बाजारात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी लायक बनू शकता. तुम्ही केलेली बचत तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार व वयानुसार विविध साधनात गुंतवून आदर्श पोर्टफोलीओ तयार केला तर त्यापासून आकर्षक परतावा मिळू शकतो तसेच एखाद्यावेळी होणा-या मोठ्या नुकसानीपासून कसा बचाव करावयाचा हे ही ठरवता येईल, मात्र यासाठी आवश्यकता असते ती स्वयंशिस्तीची व संयमाची. गुंतवणूक म्हणजे काही तुमचे सारे पैसे भविष्यातील “एखाद्या इन्फोसीस”मध्ये टाकण्यासाठी वाट पहात रहाणे नव्हे. गुंतवणूक म्हणजे जुगार किंवा सट्टेबाजी नसून मर्यादित प्रमाणात जोखीम स्विकारुन नियमीत व स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत तयार करणे हेच गुंतवणूकीचे प्रमुख उदिष्ठ असावयास हवे. गुंतवणूक म्हणजे एखादी मालमत्ता खरेदी करुन त्यापासून किती उत्पन्न मिळू शकेल (लाभांश, व्याज, भाडे इ. स्वरुपात) तसेच दिर्घ मुदतीत त्या मालमत्तेत मुल्यवृध्दी किती होईल याचा योग्य अंदाज बांधणे हिच गुंतवणूकीची कला आहे.
तुम्ही गुंतवणूक का केली पाहिजे?
सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे कि ज्यामुळे तुमचे पैसे वाढतील व भविष्यात वाढणा-या महागाईचा सामना करणे तुम्हाला सहज शक्य होईल. तुमच्या गुंतवणूकीवर मिळणारा परतावा हा नेहमीच महागाईच्या दरापेक्षा जास्त असला पाहिजे, ज्यामुळे काही काळानंतर तुमच्याकडे एक चांगला फंड तयार होईल. तुम्ही तुमच्या पैशाची गुंतवणूक शेअर्स,बॉण्डस्, म्युच्युअल फंड किंवा मुदत ठेवी या पैकी कोणत्याही साधनात केली तरी त्याचे अंतीम उदिष्ठ हे निवृत्तीनंतरच्या आर्थीक गरजांची पुर्तता करणे, लग्न, कॉलेज फि, प्रवास, जास्त चांगले जीवनमान किंवा अगदी तुमच्या वारसांसाठी पैसे मागे ठेवणे या पैकी कोणत्याही कारणासाठी संपत्ती निर्माण करणे हे असू शकते नव्हे तर ते तसे असलेच पाहिजे. काही काळाने जेव्हा तुमच्या गुंतवणूकीत होणारी वाढ हि तुमच्या वाढणा-या पगारापेक्षा कितीतरी जास्त झाल्याचे तुम्हाला दिसेल तेव्हा होणारा आनंद हा काही औरच असेल.
गुंतवणूक केव्हा करावी?
जेवढ्या लवकर सुरुवात कराल तेव्हढे चांगले. तुम्ही बाजारात लवकर गुंतवणूक करुन तुम्ही तुमच्या पैशाची चांगली वाढ होण्यासाठी जास्त वेळ देऊ शकता. तसेच असे केल्याने तुम्हाला चक्रवाढीने मिळणा-या व्याजाचा फायदा मिळून तुमचे लाभांशाचे उत्पन्न वाढण्यासही मदत होते. बाजारातील अनिश्र्चितता गृहित धरली तरी याबाबतचे झालेले संशोधन व इतिहास पहाता जर गुंतवणूकीचे तीन महत्वाचे नियम सांगावयाचे झाल्यास ते असे सांगता येतील कि (१) गुंतवणूकीची सुरुवात लवकर करा (२) नियमीत गुंतवणूक करत रहा (३) गुंतवणूक नेहमी दिर्घ काळासाठीच करा व ती अल्प मुदतीसाठी असू नये. गुंतवणूकीसाठी “उत्तम काळाची” वाट पहाण्याचा मोह होऊ शकतो तो टाळलाच पाहिजे कारण यामुळे होणा-या संभाव्य फायद्याची संधी हातातून जाण्याचा धोकाच जास्त असतो. गुंतवणूकीतून मिळणारा फायदा परत त्याच गुंतवणूकसाधनात गुंतवून चक्रवाढीचा जास्त फायदा तुम्हाला मिळू शकतो मात्र यासाठी आपल्या निवडलेल्या गुंतवणूक साधनावर आपला ठाम विश्वास असणे आवश्यक असते. चक्रवाढीचा परिणाम हा असतो कि तुम्ही फक्त तुम्ही केलेल्या गुंतवणूकीवरच फायदा मिळवत नसून तो पुन:र्गुंतवणूक केल्यामुळे लाभांश/व्याजावरही वर्षानुवर्षे नियमीत मिळत रहातो. आणि म्हणूनच लाभांश/व्याजाची पुन:र्गुंतवणूक हि सुध्दा गुंतवणूकीची एक कलाच आहे. जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूकीची सुरुवात करता व ती तशीच नियमीतपणे करत रहाण्याची सवय अंगी बाणवून तुम्ही जास्त पैसे मिळवू शकता. जेवढा जास्त काळ व जास्त व्याजदराने तुम्ही तुमच्या गुंतवणूकीच्या रक्कमेला वाढण्यासाठी देता तेवढा जास्त फायदा तुम्हाला मिळतो. म्हणूनच यासाठी शेअर्समधील गुंतवणूक हि दिर्घकालासाठी सर्वोत्तम मानली जाते. अर्थव्यवस्थेतील उंचावणारा आलेख हा शेअरबाजारातील चढ-उतारावर व नुकसान होण्याच्या जोखीमीवर मात करुन अतिशय उत्तम परतावा दिर्घ मुदतीत मिळवून देतो हे लक्षात ठेवा. म्हणून अल्पमुदतीत होणा-या नफा नुकसानीचा विचार न करता बाजारातील कोणतीही गुंतवणूक हि दिर्घ काळासाठी करावयाची असते हे पक्के लक्षात ठेवा.
गुंतवणूक करण्यासाठी माझ्याकडे किती पैसे असावयास हवेत?
याला कोणतेही बंधन नाही. तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढ्याने तुम्ही सुरुवात तर करा. तुम्ही गुंतवणूक करणार असणा-या रकमेवर व गुंतवणूकीच्या साधनावर खालील बाबींचा प्रभाव मात्र पडू शकतो: १) तुमची जोखीम स्विकारण्याची तयारी.२) किती काळासाठी तुम्ही गुंतवणूक करणार आहात.३) तुम्ही केलेल्या बचतीची रक्कम किती उपलब्ध आहे.वरील तिन्ही बाबींचा विचार आपण पुढील काही प्रकरणातून करणार आहोत.तुम्ही कोण-कोणत्या साधनात गुंतवणूक करु शकता?तसे पहाता गुंतवणूकीसाठी अनेक साधने आहेत, त्यापैकी काही:१) कंपन्यांचे शेअर्स२) कर्जरोखे (बॉण्डस्)३) म्युच्युअल फंडाच्या विविध योजना४) मुदत ठेवी५) जमिन – जुमला६) सोने७) अन्य वरील बाबींबाबत आपण दुस-या प्रकरणात चर्चा करुया. |