मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?
नुकतीच मला Whatsapp गृपवर मध्यमवर्गातील व्यक्तीने कोणत्या साधनात व किती प्रमाणात गुंतणूक करावी असा प्रश्न विचारला गेला होता म्हणूनच हा ताजा लेख मी आजच लिहिला आहे तो आपणास कदाचित मार्गदर्शक होऊ शकेल.
सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय व्यक्ती हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या सुरक्षित साधनात गुंतवणूक करण्यासाठी प्राधान्य देत असतो. परंतु आजकाल बँक ठेवींवरील व्याजाचे दर हे ७% पर्यंत कमी झालेले असून जर भविष्यात महागाईचा दर नियंत्रणात राहिला तर RBI व्याजदर आणखी कमी करू शकेल. आपणास माहित असेलच कि मुख्यत्वेकरून आपल्या सारख्या Developing Country मध्ये दरवर्षीच महागाई वाढतच असते यामुळे रुपयाची किंमतही दरवर्षी कमी होत असते. बँकेकडून मिळणाऱ्या व्याजातून जर महागाईचा दर कमी केला तर खरे म्हणजे फक्त पैसे सुरक्षित ठेवण्याचे उद्दिष्टच फक्त यातून पुरे होऊ शकते. यामुळे बँकेत नियमित बचत किंवा ठेवी करून दीर्घ काळात संपत्ती निर्माण करता येत नाही हि वासुस्थिती आहे. यामुळे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीने गुंतवणुकीचे अन्य पर्याय शोधलेच पाहिजेत.
नियमित किंवा एकरकमी गुंतवणुकीतून संपत्ती निर्माण करण्याची ताकद हि शेअर बाजारात सर्वाधिक जास्त आहे हे सिद्ध झालेले त्रिकालाबाधित सत्य आहे, याचा अर्थ आपली सर्वच गुंतवणूक हि शेअरबाजारात किंवा म्युचुअल फंडात करावी असा होत नाही. आपली गुंतवणूक हि विविध साधनात विभागलेली असली पाहिजे कारण शेअरबाजारात कायम तेजी राहणार नाही आणि जर मंदीच्या काळात पैशाची गरज लागली तर नुकसानीत पैसे काढावे लागतील, म्हणून आपली गुंतवणूक विभागून ठेवावी. मात्र आपल्या गुंतवणुकीचा काही हिस्सा हा शेअरबाजारात गुंतवलेला असलाच पाहिजे.
कोणत्या साधनात किती प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी शास्त्र आहे परंतु हे व्यक्तीसापेक्ष बदलत राहते कारण प्रत्येक व्यक्तीची गुंतवणुकीची गरज वेगवेगळी असते, जोखीम स्वीकारण्याची क्षमता व तयारी वेगवेगळी असते. गुंतवणूक कोणत्या साधनात करावी याचा निर्णय करताना अनेक गोष्टी विचारात घ्याया लागतात, वय, मिळकत, मिळकत स्थिर आहे कि अस्थिर आहे, नोकरी का व्यवसाय, घरात किती व्यक्ती आहेत, त्यातील किती व्यक्ती मिळवत्या आहेत असल्यास त्यांचे उत्पन्न किती, किती व्यक्ती तुमच्यावर अवलंबून आहेत, किती काळासाठी गुंतवणूक करण्याची तयारी आहे, गुंतवणूक कोणत्या उद्देशाने करावयाची आहे, गुंतवणूक नियमितपणे करावयची आहे कि एकरकमी करावयाची आहे इ. अनेक गोष्टींचा विचार करूनच तुमचा चांगला व अनुभवी गुंतवणूक सल्लागार तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देत असतो. यामुळे सर्वांना एकाचप्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला मी देऊ शकत नाही मात्र, काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे.
गुंतवणुकीचे प्रमाण हे वयोमानानुसार बदलते असावे, यासाठी विविध प्रकारची गणितीय सूत्र अवलंबली जाते. मात्र समजण्यासाठी सोपे म्हणून १०० या संखेतून तुमचे वय वजा करता जी बाकी येईल तेवढ्या प्रमाणातील रक्कम हि दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्यासाठी शेअरबाजार व म्युचुअल फंडात गुंतवावी व हे प्रमाण दरवर्षी वयानुसार बदलते ठेवणे शक्य होत नाही म्हणून किमान दर ५ वर्षांनी तरी ते बदलत न्यावे.
- नियमितपणे किती गुंतवणूक करावी: सर्वसाधारणपणे भारतीय लोक त्यांच्या मासिकप्राप्तीच्या सरासरी ३५% रकमेची गुंतणूक करतो. हे प्रमाण योग्य आहे, मात्र व्यक्तीसापेक्ष ते बदलू शकते. २५ ते ३० वर्षाचे व्यक्तीने जेव्हा जबाबदारी नसते तेव्हा जास्त गुंतवणूक करावी व एकदा खर्च सुरु झाले कि ती कमी करून किमान ३५ ते ४०% एवढीतरी करावी.
- लिक्विड फंड: आकस्मिक खर्चाच्या तरतुदीसाठी या फंडात किमान आपल्या ६ महिन्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम कायम ठेवावी. यात सरासरी आपल्या गुंतवणुकीच्या १०% रक्कम गुंतवत जावी.
- शेअर मार्केट: शेअरबाजारात जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर मध्यमवर्गीय नोकरदार माणसाने ते शक्यतो टाळावे कारण अभ्यास नसतो व वेळ नसतो. मात्र जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करू इच्छित असाल तर अवश्य करावी. यासाठी अशी एखादी चांगली कंपनी निवडावी कि जिचे कॅपिटल कमी आहे मात्र त्या कंपनीच्या उत्पादनाची सर्वत्र व जास्त प्रमाणात विक्री होते थोडक्यात ज्या कंपनीची उत्पादने सर्वात जास्त लोकं वापरतात. अशी कंपनी निवडल्यावर दर महिना किंवा दर तीन महिन्यांनी एका ठराविक तारखेला किमान एक तरी शेअर विकत घ्यावा. मात्र शेअर बाजार किंवा कमोडीटी बाजारात डे-ट्रेडिंग, फ्युचर्स/ऑप्शन्स या प्रकारापासून दूर रहानाण्याचा शकतो प्रयत्न करा. शेअरबाजारात आपल्या एकूण गुंतवणुकीपैकी साधारण १५% रक्कम गुंतवावी.
- म्युचुअल फंड: म्युचुअल फंडात आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थान हे एक तज्ञ फंड व्यवस्थापक करत असतो ज्याला शेअरबाजाराचे चांगले ज्ञान ज्ञान असते तसेच सर्व साधनसामुग्रीही त्याचेजवळ उपलब्ध असते. म्हणून सर्वसामान्य माणसाने म्युचुअल फंडाच्या विविध योजनेत अवश्य गुंतवणूक करावी. हि गुंतवणूक एसआयपी च्या माध्यमातून दीर्घकाळासाठी अगदी आपण निवृत्त होईपर्यंत करावी, मध्ये जर आवश्यकता भासली तर पैसे काढावेत. म्युचुअल फंडामध्ये विविध प्रकारच्या योजना असतात तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीने गुंतवणुकीसाठी योग्य योजनेची निवड करावी. याचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या ५०% एवढे तरी असावे.
- रिअल इस्टेट: स्वत:ला राहण्यासाठी जर घर हवे असेल ते घेतलेच पाहिजे मात्र गुंतणूक म्हणून दुसरे घर घेणे किंवा कोठेतरी जागा घेऊन ठेवणे त्यासाठी बँकेचे कर्ज काढणे या गोष्टी टाळलेल्याच चांगल्या कारण एकतर स्थावर मालमत्ता विकत घेताना त्याला चांगला दर द्यावा लागतो पण विकताना तो मिळेलच याची खात्री नसते, या व्यवहारात पारदर्शकता कमी असते. अल्प काळात यातून कधीतरी जास्त परतावा मिळू शकतो मात्र दीर्घ काळात मिळणारा परतावा हा शेअरबाजारापेक्षा कितीतरी प्रमाणात कमी असतो. स्वत:साठी गृहकर्ज घेऊन घर घेत असाल तर जेव्हढा इएमआय असेल त्याच्या १०% रकमेएव्हढ्या रकमेची एसआयपी म्युचुअल फंडात अवश्य करावी जेव्हा तुमचे गृहकर्ज फेडून होईल तेव्ह्या तुम्ही बँकेत भरलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम तुम्हाला मिळू शकेल. यामुळे स्थावर मालमत्तेत किती प्रमाणात गुंतवणूक करावी याचे प्रमाण देता येत नाही. इएमआय कधीही आपल्या मासिक उत्पनाच्या ३०% ते ४०% पेक्षा जास्त नसावा.
- बॉंड/पोस्ट/बँक ठेवी या प्रकारात १५% ते २०% रक्कम गुंतवावी जी केव्हाही उपयोगी येऊ शकेल.
- सोने: उर्वरित ५% रक्कम सोन्यात गुंतवावी. खरे पाहता सोन्यातील गुंतवणूक हि भावनिक असते मात्र यातून जास्त लाभ मिळत नसतो.
- जीवन विमा: मृत्यू कुणाला केव्हा येईल हे माहित नसते म्हणून प्रत्येकानेच आपल्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून प्रथम विमा घ्यावा. बाकी विम्याचे कोणतेही प्लान घेऊ नयते. २५/३० वर्षाचे व्यक्तीला वार्षिक रु.६ ते ७००० रुपयांच्या वार्षिक हप्त्यात सुमारे रु.१ कोटीची विमा कवच मिळू शकते.
- मेडिक्लेम: प्रत्येकाने आपल्या कुतुबातील सर्व व्यक्तींचा समावेश असणारी मेडिक्लेम पोलिसी अवश्य घ्यावी कारण आपल्या घरातील कोणालाही कधीही आजार येऊ शकतो हे लक्षात ठेवा त्याची तरतूद केली तर आर्थिक भर जाणवणार नाही.
याचप्रमाणे आपले सारे असेटस विमा कवच घेऊन सुरक्षित करणे शहाणपणाचे असते. तसेच आपल्या गुंतवणुकीला वारस हा नेमलाच पाहिजे ज्यामुळे भविष्यात काही अघटीत घडले तर वारसाला त्रास होत नाही. याचप्रमाणे एकदा का आपले असेटस निर्माण झाले कि प्रत्येकाने इच्छापत्र तयार करून ठेवावे.
जर पती-पत्नी दोघेही नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांचे दोघांचे उत्पन्नाचा ताळमेळ घालून दोघांचीही वेगवेगळी गुंतवणूक करावी.