• 9503718779 Sujay
  • 9518 752 605 Sadanand
  • clients.tfs@gmail.com
  • साइन इन
  • साइन अप करा
  • Switch English

Thakur Financial Services

  • पहिले पान
  • आमच्या बाबत
  • म्युचुअल फंड
    • ऑनलान गुंतवणूक करा
    • म्युचुअल फंडाबाबत
    • म्युचुअल फंडाचे प्रकार
      • समभाग आधारित
      • कर्जरोखे आधारित
      • करबचतीच्या योजना
    • गुंतवणूक
    • शेअरबाजार
      • भांडवली बाजार
      • फ्युचर्स
      • ऑप्शन
    • डिमॅट खाते
    • उत्पादने
    • सेवा व सुविधा
  • विमा
  • आयकर
  • लेख
  • डाउनलोड
  • म्युच्युअल फंड ऑनलाईन
    • ऑनलान व्यवहार करा
  • संपर्क करा
Page 1 of 3
1 2 3 Next »

२२. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

२२. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका

१. जर तुम्ही एखादा नवीन शेअर खरेदी केलेला असेल आणि तो त्याच्या खरेदी किंमतीपेक्षा जर ८% कमी झाला असेल तर तो शेअर लगेच विकून तुमचे पैसे मोकळे केले पाहिजेत हे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या विम्या सारखे आहे. बरेचवेळा नुकसानीतील शेअर विकण्याचे टाळले जाते तेव्हा अशी अशा असते की तो शेअर परत वाढेल आणि मग आपण तो विकू मात्र जेव्हा तो ८% पेक्षा जास्त खाली जातो तेव्हा तो आणखीन खाली जाण्याचीच शक्यता जास्त असते म्हणून तो लगेच विकला पाहिजे आणि तेव्हा दुसरा शेअर ज्यात तेजी दिसत असेल तो खरेदी केला पाहिजे. जेव्हा तुम्ही ७-८% नुकसानीत शेअर विकता तेव्हा तुम्ही तुमचे भांडवल सुरक्षित करत असता, म्हणून हा निर्णय घेतला पाहिजे. ७-८% हा जास्तीत जास्त नुकसानीचा दर असतो तो सरासरी दर नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही जर असे केलेत तर मंदीच्या कालखंडात तुमचे नुकसान ३ ते ४% पर्यंत मर्यादित ठेवता येते.

मात्र हे करत असताना तुमच्या पोर्टफोलिओ मधिल जे जुने मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असतील व त्यात जर चांगला नफा झालेला असेल तर त्याला हा नियम लावण्याची गरज नाही कारण तो तुमचा विनिंग स्टॉक असतो. त्या शेअरमध्ये अशावेळी शक्य असल्यास जास्तची खरेदी करून सरासरी करणे चांगले असते.

२. एखादा खराब कामगिरी करणारा शेअर जरी कमी किंमतीत उपलब्ध असला तरी तो खरेदी करू नका त्यातून तुम्हाला काही फायदा होणार नाही.

३. नेहमीच बाजाराचे सर्वच नियम पाळा.

४. शेअर खरेदी करताना तुमच्या भावनेला कोणतिही किंमत देऊ नका. एखादा शेअर तुम्ही रु. ६० या किंमतीला खरेदी केलेला असेल आणि तो तुम्हाला रु. ५५ या किंमतीला विकावा लागला आणि परत तो रु ६५ या किंमतीला खरेदी करणे हे तुम्हाला कदाचित मूर्खपणाचे वाटेल, पण हा विचार बाजूला सारा आणि मागील घटना विसरून जर हे असे करावे लागले तर बेलाशक करा. कारण यातच तुमचा अंतिमतः फायदा होणार आहे. एखादा निर्णय चुकेल पण बरेच निर्णय बरोबर येतील ही खात्री बाळगा. कारण प्रत्येक वेळी घेतलेला निर्णय हा त्या वेळी नवीनच असतो.

५. शेअरबाजारात गुंतवणूक करताना नेहमीच दीर्घ मुदतीचाच विचार केला पाहिजे.

६. कोणतेही नियोजन केल्याशिवाय केलेल्या गुंतवणुकीला कोणताही अर्थ नसतो. गुंतवणूक करताना तुम्ही ती कोणत्या कारणासाठी करू इच्छिता आणि ती किती काळासाठी करू इच्छिता/शकता याला फार महत्व असते.

७. नेहमी मोठे गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड्स आणि परदेशी गुंतवणूकदार कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असतात किंवा कोणते शेअर्स विकत असतात हे नियमितपणे अवलोकन केले पाहिजे हे न करणे म्हणजे चांगला शेअर खरेदी/विक्री करण्याची योग्य संधी हातची दवडण्यासारखे आहे. शेअरबाजाराला दिशा देण्यासाठी फार मोठ्या रकमेची आवश्यकता असते आणि मोठे गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड्स आणि परदेशी गुंतवणूकदार हेच ती दिशा देऊ शकत असतात कारण त्यांच्याकडे भरपूर पैसे उपलब्ध असतात, नियमित येत असतात. तुम्ही जो शेअर खरेदी करण्याचा विचार करत असाल तो स्टॉक म्युच्युअल फंडाच्या एकातरी मोठ्या योजनेचा मोठा भाग असला पाहिजे. त्याचप्रमाणे जर तो शेअर एखाद्या मोठ्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट संस्थेने खरेदी केलेला असेल तर ते अधिकच चांगले, कारण हि कृती असे दर्शवित असते कि ती कंपनी योग्य दिशेने काम करत आहे आणि म्हणून त्या शेअरला चांगले भविष्य आहे. आघाडीच्या म्युच्युअल फंड योजनेत नियमितपणे गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली जात असल्यामुळे तिच्यात बाजाराला दिशा दाखवण्याची ताकद असते हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.

८. शेअरबाजारात संयम हा नेहमीच उपयुक्त गुण मानला जातो, ज्याच्याकडे तो जास्त असतो तो सर्वात जास्त फायदा मिळवत असतो. तुम्ही खरेदी केलेल्या चांगल्या शेअर्स मधिल कमी जास्त चढ उताराकडे दुर्लक्ष करा. कारण चांगले फळ मिळावयास नेहमीच वेळ द्यावा लागतो.

९. नेहमीच बाजारात काय चालले आहे याकडे लक्ष दिले पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नुकसान करून घेणेच होय. नेहमीच नवीन काहीतरी शिकण्याचा फायदाच मिळत असतो यामुळे आपली चूक दुरुस्त करता येऊ शकते. आतली बातमी मिळवण्याचा प्रयत्न करा. नुसत्या मोठ्या बातम्यांवर विसंबून राहू नका. तुमचा अभ्यास तुम्हीच केला पाहिजे. आजकाल हे करणे फारच सोपे झालेले आहे त्याचा वापर करा.

१०. तुमचे सर्वच पैसे एकाच शेअर्समधे किंवा एकाच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवू नका. तुमची गुंतवणूक ही नेहमीच निरनिराळ्या संक्षेत्रातील काही चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समधे केलेली असली पाहिजे. ती किमान पांच  क्षेत्रातील दहा शेअर्समधे करावी.

११. ब्रोकर तुम्हाला मार्जिन वापरायला देत असतो पण ते किती प्रमाणात वापरावयाचे हे तुम्ही तुमची जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार ठरवले पाहिजे कारण जास्त मार्जिन वापले आणि नुकसान झाले तर तुमचे सारेच पैसे तुम्ही घालवून बसू शकता. शक्यतोवर हे टाळा.

१३. हाव ही अतिशय धोकादायक असते ती तुम्ही मिळवलेला संपूर्ण नफा फस्त करून टाकू शकते. जेव्हा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो तेव्हा तो लगेच नगदी स्वरूपात करून घेणे केव्हाही फायदेशीर असते.

Learn from others mistakes in share marketread in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

२१. पोर्टफोलिओच्या कामगिरीचे मूल्यांकन

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

२१. पोर्टफोलिओच्या कामगिरीचे मूल्यांकन

सर्वसाधारणपणे महिन्यातून एकदा आपल्या पोर्टफोलिओचे अवलोकन करावे. पोर्टफोलिओ मधील एकेका शेअरची कामगिरी तपासावीच सोबत एकूण संपूर्ण पोर्टफोलिओच्या कामगिरीचेसुद्धा मूल्यांकन पाहावे. हे करत असताना एकूणच बाजाराच्या हालचालींचा, सेन्सेन्स किंवा निफ्टी कोणत्या दिशेने जात आहे हे पाहून आपला पोर्टफोलिओ सुद्धा त्याप्रमाणे कामगिरी करत आहे की  नाही हे तपासले पाहिजे. यामुळे आपल्याला आपल्या एकूण पोर्टफोलिओमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे की नाही हे पडताळून घेता येईल.

आता आपल्या एकूण पोर्टफोलिओ पासून आपल्याला काय नफा/तोटा झालेला आहे हे कसे तपासावे हे समुजून घेऊया. उदाहरणार्थ श्री. अजय याच्या पोर्टफोलिओचे मागील महिन्याच्या अखेरच्या दिवशीचे एकूण मूल्यांकन रू.२,००,०००/- इतके होते. या महिन्यात (मध्यावर) त्याने आणखीन रु. १०,०००/- चे शेअर्स खरेदी केले. याशिवाय चालू महिन्यात त्याला रु. १०,०००/- इतका लाभांश मिळाला. आणि चालू महिन्याच्या अखेरीला पोर्टफोलिओचे एकूण मुल्याकंन झाले रु.२,३०,०००/-

आता या महिन्यात मिळालेला परतावा (Yeild) काय दराने मिळाला हे पाहूया

= {(२३०००० – (२००००० + २००००)} / {२००००० + (१/२*२००००) } * १०० = ४.७६% एका महिन्यात मिळालेल्या नफ्याचा दर

वरील उदाहरणात नवीन गुंतवणूक केलेले रु. १००००/- आणि मिळाला लाभांश रु. १००००/- असे एकूण रु. २००००/- हे महिन्याच्या मध्यावर असल्यामुळे त्याच्या ५०% रक्कम विचारात घेतली आहे.

बीटा परिणाम: तुमच्या पोर्टफोलिओ मधून मिळालेला परतावा निफ्टी किंवा अन्य निर्देशांक यातून मिळालेला परतावा याच्या तुलनेत किती मिळू शकतो हे बीटा दर्शवित असतो. उदाहरणार्थ जर निर्देशांक २% दराने

वाढला असेल आणि तुमचा पोर्टफोलिओ १.५% दराने वाढला असेल तर तुमच्या पोर्टफोलिओचा बीटा १.५/२ = ०.७५ हा होतो. याचा अर्थ असा होतो कि जेव्हा संबंधित निर्देशांक १% ने वाढेल तेव्हा तुमच्या पोर्टफोलीचे मूल्य ०.७५% या दराने वाढेल. जर हाच बीटा जास्त असेल तर जेव्हा निर्देशांक वर जाईल तेव्हा तुम्हाला निर्देशांकापेक्षा त्या प्रमाणात जास्त फायदा होईल आणि जेव्हा निर्देशांक खाली जाईल तेव्हा त्या प्रमाणात नुकसानही जास्त होईल. सर्वसाधारणपणे भारतीय बाजारात १.२ हा बीटा तुमचा बाजाराप्रती जास्त तेजीचा कल दर्शवतो. आपल्या पोर्टफोलिओचा बीटा कसा असावा हे आपणच ठरवू शकतो, जर तुम्हाला जास्त जोखीम घेऊन जास्त फायदा मिळवावयाचा असेल तर ज्या शेअर्सचा बीटा निर्देशांकापेक्षा जास्त आहे असे शेअर्स आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये खरेदी केले पाहिजेत आणि जर तुम्ही बाजाराबाबत साशंक असला तर याच्या उलट केले पाहिजे.

जेवढा बीटा जास्त तेवढी तेजीच्या कालखंडात जास्त फायदा मिळण्याची शक्यता आणि जर तुमचा अंदाज चुकून तेव्हा मंदी आली तर होणारे नुकसानही जास्त होणार.

जेवढा बीटा कमी तेवढी तेजीच्या कालखंडात कमी फायदा मिळण्याची शक्यता आणि जर तुमचा अंदाज चुकून तेव्हा मंदी आली तर होणारे नुकसानही कमी होईल.

आणि जर तुम्हाला निर्देशांकाप्रमाणेच परतावा मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा बीटा १ इतका ठेवला पाहिजे.

कोणत्याही शेअरचा बीटा काढण्यासाठी त्याचा ऐतिहासिक डेटा वापरला जातो. याच्यामुळे भविष्यातील शेअरच्या किंमतीचा अंदाज बांधता येत नाही मात्र निर्देशांकाच्या प्रमाणात त्या शेअरची वाटचाल कशी असू शकेल याचा अंदाज बीटामुळे बांधता येऊ शकतो.

read in Marathi. mutualfundmarathi.comValuation of Portfolio read in Marathi. How to track your portfolio
Read more
  • Published in Capital Market
No Comments

२०. क्षेत्रीय परिभ्रमण

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

२०. क्षेत्रीय परिभ्रमण

आपण पहिले असेल की आयटी स्टॉक जेव्हढे लोकप्रिय असतात तेव्हढे बँकिंग/फायनान्शिअल स्टॉक लोकप्रिय असत नाहीत. तसेच मोठ्या एफएमसीजी, फार्मा, कंझुमर ड्युरेबल कंपन्यांचे शेअर्स त्याप्रमाणात लोकप्रिय नसतात. आयटी कंपन्यांमध्ये नेहमीच मोठे चढ उतार असतात व म्हणून जास्त फायदा मिळवण्यासाठी म्हणून जर का तुम्ही आयटी कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा परत विचार करा. ट्रेडर हा एखाद्या दिवशी सुद्धा अनेकवेळा त्याच शेअर्सची खरेदी विक्री करत असला तरी ज्याला शेअर्स गुंतवणूक म्हणून खरेदी करावयाचे असतात त्याने नेहमीच ज्या शेअर्समध्ये कमी प्रमाणात चढ उतार असतात असेच शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे त्याच्या हिताचे असते.

जेव्हा एका क्षेत्रात मोठी उलाढाल होत असते तेव्हा अन्य क्षेत्रात त्याप्रमाणात कमी उलाढाल होत असते, काही दिवसांनी हि परिस्थिती बदलते आणि दुसऱ्या क्षेत्रावर ट्रेडर्स जास्त लक्ष केंद्रित करू लागतात. हे असे क्षेत्रीय परिभ्रमण बाजारात नेहमीच घडत असते. अनेक वेळा ICE (इन्फोटेक, कम्युनिकेशन आणि एंटरटेनमेंट स्टॉक)  स्टॉक जास्त आकर्षक वाटतात त्याचवेळी अन्य शेअर्स मध्ये मात्र त्या प्रमाणात हालचाल दिसत नाही. एक गुंतवणूकदार म्हणून जेव्हा कोणत्याही शेअर्सच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि ती त्यांच्या अर्निंग रेशोसी मिळती जुळती नसेल तर अशा वेळी ते शेअर्स विकून नफा पदरात पाडून घेतला पाहिजे आणि ज्या शेअर्समधे भविष्यात विश्लेषणानुसार  तेजी येण्याचे संकेत दिसत असतील त्या शेअर्समधे गुंतवणूक केली पाहिजे. थोडक्यात जिथे फायदा जास्त प्रमाणात मिळालेला आहे तो रोखीत परावर्तित करून आलेले पैसे ज्या शेअर्सच्या किंमती काही तात्पुरत्या कारणामुळे कमी झालेल्या आहेत व भविष्यात जर ते परत वाढण्याची शक्यता असेल तर ते स्टॉक तुम्ही खरेदी केले पाहिजेत.

वारंवार क्षेत्रीयपरिभ्रमण होण्याचे महत्वाची दोन कारणे असतात एक म्हणजे भीती आणि दुसरे असणारी पैशांची हाव, या दोन गोष्टींमुळेच बाजारात नियमितपणे काहीतरी कारण शोधून चढ उतार होत असतात आणि हेच कारण कारण असते की एका क्षेत्रातून संधी संपली असे वाटू लागते आणि मग दुसऱ्या क्षेत्राचा शोध सुरु होतो. म्हणून गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर त्याने शेअर्स खरेदी करताना त्याची योग्य किंमत काय आहे हे विश्लेषण करून नंतरच ते खरेदी केले पाहिजेत. बाजारात अनेक वेळा तुम्हाला असे शेअर्स दिसतील की त्यांचा पीई १०० पेक्षा सुद्धा जास्त आहे तर काही फंडामेंटली मजबूत शेअर्सचा पीई १० पेक्षा सुद्धा कमी असू शकतो.

अनेक ट्रेडर्स तेजी असणाऱ्या शेअर्सच्या, झटपट जास्त पैसे मिळवण्यासाठी मागे धावत असतात आणि ते अशा शेअर्सकडे दुर्लक्ष करत असतात की जे हळू हळू पण स्थिरपणे वाढत असतात. यामुळे होते काय की जेव्हा जास्त तेजीवाले स्टॉक आपटतात तेव्हा त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली येतात आणि जे स्टॉक हळू हळू स्थिरपणे वाढत असतात त्यांच्या किंमती तेव्हा कमी प्रमाणात खाली येतात हे वास्तव आहे. जेव्हा अपेक्षेप्रमाणे कंपन्यांची कमाई वाढणे थांबते तेव्हा त्यांच्या किंमती या कमी होत असतात मात्र हा विचार तेजी असणाऱ्या शेअर्सबाबत कोणी करताना दिसत नाही आणि मग ते आपल्या नशिबाला दोष देत बसतात. म्हणून कोणतेही शेअर्स घेताना सारे रेशोज तपासूनच शेअर्सची खरेदी केली पाहिजे.

येथे हा उद्देश नाही की मी फक्त बँकिंग, फार्मा किंवा एफएमजीसी चे शेअर्स घ्या असा सल्ला देत आहे तर तुम्हाला बाजारात होत असलेल्या क्षेत्रीय परिभ्रमणाची कल्पना असावी व फक्त फंडामेंटल जे कधी बदलत नसते त्याचा विचार करून सोबत इक्विटीचे अर्निंग्सशी असलेले प्रमाण यावरच कोणत्याही शेअरची किंमत ठरत असते हे तुमच्या लक्षात आणून देणे हा उद्देश आहे. म्हणून ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला रस असेल त्या क्षेत्रातील कंपन्यांची कामगीरी तपासा आणि थोडे थोडे शेअर्स घेत एक चांगला पोर्टफोलिओ बनवा. शेअर्स घेताना असे घ्या की जरी त्यांच्या किंमती काही तात्पुरत्या कर्णमुकले कमी झाल्या तरी परत चांगली परिस्थिती निर्माण झाली की त्यांच्या किंमती परत वेगाने वाढू लागतील आणि दीर्घ काळाचा विचार केला तर निश्चितच त्यातून चांगला फायदा मिळाला पाहिजे. शेअर बाजार हा अल्प काळात थोडे पैसे मिळवण्यासाठी नसून तो दीर्घ मुदतीत भरीव संपत्ती निर्माण करण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठी स्वप्ने मोठी पहा त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा आणि संयम बाळगा.

शेअर बाजारातून पैसे मिळवण्यासाठी ३ गोष्टी आवश्यक आहेत, वेळ (Time), ज्ञान (Knowledge) आणि खात्री (Conviction).

वेळ: संपत्ती निर्माण होण्यासाठी वेळ द्या, चांगले शेअर्स खरेदी करा आणि परत परत नेहमी खरेदी करत रहा. हे असेच दीर्घकाळ करत रहा. संपत्ती आपोआप निर्माण होईल हा विश्वास ठेवा.

ज्ञान: शेअर्स खरेदी करण्यापूर्वी संबंधित कंपनीचे पूर्ण विश्लेषण करा. त्यासाठी आजकाल अनेक साधने नेटवर मोफत उपलब्ध आहेत त्यांचा वापर करा.

खात्री: पूर्ण विश्लेषण केल्यावर पूर्ण खात्री झाल्यावरच शेअर्सची खरेदी करा हे करताना पुढील १० ते १५ वर्षांचा विचार करा.

हे अजिबात करू नका: आणि एक महत्वाचे म्हणजे कोणाकडून टिप्स वगैरे विकत घेऊ नका हा एक धंदा आहे, एक लक्षात ठेवा जर ती व्यक्ती तुम्हाला टीप देऊन पैसे मिळवून देऊ शकते तर ते ज्ञान स्वतःसाठी वापरून तो पैसे नाही का मिळविणार? आज देशात जे मोठे श्रीमंत गुंतवणूकदार आहेत ते तुम्हाला आमच्याकडून टिप्स विकत घ्या असे कधी सांगताना तुम्ही पहिले आहे काय? टीव्हीवर टीप देणे हा सुद्धा एक धंदाच आहे.  खोटं वाटत असेल तर खात्री करून घ्या, ते जे तुम्हाला सल्ला म्हणून देतात तो एका वहीत लिहून ठेवा आणि परिणाम पाहत रहा, मी काय सांगतो आहे ते तुमच्या लक्षात येईल याहून जास्त मी इथे काही सांगू शकत नाही.

About sector rotation read in marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१९. पोर्टफोलिओचे पुनरावलोकन

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१९. पोर्टफोलिओचे पुनरावलोकन

पोर्टफोलिओ व्यवस्थापन हि एक नियमितपणे चालू असणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नियमितपणे आपल्या सर्व गुंतवणुकीचे पुनरावलोकन करावे लागते. आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असणाऱ्या प्रत्येक शेअर्स, रोखे यांच्या कामगिरीचे मूल्यांकन नियमितपणे तपासून त्याच्या खरेदी अथवा विक्रीचा निर्णय नियमितपणे घ्यावा लागतो. अर्थात आपल्या पोर्टफोलो मध्ये असलेल्या एकूण गुंतवणूक रक्कम, त्याचा आकार आणि कोणत्या प्रकारचे साधन पोर्टफोलिओ मध्ये आहे यानुसार किती वेळा पोर्टफोलिओचे पुनरावलोकन केले पाहिजे हे अवलंबून असते. यासाठी तुम्ही किती वेळ देता यावर तुम्हाला मिळणारा परिणाम अवलंबून असतो. जर तुम्ही जास्त वेळ दिला, तुम्हाला जास्त चांगला परिणाम मिळू शकतो. जर तुमचा पोर्टफोलिओ मोठा असेल तर, किमान ज्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता असेल तेव्हा तुम्ही दिवसातून एक तास तरी यासाठी दिला पाहिजे. जेव्हा बाजार स्थिर असेल तेव्हा तुम्ही आठवड्यातून एखादा दिवस यासाठी दिला तरी चालू शकेल.  यासाठी नियमितपणे बाजारातील उलाढालीवर लक्ष ठेवले पाहिजे.

पहा, विश्लेषण करा आणि आवश्यकता असेल तर बदल करा

तुमचा पोर्टफोलिओ नीट काळजीपूर्वक तपासा, त्याचे योग्य प्रकारे विश्लेषण करा आणि जर गरज असेल तरच त्यातील काही शेअर्स विका आणि दुसरे नवीन शेअर्स खरेदी करा. मात्र थोडे नुकसान झाले किंवा फायदा झाला म्हणून उगाच कारणाशिवाय तुमच्या पोर्टफोलिओ मधिल शेअर्स विकू नका, कारण असे करण्याने तुम्ही तुमचे भविष्यात होणाऱ्या फायद्यात नुकसान करून घेता. वारंवार शेअर्सची खरेदी विक्री करून तुम्ही उगाच कारणाशिवाय जास्त कर भरता दुसरे म्हणजे उगाच तुमच्या ब्रोकरला फायदा (ब्रोकरेज देऊन) करून देत असता. वारंवार खरेदी विक्री करणारा ट्रेडर ब्रोकरला नेहमीच प्रिय असतो कारण तुम्हाला फायदा होउदे किंवा नुकसान त्याला तुम्ही केलेल्या उलाढालीवर ब्रोकरेज मिळणारच असते.

खालील बाबी नेहमी तपासूनच निर्णय घ्या:

१) जर तुमच्या शेअर्सचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे असेल व ते जर वाढत असेल तर शेअरची किंमत थोडी बहुत कमी जास्त झाली किंवा ती वाढली नाही तरी तो विकू नका तर त्याला सांभाळून ठेवा. कारण कोणत्याही शेअरची किंमत वाढण्यामागे प्रतिशेअर कमाई हे एक महत्वाचे कारण असते. सयंम हा बहुमोल आहे म्हणूनच तो दुर्मिळ आहे, सयंम पाळलात तर त्याचे मोठे बक्षीस तुम्हालाच मिळणार हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.

२) जर तुम्ही असा विचार करत असाल की  आत्ता चांगला फायदा झालेला आहे तेव्हा आपल्याकडील फायद्यात असणारा शेअर विकूया आणि तो परत खाली आला की परत विकत घेऊ. या प्रकारे विचार करण्यात दोन प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. एक तुम्ही दोन वेळचे ब्रोकरेज देता (एकदा विकताना आणि परत खरेदी करताना) आणि दुसरे म्हणजे तो शेअर सतत वाढत गेला तर तो तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करता येणार नाहीच आणि नंतर जर खरेदी करावयाचा झाला तर जास्त किंमतीत खरेदी करावा लागेल आणि किंमत वाढण्याचा तुम्हाला फायदा काहीच मिळणार नाही.

३) बाजारात खरेदीची योग्य वेळ ठरवण्यात उगाच तुमचा वेळ व्यर्थ घालवू नका कारण या जगात ते परिपूर्णपणे कोणालाच जमत नसते.

४) मात्र जर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये जर एखाद्या क्षेत्रातीलच अनेक शेअर्स असतील तर त्या क्षेत्रावर नियमित नजर हि ठिवावीच लागते व परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.

५) जर तुमची गुंतवणूक मोठी असेल तर किमान ५ क्षेत्रात ती विभागलेली असली पाहिजे व किमान १० शेअर्स तरी तुमच्या पोर्टफोलिओ मधे असले पाहिजेत याची काळजी घ्या.

६) मग्जला काही प्रकरणात दिलेल्या रेशोंप्रमाणे तुमच्या पोर्टफोलिओचे विश्लेषण करा आणि नंतरच कोणताही निर्णय घ्या, घाई घाई मध्ये कोणताही निर्णय घेतल्यास तो चुकण्याचीच जास्त शक्यता असते हे नेहमी लक्षात ठेवा.

mutualfundmarathi.comPortfolio Evaluation read in Marathi. How to track your portfolio read in Marathi.
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१८. वयानुसार पोर्टफोलिओ

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१८. वयानुसार पोर्टफोलिओ

आपण मागील लेखात पहिले आहेच कि आपली गुंतवणूक हि गुंतवणुकीच्या विविध साधनात गुंतवून आपण जोखीम कमी करू शकतो सोबत आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवू शकतो. आपला पोर्टफोलिओ कसा तयार करावा याचे नियोजन प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आणि त्याच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार करावे लागते. मात्र सर्वसाधारणपणे जर सांगावयाचे झाले तर आपल्या सध्याच्या वयानुसार गुंतवणूक कशी करावी याचे येथे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. असे मानले जाते कि जेवढे वय कमी तेव्हढा आपल्याकडे कालावधी जास्त असतो म्हणून कमी वयात जास्त जोखीम असणाऱ्या साधनात जास्त गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळवावा आणि जसे वय वाढत जाईल तसे जोखमीच्या साधनातील गुंतवणूक कमी कमी करत न्यावी व ती सुरक्षित साधनात वाढवत न्यावी असे एक सर्वमान्य सूत्र आहे.

खालील टेबलचा वापर करून तुम्ही निर्णय करू शकता:

वय पोर्टफोलिओ
३० पेक्षा कमी 80% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स  
10% रोख (लिक्विड फंड्स)
10% एफडी किंवा रोखे
३० ते ४० 70% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स
10% रोख (लिक्विड फंड्स)
20% एफडी किंवा रोखे
४० ते ५०60% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सs
10% रोख (लिक्विड फंड्स)
30% एफडी किंवा रोखे
५० ते ६०50% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स
10% रोख (लिक्विड फंड्स)
40% एफडी किंवा रोखे
६० पेक्षा जास्त 40% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स
10% रोख (लिक्विड फंड्स)
50% एफडी किंवा रोखे

तुम्ही तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार आणि किती कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची आहे व तुम्हाला काय दराने तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक परतावा मिळावा यावर अवलंबून तुम्ही यामध्ये बदल करू शकता. एक लक्षात ठेवले पाहिजे

जास्त जोखीम = जास्त फायदा किंवा जास्त नुकसान होण्याची शक्यता.

मध्यम जोखीम = माफक फायदा किंवा माफक नुकसान होण्याची शक्यता.

कमी जोखीम = कमी फायदा किंवा कमी नुकसान होण्याची शक्यता.

मात्र एक गोष्ट निश्चितपणे प्रत्येकाने केलीच पाहिजे कि महागाईवर मात करून दीर्घ मुदतीत जास्त फायदा मिळण्यासाठी काही रक्कम हि शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडाच्या समभाग आधारित योजनेत गुंतवलीच पाहिजे.  हा नियम प्रत्येकालाच लागू होतो मग तुमचे वय कितीही असुदे याचे कारण फक्त शेअरबाजारातूनच सर्वाधिक परतावा मिळू शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एफडी किंवा रोख्यात गुंतवणूक करता तेव्हा हि काळजी घेतली पाहिजे कि प्रत्येकाची मुदतपूर्तीची वेळ वेगवेगळी असेल यामुळे तुमचा कॅश फ्लो प्रवाही राहील.

आणि महत्वाचे म्हणजे कायम नियमितपणे थोडी का होईना गुंतवणूक करत राहावे ज्याचा उपयोग भविष्यात होत असतो.

mutualfundmarathi.comPortfolio As per age read in Marathi. How to track your portfolio read in Marathi.
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१७. विविधिकरणाचे महत्व

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१७. विविधिकरणाचे महत्व

आपली गुंतवणूक विविध साधनात गुंतवून बाजारातील चढ उतारावर मात करून मुद्दल सुरक्षित ठेवले जाऊ शकते.  विविधीकरण म्हणजे आपली काही गुंतवणूक शेअर बाजार व संबंधित योजनेत गुंतवणूक करून आपण महागाईच्या दरापेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकतो तर काही रक्कम सुरक्षित साधनात गुंतवून स्थैर्य प्राप्त करू शकतो. ज्यामुळे जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा जरी शेअर बाजारात नुकसान झाले तरी सुरक्षित साधनात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झालेले नसते याचा दुसरा एक फायदा करून घेता येतो कि बाजार जर एकदम मोठ्या प्रमाणात खाली आला तर सुरक्षित साधनातील गुंतवणूक आपण बाजारात करून सरासरी करू शकतो व मंदी नंतर येणाऱ्या तेजीच्या कालखण्डात जास्त पैसे मिळवू शकतो.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना आपण एक काळजी घेतली पाहिजे कि आपले सर्वच पैसे कोणत्याही एका कंपनीच्या शेअर्समधे न गुंतवता ते अनेक कंपन्यांच्या शेअर्समधें गुंतवावेत आणि तेसुद्धा विविध क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या शेअर्समधें गुंतवावी. प्रत्येक क्षेत्रावर त्या क्षेत्राशी संबंधित बातमी, करतील बदल, आयात निर्यात धोरण, व्याज दरातील बदल इ. गोष्टींचा परिणाम होत असतो. उदा. आयटी क्षेत्रावर परकीय चलनातील दारांच्या बदलांचा मोठा परिणाम होत असतो, बँकिंग क्षेत्रातील शेअर्स वर व्याज दरातील बदलांचा मोठा परिणाम होत असतो, फार्मा क्षेत्रावर यूएस एफडीए च्या निर्णयाचा मोठा परिणाम होत असतो, तेल कंपन्यांच्या शेअर्सवर क्रूड ऑइल दरातील फरकाचा परिणाम होत असतो, एफएमजीसी क्षेत्रावर कर बदलांचा परिणाम जास्त होत असतो, महागाईच्या दराचा परिणाम व्याज दरात चढ उतार होण्यात होत असतो. म्हणून जर आपण आपली शेअर बाजारातील गुंतवणूक हि सर्व महत्वाच्या क्षेत्रातील आघाडीच्या शेअर्समध्ये केली तर काही शेअर्सवर सकारात्मक तर काही शेअर्सवर नकारात्मक परिणाम होऊन संतुलन साधले जाते. तसेच जेव्हा बाजारात सर्वंकष तेजी असते तेव्हा सर्वच शेअर्सचे मूल्य वृद्धी कमी जास्त प्रमाणात होऊन जास्तीचा फायदा होतो. मंदीच्या काळात ज्या क्षेत्रावर सकारत्मक बातमी इ. चा परिणाम होऊन होणाऱ्या फायद्यामुळे अन्य शेअर्समध्ये झालेले नुकसान कमी होते. विविध क्षेत्रातील शेअर्स खरेदी करताना त्या त्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत यासाठी पूर्वी सांगितलेले नियम पाळावेत.

तसेच आपली सर्वच गुंतवणूक शेअर्समधें न करता त्यातील काही रक्कम हि बॉण्ड्स, बँक एफडी, लिक्विड फंड्स इ. कमी किंवा शून्य जोखमीच्या साधनात गुंतवावी. यामुळे दीर्घ मुदतीत पोर्टफोलिओला स्थैर्य प्राप्त होते.

आपल्या पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचे प्रमुख उद्देश:

१) मुद्दल सुरक्षित ठेवणे

२) स्थिर उत्पन्न मिळवणे

३) भांडवल वृद्धी करणे

४) तरलता सांभाळणे – हि फार महत्वाची असते, गरजेला कधीही पैसे उपलब्ध असतात, तसेच संधी मिळाल्यास गुंतवणूक करता येते.

एक मात्र तेवढेच खरे असते कि विविधीकरणाने जोखीम कमी होते त्याच प्रमाणे तेजीच्या काळात जास्त पैसे मिळण्याची संधी सुद्धा कमी होते परंतु एक लक्षात ठेवले पाहिजे कि हत्ती होऊन ओझे वाहण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी कारण जास्त फायद्याच्या मोहापायी अनेक गुंतवणूकदार सारे काही गमावून बसतात. आपले उदिष्ठ हे महागाई पेक्षा जास्त दराने उत्पन्न मिळवणे, दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करणे आणि मिळवलेल्या संपत्तीचे जतन करणे हे असावे. हे सारे विविधीकरणाच्या माध्यमातून साधता येते.

थोडक्यात विविधिकरणामुळे निश्चिन्त पणे झोपता येते.

Importance of diversification read in Marathi. How to track your portfolio read in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१६. शेअर्स कधी विकावेत

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१६. शेअर्स कधी विकावेत

शेअर्स कधी विकावे हा एक प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात केव्हा ना केव्हा तरी येतोच. यासंबंधी काही महत्वाचे घटक समजून घेऊया.

शेअर्स खरेदी कधी करावेत हे आपण मागील काही लेखात पहिले असेल. कोणते शेअर्स खरेदी करावेत हे पाहणे तसे सोपे आहे, खरेदी केलेले शेअर्स कधी विकावेत हा जास्त कठीण प्रश्न आहे. पण इथे मी तुम्हाला काही टिप्स देण्याचा प्रयत्न करतो याचा वापर करून तुम्ही शेअर्स विक्रीचा निर्णय करू शकता. एक लक्षात ठेवा येथे दिलेल्या एक सूचनेचा वापर करून शेअर्स विक्री करायची नसून या सर्व सूचनांचा एकत्रितपणे विचार करूनच विक्रीचा निर्णय करावयाचा आहे.

१) जर तुम्ही खरेदी केलेला शेअर तुमच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसेल किंवा तुम्ही भविष्यात काही घोषणा होईल या अपेक्षेने शेअर्स खरेदी केले असतील व घोषणाच जर होत नसेल तर विक्री केली पाहिजे. बरेच फार्मा कंपन्यांचे शेअर्स यामध्ये मोडतात. एखादया नवीन औषध बाजारात आणण्याची चर्चा सुरु होते पण ते तसे आणलेच जात नाही. किंवा US FDA काही कंपन्यांना औषध निर्मितीवर आणलेली बंधने लवकरच उठवणार आहे अशी हवा झालेली असते पण तसं होताना दिसत नाही तेव्हा त्या शेअरची किंम्मत कमी होऊ लागते कारण बरेच गुंतवणूकदार तो विकण्याच्या मागे लागतात अशा वेळी आणखीन जास्त नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्याकडील ते स्टॉक विकणे योग्य निर्णय असू शकतो.

२) जर एखाद्या शेअरची किंमत ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली असेल आणि जर तुम्हाला फार मोठा फायदा होत असेल. तुम्ही ज्यावेळी शेअर्स खरेदी केले होतेत तेव्हाच्या किंमतीत ५ ते १० पट किंवा जास्त वाढ झालेली असेल तर तुम्ही किमान तुमची गुंतवलेली रक्कम अधिक वार्षिक २०% दराने होणारा नफा इतक्या रकमेचे शेअर्स विकून बाकीचे आणखीन फायदा मिळावा या हेतूने ठेऊ शकता.  काही वेळा परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्याकडील असामान्य फायदा झालेले सर्वच शेअर्स विकून तो शेअर परत खाली येण्याची वाट पाहणे हे सुद्धा जास्त फायदेशीर होऊ शकते. पण फंडामेंटल मध्ये बदल झालेला नसेल तर शक्यतो सर्व शेअर्स न विकता काही शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणे चांगले असते.

3) जेव्हा सध्याची शेअरची किंमत हि भविष्यातील अपेक्षित उत्पन्नाची शाश्वती देत नसेल किंवा जेव्हा ईपीएस कमी होऊ लागते तेव्हा त्याची विक्री केली पाहिजे. जेव्हा विक्रीचा निर्णय करावयाचा असतो तेव्हा सुद्धा खरेदी करताना आपण जे रेशो तपासले होते ते परत तपासले पाहिजेत व त्यातून जर शेअरचे भविष्य आशादायक नसेल तर ते विकलेच पाहिजेत.

४) आपल्याकडील असणारे शेअर्स विकून येणाऱ्या पैशातून अन्य दुसऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे जास्त फायदेशीर होऊ शकते अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा हा निर्णय केला पाहिजे.

५) जर कधी शेअर विकून कर वाचवता येणार असेल तर असे करून चालू शकते. समजा तुम्हाला तुमच्याकडील शेअर्स विकून  भरपूर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन झालेला आहे अशा वेळी तुम्ही दुसरा एखादा असा शेअर खरेदी केला पाहिजे कि ज्यामध्ये लवकरच लाभांश दिला जाणार आहे आणि जेव्हा तो लाभांश दिला जातो त्यानंतर तो विकला पाहिजे यामुळे तुम्हाला होणारे भांडवली नुकसान पूर्वीच्या भांडवली फायद्यातून तुम्ही वजा करून आयकर वाचवू शकता.

६) जर कंपनीच्या कामगिरीत किंवा फंडामेंटल्समध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत कि ज्यामुळे त्या शेअरची किंमत कमी होऊ शकते तो शेअर विकला पाहिजे. काही वेळा तुमच्याकडे ज्या कंपनीचे शेअर्स असतात ती कंपनी एखादया नवीन व्यवसायाची घोषणा करते मात्र तो व्यवसाय प्रत्यक्षात सुरु होऊन त्यापासून फायदा मिळण्यासाठी जर बराच काळ जाणार असले तर अशा वेळी त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत काही काळासाठी खाली येण्याची शक्यता असते, अशा वेळी आपल्याकडील शेअर्स विकून पैसे मोकळे करावेत आणि त्या शेअरची किंमत पुरेशा प्रमाणात कमी होऊन त्यात परत तेजीचे संकेत दिसू लागले कि तो शेअर परत खरेदी करावा.

७) ज्या शेअरची किंमत सतत वाढत असते त्या कंपनीचे उत्पन्न, विक्री, नफा इ. सुद्धा त्याच प्रमाणात वाढत राहिले पाहिजे, मात्र जर नुसतीच किंमत वाढत असेल व परतावा २ ते ३ तिमाही निकालात सुद्धा पुरेशी वाढ दाखवत नसेल तर त्या शेअरची किंमत कमी होण्याची शक्यता वाढते, अशा वेळी तो विकून टाकावा.

८) योग्य वेळी नुकसान कमी करण्यासाठी सुद्धा शेअर्स विकावे लागतात. पण घाबरून जाऊन मात्र शेअर्स विकू नका. सर्वसाधारणपणे असा एक नियम आहे कि जर तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत ८% किंवा जास्त कमी झाली तर तो शेअर आणखीन खाली जाण्याचे संकेत देत असतो अशावेळी पुढे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या कडील असणारे शेअर्स विकून लॉस बुक करावा. यामुळे तुमचे पैसे मोकळे तर होतातच परत तुम्ही दुसरी गुंतवणुकीची चांगली संधी साधून झालेले नुकसान भरून काढू शकता. पण हे प्रत्येक वेळेलाच बरोबर ठरेल असेही नसते. काही वेळा तो शेअर ८% ते १०% कोसळून परत उसळी घेऊ शकतो म्हणून सर्व रेशो तपासूनच विक्रीचा निर्णय घेतला पाहिजे.

तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची माहिती नियमितपणे करून घेत रहा. नियमितपणे प्रत्येक ३ महिन्यांनी जाहीर होणारे निकाल काळजीपूर्वक पडताळून पहा. सर्व रेशो नियमितपणे तपासा. संबंधित कंपनीची पूर्ण माहिती मिळावा. ती कोणते उत्पादन किंवा सेवा विकत असते त्याची बाजारातील उपयुक्तता आणि खप तपासा. खप सतत वाढत असेल तर चिंता करू नका. काही वेळा चांगल्या कंपनीचे शेअर्स जेव्हा खाली येतात तेव्हा ते जास्तीचे खरेदी करून सरासरी करत राहून जेव्हा ते असामान्य फायदा मिळवून देतात तो पर्यंत थांबणे योग्य होऊ शकते.


                                                                                                                                              
When to sale shares read in Marathi. How to track your shares details read in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१५. शेअर्स खरेदी करण्याची वेळ

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१५. शेअर्स खरेदी करण्याची वेळ

शेअर्स खरेदी करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स

१) दीर्घ मुदतीत आणि अल्प मुदतीत कमाई मध्ये होणारी भरीव वाढ. यासाठी मागील ३ वर्षात ज्या कंपन्यांची वार्षिक कमाई २५% किंवा जास्त प्रमाणात वाढलेली असली पाहिजे. आणि नजीकच्या तिमाहीमध्ये हि वाढ सुद्धा २५% किंवा जास्त असली पाहिजे.

२) विक्रीमध्ये प्रभावी वाढ असली पाहिजे त्याचप्रमाणे नफ्याचे विक्रीशी वाढीव प्रमाण असले पाहिजे आणि सोबत ते भांडवलाच्या प्रमाणातही वाढलेले असले पाहिजे. थोडक्यात विक्री, विक्रीशी नफ्याचे प्रमाण किमान २५% दराने वाढलेले असले पाहिजे आणि नफा – भांडवल रेशो मध्ये किमान १५% किंवा अधिक दराने वाढ झालेली असली पाहिजे.

३)  कंपनीने एखादे अगदी नवीन प्रकारचे उतपादन किंवा सेवा बाजारात आणली असेल तर ती वेळी शेअर खरेदीसाठी चांगली असू शकते.  यामुळेच ९० च्या दशकात आयटी कंपन्यांच्या शेअर्समधे ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

४) एखाद्या आघाडीच्या उद्योग समूहातील सर्वात मोठी कंपनी मात्र अशा वेळी जवळपास एकूण उद्योग समूहाच्या भांडवलामधे त्या कंपनीचा ५०% किंवा जास्त हिस्सा असला पाहिजे. आघाडीच्या उद्योग समूहावर नजर ठेवा व त्यातील ज्या कंपनीच्या शेअर्सची किंमत बाजारावर प्रभाव दाखवत असेल तर तो शेअर खरेदी करण्यायोग्य असतो. मात्र त्याच उद्योग समूहा मधील एखादा शेअर कमी किंमतीला उपलब्ध आहे म्हणून खरेदी करू नये.

५) उच्च दर्जाचे पत मानांकन असलेल्या एखाद्या संस्थेने जर एखादी कंपनी प्रायोजित केलेली असेल किंवा जर अनेक चांगली कामगिरी करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांच्या  पोर्टफोलिओ मधे जे समान शेअर्स असतील तर खरेदी करावेत.

६) नवीन उच्चांक. ज्या शेअर्समध्ये नवीन नवीन उच्चांक होतात आणि सोबत जर त्याच्या उलाढालीतसुद्धा  नजरेत भारण्याइतकी वाढ होत असेल तर तो शेअर आणखीन वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणून असा शेअर्स अवश्य खरेदी करावा.

७) जेव्हा बाजारात सर्वंकष तेजी असते तेव्हा चांगल्या कंपंन्यांचे शेअर्स अवश्य खरेदी करावेत.

८) जेव्हा बाजारात सर्वंकष मंदी असेल तेव्हा शेअर्स खरेदी करण्याचे टाळावे कारण त्या काळात शेअर्सच्या किंमती आणखीन खाली येण्याची शक्यता असते. मात्र एकदा का बाजाराने तळ गाठला कि चांगले स्टॉक खरेदी करण्यास सुरुवात करावी. वर्ष १९९२ मध्ये सेन्सेक्स ४५०० पासून १५०० पर्यंत खाली आला होता, वर्ष २०००-०१ मध्ये तो ६३०० ते २१०० पर्यंत खाली आला होता, २००८-०९ मध्ये तो २१००० पासून ७६०० पर्यंत खाली आला होता म्हणजे यापुढे जेव्हा केव्हा बाजार ५०% किंवा जास्त कोसळेल तेव्हा आपण डोळे झाकून चांगले शेअर्स खरेदी केलेच पाहिजेत. बाजाराने एकदा का तळ गाठला आणि त्याने परत तेजीचा कल दाखवावयाला सुरुवात केली (यावेळी परदेशी गुंतवणूकदार व म्युच्युअल फंड्स जोमाने खरेदी चालू करतात) कि आपणसुद्धा चांगले शेअर्स खरेदी सुरु केली पाहिजे.



4. Leading stock in a leading industry group. Nearly 50% of a stock’s price action is a result of its industry group’s performance. Focus on the top industry groups and within those groups select stocks with the best price performance. Don’t buy laggards just because they look cheaper.5. High-rated institutional sponsorship. You want at least a few of the better performing mutual funds owning the stock. They’re the ones who will drive the stock up on a sustained basis. 6. New Highs. Stocks that make new highs on increased volume tend to move higher. Outstanding stocks usually form a price consolidation pattern, and then go on to make their biggest gains when their price breaks above the pattern on unusually high volume.7. Positive market. You can buy the best stocks out there, but if the general market is weak, most likely your stocks will be weak also.

Buying timing of the shares read in Marathi. How to track your shares price read in Marathi. mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१४. अनेक क्षेत्रातील सवलतीत असणारे शेअर्स – सौदा करून विकत घ्या

बाजारात अनेकवेळा काही चांगले शेअर्स अगदी कमी किंमतीमध्ये उपलब्ध असतात, जे सध्या अनेकांचे नावडते झालेले असतात. असे स्टॉक शोधण्याची एक चांगली पद्धत असते.

१) प्रथम असे शेअर्स शोधा कि काही तात्कालिक कारणामुळे ज्यांच्या किंमती कमी झालेल्या असतात व जे स्टॉक विकत घेण्यास बहुतांशी अल्पकालीन गुंतवणूकदार इच्छुक नसतात.

२) वरीलप्रमाणेच तर्क लढवून असे पहा कि एखाद्या कोणत्या क्षेत्रातील बहुतांशी स्टॉक या प्रकारात मोडत आहेत ते पहा. म्हणजेच किंमत कमी झाली आहे व दुर्लक्षित आहेत.

३) आता यातील काही शेअर्स तुम्ही तुमच्या “अवलोकनाच्या यादीत” समाविष्ट करा. हे असे करण्यासाठी खालील घटक विचारात घ्या:

पी/इ रेशो (Price to Earnjng Ratio): यासाठी कमीत कमी १० व जास्तीत जास्त ३० शेअर्स निवडा, ज्यांचा सध्याचा पी/ई ३० च्या जवळपास असला पाहिजे. बरेच वेळा कमी पी/इ असणारा शेअर हा अल्पकालीन गुंतवणूकदार खरेदी करण्यासाठी इच्छुक नसतात, म्हणून दुर्लक्षित असतो. आता अशा शेअर्स बाबत आघाडीचे विश्लेषक काय म्हणतात ते तपासून पहा. यासाठी तुम्ही एखादया चांगल्या मोठ्या ब्रोकरच्या संकेतस्थळावर हि माहिती पाहू शकता. उदा. ICICIDIRECT चे संकेतस्थळाला तुम्ही भेट देऊन हे पाहू शकता.

किंमत-विक्री गुणोत्तर (Price to Sales Ratio):  याला PSR असेही संबोधले जाते. ह्याचा वापर स्टॉकचे सूक्ष्म विश्लेषण करण्यासाठी केला जातो. बरेच गुंतवणूकदार ज्या शेअरचा  PSR १ पेक्षा कमी असतो तो गुंतवणुकीसाठी चांगला शेअर मानत असतात. यासाठी मी जास्तीत जास्त 0.5 चा PSR आणि कमीत कमी कोरी जागा सोडून शेअर्स शोधतो. मात्र हे करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे कारण अनेकवेळा कमी PSR असणारे बरेच शेअर्स असू शकतात. याचा वापर करून आपण असे शेअर्स शोधू शकतो कि ज्यांची पूर्वी बरीच जास्त किंमत होती मात्र सध्या काही तात्कालिक कारणामुळे त्या शेअर्सची किंमत कमी झालेली असते.

कमाई मधील वाढीचा दर (Earnings Growth): अशी कंपनी पहा कि जिच्या वार्षिक कमाईचा दर हा २०% पेक्षा जास्त आहे. जर एखादया कंपनीचा Earnings Growth दर हा २०% पेक्षा जास्त व सोबत पी/ई १०% किंवा कमी असेल तर ती गुंतवणुकीची उत्तम संधी असू शकते. याला PEG किंवा PE to Growth रेशो असे म्हटले जाते. हुशार गुंतवणूकदार १ पेक्षा कमी PEG असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. समजा वरील उदाहरणा प्रमाणे P/E १० / EG २० आहे तर PSR ०.५ होतो.

भांडवलावरील परतावा (Return on Equity): अशा कंपनीचे शेअर्स शोधा कि जे भांडवलावर वार्षिक २०% पेक्षा जास्त परतावा देत असतात. यामुळे तुम्हाला समजू शकते कि तुमच्या गुंतवणुकीवर किती दराने परतावा मिळू शकतो. जेवढा जास्त परतावा तेवढा तो शेअर खरेदी करण्यासाठी चांगला हे समजून जा.

वरीलप्रमाणे सर्व रेशोंचे एकत्रित विश्लेषण करून तुम्ही शेअर्स खरेदीचा योग्य निर्णय करू शकता. हे विश्लेषण करून झाल्यावर निरनिराळ्या आर्थिक संकेतस्थळावर जाऊन संबंधित कंपनीबाबतची माहिती गोळा करा आणि त्यानंतर योग्य किंमतीत शेअर्स खरेदी करा आणि शांत बसा. पैसा आपोआप तुमच्यासाठी काम करू लागेल.

About buy at a bargain in shares read in marathimutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments

१३. गगनाला गवसणी घालणारे शेअर्स – योग्य किंमत कशी ठरवावी

Tuesday, 08 January 2019 by Sadanand Thakur

१३. गगनाला गवसणी घालणारे शेअर्स – योग्य किंमत कशी ठरवावी?

बरेचवेळा असे  होते कि बाजारात, एखादया शेअरमध्ये तेजी असते तेव्हा प्रत्येकालाच तो शेअर विकत घ्यावयाचा असतो मात्र त्याची असणारी किंमत मात्र जास्त वाटत असते, म्हणून तो घ्यावा कि न घ्यावा हा त्याचा गोंधळ उडालेला असतो. यावेळी काही शेअर्सची किंमत योग्य असते तर काही शेअर्सची किंमत त्याच्या योग्यतेपेक्षा जास्त किंवा कमी असते. आता हे कसे ओळखावे?

एखादया शेअरची किंमत कमी किंवा जास्त असते यासाठी काहीतरी कारण हे असतेच बहुतांशी वेळा ते कारण म्हणजे वाजवीपेक्षा जास्त असणाऱ्या अपेक्षा हेच असते.  गुंतवणूकदाराची अपेक्षा असते कि संबंधित कंपनी हि दोन प्रकाराने आपला फायदा करून देईल: एक म्हणजे महसुलात वाढ आणि दुसरे म्हणजे कमाई मध्ये वाढ या दोन महत्वाच्या अपेक्षा एखादा शेअर खरेदी करताना असतात. यावेळी गुंतवणूकदारसमोरील सर्वात मोठे आव्हान हे असते कि  असे वेगाने वाढणारे शेअर्सच्या मागील कारण काय आहे हे ओळखणे हेच होय.

सातत्याने चांगली कामगीरी करणारे स्टॉक पहा. याचा अर्थ असा नव्हे कि तुम्ही ते फक्त खरेदी करा आणि पहात बसा. तर तुम्ही यातील काही शेअर्स पूर्वीच खरेदी केलेले असतील तर त्यांची कामगिरी नियमितपणे तपासली पाहिजे. आणि जेव्हा या शेअर्सची प्रति शेअर मिळणारे उत्पन्न कमी होते किंवा कमाई  कमी होते तेव्हा ते लगेच विकून मोकळे झाले पाहिजे. आणि जेव्हा त्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात कमी होते तेव्हा असे स्टॉक हेरले पाहिजेत आणि ते खरेदी केले पाहिजेत. यासाठी गरज असते ती आत्मसंयमाची. मग तुम्हाला असे वाटते काय कि कंपनी कोणतीच गोष्ट चुकीची करणार नाही आणि तुम्हाला ते शेअर परत खरेदी करण्याची संधीच मिळणार नाही.  जर असे झाले तर ती जगातील एकमेव कंपनी असेल जी कधीच चूक करत नाही. कधी कधी असेही होते कि आपण जेव्हा शेअर खरेदी करतो तेव्हा वर्तमान भाव पातळीपेक्षा तो आपल्याला महाग वाटू शकतो परंतु खरे पाहता ते मूल्य बरेच चांगले असू शकते. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे झाले तर P/E सध्य पातळीपेक्षा कमी असतो.

आपण ज्या गोष्टींवर ध्यान दिले पाहिजे त्या:

१) प्रत्येक क्षेत्रातील आघाडीची कंपनी/न्या निवडा कि ज्यांनी सातत्याने बाजारात वर्चस्व गाजवलेले आहे. मोठ्या कंपनीला आणखीन मोठे व्हावयाचे असते, कारण त्या जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात तसेच त्या संशोधन आणि विकासावर जास्त पैसे खर्च करू शकतात. एक त्रिकाल बाधित सत्य तुम्हाला माहित असेलच कि पैसा हा नेहमी पैसेवाल्याकडे जातो आणि मोठा माणूसच आणखीन मोठा होत असतो.

२) कंपनीची कमाई प्रत्येक वर्षीच वाढत असली पाहिजे, आणि ती जास्त टक्केवारीत वाढत असली पाहिजे.

३) कंपनीच्या महसुलात सातत्याने वाढ होत असली पाहिजे. आणि वाढ त्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या महसुली वाढीच्या दरापेक्षा जास्त दराने होत असली पाहिजे.

४) कंपनीचे व्यवस्थापन मजबूत असले पाहिजे.

५) आणि त्या कंपनीने वाढत्या स्पर्धेला पुरून उरण्याची क्षमता बाळगली असली पाहिजे.

जेव्हा तुम्ही अशी एखादी कंपनी शोधता कि जिच्यामध्ये वरील सर्व गुण सामावलेले आहेत तेव्हा त्या शेअर्सची किंमत कमी असूच शकत नाही. आणि म्हणून जर तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत तो खरेदी करण्यासाठी मोजण्याची तयारी ठेवावीच लागेल. एका अर्थाने तुम्ही त्या कींपनीत प्रवेश करण्याचे मूल्यच देत असता असे समजले पाहिजे. आणि जर तुमच्याकडे संयम असेल तर कदाचित भविष्यात तो स्टॉक तुम्हाला कमी किंमतीत सुद्धा मिळू शकतो.

अशा कंपनीच्या शेअर्समधून मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला संपत्ती निर्माण करावयाची असेल तर ते स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये दीर्घ काळासाठी ठेवले पाहिजेत. शक्य असल्यास ते नियमितपणे जास्तीचे खरेदी करत राहिले पाहिजे, यामुळे तुम्ही त्या कंपनीच्या वाढीमध्ये तुम्हालासुद्धा वाढण्याची संधी देत असता. जरी तुम्ही अश्या चांगल्या कंपनीचे थोडे जरी स्टॉक घेऊन ठेवलेत तरी, काही काळाने बोनस आणि स्प्लिट च्या माध्यमातून तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढत जाते आणि परत परत तुमचे गुंतवणूक मूल्यसुद्धा वाढत जाते, याप्रकारे तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. तुम्हाला माहित आहे का इन्फोसिस या कंपनीचे ज्यांनी १० किंवा त्या पटीत शेअर्स पूर्वी घेतले होते आज त्यांच्याकडे त्यांनी घेतलेल्या शेअर्सच्या संख्येत अनेक पटीने वाढ झालेली आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कम्पनीचे काही शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे काही प्रमाणात मालक होत असता. आणि म्हणूनच एखाद्या कमी भावाच्या कंपनीच्या जास्त शेअर्स पेक्षा एखाद्या मोठ्या व चांगल्या कंपनीचे कमी शेअर्स बाळगणे हे केव्हाही चांगले असते. म्हणून जर तुम्हाला जास्त फायदा व्हावा असे वाटत असेल तर जास्त भावाचे चांगल्या कंपनीचे शेअर्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये बाळगले पाहिजेत.

जर तुमच्याकडे असलेल्या शेअरची किंमत सतत वाढत असेल तर ते आणखीन खरेदी करावेत काय?

जर तुम्ही बाळगून असलेल्या शेअर्सची किंमत २०% ते २५% किंवा जास्त जर ८ आठवड्याच्या आत वाढली असेल तर तुम्ही त्या शेअरमध्ये आणखीन खरेदी केली पाहिजे. मात्र त्या स्टॉक मध्ये मजबुती चालूच असली पाहिजे. कारण जेव्हा अशी किंमत वाढू लागते तेव्हा लवकरच त्या कंपंनी बाबत एखादी बातमी येणार असते.

बातमी प्रकाशित झाली कि काय करावे?

एखाद्या कंपनी संबंधित चांगली बातमी टीव्ही, वर्तमान पत्रे इ. माध्यमातून प्रसारित झाली कि लगेच आपल्या कडे असणारे शेअर्स विकून टाकावेत आणि त्यांची किंमत कमी झाली कि तेच स्टॉक परत विकत घेतले पाहिजेत. It is principal that sale on news.

About Sky rocketing stocks read in marathi mutualfundmarathi.com
Read more
  • Published in Capital Market
No Comments
Page 1 of 3
1 2 3 Next »
  • 1
  • 2
  • 3

अनिवार्य सूचना (Disclaimers)

www.mutualfundmarathi.comया वेबसाईटची निर्मिती हि मराठी भाषिकांना त्यांचे मातृभाषेत म्युचुअल फंड व शेअरबाजाराची माहिती मिळावी म्हणून तयार केलेली आहे. या वेबसाईटची मालकी हि सदानंद ठाकूर याची असून येथील मजकूर पूर्व परवानगीशिवाय अन्यत्र पोस्ट करू नये. Thakur Financial Services ठाकूर फायनान्शियल सर्व्हीसेस ARN-46061 व्दारे म्युचुअल फंड वितरक म्हणून AMFI व अनेक AMC सोबत रजिस्टर आहे. या संकेतस्थळावर दिलेली माहिती, फायनान्शियल प्लानिंग सुविधा, कॅलक्यूलेटर व अन्य सुविधा हि तुमच्या म्हणजे या संकेतस्थळाला भेट देणार्यांच्या माहितीसाठी त्यांनी स्वत: उपयोगात आणण्यासाठी आहे. आम्ही यासाठी कोणतीही फी किवा अन्य कोणतेही मानधन आकारत नाही. ह्याचा वापर करून केलेली गुंतवणूक तसेच परिणाम देईल असा आमचा दावा नाही. म्युचुअल फंडात केलेली गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. मागील कामगिरी तशीच राहील अथवा राहणार नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी संबधित योजनेचे माहिती पत्रक वाचून व समजून घेऊन गुंतवणूक करा. (Disclaimer: Mutual Fund investments are subject to market risk, read all scheme related documents carefully. Past performance of the scheme may or may not sustain in future).

Design & Powered By S.N Enterprises

TOP
×