प्रकरण ५ वे
५. तुमचे उदिष्ठ सुरुवातीलाच निश्र्चित करा
गुंतवणूकीचे उदिष्ठ
ज्या गुंतवणूकीमधून दिर्घ मुदतीत चांगला परतवा मिळेल अशा गुंतवणूकीच्या साधनाची निवड अत्यंत काळजीपुर्वक केली पाहिजे. अल्प काळाचा विचार गुंतवणूक करताना करणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. मुख्यत्वेकरुन जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तेव्हा तुम्ही दिर्घ काळाचाच विचार करणे तुमच्या हिताचे होईल. शेअर बाजारात नेहमीच शेअर्सच्या किंमती अत्यंत वेगाने वर खाली होत असतात. सुरुवात करताना किमान ३ ते ५ वर्षाचे उदिष्ठ ठेऊन गुंतवणूकीची सुरुवात करा. त्यासाठी प्रथमत: तुम्ही स्वत:लाच ओळखण्यास सुरुवात करा.
तुम्ही तुमच्या गुंतवणूकीपासून काय मिळवू इच्छित आहात?
नियमीत उत्पन्न, मुद्दलात वाढ कि दोन्ही गोष्टी मिळवू इच्छीत आहात हे ठरवा.
आता तुम्ही किती जोखीम स्विकारण्यासाठी तयार आहात?
प्रत्येकाची जोखीम स्विकारण्याची मानसीकता सारखी असू शकत नाही त्यामुळे काही व्यक्ती बाजारात गुंतवणूक केल्यानंतर जर नुकसान झाले तर लगेच शेअर्स विकून बाजाराला राम राम करतात, यामध्ये अनैसर्गीक असे काहीच नाही. मात्र अशी प्रवृत्ती असणाऱ्या माणसाने शेअरबाजारात गुंतवणूक न करणेच इष्ट असते. कोणत्याही व्यवसायात नफा व नुकसान हे होतच असतेच. जेथे जास्त फायदा मिळण्याची शक्यता असते तेथे नुकसानही जास्तच होऊ शकते. शेअर बाजाराचा दोनशे वर्षाचा इतिहास पाहिल्यास असे दिसून येते कि अनेकवेळा शेअर बाजार ६०% पेक्षा जास्त कोसळलेला आहे हि जशी वस्तुस्थीती आहे त्याचप्रमाणे ज्यानी ज्यानी चांगल्या कंपन्याच्या शेअर्समध्ये दिर्घकाळासाठी गुंतवणूक केली आहे त्या सर्वानाच अतिशय उत्तम फायदा झालेला आहे. म्हणूनच शेअर बाजारात तुम्हाला उतरावयाचे असेल तर तुम्ही दिर्घकाळासाठीच गुंतवणूक करणे व ती नियमीतपणे करणे हेच अंतीमत: योग्य ठरु शकते. तुम्हाला माहित असेलच कि बेंजामीन ग्राहम व वॉरेन बफेट सारख्या यशस्वी गुंतवणूकदारानी शेअर बाजारातून अमाप उत्पन्न मिळवले पण त्यानी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये बदल झाला तरच त्यांची त्या कंपनीतील गुंतवणूक काढून त्यांच्या पोर्टफोलीओमध्ये बदल केलेला आहे. जर का तुम्हाला एकदा हे समजले कि आपल्याला आपल्या गुंतवणूकीपासून किती फायदा होऊ शकतो तरच काही तासात, दिवसात, आठवड्यात, माहिन्यात किंवा अगदी २ ते ३ वर्षातसुध्दा तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत कमी अथवा जास्त झाली तरी तुम्ही विचलीत होणार नाही. शेअर बाजारात गुंतवणूकीची सुरुवात करताना म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी योजनेपासून सुरुवात करणे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन तज्ञ व्यक्तींव्दारे केले जाण्याची सुवीधा मिळते. जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनानी गेल्या २५ वर्षात वार्षीक सरासरी १५% ते ३०% परतावा तोही चक्रवाढ पध्दतीने दिलेला आहे. परत यात आपल्याला काही व्यवस्थापन करावे लागत नाही. तुमचा गुंतवणूक सल्लागार यासाठी म्युच्युअल फंडाची चांगली योजना निवडण्यास मदत करत असतो. मात्र जर का बाजारातील चढ-उतार, अस्थीरता या गोष्टींचे तुम्हाला वावडे असेल तर तुम्ही निश्र्चित उत्पन्न साधनात गुंतवणूक करणेच योग्य होईल.
आर्थीक नियोजन व उदिष्ठ ठरवीणे:
गुंतवणूकीसाठी शिस्तबध्द नियोजन व कोणत्या उदिष्ठपुर्तीसाठी गुंतवणूक करावयाची या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. यासाठी प्रथमत: तुम्ही तुम्हालाच काही प्रश्र्न विचारा:
मी कीती काळ नियमीत गंतवणूक करु शकतो? याचा अर्थ तुम्ही गुंतवणूकीची सुरुवात करत असताना तुमचे सध्याचे वय काय आहे व तुम्ही तुमच्या वयाच्या कितव्या वर्षापर्यंत नियमीत गुंतवणूक करु शकता या मधील काळ हा तुमचा गुंतवणूकीचा काळ असतो. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करत अहात हेही महत्वाचेच आहे. कारण काहीही असू शकते जसे कि घर/गाडी घेणे, गृह कर्ज घेताना स्वत:चा हिस्सा निर्माण करणे, दुसरे घर/प्रॉपर्टी घेणे, मुलांचे शिक्षण/लग्न, मोठ्या ट्रिपला जाणे, निवृत्तीनंतरची सोय इ.
याचबरोबर अल्प मुदतीत आपली कोणती आर्थीक गरज भागवावी लागणार आहे याचा सुध्दा विचार करणे अत्यावश्यक असते.
तुमची उदिष्ठ ठरवताना ती उदिष्ठ पुर्ण होण्यासाठी नियमीतपणे किती गुंतवणूक तुम्ही करु शकता याचा नीटपणे विचार करा. उदिष्ठपुर्तीचा कालावधी सुध्दा नीटपणे निश्र्चित करा. यामुळे तु्म्ही तुमच्या गुंतवणूकीचे चांगल्याप्रकारे नियोजन करु शकाल.
काळ तुम्हाला अनुकूल आहे काय?
तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही किती काळ देऊ शकता? रोज काही तास कि महिन्यातील काही तास हेही महत्वाचे आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे तुम्हाल पैसे केव्हा लागणार आहेत यावरच गुंतवणूकीचा कोणता प्रकार तुम्ही निवडला पाहिजे हे अवलंबून असते. यासाठी गुंतवणूकीच्या विवीध प्रकारातून मागील काळात कसा परतावा मिळाला आहे हे तुम्ही तपासले पाहिजे. मिळणा-या परताव्यावर कर दायित्व आहे कि नाही याचाही विचार करणे महत्वाचे असते. जर का तुम्हाला पैसे १० वर्षानंतर किंवा त्यापेक्षा जास्त काळाने मिळून चालणार असतील तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केली पाहिजे. जर का तुम्हाला पुढील १ ते ३ वर्षात पैसे लागणार असतील तर तुम्ही बॉण्ड फंडात गुंतवणूक करणे योग्य होईल. जर का तुम्हाला २ वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही अल्प मुदतीच्या बॉण्ड फंडात किंवा एफएमपीमध्ये गुंतवणूक करणे योग्य होईल. जर तुम्हाला १ वर्षापेक्षा कमी काळात पैसे लागणार असतील तर तुम्ही लिक्वीड फंडात किंवा बँक ठेवीत गुंतवणूक करणे योग्य होईल.
गुंतवणूकीचे नियोजन
एकदा का तुमचा गुंतवणूक सुरु करण्याचा निर्णय झाला कि प्रथमत: हे ठरवा कि तुम्ही किती पैशाची गुंतवणूक करु शकता. आता तुम्ही किती रक्कम प्रथमत: एकरकमी गुंतवू शकता ते पहा. यानंतर पुढे दरमहा नियमीत किती पैसे गुंतवणूकीसाठी बाजूला काढू शकता ते निश्चित करा. उत्पन्नाचे साधन कसे आहे, ते दरमहा ठरावीक आहे कि अनियमीत आहे हि गोष्ट सुध्दा तपासली पाहिजे. तुम्ही अचानक उभ्दवणा-या गरजेसाठी तरतुद केली आहे याची खात्री करा. एकदा का निर्णय झाला कि तुमच्या उदिष्ठाना पुर्ण करण्यासाठी तुमच्या गुंतवणूकीची सुरुवात करा व घेतलेल्या निर्णयाला चिकटून रहा. विचलीत होऊ नका.