१७. विविधिकरणाचे महत्व
आपली गुंतवणूक विविध साधनात गुंतवून बाजारातील चढ उतारावर मात करून मुद्दल सुरक्षित ठेवले जाऊ शकते. विविधीकरण म्हणजे आपली काही गुंतवणूक शेअर बाजार व संबंधित योजनेत गुंतवणूक करून आपण महागाईच्या दरापेक्षा जास्त उत्पन्न मिळवू शकतो तर काही रक्कम सुरक्षित साधनात गुंतवून स्थैर्य प्राप्त करू शकतो. ज्यामुळे जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा जरी शेअर बाजारात नुकसान झाले तरी सुरक्षित साधनात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झालेले नसते याचा दुसरा एक फायदा करून घेता येतो कि बाजार जर एकदम मोठ्या प्रमाणात खाली आला तर सुरक्षित साधनातील गुंतवणूक आपण बाजारात करून सरासरी करू शकतो व मंदी नंतर येणाऱ्या तेजीच्या कालखण्डात जास्त पैसे मिळवू शकतो.
शेअर बाजारात गुंतवणूक करताना आपण एक काळजी घेतली पाहिजे कि आपले सर्वच पैसे कोणत्याही एका कंपनीच्या शेअर्समधे न गुंतवता ते अनेक कंपन्यांच्या शेअर्समधें गुंतवावेत आणि तेसुद्धा विविध क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या शेअर्समधें गुंतवावी. प्रत्येक क्षेत्रावर त्या क्षेत्राशी संबंधित बातमी, करतील बदल, आयात निर्यात धोरण, व्याज दरातील बदल इ. गोष्टींचा परिणाम होत असतो. उदा. आयटी क्षेत्रावर परकीय चलनातील दारांच्या बदलांचा मोठा परिणाम होत असतो, बँकिंग क्षेत्रातील शेअर्स वर व्याज दरातील बदलांचा मोठा परिणाम होत असतो, फार्मा क्षेत्रावर यूएस एफडीए च्या निर्णयाचा मोठा परिणाम होत असतो, तेल कंपन्यांच्या शेअर्सवर क्रूड ऑइल दरातील फरकाचा परिणाम होत असतो, एफएमजीसी क्षेत्रावर कर बदलांचा परिणाम जास्त होत असतो, महागाईच्या दराचा परिणाम व्याज दरात चढ उतार होण्यात होत असतो. म्हणून जर आपण आपली शेअर बाजारातील गुंतवणूक हि सर्व महत्वाच्या क्षेत्रातील आघाडीच्या शेअर्समध्ये केली तर काही शेअर्सवर सकारात्मक तर काही शेअर्सवर नकारात्मक परिणाम होऊन संतुलन साधले जाते. तसेच जेव्हा बाजारात सर्वंकष तेजी असते तेव्हा सर्वच शेअर्सचे मूल्य वृद्धी कमी जास्त प्रमाणात होऊन जास्तीचा फायदा होतो. मंदीच्या काळात ज्या क्षेत्रावर सकारत्मक बातमी इ. चा परिणाम होऊन होणाऱ्या फायद्यामुळे अन्य शेअर्समध्ये झालेले नुकसान कमी होते. विविध क्षेत्रातील शेअर्स खरेदी करताना त्या त्या क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत यासाठी पूर्वी सांगितलेले नियम पाळावेत.
तसेच आपली सर्वच गुंतवणूक शेअर्समधें न करता त्यातील काही रक्कम हि बॉण्ड्स, बँक एफडी, लिक्विड फंड्स इ. कमी किंवा शून्य जोखमीच्या साधनात गुंतवावी. यामुळे दीर्घ मुदतीत पोर्टफोलिओला स्थैर्य प्राप्त होते.
आपल्या पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचे प्रमुख उद्देश:
१) मुद्दल सुरक्षित ठेवणे
२) स्थिर उत्पन्न मिळवणे
३) भांडवल वृद्धी करणे
४) तरलता सांभाळणे – हि फार महत्वाची असते, गरजेला कधीही पैसे उपलब्ध असतात, तसेच संधी मिळाल्यास गुंतवणूक करता येते.
एक मात्र तेवढेच खरे असते कि विविधीकरणाने जोखीम कमी होते त्याच प्रमाणे तेजीच्या काळात जास्त पैसे मिळण्याची संधी सुद्धा कमी होते परंतु एक लक्षात ठेवले पाहिजे कि हत्ती होऊन ओझे वाहण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खावी कारण जास्त फायद्याच्या मोहापायी अनेक गुंतवणूकदार सारे काही गमावून बसतात. आपले उदिष्ठ हे महागाई पेक्षा जास्त दराने उत्पन्न मिळवणे, दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करणे आणि मिळवलेल्या संपत्तीचे जतन करणे हे असावे. हे सारे विविधीकरणाच्या माध्यमातून साधता येते.
थोडक्यात विविधिकरणामुळे निश्चिन्त पणे झोपता येते.