ELSS: म्युचुअल फंडाची करबचत योजना
ELSS: म्युचुअल फंडाची करबचत योजना. गुंतवणूक करा – करबचतीचा लाभ घ्या – दीर्घ मुदतीत संपत्तीसुद्धा निर्माण करा.
इन्कमटॅक्स हा जणू काही तुमच्या खिशाला कात्री लावण्याचे काम करत असतो. परंतु जर का आपण विचार केला तर लक्षात येईल कि प्रामाणिकपणे करभरणा केल्याने आपण आपल्या देशाच्या प्रगतीत आपला हातभार लावत असतो. काही व्यक्ती आनंदाने आपले कर्तव्य समजून करभरणा करत असतात तर काहीजण नाखुशीने करभरणा करत असतात.
अनेक व्यक्ती करबचत करण्यासाठी वेगवेगळ्या गुंतवणूक साधनात त्याचे फायदे तोटे समजून न घेतासुद्धा कोणाच्या तरी सांगण्यावरून गुंतवणूक करत असतात. जर का तुम्हाला हे समजले कि करबचतीसाठी गुंतवणूक केल्यावर त्या गुंतवणुकीतून तुम्हाला संपत्तीसुद्धा निर्माण करता येते, तर तुम्हाला याबाबत समजून घ्यावयाला निश्चितच आवडेल, नाही का?
ELSS हे माध्यम कर बचतीसाठी सर्वात जास्त फायदेशीर का आहे ते आपण खालील टेबल मध्ये पाहू शकता
गुंतवणुकीचे साधन | PPF | 5 Years Bank FD | Life Insurance | ULIP | NSC | NPS | ELSS |
परताव्याचा सरासरी वार्षिक चक्रवाढ दर | 8% | 7.5% | 4% | Market LinkedApprox 9% | 7-8% | Market LinkedApprox 10% | Market LinkedApprox 13-15% |
लॉक इन कालावधी वर्षे | 15 Years | 5 Years | 15 to 20 Years | 5 to 20 Years | 5 Years | Till Retirement | 3 Years |
होय Equity Linked Savings Schemes (ELSS)- अर्थात म्युचुअल फंडाच्या करबचतीच्या योजना या तुमच्या देय आयकरात बचत तर करू शकतीलच वरती यातून उत्तम प्रकारचा नफा मिळून दीर्घ मुदतीत संपत्तीसुद्धा निर्माण करता येईल. ELSS हि एक म्युचुअल फंडाची वैविध्यपूर्ण (Diversified) योजना असते, या योजनेतील ८०% ते १००% रक्कम हि बाजारातील कालानुसार शेअरबाजारात गुंतवली जाते.
ELSS फंडात केलेली रु.१,५०,०००/- पर्यंतची गुंतवणूक हि व्यक्तीच्या एकूण करपात्र उत्पन्नातून आयकर कायदा १९६१ नुसार आयकर कलम ८०-सी अंतर्गत वजावटीला पात्र असते. हि वजावट व्यक्ती किंवा एचयुएफ या प्रकारातील करदात्यांना मिळू शकते.
ELSS फंडाच्या सर्वच योजनेत केलेला गुंतवणूकीला ३ वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, जो अन्य कोणत्याही करबचतीच्या योजनेपेक्षा सर्वात कमी असतो. शिवाय या गुंतवणुकीतून मिळणारा नफा हा दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याच्या कर आकारणीस पात्र असतो ज्यामुळे सर्वात कमी कर दायित्वचा लाभसुद्धा मिळतो. जर तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून ELSS योजनेत गुंतवणूक केलीत तर प्रत्येक हप्त्याला ३ वर्षांचा लॉक-इन कालावधी लागू होतो. ३ वर्षानंतर जर तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल तर तुम्ही तुमची युनिट विकून पैसे काढू शकता.
शेअरबाजारात केलेल्या गुंतवणुकीतून दीर्घमुदतीत गुंतवणुकीवर इतर साऱ्या गुंतवणूक साधनापेक्षा जास्त फायदा मिळालेला आहे. उदाहरणार्थ जर करबचतीच्या उद्देशाने जर तुम्ही बँक मुदत ठेवीत उन्त्वणूक केलीत तर त्यावर ७% ते ७.५% दराने व्याज मिळते व अशा गुंतवणुकीला ५ वर्षांचा लॉक-इन कालावधी लागू असतो. याशिवाय बँक मुदत ठेवींवरील व्याज हे करपात्र उत्पन्न गणले जात असल्यामुळे तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेनुसार तुम्हाला या व्याजावर आयकर भरावा लागतो. याउलट ELSS फंडाच्या योजनेत केलेला गुंतवणूकीवर तुमचे उत्पन्न कितीही असले होणाऱ्या फायद्यावर जास्तीतजास्त फक्त १०% दराने कर लागू शकतो, तो सुद्धा जर तुमचा होणारा फायदा रु.एक लाखांपेक्षा जास्त असेल तरच. ELSS योजनेतून रु.एक लाखांपर्यंतचा होणारा फायदा हा करमुक्त असतो. CRISIL – AMFI ELSS Fund Performance index नुसार २९/१२/२०१७ अखेर संपलेल्या मागील ३ वर्षात ELSS योजनेतून वार्षिक सरासरी १३.१% चक्रवाढ दराने परतावा मिळालेला आहे. आणि हाच परतावा जर मागील २२ वर्षांचा पहिला तर तो वार्षिक सरासरी २२% चक्रवाढ दराने किंवा अधिक मिळालेला आहे.
उदाहरण सांगावयाचे झाले तर जर श्री.राम याने करबचतीसाठी वर्ष २००१ ते २०१८ या कालावधीत दरवर्षी रु.१,५०,०००/- पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली असती तर त्याची गुंतवणूक झाली असती रु.२७ लाख ज्याचे व्याजासह मूल्य झाले रु.४९,५१,९०४/- याच कालखंडात श्री.कृष्णाने मात्र म्युचुअल फंडाच्या ELSS योजनेत तेवढीच गुंतवणूक केली रु.२७,००,०००/- त्याचे २१ फेब्रुवारी २०१८ रोजी फायद्यासह गुंतवणूक मूल्य झाले रु.१,१६,३२,०७४/- म्हणजेच रु.६६,८०,१७० जास्त किंवा २.३४ पट जास्त.
म्हणून करबचत करत असतानाच अधिकचा फायदा मिळावा यासाठी म्युचुअल फंडाच्या ELSS योजनेत गुंतवणूक कारणे केव्हाही शहाणपणाचे असते, मात्र म्युचुअल फंडाच्या ELSS योजनेत शेअरबाजाराची जोखीम असल्यामुळे आपल्या गुंतवणुकीचे उदिष्ट हे पीपीएफ प्रमाणेच दीर्घ मुदतीचेच असावे, जे शक्यतो १५ ते २० वर्षांचे असावे.