म्युच्युअल फंडा मध्ये प्रामुख्याने दोन प्रकारातील योजना असतात. समभाग आधारित आणि कर्ज रोखे आधारित योजना. यामध्ये परत ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड या प्रकारातील योजना असतात.
समभाग आधारित योजना (Equity Schemes)
या प्रकारातील योजनेतील पैसे हे योजनेच्या उद्दिष्टांनुसार वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स (समभागात) गुंतवले जातात. म्हणून या प्रकारातील योजनांना समभाग आधारित योजना असे म्हटले जाते. या प्रकारच्या योजनेत अर्थातच शेअर बाजाराची जोखीम अंतर्भूत असते आणि म्हणूनच अशा योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य अगदी रोजच्या रोज बदलत असते. ज्या दिवशी शेअर बाजार वर जातो त्या दिवशी आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढलेले दिसते आणि ज्या दिवशी शेअर बाजार खाली जातो त्या दिवशी आपल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होते. परंतु एक लक्षात ठेवले पाहिजे कि दीर्घ मुदतीत शेअर बाजार हा वरच जात असतो आणि म्हणूनच जर आपण म्युच्युअल फंडाच्या समभाग आधारित योजनेत दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर आपल्याला निश्चितपणे चांगला नफा होतो. म्हणून आपण गुंतवणूक करताना जर १५ ते २० वर्षांचा किंवा त्याही पेक्षा जास्त काळाचा विचार करून नियमित दर महिना ठराविक रक्कम गुंतवली तर जोखीमही कमी होते आणि पैसेही चांगले मिळतात कारण आपण बाजाराच्या सर्वच स्थितीमध्ये गुंतवणूक करत राहतो यासाठी एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे. असे केल्याने संपत्ती निर्माण होऊ शकते.
समभाग आधारित योजनांमध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, बॅलन्सड तसेच कर बचतीसाठी ELSS इ. प्रकारच्या कमी अधिक जोखमीच्या योजना असतात.
या प्रकारच्या योजनेत कोणत्या कारणासाठी गुंतवणूक करावी?
- कर बचत करण्यासाठी
- मुलांच्या शिक्षणासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी
- मुलांच्या विवाहासाठी पैशांची तरतूद करण्यासाठी
- रिटायरमेंट प्लॅनींग करण्यासाठी
- संपत्ती निर्माण करण्यासाठी
- घर खरेदी करण्यासाठी
- गाडी घेण्यासाठी
- फिरायला जाण्यासाठी
इत्यादी कोणत्याही कारणासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली पाहिजे.