१०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही
नियमितपणे गुंतवणूक करत रहा, घाबरून जाऊ नका
माझ्याकडून हीच सर्वात चांगली टीप तुमच्यासाठी आहे. शेअर्स निवडताना काळजी घ्या, पण एकदा का तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा स्टॉक खरेदी केलात आणि काही कारणाने जर शेअर बाजार खाली आला किंवा गडगडला आणि तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर घाबरून जाऊन तो शेअर विकून मोकळे होऊ नका तर अशा वेळी नियमितपणे जमतील तेव्हढे जास्तीचे शेअर्स खरेदी करा. शेअर खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कि नेहमी चांगल्या कंपनीचेच शेअर्स विकत घ्या ती कंपनी काय निर्माण करते त्याची माहिती घ्या. कंपनी सुरु करणारी व्यक्ती कोण आहे, तिचा पूर्वेतिहास काय आहे. कंपनीचे व्यवस्थापन पारदर्शक आहे का, कंपनीची विक्री प्रत्येक वर्षी वाढणारी आहे कि नाही, बाजारात कंपनीची प्रतिष्ठा काय आहे, पीई नेहमी वाढणारा आहे का इ. कंपनी संबंधित माहिती करून घेऊन शेअर्स खरेदीचा निर्णय घ्या. एकदा शेअर्स खरेदी करून झाले आणि जर त्याची बाजारातील किंमत कमी झाली तरी घाबरून जाऊ नका कारण शेअर्सच्या मूल्यातील चढ उतार हा शेअर बाजाराचा स्थायी भाव आहे.
शेअरची किंमत कमी किंवा जास्त झाली तरी कंपनी आपले कामकाज चालूच ठेवत असते. जोपर्यंत कंपनीचे प्रवर्तक त्यांच्या मालकीचे शेअर्स विकत नाहीत तो पर्यंत तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. हा मात्र जर तुम्ही छोट्या आकाराच्या कंपनीचे शेअर्स घेतलेले असतील तर मात्र त्यांचा शेअर्सचा कमी झालेला भाव परत वाढेल कि नाही हे सांगणे अवघड असते. अनेकवेळा शेअर्सच्या किंमती कमी होण्याचे कारण हे भावनेवर आधारित असते आणि असे झाल्यास तो परिणाम तात्पुरता असतो. जर तुम्ही घेतलेल्या शेअर्सची किंमत कमी झाली तर खालील गोष्टी तपासा:
१) शेअर्सची किंमत अचानकपणे कमी होण्याचे कारण काय आहे? त्या कंपनी बाबत काही अफवा पसरली आहे काय? जर अफवा पसरली असेल तर त्याबाबत कंपनीचा खुलासा काय आलेला आहे ते तपासा.
२) स्टोकनी किंमत कमी झाल्यानंतर त्याबाबत कंपनीचे काही म्हणणे आहे का ते तपासा.
३) त्या कंपनीत काम करणारे अधिकारी शेअर्स खरेदी किंवा विक्री करत आहेत काय?
४) किंमत कमी झालेली असताना कंपनी शेअर्सची पुनर्खरेदी करत आहे काय?
जर कंपनी देत असलेला खुलासा तुम्हाला योग्य वाटला तर तुम्ही समभागांच्या घसरलेल्या किंमतीकडे दुर्लक्ष करणे हेच तुमच्या हिताचे असेल. मात्र काही योग्य कारणामुळे जर शेअर्सचा भाव पडलेला असेल व तो आणखीन खाली जाण्याची शक्यता असेल तर मात्र तुम्ही तो शेअर नुकसानीत सुद्धा विकून आलेल्या पैशातून अन्य चांगल्या कंपनीचा शेअर विकत घेण्याचा विचार केला पाहिजे. मात्र तुमचा कोण्तायी निर्णय हा कंपनी संबधीचा असला पाहिजे आणि तो शेअर्सच्या किंमतीशी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर स्टॉकची किंमत कमी येण्याचे कारण कंपनीच्या उलाढालीशी, नफा कमी होण्याशी निगडित नसेल तर ती किंमत परत वर जाऊ शकेल, आणि मग तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.
नेहमीच चांगल्या कंपनीचेच शेअर्स खरेदी करा:
बरेचवेळा शेअरबाजारात नवीनच गुंतवणूक करणारी व्यक्ती लवकरात लवकर जास्त पैसे मिळवावेत अशा मानसिकतेची असते. जर तुम्ही नशीबवान असाल तर असे कदाचित घडलंही. परंतु खरे पाहता तेच गुंतवणूकदार श्रीमंत होतात जे चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून ते दीर्घ मुदतीसाठी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये बाळगून ठेवतात. बरेच लोकं कोणता शेअर स्वस्त आहे असे विचारत असतात. याचे एक कारण असते ते म्हणजे त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नसतात मात्र त्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये हजारो शेअर्स असावेत असे वाटत असते ज्यायोगे जेव्हा त्या शेअरची किंमत वाढेल तेव्हा त्यांना असे वाटते कीं आपल्याला भरपूर पैसे मिळतील. पण समस्या अशी असते कि असे स्वस्त असणाऱ्या शेअर्सची किंमत कधी वाढतच नाही. आणि यदाकदाचित थोडी वाढली तरी ते विकले जातच नाहीत कारण ते खरेदी करायला कोणीच तयार नसते.
समजा तुमच्याकडे रु.१०००० आहेत व त्यातून हजारो कमी किंमतीचे शेअर्स घेण्याऐवजी तुम्ही जर एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत तर भविष्यात त्याचे बरेच पैसे होऊ शकतात. याचे एक उदाहरण म्हणजे जर का तुम्ही रु.१०००० चे Infosys चे शेअर्स १९९१ साली खरेदी केले असतेत आणि आजपर्यंत बाळगून ठेवले असतेत तर आज मिळालेले बोनस शेअर्स अधिक स्प्लिट मुळे तुमच्याकडे हजारो शेअर्स झाले असते व आज त्याचे मूल्य काही कोटी रुपये झाले असते.
अर्थात मागील काळात ज्या कंपनीच्या शेअर्सनी असाधारण कामगिरी केली आहे हे समजणे फारच सोपे असते पण असे कोणते शेअर्स भविष्यात भरघोस प्राप्ती करून देऊ शकतील हे सांगणे मात्र कठीण काम असते. म्हणून सर्वात चांगली गोष्ट हि आहे कि तुम्ही एखाद्या तुम्हाला माहित असलेल्या चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या आणि विसरून जा. यामुळे काय होईल कि सुरुवातीला शेअर्स खरेदी करताना फक्त तुम्हाला ब्रोकरेज द्यावे लागेल आणि जर तुम्ही घेतलेले शेअर्स जर चालल्या कंपनीचे असतील तर ते भविष्यात चांगली कामगिरी करतीलच आणि जर ते अशी चांगली कामगिरी करत असतील तर ते विकण्याचा विचार तरी का करावयाचा बरे?
तुमच्याकडे असणाऱ्या रु.१०००० चे अनेक स्टॉक घेण्याच्या ऐवजी जरी एखाद्या चांगल्या कंपनीचा उदा. मारुती लिमिटेड चा जरी एक शेअर घेऊन ठेवलात आणि परत तुमच्या कडे जेव्हा पैसे जमतील तेव्हा परत एक जास्तीचा शेअर घेतलात असे दीर्घ मुदतीत करत राहिलात तर २०-२५ वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटीने वाढलेले तुम्हाला दिसून येईल. मारुती हे एक उदाहरण म्हणून सांगितले आहे, देशांत जवळपास २५० चांगल्या कंपन्या आहेत त्यातील तुम्हाला जी माहित असेल अशा कंपनीच्या शेअर्सची तुम्ही नियमितपणे खरेदी करू शकता.
तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये किती कंपन्यांचे शेअर्स असावेत
अनेक कंपन्यांचे शेअर्स घेण्यापेक्षा काही थोड्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये धारण करणे हे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवणे सोपे होते. तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पैशांप्रमाणात किती कंपन्यांचे शेअर्स बाळ्गावेत हे खालील टेबल मध्ये मार्गदर्शन म्हणून पहा:
असणारी रक्कम | किती कंपन्यांचे शेअर्स बाळ्गावेत |
रु. २०००० पेक्षा कमी | १ ते २ |
रु. २०००० ते ५०००० | २ ते ३ |
रु. ५०००० ते २००००० | ३ ते ५ |
रु. २००००० ते ५००००० | ५ ते ७ |
रु. ५००००० पेक्षा जास्त | ७ ते १० |