प्रकरण ७ वे
७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?
कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीच्या संबधीत विवीध रेशो पहाणे गरजेचे असते. विवीध रेशोंचे विश्लेषण करताना त्या कंपनीची एकंदर कामगिरीचे मोजमाप करता येते व सर्वच रेशो जर गणितीदृष्ट्या योग्य असतील तर गुंतवणूक करताना आपली खात्री होते कि आपला गुंतवणूकीचा निर्णय योग्य असून आपण त्या शेअरच्या किंमतीत होणा-या चढ उतारामुळे आपले मन विचलीत होत नाही व चुकीच्या वेळी शेअर खरेदी अथवा विक्रीचा निर्णय आपण घेत नाही. उलट अशा शेअरची किंमत जर कमी झाली तर ती एक चांगली संधी समजून आपण त्या शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करतो व तेजीच्या काळात जास्त फायदा मिळवतो. दुसरा फायदा म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक हि दिर्घ मुदतीसाठीच जास्तकरुन फायदेशीर होते हे आपणास कळते व तसे आपण निर्णय घेतो.
पीएसआर (प्राइज टू सेल्स रेशो):
हा रेशो ३ पेक्षा कमी असलाच पाहिजे, खरं म्हणजे तो १ पेक्षाही कमी असेल तर चांगले. याच्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत व प्रती शेअर विक्री यांची तुलना करता येते. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे कि जर का पीएसआर ३ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान होण्याचीच शक्यता (खात्रीच म्हणाना) जास्त असते व जर हा रेशो १ पेक्षा कमी असेल तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते.
पीएसआर = शेअरची किंमत / प्रती शेअर मिळणारे मागील १२ महिन्याचे विक्रीचे उत्पन्न
उदा.: क्ष लि. ची गेल्या १२ महिन्यातील एकूण विक्री = रु.१०० कोटी
कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या १ कोटी
म्हणून प्रती शेअर विक्रीचे उत्पन्न रु.१००
कंपनीच्या शेअरचे बाजार मुल्य रु.७५ प्रती शेअर
पीएसआर = ७५/१००
= ०.७५
रिटर्न ऑन इक्वीटी:
याचा अर्थ तुमच्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो, वॉरेन बफेट म्हणतो जर का तुम्हाला २०% च्या दरम्याने मिळत असेल तर तो चांगला समजावा.
Return on Equity = Net Income/Shareholder’s Equity
डेब्ट – इक्वीटी रेशो:
हा रेशो कंपनीच्या स्वत:च्या भांडवलाशी कर्जाचे प्रमाण दाखवतो. कंपनीचे एकूण कर्ज / कंपनीचे एकूण शेअर भांडवल या सुत्राने हा काढला जातो. हा किमान ०.५ पेक्षा तरी कमी असणे उत्तम, परंतु १ असला तरी चालू शकते. मात्र जर का तो २ पेक्षा जास्त असेल तर धोक्याची घंटा समजावी. याचा अर्थ कंपनीला जास्त प्रमाणात कर्जावर व्याज द्यावे लागेल व त्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफा मिळवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल. म्हणून सगळेच कर्ज वाइट असते असे नव्हे जर का कर्जावरील व्याजाची फेड करुनही जर का कंपनीचा फायदा चांगल्या प्रमाणात होत असेल तर कंपनी कर्जाचा उपयोग विस्तारीकरणावर किंवा उलाढाल वाढीसाठी प्रभावीपणे करत आहे असे समजले जाते. मात्र पायाभूत सुवीधा पुरवणा-या कंपन्यांचे बाबत हा रेशो वापरणे योग्य नसते कारण त्यांची उभारणीच मुळी उच्च डेब्ट इक्वीटी रेशोवर केलेली असते कारण त्याना लागणारे भांडवलाचे प्रमाणच जास्त असते.
बेटा:
इंडेक्सच्या तुलनेत शेअरची किंमत किती अस्थीर आहे हे बेटा फँक्टरमुळे कळू शकते. जेवढा बेटा जास्त तेवढे शेअरच्या किंमतीत जास्त चढ-उतार संभवतात. तर जर बेटा उणे असेल तर समजावे कि तो बाजाराच्या कलाविरुध्द वाढ घट दाखवेल म्हणजेच जेव्हा बाजारात तेजी असेल तेव्हा अशा शेअरची किंमत मात्र कमी होते व बाजार खाली जात असताना याची किंमत वाढते. ह्याची गणना करणे हे फारच किचकट असल्यामुळे मी याचे सुत्र येथे देत नाही मात्र तो बीएसईच्या साईटवर रोजच्या रोज उपलब्ध असतो,
https://www.bseindia.com/indices/betavalues.aspx या संकेतस्थळावर तुम्हाला कंपनीचा बेटा पाहाता येईल.
प्रतीशेअर उत्पन्न(Earning per share – EPS)
याच्यामुळे कंपनी प्रतीशेअर किती उत्पन्न मिळवते हे समजून येते आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मिळणारे प्रती शेअर उत्पन्न हेच जास्त महत्वाचे असते. इपीएस = कंपनीचा निव्वळ नफा / कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या या सुत्राने इपीएस काढला जातो. उदा. क्ष लि. चे २ कोटी शेअर्स आहेत व नफा जर रु.६ कोटी असेल तर इपीएस होईल रु.३ प्रती शेअर. याच्यामुळे कंपनी अल्पकाळात व दिर्घ काळात कशी ग्रोथ (वृध्दी) त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत करते हे समजून येते. म्हणून गुंतवणूक करण्यापुर्वी त्या सेक्टरमधील सर्व कंपन्याचा इपीएसची तुलना करणे अत्यावश्यक आहे.
पी / इ रेशो
कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना फक्त इपीएस पाहून चालत नाही तर त्याच बरोबर त्याची तुलना शेअरच्या बाजारभावाशी करणेसुध्दा अत्यावश्यक असते. यासाठी पी ई रेशो पहाणे महत्वाचे असते. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना पी / ई रेशो हा महत्वाचा घटक असल्यामुळे आपण याची येथे जरा विस्ताराने व उदाहरणासह चर्चा करुया. पी / ई रेशो = शेअरचे बाजार मुल्य (किंमत) / गेल्या ४ तिमाहितील इपीएस उदा. क्ष लि. च्या शेअरचे बाजारमुल्य आहे रु.१०० आणि त्याचा इपीएस आहे रु.२० प्रती शेअर तर त्या शेअरचा पी ई होतो ५. कंपनीच्या इपीएस मध्ये नियमीतपणे जर मोठ्या प्रमाणावर वाढ होत असेल त्या शेअरची किंमतही वाढण्याचे ते एक महत्वाचे कारण होते. जर का त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत एखाद्या कंपनीच्या शेअरचा पी ई रेशो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो स्टॉक महाग असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. तेच जर पी ई कमी असेल तर तो शेअर गुंतवणूकीसाठी योग्य आहे असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. मात्र मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर ज्या शेअरचा पी ई रेशो जास्त आहे अशा शेअरची कामगिरी जास्त चांगली झालेली दिसून आलेली आहे. क्ष ह्या कंपनीचे सध्याचे प्रती शेअर उत्पन्न रु.१ असून त्या कंपनीची अपेक्षा आहे कि हे उत्पन्न भविष्यात वार्षीक २०% दराने वाढेल हे गृहित धरल्यास ५ वर्षानंतर कंपनीचे प्रती शेअर उत्पन्न असेल रु.२.५०. आता असे धरुया कि या क्षेत्रानुसार कंपनीचा पी / ई रेशो १५ हा गुंतवणूकदाराचे दृष्टीने योन्य आहे. म्हणून हा शेअर अपेक्षीत २.५० च्या इपीएस नुसार १५ पटीने विकला जाईल (२.५० गुणीले १५) म्हणजेच रु.३७.५० या किंमतीला विकला जाईल तो होतो चालू वर्षाच्या इपीएसच्या ३७.५० पट. येथे कंपनी २०% वार्षीक दराने उत्पन्नात वाढ अपेक्षीत असल्यामुळे (व या कंपनीची मागिल कामगिरीही सतत चांगली राहिलेली असल्यामुळे) गुंतवणूकदार हा शेअर भविष्यात मिळणा-या उत्पन्नावर अवलंबून जास्त किंमतीला तो शेअर खरेदी करण्यास तयार असतो. अशा वेळी तो शेअर उच्च पी / ई (या वर्षीच्या तुलनेत) असूनही खरेदी केला जातो. याचाच दुसरा अर्थ चांगल्या व्यवस्थानाखालील, चांगल्या कामगिरीचा इतिहास असलेल्या व भविष्यात आकर्षक उत्पन्न देऊ शकणा-या म्हणजेच थोडक्यात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चांगल्या (वेलनोन) कंपनीच्या शेअरला तो जास्त किंमत मोजण्यास तयार असतो.
रेशोंचे विश्लेषण आजकाल इंटरनेटवर अनेक साईटसवर उपलब्ध असते, प्रामुख्याने काही चांगल्या ब्रोकरच्या साईटवर, बीएसई व एनएसीच्या साईटवरही हे उपलब्ध असते या सुवीधेचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.
मात्र जर तुमच्याकडे अजिबात वेळच नसेल व हे काम तुमच्यावतीने तज्ञ व्यक्तीने करुन तुम्हाला दिर्घ मुदतीत शेअर बाजारापासून मिळणार फायदा मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या वेग वेगळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाणा-या म्हणजेच डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत नियमीत दर महा एसआयपीच्या माध्यमातून दिर्घ मुदतीसाठी (साधारण ५ वर्षापेक्षा जास्त व उत्तम परताव्यासाठी १५ ते २० वर्षे) करणे हे अतिशय फायदेशीर होते. अशाप्रकारच्या चांगल्या योजनानी सरासरी वार्षीक २५% चक्रवाढ दराने १५ पेक्षा अधीक वर्षाचे काळात उत्पन्न दिलेले आहे. आणि अजून किमान ३० ते ४० वर्षे ते याच दराने मिळण्याची शक्यता आहे.
रेशोंप्रमाणेचे कंपनीच्या फंडामेंटलचे विश्लेषण करणेही तेवढेच किंबहुना अधीक महत्वाचे आहे त्याबाबत आपण पुढील प्रकरणात चर्चा करुया.