शेअर ट्रेडिंग मधून फायदा कसा मिळवावा?
शेअर बाजारात ट्रेडिंग करून अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीत फायदा मिळवून जास्तीच्या खर्चाला हातभार लावावा किंवा तो फायदा दीर्घ मुदतीसाठी गुंतवून संपत्ती निर्माण करावी असे वाटते काय.. जर तुम्हाला खरोखर असे वाटत असेल तर या पानावरील माहिती शांतपणे वाचून घ्या, समजून घ्या.
प्रश्न – १: शेअर बाजारात ट्रेडिंग करून किती लोकांना फायदा होतो?
उत्तर: तुमच्या आजूबाजूचे बहुतांशी लोक तुम्हाला सांगतील कि शेअर बाजार म्हणजे एक जुगार आहे. यातून पैसे मिळत नाहीत तर जातात म्हणजेच नुकसान होते. शेअर बाजारात ट्रेडिंग करणार्यांपैकी बहुतांशी लोकांना नुकसानच होते कारण ते चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी व कोणाच्या तरी सांगण्यावरून शेअर बाजारात उडी घेतात, कोणत्यातरी माहित नसलेल्या कंपनीचा शेअर विकत घेतात, त्याचा भाव गडगडला कि विकून बाहेर पडतात व नुकसान सोसतात आणि मग त्याची दुषणे शेअर बाजाराला देतात. अनेक सर्व्हे असे दाखवतात कि जेव्हा बाजारात पूर्ण तेजी असते व जेव्हा तो उच्चतम पातळीवर असतो त्यावेळी बहुतांशी लोकं बाजारात गुंतवणूक करतात. तेजी नंतर मंदी व मंदी नंतर तेजी अशी आवर्तने सदैव बाजारात चालू असतात. सर्वसाधारणपणे बाजारात नेहमीच चढ उतार हे असतातच, आणि ते तसे असतात म्हणूनच तर ट्रेडिंग करून फायदा मिळवता येतो. एका सर्व्हेक्षणानुसार असे सिद्ध झालेले आहे कि गेल्या पन्नास वर्षात बाजारात तेजीचा कालखंड हा साधारणपणे ३ ते ५ वर्षे टिकून असतो, अशा सततच्या तेजीचे कालखंडा नंतर मंदी हि येतेच मात्र अशा मंदीचा सरासरी कालखंड हा ९ महिने एवढाच असतो. खरे पाहता अशी मंदी म्हणजे अल्प काळात उत्तम नफा मिळवण्याची संधी असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारात जेव्हा मंदीचा कालखंड संपून परत तेजीचा कालखंड सुरु होतो तेव्हा बाजार मागील तेजीतील उच्चतम पातळी ओलांडून एक नवीन उच्चतम पातळी तयार करत असतो असा इतिहास आहे.
वरील गोष्ट समजून घेण्यासाठी आता आपण BSE सेन्सेक्स मधील काही महत्वाचे चढ उतार समजून घेऊया. सेन्सेक्स १९७९ साली सुरु झाला व तो आज दि. १८ ऑक्टोबर २०१७ ला ३२५८४ एवढा आहे म्हणजेच जर का तुम्ही १९७९ साली रुपये १०० सेन्सेक्स मध्ये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य रु.३२,५८४/- एवढे झाले असते. परंतु या कालखंडात तो सतत वरच गेला आहे का? याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. १९९२ साली सेन्सेक्स ने त्यावेळची उच्चतम पातळी ४५०० गाठली, त्यानंतर हर्षद मेहता चा घोटाळा उघड झाला व सेन्सेक्स १५०० पर्यंत खाली आला, हि बाजारातील पहिली मोठी तेजी मंदी. यानंतर २००० साली त्याने मागील उच्चतम पातळी तोडून ६३०० ची उच्चतम पातळी त्याने तयार केली,यानंतर आय.टी. बबल फुटला आणि तो २१०० पर्यंत खाली आला. हि दुसरी मोठी तेजी मंदी. यानंतर जानेवारी २००८ मध्ये सेन्सेक्स ने मागील उच्चतम पातळी ओलांडून २१२३२ ची नवीन उच्चतम पातळी निर्माण केली. यानंतर अमेरिकेत सब-प्राईम घोटाळा बाहेर पडला, तिकडे अनेक आर्थिक संस्था, बँका अडचणीत आल्या, त्यातील काही बुडाल्या व सेन्सेक्स मार्च २००९ मध्ये ७६०० च्या नीचतम पातळीवर येऊन पोहोचला,पुढे ८ महिन्यातच तो परत १८००० पार करून गेला, २०१३ मध्ये परत तेजी सुरु झाली व २०१४-१५ मध्ये त्याने ३०००० ची उच्चतम पातळी पार केली. २०१५-१६ मध्ये चीन मध्ये आर्थिक संकट आले त्याच्या परिणाम स्वरूप बाजार २०००० पर्यंत खाली आला व सध्या तो ३२५८४ च्या जवळ आहे.
मात्र खरे पाहता बाजाराची मुलतत्वे वापरून जर का तुम्ही गुंतवणूक/ट्रेडिंग केले तर निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. फ्युचर्स, ऑप्शन,इंट्रा दे यांचे नादी लागला नाहीत, चांगल्या मोठ्या नामांकित कंपन्यांचे शेअर्सची किंमत जेव्हा खाली येते तेव्हा ते जर का तुम्ही खरेदी केले व ते वाढल्यावरच विकावयाचे असे धोरण ठेवले तरच तुम्हाला निश्चित व चांगला नफा होऊ शकतो. यासाठी सर्वात महत्वाचे आहे स्वत:चे निर्णयावर ठाम राहणे, विश्वास ठेवणे व संयम पाळणे.
अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्या वस्तूची किंमत वाढते ती कालांतराने कमी होते व ज्या वस्तूची किंमत कमी होते ती कालांतराने वाढतेच,जगात सारे काही किंमतीतील चढ उतार हे मागणी व पुरवठा या न्यायाने होत असतात. जेव्हा उपलब्धता कमी होऊन मागणी वाढते तेव्हा किंमत वाढते व जेव्हा उपलब्धता भरपूर होते, सारेच लोक विकावयास लागतात तेव्हा साहजिकच मागणी कमी होते व किंमतही कमी होते. म्हणून तर काधीतरी कांदा १० रुपये किलो असतो तर कधी तो १०० रुपये किलोने विकला जातो. हेच सूत्र शेअर बाजारालाही लागू पडते.अर्थशास्त्राचा हा नियम शेअर बाजाराला व मुख्यत्वे करून मोठ्या कंपन्यांना तंतोतंत लागू पडतो.
जेव्हा जेव्हा एखादा शेअर त्याचे वर्षातील नीचतम पातळीच्या जवळ येतो तेव्हा तो त्या पातळीपासून १०% ते २०% या रेंज मध्ये अनेक वेळा वर खाली होत असतो, हि वेळ शेअर्स ट्रेडिंग करून पैसे मिळवण्यासाठी चांगली होऊ शकते.
ट्रेडिंग करताना किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहोत हे महत्वाचे असते:
अल्पकालीन दृष्टिकोन: हा साधारणपणे एक आठवडा ते ३ महिने असावा, या काळात शेअर निवडताना टेक्नीकल, सध्याचा ट्रेंड व फंडामेंटल यांचा एकत्रित विचार करून तो शेअर खरेदी करावा आणि त्याचे किंमतीत ट्रेंड प्रमाणे ३% ते १५% या दरम्याने नफा झाला असताना तो विकून टाकावा. जर तो या काळात सतत वाढत असेल तर, विकण्याची घाई न करता जास्तीत जास्त नफा मिळवून घ्यावा. जर तो जास्तच व्होलाटाईल असेल तर कमी फायद्यात ३ ते ५% बाहेर पडावे व दुसरी संधी पहावी.
मध्यम कालीन दृष्टीकोन: हा साधारणपणे एक महिना ते सहा महिने एवढा असावा. या काळात शेअर निवडताना टेक्नीकल, सध्याचा ट्रेंड व फंडामेंटल यांचा एकत्रित विचार करून तो शेअर खरेदी करावा आणि त्याचे किंमतीत ट्रेंड प्रमाणे ८% ते २०% या दरम्याने नफा झाला असताना तो विकून टाकावा. जर तो या काळात सतत वाढत असेल तर, विकण्याची घाई न करता जास्तीत जास्त नफा मिळवून घ्यावा. जर तो जास्तच व्होलाटाईल असेल तर कमी फायद्यात ३ ते ५% बाहेर पडावे व दुसरी संधी पहावी.
दीर्घकालीन दृष्टीकोन: हा साधारणपणे ६ महिने ते एक वर्ष किंवा जास्तच असू शकतो. या कालावधीत नफ्याची अपेक्षा १०% ते २५% एवढी असावी.
जर आपण घेतलेला शेअरची किंमत कमी होत असेल तर ती १०% कमी होईपर्यंत काहीच करू नये मात्र जर ती १०% पेक्षा जास्त खाली आली तर परत तेव्हढेच शेअर खरेदी करून सरासरी करावी. नॉर्मल कोर्स मध्ये अशी सरासरी एक ते दोन वेळाच करावी लागते, नंतर नफ्यात विकण्याची संधी मिळते ती मात्र सोडू नये.
शेअर निवडताना कंपनीची पूर्ण माहिती मिळवावी चांगला व्यवसाय करणारी, सातत्यपूर्ण नफा मिळवणारी, पहिल्या १०० मधील कंपनी शक्यतो निवडावी, EPS, P/E हे अवश्य पाहावेत.
वरीलप्रमाणे पथ्य पाळल्यास तुम्हाला निश्चितच चांगला नफा वर्षोनुवर्षे नियमितपणे मिळू सकतो. मात्र ८ ते १० वर्षात जेव्हा मोठी मंदी येते तेव्हा तुम्हाला कदाचित एक ते दीड वर्षे नफ्यात येण्यासाठी थांबावे लागू शकते हे विसरू नये, अशा मंदीचे कालखंडात सतत जास्तीची खरेदी करून सरासरी करत राहावे, तुम्हाला संधी हि मिळणारच आहे.
जर तुमची ३ ते ५ वर्षे थांबण्याची तयारी असेल तर ज्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत ५०% ते ६०% कमी झालेली असेल ते शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकता असे शेअर्स तुम्हाला ३ ते ५ वर्षात २०० ते ३००% सुद्धा फायदा मिळवून देऊ शकतात. सध्या अनेक फार्मा कंपन्यांच्या शेअर्सचे भाव असे खाली आलेले आहेत. उदा. सन फार्मा या दिग्गज औषधी कंपनीचा शेअर वर्ष दोन वर्षापूर्वी १२०० पेक्षा जास्त होता, सध्या तो ५४० च्या आसपास आहे, १४ ऑगस्ट २०१७ ला तर तो ४३२ पर्यंत खाली आला होता. याला यु.एस.एफ.डी.ए., इ. अनेक कारणे असतात. पण हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही असे शेअर्स खरेदी केले पाहिजेत व ते वाढण्याची वाट पहिली पाहिजे तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा मध्यम मुदतीत मिळत असतो.
बाजारात तेजीवाले व मंदीवाले असे दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात, जेव्हा मोठी तेजी असते तेव्हा तेजीवाले सतत ओरडत राहतात कि बाजार आणखीन वर जाणार आहे खरेदी करा, पैसे मिळवा, तर बाजारात जेव्हा मोठी मंदी असते तेव्हा मंदीवाले सतत ओरडत राहतात कि बाजार आणखीन खाली जाणार आहे विकून टाका, बाहेर पडा. खरे म्हणजे ते तुम्हाला उल्लू बनवत असतात व स्वत: पैसे मिळवत असतात. शहाणे व्हा पैसे निश्चित मिळतील.