सध्याचे परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?
जर आपण अवलोकन केले तर असे दिसून येते कि गेल्या दिड वर्षात सेन्सेक्स १८००० पासून जवळपास २९००० पर्यत वर गेलेला आहे अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात काय फायदा असा विचार अनेकांच्या मनात येत असतो. बाजार १५ हजार असताना गुंतवणूक केली असती तर बरे झाले असते मग गुंतवणूक यात करावी कि नाही असे वाटणे सहाजीकच आहे. पण ज्याना दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यानी ती केव्हाही सुरु करावी असा नियम आहे.
अर्थशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही वस्तुची किंमत जेव्हा वर जाते तेव्हा ती परत खाली येतेच व परत जेव्हा खाली येते तेव्हा ती नंतर परत वर जातेच. जेव्हा सर्वच लोकांना एखादी वस्तू काहि कारणाने महाग होईल असे वाटू लागते तेव्हा बरेच लोकं ती वस्तू खरेदी करण्यासाठी उताविळ होतात व त्या वस्तूची किंमत वाढू लागते या उलट जेव्हा सर्वानाच वाटू लागते कि आता आपणाजवळ असणारी वस्तूची किंमत कमी होणार आहे व ते सारेच ती विकण्याच्या मागे लागतात व किंमत कमी होऊ लागते. अर्थशास्त्राचा दुसरा नियम हा वस्तूची किंमत हि वस्तूच्या मागणी व उपलब्धतेवर अवलंबून असते, जेव्हा बाजारात एखाद्या वस्तुची उपलब्धता कमी असते व तिची मागणी जास्त असते तेव्हा तीची किंमत वाढते व उपलब्धता जास्त झाली व मागणी कमी झाली कि किंमत कमी होते. हे चक्र अव्याहतपणे चालूच असते, आणि म्हणूनच शेअर बाजारातही कधी तेजी असते तर कधी मंदी असते. मात्र कधीही कायम तेजी अथवा मंदी रहात नाही, राहूच शकत नाही. मात्र सध्या जर आपणास एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल तर आपण ती रक्कम म्युच्युअल फंडाच्या–लिक्वीड योजनेत गुंतवावी (या योजनेतील गुंतवणूक हि प्रामुख्याने ९० दिवसांचे निश्र्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक साधनात केली जात असते) –
या योजनेत सध्या व्याजदर चढे असल्यामुळे वार्षीक सरासरी ८.५% ते ९% च्या दरम्याने परतावा मिळत आहे व तेथून एसटीपी (सिस्टीमँटीक ट्रान्सफर प्लान) व्दारे डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत साप्ताहीक तत्वावर वर्ग करण्याचा पर्याय निवडावा, मुदत साधारणपणे ३ ते ५ वर्षाची असावी. याचा फायदा असा होतो कि लिक्वीड फंड योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला ८.५०% ते ९% दराने परतावा मिळत राहील व एसटिपीव्दारे बाजाराच्या सर्वच स्तरावर तुमची गुंतवणूक होत राहिल्यामुळे दिर्घ मुदती तुम्हाला फारच आकर्षक परतावा मिळू शकेल.
दुसरे म्हणजे या परिस्थितीत एसआयपी (सिस्टिमँटीक इंन्व्हेस्टमेंट प्लान) माध्यमातून दर महा ठरावीक तारखेला दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत रहाणे, यातही तुम्ही साप्ताहिक गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. तुमच्या बँकेच्या बचत खात्यात पैसे शिल्लक ठेवलेत कि झाले. तुमच्या मासिक उत्पन्नातील काही भाग तुम्ही या प्रकारे गुंतवून जेव्हा बाजारात परत तेजी येईल तेव्हा आकर्षक परतावा मिळवू शकाल.
थोडक्यात नियमीत गुंतवणूक, दिर्घ मुदत, थोडा संयम व आपल्या गुंतवणूकीच्या निर्णयाची ठामपणे अंमलबजावणी याव्दारे तुम्ही भविष्यात चांगले उत्पन्न मिळवू शकाल.
तुमच्या गरजेप्रमाणे सर्वप्रकारच्या योजनाम्युच्युअल फंडात असतात. समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम असते तर कर्ज रोखे आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसते मात्र व्याजाचे चढ उताराची व पत मानांकनाची जोखीम असते, मात्र हि जोखीम लिक्विड फंड योजनेत सर्वात कमी, म्हणजे नाहीचे बरोबरच, असते. म्युचुअल फंड योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ञ फंड मॅनेजर्स करत असतात हा सर्वात मोठा फायदा असतो.
abc
TTTT