विमा ही गुंतवणूक नाही.
जीवन-विमा हा प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनातील एक महत्वाचा घटक आहे. परंतु ब-याच व्यक्ती विमा पॉलीसी घेणे म्हणजेचगुंतवणूक करणे असा गैरसमज करुन घेत असतात.
मला हल्लीच एक मेल आला होता. त्यात असे लिहिले होते की ‘गेल्या वर्षी, ‘मी रु.२ लाखाची गुंतवणूक केली होती पैकी रु.८०,०००/- मी विम्यात गुंतवले होते.’ ह्या एकाच वाक्यामुळेच मला हा लेख लिहावा असे वाटत आहे. तसे पाहिल्यास या मेलमध्ये विशेष असे काहीच नाही. कारण मला नेहमीच गुंतवणुकीबाबत सल्ला विचारणारे मेल येतच असतात. परंतु येणा-या बहुतांशी मेलमधील मानसिकता ही अशीच असते, हे खरंच चिंताजनक आहे.
सर्वच माध्यमातून येणा-या जाहीराती व प्रभावी विक्रीतंत्रच या अशा मानसिकतेला कारणीभूत असते. तसेच सर्व विमा कंपन्यांचेएजंट लोकांच्या मनात असा ग्रह करुन देत असतात, की “तुम्ही अमुक एक रकमेचा मासिक/त्रैमासिक/वार्षिक विमा हप्ता भरुन तुमचे भविष्य सुरक्षित करा, तुम्हाला अमुक एक वर्षानंतर एवढी रक्कम मिळेल, परत जर काही अघटीत घडले तर वारसाला एवढी रक्कम मिळेल, शिवाय तुम्हाला कलम ८०-सी अंतर्गत आयकरात सुटही मिळेल”, असंच काहीतरी तुमचा एजंट वर्षानुवर्षे तुम्हाला सांगत असतो व यालाच बळी पडून तुमचा असा समज होतो की विमा काढणे ही फारच चांगली गुंतवणूक आहे.
पूर्वी विमा विकताना एजंट – एजंट मध्ये स्पर्धा असायची. कारण यातून मिळणारे कमिशनचे व विविध लाभ, जसे की अमुक एक टार्गेट पूर्ण केले की काही वस्तु, सोने, गाडी, परदेशदौरा इ. हेही एक कारण होते व आहे. पूर्वी विमा कंपन्यांच्या जाहीराती फारच कमी प्रमाणात केल्या जात असत मात्र सध्यातर अनेक विमा कंपन्या बाजारात असल्यामुळे त्यांच्यातही व्यावसाईक स्पर्धा एवढी वाढली आहे की, त्याना विविध प्रकारच्या माध्यमातून सतत जाहीराती कराव्याच लागतात. हा सततचा होणारा भडिमार हेही ‘विमा म्हणजे गुंतवणूक’ असे समजण्यामागे आहेच. एका सर्व्हेनुसार तीन वर्षापूर्वी जेवढ्या जाहीराती विमा कंपन्या करत होत्या त्यात आता जवळपास ८ पट वाढ झालेली आहे. तसे पाहिल्यास सध्याच्या जगात ह्यात गैर असे काहीच नाही. कारण हा काळच मुळी स्पर्धेचा आहे व स्पर्धा म्हटली की सारे काही माफ. पण ह्यामुळे पुरेसा विमा घेऊन आपल्या वारसांचे जीवन सुरक्षीत केलेले आहे असा लोकांचा गैरसमज होतो. प्रत्यक्षात मात्र खेदाने असे नमूद करावेसे वाटते, की विम्याचा हा जो असा प्रचार व प्रसार केला जात आहे,तोच मुळी चुकीचा आहे.
आणि म्हणूनच हाच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण विमा कंपन्यांमध्ये जमा केला जाणारा हप्त्याच्या रुपातील पैसा हा, विमा संरक्षणासाठी कमी व गुंतवणूक म्हणून जास्त प्रमाणात केला जातो. ह्याचे सर्वात महत्वाचे व प्रमुख कारण जर कोणते असेल तर गेल्या अनेक पिढ्यांपासून, विमा एजंट या जमातीने असा एक भ्रम सार्वत्रिकरित्या पसरवलेला आहे की ‘टर्म इन्शुरन्स’ विकत घेणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा आहे, कारण यात भरलेले पैसे तुम्हाला कधीच हयातीत परत मिळत नाहीत. हे असं का घडतं? तर तुमच्या मागे नेहमीच कोणता ना कोणता विमा एजंट तुम्हाला गाठून तुम्हाला ‘विमा ही कशी चांगली गुंतवणूक आहे?’ हे तुमच्या कानीकपाळी ओरडत असतो. काही वेळा ही ब्याद आपल्याकडे नको म्हणून काही व्यक्तीच तुमचा रेफरन्स त्याला देत असतात. मात्र तुम्हाला विमा विकताना तो स्वत:हून कधीच ‘टर्म इन्शुरन्स’ बद्दल चकार शब्दसुध्दा बोलत नाही. उलट जर तुम्ही याबाबत त्याला काही विचारले, तर तो तुम्हाला लगेच असे निदर्शनाला आणून देतो की यातून तुम्हाला काहीच परत मिळणार नाही. आणि निश्चितच तुम्ही ज्यातून आपल्याला काहीच जर मिळणार नसेल तर कशाला ‘टर्म इन्शुरन्स’ विकत घ्यावयाचा असा विचार करुन तीच विमा पॉलीसी विकत घेता ज्यातून तुम्हाला काही वर्षानंतर पैसे परत मिळणार असतात. इथे तो एजंट मनात खुश होत गालातल्या गालात हसत असतो, “कसं मी बरोबर पटवल! आता मला पहिल्या वर्षी एवढे कमीशन मिळेल व नंतर अमुक-अमुक वर्षे मला नियमित एवढे-एवढे वार्षिक कमिशन मिळत राहील.” थोडक्यात त्याने तुम्हाला कसे गंडवले हे कधीच कळत नाही.
आता तुम्ही विचाराल की ‘या प्रकारच्या पारंपरिक विमा पॉलिसीतून काही फायदा असतो की नाही?’ तर निश्चितच असतो, पण यातील सर्वात जास्त फायदा हा त्या एजंटला असतो, ज्याने तुम्हाला हा विमा विकलेला असतो. याचे प्रमुख कारण असते ते म्हणजे विमा एजंटने केलेली तुमची मानसिक अवस्था, ज्यामुळे तुम्ही तो विकत घेता. विमा एजंट याला बहुतांशी ‘Life’ संबोधत असतात. येथेच तर सारी गल्लत आहे. ‘Life’ जेव्हा असा विचार करतो की, आपल्याला अमुक एवढे विमा संरक्षण मिळाले आहे, त्याचवेळी विमा एजंट व विमा कंपनी मात्र त्यांच्यासाठी विमा हप्ता हे पैसे मिळवण्याचे एक माध्यम समजत असतात. या वेळी ‘Life’ मात्र विचार करत असतो की जर माझा अचानक मृत्यु झाला, तर माझ्या पत्नीला/पतीला किंवा अन्य वारसाला रु.२० लाख मिळतील जे त्यांचेसाठी पुरेसे असतील. एकदा का ‘Life’ च्या आयुष्याची (Life) किंमत गळी उतरवली की तो एजंट त्याच्या मनातील ‘टर्म इन्शुरन्स’ चा कीडा अलगद बाजूला करण्यात यशस्वी होतो आणि त्याबदल्यात तो विकत असतो एक अतिशय खर्चिक विमा पॉलीसी.
मी जे काही इथे सांगत आहे ते तुम्ही सहजपणे पडताळून पाहू शकता. आता असे करा की तुम्ही तुमच्या माहितीतल्या एका विमा एजंटला फोन करुन सांगा की तुम्हाला रु.२० लाखाचे विमा संरक्षण घ्यावयाचे आहे तेव्हा मला एखादा चांगली विमा योजना सांग.तसेच दुर-या एका विमा एजंटला फोन करून सांगा की तुम्हाला रु.२० लाखाचा जीवन विमा विकत घ्यायचा आहे आणि त्यासाठी मीवार्षिक रु.३०००/- चाच हप्ता भरण्यास तयार आहे, तेव्हा मला एखादी चांगली विमा योजना सुचव. आता तुम्हाला जो पहिला एजंट भेटावयास येईल तो तुम्हाला ‘टर्म इन्शुरन्स’ बाबत चकार शब्दसुध्दा न सांगता एखादी पारंपरिक विमा योजना तुमच्या समोर सादर करेल. मात्र तुम्ही बोलावलेल्या दुस-या एजंटची जेव्हा खात्री होईल की, तुम्ही वार्षिक रु.३०००/- पेक्षा जास्त हप्ता भरावयास तयार नाही, तेव्हा तो नाईलाजाने का होईना ‘टर्म इन्शुरन्स’ च्या योजनेची माहिती अवश्य देईल. कारण त्याला धंदा घालवावयाचा नसतो.
विमा विक्रीचे सद्य रुप अधिक विमा खरेदी करणा-यांची पॉलीसीच्या लाभाची लालसा याचा एकत्रित परिणाम म्हणजे वर सांगितलेलेविम्याबाबतच अज्ञान, ज्यामुळे बचतीची चांगली सवय असणारे बरेचसे भारतीय, बाजारात अनेक गुंतवणुकीची साधने उपलब्ध असूनही त्यामध्ये गुंतवणूक न करता विम पॉलिसी हेच गुंतवणुकीचे माध्यम समजून त्यात पैसे टाकत असतात. कारण मुळातच त्याना इन्शुरन्स व गुंतवणूक यातील फरकच समजेला नसतो. तसेच विम्याचा सर्वोत्तम पर्याय कोणता? तो कोणी व कधी घ्यावा हे अजिबात माहीतच नसते व त्यामुळे वारंवार त्याच-त्याच चुका केल्या जात असतात. यामुळेच गोंधळाची परिस्थिती उद्भवत असते.
आता हेच पहा, गुंतवणुकीसाठी प्रत्येक माणसाच्या गरजेनुसार व जोखीम स्विकारण्याच्या तयारी/क्षमतेनुसार आर्थिक बाजारामध्येविविध गुंतवणूकीच्या योजना उपलब्ध असतात. मात्र अज्ञानामुळे या चांगल्या माध्यमाचा उपयोग गुंतवणुकीसाठी फारच थोड्या व्यक्ती करत असतात. आता कमिशनच्या बाबतीत बोलवयाचे झाल्यास इन्शुरन्स व अन्य गुंतवणूक पर्याय या दोन्ही प्रकारातील एजंटना कमिशन हे मिळतच असते. कारण गुंतवणूक करु इच्छीणा-याला कोणाला तरी त्याचा मोबदला द्यावा लागतो, एवढ्यावरच या दोन प्रकारच्या एजंट मधील तुलना संपते.
आता आपण प्रथम हे पाहुया की विमा म्हणजे काय? आणि तो कशा स्वरुपात घ्यावा? आणि इन्शुरन्स व गुंतवणुकीतील महत्वाचा फरक तो काय? एका वाक्यात सांगायचे झाले तर विमा म्हणजे भविष्यातील आर्थिक गरजेचे संरक्षण विकत घेणे. जर काही कारणाने एखाद्या मिळवत्या व्यक्तीचा अकाली मृत्यु झाला, तर त्याच्या पश्चात रहाणा-या व त्याच्यावर अवलंबून असणा-या व्यक्तींनाआर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी जीवन विमा संरक्षण गरजेचे असते. तसेच मालमत्तेचा, आजारपणाचा, कायदेशीर दायीत्वाचा आणि अनेक गोष्टींचा योग्य तो विमा उतरवणे हे जीवनविम्या इतकेच महत्वाचे असते. आपल्या जीवनाचा विमा उतरवताना सर्वोत्तम विमा योजना म्हणजे ‘टर्म इन्शुरन्स’ ज्यामध्ये तुम्ही फक्त विम्याचीच रक्कम, ज्या उद्देशासाठी विमा घ्यावयाचा आहे त्यासाठीच भरत असता. कारण विम्याचा खरा उपयोग हा आपल्या प्रिय व्यक्तीना आपल्या पश्चात आर्थिक सुरक्षेची गरज म्हणून असतो. मात्र ज्यावेळी तुम्ही ‘टर्म इन्शुरन्स’ व्यतिरिक्त अन्य विम्याची योजना विकत घेता, त्यावेळी तुम्ही गुंतवणूक समजून तो विकत घेत असता. जेव्हा गुंतवणूक समजून विमा विकत घेता तेव्हा, तुम्ही अन्य गुंतवणुकीपासून मिळणा-या लाभांना मुकत असता. कारण गुंतवणूकीच्या तत्त्वात न बसणारी अनेक कारणे इन्शुरन्समध्ये आहेत. यातील काही कारणे:
तरलतेचा अभाव: गुंतवणूक ही नेहमीच तरल (लिक्वीड) असलीच पाहीजे. कारण हा गुंतवला जाणारा पैसा तुमचा आहे, तो तुम्हाला काही सहजपणे मिळालेला नसतो तर त्यासाठी तुम्हाला कष्ट घ्यावे लागलेले असतात. वर तुमच्या काही इच्छा आकांक्षा बाजुला सारुन तुम्ही तो बाजुला काढलेला असतो. म्हणूनच जर का अचानक गरज लागली तर तो केव्हाही उपयोगात आणता आलाचपाहीजे, अन्यथा वेळेला उपयोगी न येणा-या गुंतवणूकितील पैशाचा उपयोगच काय. आता इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबत काय होते की,गुंतवणूक म्हणून जी रक्कम तुम्ही गुंतवलेली असते ती अतीदिर्घ मुदतीसाठी (विमा पॉलीसीच्या मुदतीनुसार) अडकून रहात असल्याने ती तुम्हाला मध्येच, हवी तेव्हा, काढता येत नाही. या व्यतिरिक्त कोणतीही विमा योजना, त्या प्रकारातील कोणत्याही गुंतवणूक साधनापेक्षा, खूपच कमी परतावा गुंतवणुकीवर मिळवून देत असते. आता अशी कोणती योजना आहे कि जी गुंतवणूकीबरोबरच करबचतीचासुद्धा लाभ देते? तर यासाठी चांगले पर्याय म्हणजे काही रक्कम पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात गुंतवणे व काही रक्कम म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत गुंतवणे हा होय. पब्लिक प्रॉव्हिडंड फंडात ५ वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो तर म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत ३ वर्षांचा लॉक-इन पिरिअड असतो. या दोन्ही योजनेतील लॉक-इन पिरियड हा विमा पॉलिसीपेक्षा खूपच कमी असतो व दोन्ही गुंतवणूकीतून विमा योजनेप्रमाणेच कलम ८०-सी अंतर्गत आयकरात सूट मिळते.
पारदर्शकतेचा अभाव: आम्ही असे मानतो की सर्व प्रकारच्या गुंतवणूक पर्यायात पारदर्शकतेला अनन्यसाधारण महत्व असलेच पाहीजे.ज्या विमा योजनेला बरेच लोकं गुंतवणूक म्हणून पहात असतात त्यात या गोष्टीचा पूर्ण अभाव असतो. ज्या गुंतवणूक साधनात पारदर्शकता नसते त्याच साधनात सर्वसाधारणपणे घोटाळे, अकार्यक्षमता आणि असमाधानकारक कामगिरी होत असते. भारतातील म्युच्युअल फंड उद्योग ज्या प्रमाणात पारदर्शकता व चांगली कामगिरी करत असताना भारतातील विमा क्षेत्रात मात्र त्या तुलनेतकोणतेच मापदंड दुर्दैवाने पाळले जात नाहीत. यामुळेच तुम्ही विमा योजनेत गुंतवलेले पैसे कोठे गुंतवले जातात, ते कोणकोणत्या साधनात व किती प्रमाणात गुंतवले जातात या बाबतच फारच थोडी जाणकारी तुम्हाला विमा कंपनीकडून दिली जात असते. या बाबतीत म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक योजनेत याची माहीती व्यवस्थित पणे दिलेली असते. म्युच्युअल फंडात रोजच्यारोज निव्वळ मालमत्ता मूल्य, गुंतवणुकीचा तपशील, जर नियमात काही बदल झाले तर ते लगेच तुम्हाला समजून घेण्याची सोय असते. जर फंड मॅनेजर किंवा एखाद्या महत्वाच्या जागेवरील व्यक्तीमध्ये बदल झाला तर तो सार्वजनिक केला जातो ज्यामुळे गुंतवणूकीच्या व्यवस्थापनात किंवा निर्णयात काय बदल घडू शकतो याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. हे सारे नियम खरं म्हणजे विमा क्षेत्रालाही लागू करणे गरजेचे आहे. पण सध्या तरी याचा अभावच दिसुन येत आहे.
किंमत (कॉस्ट): जे एजंट म्युच्युअल फंडाच्या योजना, रिझर्व्ह बँकेचे सरकारी रोखे, कंपन्यांचे बॉंड, पोस्टल डिपॉझीटस, पीपीएफ या प्रकारातील आर्थिक उत्पादने विकतात त्याना मिळणारे कमिशन व इन्शुरन्स एजंट यांना मिळणारे कमिशन यात जमिन अस्मानाचा फरक आहे. खर म्हणजे विमा एजंटला दिले जाणारे जास्त कमिशन ही गुंतवणूकदाराची केली जाणारी लूटच आहे. आता तुम्ही जेव्हा एखादी पारंपरिक विमा योजना विकत घेता, तेव्हा विमा एजंटला पहिल्या वर्षी सरासरी ४०% पर्यंत कमिशन दिले जाते, दुस-या वर्षी ते ७.५% ते १०% या दरम्यान दिले जाते व नंतरच्या उर्वरीत वर्षात ते ५% दराने दिले जाते. म्हणजेचे जर करबचत व गुंतवणूक या उद्देशाने तुम्ही पुढील २५ वर्षानंतर मॅच्युअर होणा-या विमा योजनेत दर वर्षी रु.१.५० लाख गुंतवले तर एजंटला मिळणारे एकूण कमिशन होते रु.२,४७,०००/- (पहील्या वर्षाचे रु.६०,०००/- + दुस-या वर्षाचे रु.१५,०००/- + पुढील २३ वर्षाचे प्रत्येक वर्षी रु.७,५००/- प्रमाणे रु.१,७२,५००/-). आता जे आर्थिक उत्पादन तुम्ही गुंतवणुकीचे साधन म्हणून विकत घेत असता, त्याच्या सेवेसाठी दिली जाणारी कमिशनची रक्कम ही फारच मोठी होते, ज्यामुळे मूळ गुंतवणुकदाराला मिळणारा परतावा हा खूपच कमी होत असतो. खरं म्हणजे हा कमिशनचा जास्त दर हाच मुळी विमा योजना ही गुंतवणुकीचे अत्यंत सामान्य साधन आहे हे सांगण्यास पुरेसे आहे.म्हणूनच सोकॉल्ड सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून विमा योजनेत गुंतवली जाणारी रक्कम हे अत्यंत वाईट डिल गुंतवणूकदारासाठी असते.
विमा हा जवळपास प्रत्येकाचीच ठराविक काळापर्यंत गरज आहे यात दुमत असण्याचे कोणतेच कारण नाही. परंतु प्रथम तुम्हाला किती रकमेचे विमा संरक्षण हवे आहे हे निर्धारीत करा व त्यानंतर तेवढे विमा संरक्षण ‘टर्म इन्शुरन्स’ च्या माध्यमातून घ्या व त्याच वेळी तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार बाजारात उपलब्ध असणारी सर्व गुंतवणूक साधने तपासा, त्यांची मागील कामगिरी तपासा व नंतरच तुमच्या गुंतवणूकीचा निर्णय घ्या हाच खरा शहाणपणा होय.
परत एकदा सांगतो की विमा व गुंतवणूक यांची गल्लत करु नका, यातच तुमचे उज्चल आर्थिक भविष्य दडलेले आहे.