तेजी व मंदी – शेअर बाजाराचा अविभाज्य घटक :
एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि बाजारात नियमितपणे चढ उतार होतच असतात, तसेच ८/१० वर्षात एक मोठी तेजी येत असते व तेजी पाठोपाठ एक मोठी मंदीही येत असते. तेजीच्या कालखंडात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य मोठ्या प्रमाणावर वाढते व मोठ्या मंदीच्या काळात ते परत कमी होत असते. मात्र शेअर बाजाराचा अभ्यास करताना असे दिसून आले आहे कि शेअर बाजारात तीन प्रकारचे कल प्रामुख्याने असतात – तेजीचा कालखंड, मंदीचा कालखंड व साइड-वे (बाजार एका ठराविक मर्यादेत वर खाली होतो ) कालखंड, या तिन्हीमध्ये मंदीचा कालखंड हा सर्वात कमी असतो. जो गेल्या पन्नास वर्षात सरासरी ९ महिने एवढाच आहे. या कालखंडात आपण आपले गुंतवलेले पैसे काढू तर नयेतच उलट शक्य असल्यास जास्त रकमेची गुंतवणूक करावी कारण मंदी नंतर तेजी येतेच व तेजीच्या काळात आपल्या गुंतवणुकीचे मूल्य जास्त प्रमाणात वाढते.
तेजीचा कालखंड: हा कालावधी सर्वात जास्त काळाचा असतो जो किमान ३ वर्षे व जास्तीत जास्त ५ वर्षाचा असतो. या कालखंडात गुंतवणुकीचे मूल्य जवळपास सतत वाढत असते , हा कालखंड आनंद देणारा असतो. या कालखंडात सर्वात जास्त लोक शेअर बाजारात सतत गुंतवणूक करत असतात म्हणजेच कंपन्यांचे शेअर्सला पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असते म्हणून शेअर्सचे भाव सतत वाढत असतात कोणत्याही वस्तूचे बाबतही हेच घडत असते, जेव्हा बाजारात त्या वस्तूचा तुटवडा असतो तेव्हा दर वाढतात व जेव्हा बाजारात मालाचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो तेव्हा दर कोसळतात म्हणूनच कधी आपण कांदा ५ रूपये किलोने विकत घेतो तर तो कधी १०० रुपये किलोने विकत घ्यावा लागतो. तेच तूर डाळीचे बाबत गेल्या वर्षी तुरडाळ २०० रुपये किलोने विकली जात होती यंदा ती ६० -७० रुपये किलोने मिळत आहे . हीच गोष्ट शेअर बाजारालाही लागू पडते हे समजून घेतलेत म्हणजे शेअर बाजाराची भीती दूर होईल व तुमचा संपती निर्माण कारण्याचा राजमार्ग तुम्हाला खुला होईल.
मंदीचा कालखंड: ज्या प्रमाणे तेजीत शेअर्सचे भाव वाढतात कारण सारेच जण शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात तसेच जेव्हा सर्वच गुंतवणूकदार काही कारणामुळे त्यांचेकडील शेअर्स विकण्याचा मानसिकतेमध्ये असतात तेव्हा खरेदीसाठी मात्र थोडेच उत्सुक असतात मग हळूहळू शेअर्सचे भाव कोसळू लागतातव बाजारात मंदी येते. पण हा मंदीचा काळ गेल्या ५० वर्षात सरासरी ९ महिने एवढाच आहे. याच काळात गुंतवणूक दाराला कमी भावात युनिट्स मिळत असल्याने जास्त युनिट्स मिळतात व याचा फायदा पुढील तेजीमध्ये होतो. या काळात जास्तीत जास्त रकमेची गुंतवणूक करावी कारण मंदी ही गुंतवणुकदारासाठी एक सुवर्णसंधीच असते.
साइड–वे चा कालखंड: या कालखंडामध्ये शेअर्स बाजार एका ठराविक मर्यादेत वर खाली होत असतो, ज्याप्रमाणे २०११ ते २०१३ या तीन वर्षात सेन्सेक्स १५००० ते २१००० या मर्यादेत वर खाली होत होता.