२२. दुसऱ्यांच्या चुकांमधून शिका
१. जर तुम्ही एखादा नवीन शेअर खरेदी केलेला असेल आणि तो त्याच्या खरेदी किंमतीपेक्षा जर ८% कमी झाला असेल तर तो शेअर लगेच विकून तुमचे पैसे मोकळे केले पाहिजेत हे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीच्या विम्या सारखे आहे. बरेचवेळा नुकसानीतील शेअर विकण्याचे टाळले जाते तेव्हा अशी अशा असते की तो शेअर परत वाढेल आणि मग आपण तो विकू मात्र जेव्हा तो ८% पेक्षा जास्त खाली जातो तेव्हा तो आणखीन खाली जाण्याचीच शक्यता जास्त असते म्हणून तो लगेच विकला पाहिजे आणि तेव्हा दुसरा शेअर ज्यात तेजी दिसत असेल तो खरेदी केला पाहिजे. जेव्हा तुम्ही ७-८% नुकसानीत शेअर विकता तेव्हा तुम्ही तुमचे भांडवल सुरक्षित करत असता, म्हणून हा निर्णय घेतला पाहिजे. ७-८% हा जास्तीत जास्त नुकसानीचा दर असतो तो सरासरी दर नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही जर असे केलेत तर मंदीच्या कालखंडात तुमचे नुकसान ३ ते ४% पर्यंत मर्यादित ठेवता येते.
मात्र हे करत असताना तुमच्या पोर्टफोलिओ मधिल जे जुने मोठ्या कंपन्यांचे शेअर्स असतील व त्यात जर चांगला नफा झालेला असेल तर त्याला हा नियम लावण्याची गरज नाही कारण तो तुमचा विनिंग स्टॉक असतो. त्या शेअरमध्ये अशावेळी शक्य असल्यास जास्तची खरेदी करून सरासरी करणे चांगले असते.
२. एखादा खराब कामगिरी करणारा शेअर जरी कमी किंमतीत उपलब्ध असला तरी तो खरेदी करू नका त्यातून तुम्हाला काही फायदा होणार नाही.
३. नेहमीच बाजाराचे सर्वच नियम पाळा.
४. शेअर खरेदी करताना तुमच्या भावनेला कोणतिही किंमत देऊ नका. एखादा शेअर तुम्ही रु. ६० या किंमतीला खरेदी केलेला असेल आणि तो तुम्हाला रु. ५५ या किंमतीला विकावा लागला आणि परत तो रु ६५ या किंमतीला खरेदी करणे हे तुम्हाला कदाचित मूर्खपणाचे वाटेल, पण हा विचार बाजूला सारा आणि मागील घटना विसरून जर हे असे करावे लागले तर बेलाशक करा. कारण यातच तुमचा अंतिमतः फायदा होणार आहे. एखादा निर्णय चुकेल पण बरेच निर्णय बरोबर येतील ही खात्री बाळगा. कारण प्रत्येक वेळी घेतलेला निर्णय हा त्या वेळी नवीनच असतो.
५. शेअरबाजारात गुंतवणूक करताना नेहमीच दीर्घ मुदतीचाच विचार केला पाहिजे.
६. कोणतेही नियोजन केल्याशिवाय केलेल्या गुंतवणुकीला कोणताही अर्थ नसतो. गुंतवणूक करताना तुम्ही ती कोणत्या कारणासाठी करू इच्छिता आणि ती किती काळासाठी करू इच्छिता/शकता याला फार महत्व असते.
७. नेहमी मोठे गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड्स आणि परदेशी गुंतवणूकदार कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असतात किंवा कोणते शेअर्स विकत असतात हे नियमितपणे अवलोकन केले पाहिजे हे न करणे म्हणजे चांगला शेअर खरेदी/विक्री करण्याची योग्य संधी हातची दवडण्यासारखे आहे. शेअरबाजाराला दिशा देण्यासाठी फार मोठ्या रकमेची आवश्यकता असते आणि मोठे गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड्स आणि परदेशी गुंतवणूकदार हेच ती दिशा देऊ शकत असतात कारण त्यांच्याकडे भरपूर पैसे उपलब्ध असतात, नियमित येत असतात. तुम्ही जो शेअर खरेदी करण्याचा विचार करत असाल तो स्टॉक म्युच्युअल फंडाच्या एकातरी मोठ्या योजनेचा मोठा भाग असला पाहिजे. त्याचप्रमाणे जर तो शेअर एखाद्या मोठ्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट संस्थेने खरेदी केलेला असेल तर ते अधिकच चांगले, कारण हि कृती असे दर्शवित असते कि ती कंपनी योग्य दिशेने काम करत आहे आणि म्हणून त्या शेअरला चांगले भविष्य आहे. आघाडीच्या म्युच्युअल फंड योजनेत नियमितपणे गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली जात असल्यामुळे तिच्यात बाजाराला दिशा दाखवण्याची ताकद असते हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे.
८. शेअरबाजारात संयम हा नेहमीच उपयुक्त गुण मानला जातो, ज्याच्याकडे तो जास्त असतो तो सर्वात जास्त फायदा मिळवत असतो. तुम्ही खरेदी केलेल्या चांगल्या शेअर्स मधिल कमी जास्त चढ उताराकडे दुर्लक्ष करा. कारण चांगले फळ मिळावयास नेहमीच वेळ द्यावा लागतो.
९. नेहमीच बाजारात काय चालले आहे याकडे लक्ष दिले पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नुकसान करून घेणेच होय. नेहमीच नवीन काहीतरी शिकण्याचा फायदाच मिळत असतो यामुळे आपली चूक दुरुस्त करता येऊ शकते. आतली बातमी मिळवण्याचा प्रयत्न करा. नुसत्या मोठ्या बातम्यांवर विसंबून राहू नका. तुमचा अभ्यास तुम्हीच केला पाहिजे. आजकाल हे करणे फारच सोपे झालेले आहे त्याचा वापर करा.
१०. तुमचे सर्वच पैसे एकाच शेअर्समधे किंवा एकाच क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवू नका. तुमची गुंतवणूक ही नेहमीच निरनिराळ्या संक्षेत्रातील काही चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समधे केलेली असली पाहिजे. ती किमान पांच क्षेत्रातील दहा शेअर्समधे करावी.
११. ब्रोकर तुम्हाला मार्जिन वापरायला देत असतो पण ते किती प्रमाणात वापरावयाचे हे तुम्ही तुमची जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार ठरवले पाहिजे कारण जास्त मार्जिन वापले आणि नुकसान झाले तर तुमचे सारेच पैसे तुम्ही घालवून बसू शकता. शक्यतोवर हे टाळा.
१३. हाव ही अतिशय धोकादायक असते ती तुम्ही मिळवलेला संपूर्ण नफा फस्त करून टाकू शकते. जेव्हा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होतो तेव्हा तो लगेच नगदी स्वरूपात करून घेणे केव्हाही फायदेशीर असते.