म्युच्युअल फंडचे विविध प्रकार
म्युच्युअल फंडाच्या वेगवेळ्या स्कीम्स मध्ये आपण गुंतवणूक करू शकता. एकदाका आपणाला स्कीम्सचे प्रकार समजले की आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्टांनुसार, तुमच्या आवश्यकता, आर्थिक स्थिती, जोखीम घेण्याची क्षमता आणि अपेक्षित परतावा यानुसार स्कीमांची निवड करणे सोपं जातं. संरचना आधारित स्कीम तीन प्रकारच्या असतात.
ओपन-एंडेड योजना
ओपन-एंडेड योजनेला मुदत पूर्तता कालावधी नसतो. यामध्ये त्यादिवसाच्या NAV (गुंतवणुकीसाठी एका युनिटचे मूल्य) चे आधारे केव्हाही खरेदी व विक्री करता येते आणि म्हणूनच ही सर्वोत्तम म्हणावयास हरकत नाही.
क्लोज-एंडेड स्कीम्स
मुदत बंद योजना या सर्वसाधारणपणे ३ वर्षे मुदतीच्या असतात. मात्र काही योजनांचा कालावधी ३ वर्षांपेक्षा अधिक मुदतीच्याही असू शकतो. या योजना त्यांचे आरंभाच्या दरम्यानेच गुंतवणुकीसाठी खुल्या असतात त्यांमध्ये मुदतपुर्तीपूर्वी परत गुंतवणूक करता येत नाही बहुतांशी योजना या मुदतपूर्तीनंतर ओपन-एंडेड स्कीम मध्ये परावर्तित होतात. यातील काही योजना स्टॉक एक्सचेंजवर नोंदविल्या जातात आणि योजना ज्या स्टॉक एक्सचेंजवर नोंदली असेल तेथेच त्यांची खरेदी-विक्री कंपन्यांचे शेअर्सप्रमाणे करता येते.
इंटरवल स्कीम
याप्रकारची योजना ही ओपन-एंडेड व क्लोज-एंडेड योजनांचे मिश्रण असते. या योजना ठराविक कालावधीत विक्री आणि पुनर्खरेदीसाठी खुल्या असतात.
म्युच्युअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या योजनेत गुंतवणूक करता येते:
१) समभाग आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम अंतर्भुत असते व म्हणूनच अशा योजनेत शक्यतो एसआयपी (सिस्टिमँटीक इन्व्हेस्टमेंट प्लान) व्दारे नियमीत दिर्घकाळासाठी गुंतवणूक करावी. दिर्घकाळ म्हणजे किमान ५ वर्षे ते २० वर्षे नियमीत गुंतवणूक केली असता रुपी कॉस्ट अँव्हरेजींग व चक्रवाढीचा फायदा मिळतो व आकर्षक उत्पन्न प्राप्त होते. या प्रकारात
लार्ज कँप (मोठ्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),
मिड कँप (मध्यम आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),
स्मॉल कँप (लहान कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),
लार्ज व मिड कँप ( मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),
मिड व स्मॉल कँप (मध्यम व लहान आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),
मल्टी कँप (मोठ्या,मध्यम व लहान आकाराच्या कंपन्याच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते),
बँलन्सड (कंपन्याच्या शेअर्समध्ये व कर्जरोख्यात गुंतवणूक करुन समतोल राखला जातो),
सेक्टोरल(एकाच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते) आदी विविध प्रकारच्या व कमी जास्त जोखमीच्या योजना असतात. आपल्या जोखीम स्विकारण्याच्या व गुंतवणूक कालावधीनुसार योजना निवडावी. (म्युच्युअल फंड व गुंतवणूक या विभागात याची सविस्तर माहिती दिलेली आहे).या प्रकारातील चांगल्या योजना निवडीसाठी,चांगल्या योजना या विभागाला भेट द्या.
वरील सर्व समभाग आधारित योजनांची विस्तृत माहिती याच संकेतस्थळावर दिलेली आहे ती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
२) डेब्ट फंड योजना (कर्जरोखे आधारीत): या प्रकारच्या योजनेत विविध योजना असतात. या प्रकारच्या योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसल्यामुळे यातील काही योजनेत अत्यल्प काळासाठी गुंतवणूक करता येते. सर्वसाधारणपणे अशा योजनेतून मिळणारा परतावा हा तेवढ्याच कालावधीच्या बँक ठेवींपेंक्षा जास्त मिळण्याचीच शक्यता असते. या प्रकारात
लिक्वीड योजना (अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात व मनी मार्केट सिक्युरिटीज ज्यांची मुदत ९१ दिवसांपेक्षा कमी आहे व ज्यावर ठरावीक दराने उत्पन्न मिळते अशा साधनात गुंतवणूक केली जाते),
इंकम योजना (सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते –व्याज दर बदलाचा प्रभाव पडतो),
मन्थली इंकम प्लान (७५ ते ८०% रक्कम दिर्घ मुदतीच्या सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात व उर्वरीत २० ते २५% रक्कम शेअर बाजारात गुंतवले जातात व नियमीत दरमहा/त्रैमासिक डिव्हिडंड दिला जातो),
फिक्सड मँच्युरीटी प्लान अर्थात निश्चीत तारखेला पुर्ण होणारी योजना (जेवढ्या दिवसाची योजना असेल तेवढ्या दिवसाच्याच सरकारी व कंपन्यांच्या कर्जरोख्यात गुंतवणूक केली जाते – या योजनेत जवळपास जोखीम नसते), इ. अनेक प्रकारच्या योजना गुंतवणूकदाराच्या गरजेप्रमाणे असतात.
उद्दिष्ट आधारीत योजना सहा प्रकारच्या असतात
ग्रोथ योजना
ग्रोथ योजना हि मध्यम ते दीर्घ मुदतीसाठी भांडवली वाढ देऊन आशादायक परतावा मिळण्यासाठी केली जाते. यातील मोठा हिस्सा शेअर बाजारात गुंतविला जातो. त्यामुळे त्यांचे किंमतींत छोट्या कालावधीत जरी घट झाली तरी दीर्घ कालावधीत या योजना चांगलाच परतावा देतात. तरुण व्यक्ती ज्या जास्त जोखीम स्वीकारू शकतात त्यांचेसाठी हा योग्य पर्याय आहे.
इन्कम योजना
या योजनांमध्ये बॉंडस् व कॉर्पोरेट डिबेंचर्ससारख्या निश्चित उत्पन्न देणा-या सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली जाते. यातीला परतावे हे स्थिर आणि कमी जोखिमेचे असतात. जर तुम्ही निवृत्त व्यक्ती असाल किंवा तुम्हाला भांडवली स्थैर्य हवे असेल अथवा जर तुम्हाला नियमित व स्थिर परतावे हवे असतील इन्कम योजना स्वीकारा.
बॅलन्सड योजना
नावाप्रमाणेच या योजनेखाली काही सुनिश्चित प्रमाणात शेअरमार्केटमधे व निश्चित इन्कम सिक्युरिटीजमधे गुंतवणूक केली जाते. हि योजना म्हणजे ग्रोथ व इन्कम स्कीमांचा सुवर्णमध्य आहे. निव्वळ इक्विटी योजनांचे तुलनेत यात कमी जोखीम असते.
लिक्विड स्कीम्स
तुम्हाला जर फारच थोड्या कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची असेल हि योजना चांगली आहे हिच्यामध्ये अगदी २ दिवसासाठीसुद्धा गुंतवणूक केली जाते. या योजनेत मनी मार्केट ट्रेझरी बिल्स, सर्टिफिकेट आफ डिपॉझिट, कमर्शिअल पेपर आणि सरकारी रोख्यात अशा सुरक्षित पण कमी कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते. बॅंकेतील बचत व चालू खाते ज्यावर फारच कमी व्याज मिळते अथवा अजिबात व्याज मिळत नाही त्यापेक्षा या योजनेत गुंतवणूक केली असता साधारणपणे ६ ते ७ टक्के वार्षिक दराने या योजनेत परतावा मिळतो.
गिल्ट फंड
हे फंड खासकरुन शून्य क्रेडिट जोखीम असणा-या सरकारी रोख्यात गुंतवणूक करतात. तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक करावयाची असेल या योजनेत करा.
टॅक्स सेव्हिंग स्कीम्स
या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम ८०-सी खाली रुपये १००००० (रुपये एक लाख मात्र) पर्यंत एकूण उत्पन्नातून वजावटीला प्राप्त असते. यात केलेली गुंतवणूक जर इन्कम टॅक्स वजावटीसाठी केली असेल तर ३ वर्ष काढता येत नाही. कर बचतीसाठी हा उत्तम पर्याय आहे. युलीपमधे कर बचतीसाठी गुंतवणूक करण्या ऐवजी हा पर्याय वापरणे शहाणपणाचे असते.
विशेष योजना
इंडेक्स फंडस्
या योजना विशिष्ट इंडेक्समधील समान क्षमतेच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतात. त्या विशिष्ट इंडेक्सचा पोर्टफोलिओ अशा योजनेत परावर्तित होतो.
सेक्टर स्पेसिफिक फंडस्
विशिष्ट उद्दोग किंवा क्षेत्रात गुंतवणूक केली जाते. उदा. बॅंकींग क्षेत्र अथवा आयटी क्षेत्र इ. या फंडातील परतावे हे त्या क्षेत्रातील उद्दोगातील कामगिरीवर अवलंबून असतात त्यामुळे या फंडात जास्त जोखीम असते व गुंतवणूकदाराला नियमित लक्ष ठेवावे लागते शेअर बाजारात जाणकारी असणा-यानीच अशा योजनेत गुंतवणूक करणे लाभदायक होऊ शकते.
सर्वसामान्य गुंतवणूकदाराने हे फंड टाळणेच इष्ट. सर्वसामान्य गुंतवणूकदाराने डायव्हर्सिफाइड ओपन-एंडेड स्कीम मध्येच शक्यतो गुंतवणूक करावी हेच उत्तम.