गुंतवणुकीचे व्यवस्थापनः
तसं पाहिले असता म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्स हे आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करतच असतात त्यामुळे आपल्याला काही वेगळे व्यवस्थापन करण्याची गरज नसते. मात्र म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्सवरती योजनेच्या उद्दिष्टांचे बंधन असते व एका मर्यादेबाहेर त्यांना खरेदी-विक्री करता येत नाही आणि म्हणूनच मार्केट जेव्हा मोठ्या प्रमाणात कोसळते तेव्हा NAV सुद्धा कमी होते. वर्ष २००८ मध्ये शेअर बाजार २१ हजार ते ७५०० पर्यंत कोसळला होता मात्र तो तसा एकाच दिवशी कोसळला नव्हता तर तो टप्या टप्प्याने खाली आला होता. आपल्याला त्यामागचे जागतिक मंदी, अमेरिकेत झालेला सबप्रईमचा घोटाळा, परदेशात दिवाळखोरित निघालेल्या अनेक आर्थिक संस्था इ. कारणे ज्यावेळी आपल्याला समजली त्यावेळी ज्यांनी आपली गुंतवणूक निष्क्रियपणे पाहत न बसता एक तर काढून घेतली अथवा म्युच्युअल फंडचे डेब्टस फंडात वर्ग केली व मार्केट जसं जसं खाली येत गेले त्या त्या वेळी पुनःर्गुंतवणूक केली अथवा डेब्टस फंडातून इक्विटी फंडात वर्ग केली त्यांना मात्र फायदाच झाला.
सर्वोत्तम पर्याय म्हणजे नियमीत दरमहा गुंतवणूक करत रहाणे व जर आपण दरमहा रु.२०००० पेक्षा जास्त करणार असाल तर अँटो डेबीटचे ४ फॉर्म भरुन महिन्यात साधारणपणे ७-८ दिवसाचे फरकाने ४ वेळा गुंतवणूक करावी, अशी गुंतवणूक केली असता सरासरीचा सर्वोत्तम फायदा मिळतो. माझा अनुभव आहे कि अशा प्रकारे गुंतवणूक करत राहील्यास १० वर्षात एखादे वर्ष सोडल्यास उर्वरीत ९ वर्षे चांगला फायदा होतो.
जर एकरकमी गुंतवणूक करावयाची असेल तर प्रथमत: म्युच्युअल फंडाचे कर्जरोखे (Debt Fund Scheme) आधारीत योजनेत गुंतवणूक करुन तेथुन नियमीत वर्ग योजनेव्दारा (Systematic Transfer Plan) समभाग योजनेत दर आठवडा तत्वावर वर्ग करावी जेणे करुन वरील प्रमाणे नियमीत गुंतवणूकीचाच लाभ मिळतो.
साधारणपणे ८/१० वर्षात एका मोठ्या मंदीचे व एका मोठ्या तेजीचे बाजारात आवर्तन होत असते, अर्थात असा काही नियम नाही. मात्र गेले अनेक दशके याप्रमाणे घटना घडलेल्या आहेत. माझा अनुभव असे सांगतो कि जर का बाजारातून सलग ४/५ वर्षे दर साल दर शेकडा जर का २०% पेक्षा जास्त परतावा मिळाला तर नंतरचे वर्षात एक मंदी येते व बाजारात बऱ्यापैकी करेक्शन येते. जर का असा परतावा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर मिळाला तर एक तर पैसे काढून घ्यावेत अथवा त्याच फंडाचे लिक्विड योजनेत पैसे वर्ग करून तेथून सिस्टीमॅटीक ट्रान्स्फर प्लान चा वापर करून परत काही ठराविक कालावधीत रक्कम परत मूळ योजनेत आणावी. यामुळे काय होईल कि जर बाजार खाली आला तर झालेला फायदा कायम राहून त्यात जास्त भर पडेल. जर बाजार वर गेला तर फक्त फायद्यातच नुकसान होईल, झालेल्या फायद्यात नुकसान होण्यापेक्षा हे केव्हाही चांगले.
अर्थात जर का आपण नियमितपणे गुंतवणूक करत असाल व आपण वर्षांचा नव्हे तर काही दशकांचा, दोन दशके, तीन दशके असा आपले गुंतवणुकीचा कालावधी ठरवलेला असेल तर तुम्ही काहीच न करता, फक्त नियमितपणे गुंतवणूक करत राहणेच तुमच्या फायद्याचे होईल. कारण सारासरीमध्ये बाजारातील चढ उतारावर मात करण्याची फार मोठी ताकद असते.