२१. पोर्टफोलिओच्या कामगिरीचे मूल्यांकन
सर्वसाधारणपणे महिन्यातून एकदा आपल्या पोर्टफोलिओचे अवलोकन करावे. पोर्टफोलिओ मधील एकेका शेअरची कामगिरी तपासावीच सोबत एकूण संपूर्ण पोर्टफोलिओच्या कामगिरीचेसुद्धा मूल्यांकन पाहावे. हे करत असताना एकूणच बाजाराच्या हालचालींचा, सेन्सेन्स किंवा निफ्टी कोणत्या दिशेने जात आहे हे पाहून आपला पोर्टफोलिओ सुद्धा त्याप्रमाणे कामगिरी करत आहे की नाही हे तपासले पाहिजे. यामुळे आपल्याला आपल्या एकूण पोर्टफोलिओमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे की नाही हे पडताळून घेता येईल.
आता आपल्या एकूण पोर्टफोलिओ पासून आपल्याला काय नफा/तोटा झालेला आहे हे कसे तपासावे हे समुजून घेऊया. उदाहरणार्थ श्री. अजय याच्या पोर्टफोलिओचे मागील महिन्याच्या अखेरच्या दिवशीचे एकूण मूल्यांकन रू.२,००,०००/- इतके होते. या महिन्यात (मध्यावर) त्याने आणखीन रु. १०,०००/- चे शेअर्स खरेदी केले. याशिवाय चालू महिन्यात त्याला रु. १०,०००/- इतका लाभांश मिळाला. आणि चालू महिन्याच्या अखेरीला पोर्टफोलिओचे एकूण मुल्याकंन झाले रु.२,३०,०००/-
आता या महिन्यात मिळालेला परतावा (Yeild) काय दराने मिळाला हे पाहूया
= {(२३०००० – (२००००० + २००००)} / {२००००० + (१/२*२००००) } * १०० = ४.७६% एका महिन्यात मिळालेल्या नफ्याचा दर
वरील उदाहरणात नवीन गुंतवणूक केलेले रु. १००००/- आणि मिळाला लाभांश रु. १००००/- असे एकूण रु. २००००/- हे महिन्याच्या मध्यावर असल्यामुळे त्याच्या ५०% रक्कम विचारात घेतली आहे.
बीटा परिणाम: तुमच्या पोर्टफोलिओ मधून मिळालेला परतावा निफ्टी किंवा अन्य निर्देशांक यातून मिळालेला परतावा याच्या तुलनेत किती मिळू शकतो हे बीटा दर्शवित असतो. उदाहरणार्थ जर निर्देशांक २% दराने
वाढला असेल आणि तुमचा पोर्टफोलिओ १.५% दराने वाढला असेल तर तुमच्या पोर्टफोलिओचा बीटा १.५/२ = ०.७५ हा होतो. याचा अर्थ असा होतो कि जेव्हा संबंधित निर्देशांक १% ने वाढेल तेव्हा तुमच्या पोर्टफोलीचे मूल्य ०.७५% या दराने वाढेल. जर हाच बीटा जास्त असेल तर जेव्हा निर्देशांक वर जाईल तेव्हा तुम्हाला निर्देशांकापेक्षा त्या प्रमाणात जास्त फायदा होईल आणि जेव्हा निर्देशांक खाली जाईल तेव्हा त्या प्रमाणात नुकसानही जास्त होईल. सर्वसाधारणपणे भारतीय बाजारात १.२ हा बीटा तुमचा बाजाराप्रती जास्त तेजीचा कल दर्शवतो. आपल्या पोर्टफोलिओचा बीटा कसा असावा हे आपणच ठरवू शकतो, जर तुम्हाला जास्त जोखीम घेऊन जास्त फायदा मिळवावयाचा असेल तर ज्या शेअर्सचा बीटा निर्देशांकापेक्षा जास्त आहे असे शेअर्स आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये खरेदी केले पाहिजेत आणि जर तुम्ही बाजाराबाबत साशंक असला तर याच्या उलट केले पाहिजे.
जेवढा बीटा जास्त तेवढी तेजीच्या कालखंडात जास्त फायदा मिळण्याची शक्यता आणि जर तुमचा अंदाज चुकून तेव्हा मंदी आली तर होणारे नुकसानही जास्त होणार.
जेवढा बीटा कमी तेवढी तेजीच्या कालखंडात कमी फायदा मिळण्याची शक्यता आणि जर तुमचा अंदाज चुकून तेव्हा मंदी आली तर होणारे नुकसानही कमी होईल.
आणि जर तुम्हाला निर्देशांकाप्रमाणेच परतावा मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचा बीटा १ इतका ठेवला पाहिजे.
कोणत्याही शेअरचा बीटा काढण्यासाठी त्याचा ऐतिहासिक डेटा वापरला जातो. याच्यामुळे भविष्यातील शेअरच्या किंमतीचा अंदाज बांधता येत नाही मात्र निर्देशांकाच्या प्रमाणात त्या शेअरची वाटचाल कशी असू शकेल याचा अंदाज बीटामुळे बांधता येऊ शकतो.