म्युचुअल फंडातील सर्व प्रकारातील योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पर्याय उपलब्ध असतात
- वृद्धी पर्याय (Growth Option): या पर्यायात केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य बाजारातील काळानुसार रोजच्या रोज बदलत असते. ज्या व्यक्तींना दीर्घ मुदतीत चांगली संपत्ती निर्माण करावयाची असेल किंवा काही वर्षांनंतर कोणतेतरी उदिष्ठ पूर्ण करण्यासाठी रक्कम तयार करावयाची असेल उदा. मुलांचे शिक्षण, विवाह, रिटायरमेंट इ. त्यासाठी हा पर्याय उत्तम मानला जातो. पैसे केव्हाही काढण्याची सुविधा उपलब्ध असते.
- लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment): या पर्यायात योजनेमध्ये नियमितपणे प्रॉफिट बुकिंग केले जाते व ज्या ज्या वेळेला योजनेमध्ये अतिरिक्त रक्कम जमा असेल त्या त्या वेळेला युनिटधारकांना प्रति युनिट ठराविक दराने लाभांश दिला जातो. मात्र लाभांश पुनर्गुंतवणूक (Dividend Reinvestment) हा पर्याय निवडला असेल तर हा लाभांश योजनेत परत गुंतवला जातो. या पर्यायापेक्षा वृद्धी पर्याय घेणे केव्हाही चांगले असते. मात्र जर एखाद्या व्यक्तीने काही काळ निरनिराळ्या साधनात गुंतवणूक करून काही रक्कम जमा केलेली असेल व त्या गुंतवणुकीवर काही ठरविक काळाने नियमित उत्पन्न मळावे अशी इच्छा असेल तर त्यांनी या प्रकारे गुंतवणूक करण्यास हरकत नाही. कारण म्युच्युअल फंड योजनेतून दिला जाणारा लाभांश हा प्रति युनिट दिला जात असल्यामुळे या पर्यायामुळे तुमची युनिट्स वाढत जातात तुम्हाला नंतर तुमच्या गुंतवणुकीवर जास्त दराने लाभांश मिळू शकतो.
लाभांश पेआऊट: या पर्यायात योजनेमध्ये नियमितपणे प्रॉफिट बुकिंग केले जाते व ज्या ज्या वेळेला योजनेमध्ये अतिरिक्त रक्कम जमा असेल त्या त्या वेळेला युनिटधारकांना प्रति युनिट ठराविक दराने लाभांश दिला जातो. असा लाभांश दिला जातानाच प्रचलित दराने लाभांश वितरण कर कापून लाभांशाची रक्कम दिली जात असल्याने गुंतवणूकदाराच्या हातात मिळणारी रक्कम हि करमुक्त असते. ज्यांना आपल्या गुंतवणुकीवर नियमितपणे रिटर्न्स मिळावेत असे वाटते अशा व्यक्तींनी हा पर्याय गुंतवणूक करताना घ्यावा. गेले अडीच तीन वर्षे म्युच्युअल फंडाच्या काही संतुलित प्रकारातील योजनेतून नियमित दर महिना किंवा त्रैमासिक लाभांश दिला जातो. ज्यांना नियमित प्रति महिना आपल्या गुंतवणुकीवर पेन्शन प्रमाणे रक्कम मिळावी असे वाटते अशा व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे म्युच्युअल फंडाच्या कोणत्याही योजनेत नियमितपणे लाभांश दिला जाईलच याची खात्री दिलेली नसते. जर बाजारात मोठी मंदी आली तर काही काळ म्हणजे परत तेजी येऊन योजनेमध्ये अतिरिक्त रक्कम जमा होईपर्यंत लाभांश देणे खंडित होऊ शकते, अशा वेळी कदाचित ६-७ महिने लाभांश देणे खंडित होऊ शकते.