१८. वयानुसार पोर्टफोलिओ
आपण मागील लेखात पहिले आहेच कि आपली गुंतवणूक हि गुंतवणुकीच्या विविध साधनात गुंतवून आपण जोखीम कमी करू शकतो सोबत आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवू शकतो. आपला पोर्टफोलिओ कसा तयार करावा याचे नियोजन प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार आणि त्याच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेनुसार करावे लागते. मात्र सर्वसाधारणपणे जर सांगावयाचे झाले तर आपल्या सध्याच्या वयानुसार गुंतवणूक कशी करावी याचे येथे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. असे मानले जाते कि जेवढे वय कमी तेव्हढा आपल्याकडे कालावधी जास्त असतो म्हणून कमी वयात जास्त जोखीम असणाऱ्या साधनात जास्त गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळवावा आणि जसे वय वाढत जाईल तसे जोखमीच्या साधनातील गुंतवणूक कमी कमी करत न्यावी व ती सुरक्षित साधनात वाढवत न्यावी असे एक सर्वमान्य सूत्र आहे.
खालील टेबलचा वापर करून तुम्ही निर्णय करू शकता:
वय | पोर्टफोलिओ |
३० पेक्षा कमी | 80% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स 10% रोख (लिक्विड फंड्स) 10% एफडी किंवा रोखे |
३० ते ४० | 70% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स 10% रोख (लिक्विड फंड्स) 20% एफडी किंवा रोखे |
४० ते ५० | 60% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्सs 10% रोख (लिक्विड फंड्स) 30% एफडी किंवा रोखे |
५० ते ६० | 50% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स 10% रोख (लिक्विड फंड्स) 40% एफडी किंवा रोखे |
६० पेक्षा जास्त | 40% शेअर्स आणि म्युच्युअल फंड्स 10% रोख (लिक्विड फंड्स) 50% एफडी किंवा रोखे |
तुम्ही तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या तयारीनुसार आणि किती कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची आहे व तुम्हाला काय दराने तुमच्या गुंतवणुकीवर वार्षिक परतावा मिळावा यावर अवलंबून तुम्ही यामध्ये बदल करू शकता. एक लक्षात ठेवले पाहिजे
जास्त जोखीम = जास्त फायदा किंवा जास्त नुकसान होण्याची शक्यता.
मध्यम जोखीम = माफक फायदा किंवा माफक नुकसान होण्याची शक्यता.
कमी जोखीम = कमी फायदा किंवा कमी नुकसान होण्याची शक्यता.
मात्र एक गोष्ट निश्चितपणे प्रत्येकाने केलीच पाहिजे कि महागाईवर मात करून दीर्घ मुदतीत जास्त फायदा मिळण्यासाठी काही रक्कम हि शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडाच्या समभाग आधारित योजनेत गुंतवलीच पाहिजे. हा नियम प्रत्येकालाच लागू होतो मग तुमचे वय कितीही असुदे याचे कारण फक्त शेअरबाजारातूनच सर्वाधिक परतावा मिळू शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एफडी किंवा रोख्यात गुंतवणूक करता तेव्हा हि काळजी घेतली पाहिजे कि प्रत्येकाची मुदतपूर्तीची वेळ वेगवेगळी असेल यामुळे तुमचा कॅश फ्लो प्रवाही राहील.
आणि महत्वाचे म्हणजे कायम नियमितपणे थोडी का होईना गुंतवणूक करत राहावे ज्याचा उपयोग भविष्यात होत असतो.