१९. पोर्टफोलिओचे पुनरावलोकन
पोर्टफोलिओ व्यवस्थापन हि एक नियमितपणे चालू असणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये नियमितपणे आपल्या सर्व गुंतवणुकीचे पुनरावलोकन करावे लागते. आपल्या पोर्टफोलिओ मध्ये असणाऱ्या प्रत्येक शेअर्स, रोखे यांच्या कामगिरीचे मूल्यांकन नियमितपणे तपासून त्याच्या खरेदी अथवा विक्रीचा निर्णय नियमितपणे घ्यावा लागतो. अर्थात आपल्या पोर्टफोलो मध्ये असलेल्या एकूण गुंतवणूक रक्कम, त्याचा आकार आणि कोणत्या प्रकारचे साधन पोर्टफोलिओ मध्ये आहे यानुसार किती वेळा पोर्टफोलिओचे पुनरावलोकन केले पाहिजे हे अवलंबून असते. यासाठी तुम्ही किती वेळ देता यावर तुम्हाला मिळणारा परिणाम अवलंबून असतो. जर तुम्ही जास्त वेळ दिला, तुम्हाला जास्त चांगला परिणाम मिळू शकतो. जर तुमचा पोर्टफोलिओ मोठा असेल तर, किमान ज्यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता असेल तेव्हा तुम्ही दिवसातून एक तास तरी यासाठी दिला पाहिजे. जेव्हा बाजार स्थिर असेल तेव्हा तुम्ही आठवड्यातून एखादा दिवस यासाठी दिला तरी चालू शकेल. यासाठी नियमितपणे बाजारातील उलाढालीवर लक्ष ठेवले पाहिजे.
पहा, विश्लेषण करा आणि आवश्यकता असेल तर बदल करा
तुमचा पोर्टफोलिओ नीट काळजीपूर्वक तपासा, त्याचे योग्य प्रकारे विश्लेषण करा आणि जर गरज असेल तरच त्यातील काही शेअर्स विका आणि दुसरे नवीन शेअर्स खरेदी करा. मात्र थोडे नुकसान झाले किंवा फायदा झाला म्हणून उगाच कारणाशिवाय तुमच्या पोर्टफोलिओ मधिल शेअर्स विकू नका, कारण असे करण्याने तुम्ही तुमचे भविष्यात होणाऱ्या फायद्यात नुकसान करून घेता. वारंवार शेअर्सची खरेदी विक्री करून तुम्ही उगाच कारणाशिवाय जास्त कर भरता दुसरे म्हणजे उगाच तुमच्या ब्रोकरला फायदा (ब्रोकरेज देऊन) करून देत असता. वारंवार खरेदी विक्री करणारा ट्रेडर ब्रोकरला नेहमीच प्रिय असतो कारण तुम्हाला फायदा होउदे किंवा नुकसान त्याला तुम्ही केलेल्या उलाढालीवर ब्रोकरेज मिळणारच असते.
खालील बाबी नेहमी तपासूनच निर्णय घ्या:
१) जर तुमच्या शेअर्सचे उत्पन्न अपेक्षेप्रमाणे असेल व ते जर वाढत असेल तर शेअरची किंमत थोडी बहुत कमी जास्त झाली किंवा ती वाढली नाही तरी तो विकू नका तर त्याला सांभाळून ठेवा. कारण कोणत्याही शेअरची किंमत वाढण्यामागे प्रतिशेअर कमाई हे एक महत्वाचे कारण असते. सयंम हा बहुमोल आहे म्हणूनच तो दुर्मिळ आहे, सयंम पाळलात तर त्याचे मोठे बक्षीस तुम्हालाच मिळणार हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.
२) जर तुम्ही असा विचार करत असाल की आत्ता चांगला फायदा झालेला आहे तेव्हा आपल्याकडील फायद्यात असणारा शेअर विकूया आणि तो परत खाली आला की परत विकत घेऊ. या प्रकारे विचार करण्यात दोन प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. एक तुम्ही दोन वेळचे ब्रोकरेज देता (एकदा विकताना आणि परत खरेदी करताना) आणि दुसरे म्हणजे तो शेअर सतत वाढत गेला तर तो तुम्हाला कमी किंमतीत खरेदी करता येणार नाहीच आणि नंतर जर खरेदी करावयाचा झाला तर जास्त किंमतीत खरेदी करावा लागेल आणि किंमत वाढण्याचा तुम्हाला फायदा काहीच मिळणार नाही.
३) बाजारात खरेदीची योग्य वेळ ठरवण्यात उगाच तुमचा वेळ व्यर्थ घालवू नका कारण या जगात ते परिपूर्णपणे कोणालाच जमत नसते.
४) मात्र जर तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये जर एखाद्या क्षेत्रातीलच अनेक शेअर्स असतील तर त्या क्षेत्रावर नियमित नजर हि ठिवावीच लागते व परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.
५) जर तुमची गुंतवणूक मोठी असेल तर किमान ५ क्षेत्रात ती विभागलेली असली पाहिजे व किमान १० शेअर्स तरी तुमच्या पोर्टफोलिओ मधे असले पाहिजेत याची काळजी घ्या.
६) मग्जला काही प्रकरणात दिलेल्या रेशोंप्रमाणे तुमच्या पोर्टफोलिओचे विश्लेषण करा आणि नंतरच कोणताही निर्णय घ्या, घाई घाई मध्ये कोणताही निर्णय घेतल्यास तो चुकण्याचीच जास्त शक्यता असते हे नेहमी लक्षात ठेवा.