बँकेच्या बचत व चालू खात्याचा वापर करुन अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी.
प्र. १: माझ्या सेव्हिंग बँक खात्यात काही रक्कम जमा आहे, ते पैसे मला केव्हाही काढता येतात मात्र त्यावर मला फक्त ४% दराने व्याज मिळते, मला या पेक्षा जास्त उत्पन्न मिळावे अशी इच्छा आहे तर मी काय करावे?
उत्तर: तुमच्या समोर दोन पर्याय आहेत:
१) जर तुम्हाला कोणतीही जोखीम न स्विकारता जास्त उत्पन्न हवे असेल व सोबत केव्हाही पैसे काढण्याची सुविधा पण हवी असेल तर आपण तुमच्या नेट बँकींगचा वापर करुन म्युच्युअल फंडाचे लिक्वीड स्किम मध्ये ऑनलाईन पैसे गुंतवा. पैसे जेव्हा हवे असतील तेव्हा पैसे काढण्याची सुचना ऑनलाईन द्या. दुस-या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. अशा प्रकारचे योजनेतून सर्वसाधारणपणे ६% ते ९% एनएव्ही फरकाचे उत्पन्न तुम्हाला व्याजाचे दरानुसार मिळू शकते. जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल तर iPIN च्या पर्यायाला टिक करावयास मात्र विसरु नका ज्यामुळे तुम्हाला इंटरनेटवरुन व्यवहार करण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल. अशा प्रकारचे योजनेत किमान रुपये दहा हजार गुंतवता येतात.
२) जर तुमची शेअर बाजाराची जोखीम स्विकारण्याची तयारी असेल व काही काळ थांबण्याची सुध्दा तयारी असेल मात्र जर आपणास शेअर बाजाराचे ज्ञान नसेल तर म्युच्युअल फंडाचे समभाग योजनेत (Equity Scheme) गुंतवणूक करा. मात्र सर्व रक्कम एकदाच न गुंतवता, शेअर बाजार ज्या ज्या वेळी खाली येतो त्या प्रत्येक वेळी थोडी – थोडी रक्कम गुंतवा व शेअर बाजार ज्यावेळी वर जातो व तुमच्या गुंतवणूकीवर तुम्हाला अपेक्षीत उत्पन्न मिळालेले असेल तेव्हा पैसे काढून घेण्याची सुचना ऑनलाईन द्या. पाचव्या दिवशी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. उदा. दुपारचा एक वाजला आहे आज शेअर बाजार २०० अंकानी घसरला आहे व तुमच्या बचत खात्यात रु.२५०००/- शिल्लक आहेत, तुम्ही त्यापैकी रु.५०००/- आज गुंतवा, परत जेव्हा बाजार १०० ते २०० अंकानी खाली येईल तेव्हा परत रु.५००० गुंतवा असे करत रहा नंतर जेव्हा बाजारात तेजी येईल व तुमच्या गुंतवणूकीचे मुल्य तुमच्या अपेक्षेनुसार वाढलेले असेल तेव्हा पैसे काढून घ्या. असे नियमीतपणे करत राहून तुम्ही थोडे अधिक पैसे मिळवू शकता. जर दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची असेल तर SIP (Systematic Investment Plan) व्दारे दर महा ठरावीक रक्कम १५ ते २० वर्षे नियमीत गुंतवत रहा.
प्र.२: मी व्यावसाईक (व्यापारी, उद्योजक,कारखानदार,पतसंस्था इत्यादी) असून माझे बँकेत करंट अकाउंटचे खाते आहे. ज्यावर मला कोणतेही व्याज मिळत नाहि. शनिवार व रविवारी माझ्या चालू खात्यात पैसे पडून असतात ज्यावर मला काहीच उत्पन्न मिळत नाही, मला या शिलकेवर काही उत्पन्न मिळण्यासाठी मी काय करावे?
उत्तर: अतीशय चांगला व महत्वाचा प्रश्न आहे. शुक्रवारी (तसेच प्रत्येक बँकेच्या सुटीच्या आदल्या दिवशी) दुपारी २.०० वाजण्यापुर्वी तुमच्या करंट अकाउंट मध्ये असणारे पैसे तुमच्या नेट बँकींगचा वापर करुन म्युच्युअल फंडाचे लिक्वीड स्किम अकाउंटमध्ये ऑनलाईन पैसे गुंतवा (यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यातून १.०० वाजे पर्यंत पैसे ट्रान्सफर करणे इष्ट होते), म्हणजे तुम्हाला आदल्या दिवशीची म्हणजेच गुरुवारची एनएव्ही मिळेल व त्याच दिवशी दुपारी ३.०० वाजण्यापुर्वी पैसे काढण्याची सुचना ऑनलाईन द्या (शक्यतो हि सुचना गुंतवणूक करुन झाली कि लगेचच द्या. पैसे सोमवारी दुपारी १२.०० वाजेपर्यंत तुमच्या करंट अकाउंट मध्ये जमा होतील. तुम्हाला रवीवारची एनएव्हीने पैसे मिळतील म्हणजेच गुरुवार ते रवीवार या दरम्यानच्या एनएव्ही फरकाइतके जादा उत्पन्न तुम्हाला मिळेल. अशा प्रकारच्या योजनेतून सर्वसाधारणपणे ६% ते ९% एनएव्ही फरकाचे उत्पन्न तुम्हाला व्याजाचे दरानुसार मिळू शकते. जर वर्षभर तुम्ही याप्रकारे या सुवीधेचा वापर केलात तर वर्षातील एकूण १०४ शनिवार, रवीवार + १५ सुट्या असे मिळून ११९ दिवसाचे उत्पन्न तुम्ही जादा मिळवू शकता. उदा. सर्वसाधारणपणे तुमच्या खात्यात जर का रु.१० लाख रुपये शिल्लक रहात असतील व तुम्ही हि सुवीधा वापरली तर वर्षात तुम्हाला रु.१९५०० ते रु.२९००० या दरम्याने जास्तीचे उत्पन्न मिळेल व हा लाभ मिळवण्यासाठी एकदा म्युच्युअल फंडाचे खाते उघडल्यावर प्रत्येक वेळी गुंतवणूक करणे व सोबतच पैसे काढण्याची सुचना देण्यासाठी फार तर ५ ते १० मिनीटेच वेऴ द्यावा लागेल. या सुवीधेचा अवश्य फायदा घ्या.
प्र. लिक्वीड फंडात केलेली गुंतवणूक किती जोखीमीची असते?
उत्तर: लिक्वीड फंडातील गुंतवणूक हि मनी मार्केट मध्ये व अल्प मुदतीच्या कर्जरोख्यात केली जात असते त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेत व्याज दराचे फरकाची व पत दर्जाच्या बदलाची जोखीम असते जी अत्यल्प म्हणजेच नगण्य स्वरुपाची असते. अशा योजनेतून सर्वसाधारणपणे वार्षीक ६% ते ९% दरम्याने उत्पन्न मिळते, जे व्याजदराच्या बदलावर अवलंबून असते. सध्या व्याजदर वाढलेला असल्यामुळे जास्त उत्पन्न मिळत आहे.
प्र. बँकेच्या मुदत ठेवींसाठी काही पर्यायी योजना म्युच्युअल फंडाच्या असतात का? व अशा योजनांचा काय फायदा असतो?
उत्तर: बँक ठेवींवर मिळणारे व्याज हे करपात्र उत्पन्नात मोडते व बँक टिडिएस कापूनच व्याजाची रक्कम तुमच्या हाती देत असते. म्युच्युअल फंडामध्ये Fixed Maturity Plans (ठरावीक काळाच्या मुदतबंद योजना) असतात, अशा योजनेत ३० दिवसांपासून ३ वर्षाचे मुदतीसाठी गुंतवणूक करण्याची सुवीधा असते. सर्वसाधारणपणे या योजनांतून मिळणारे उत्पन्न हे बँक व्याजापेक्षा थोडे अधिक असते. महत्वाचा फायदा म्हणजे (१) टिडिएस कापला जात नाही (२) मिळणारे उत्पन्नांवर इंडेक्ससेशनव्दारे कर आकारणी करण्याची सुवीधा आहे ज्यामुळे कर बचत होते.