२०. क्षेत्रीय परिभ्रमण
आपण पहिले असेल की आयटी स्टॉक जेव्हढे लोकप्रिय असतात तेव्हढे बँकिंग/फायनान्शिअल स्टॉक लोकप्रिय असत नाहीत. तसेच मोठ्या एफएमसीजी, फार्मा, कंझुमर ड्युरेबल कंपन्यांचे शेअर्स त्याप्रमाणात लोकप्रिय नसतात. आयटी कंपन्यांमध्ये नेहमीच मोठे चढ उतार असतात व म्हणून जास्त फायदा मिळवण्यासाठी म्हणून जर का तुम्ही आयटी कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एकदा परत विचार करा. ट्रेडर हा एखाद्या दिवशी सुद्धा अनेकवेळा त्याच शेअर्सची खरेदी विक्री करत असला तरी ज्याला शेअर्स गुंतवणूक म्हणून खरेदी करावयाचे असतात त्याने नेहमीच ज्या शेअर्समध्ये कमी प्रमाणात चढ उतार असतात असेच शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे त्याच्या हिताचे असते.
जेव्हा एका क्षेत्रात मोठी उलाढाल होत असते तेव्हा अन्य क्षेत्रात त्याप्रमाणात कमी उलाढाल होत असते, काही दिवसांनी हि परिस्थिती बदलते आणि दुसऱ्या क्षेत्रावर ट्रेडर्स जास्त लक्ष केंद्रित करू लागतात. हे असे क्षेत्रीय परिभ्रमण बाजारात नेहमीच घडत असते. अनेक वेळा ICE (इन्फोटेक, कम्युनिकेशन आणि एंटरटेनमेंट स्टॉक) स्टॉक जास्त आकर्षक वाटतात त्याचवेळी अन्य शेअर्स मध्ये मात्र त्या प्रमाणात हालचाल दिसत नाही. एक गुंतवणूकदार म्हणून जेव्हा कोणत्याही शेअर्सच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि ती त्यांच्या अर्निंग रेशोसी मिळती जुळती नसेल तर अशा वेळी ते शेअर्स विकून नफा पदरात पाडून घेतला पाहिजे आणि ज्या शेअर्समधे भविष्यात विश्लेषणानुसार तेजी येण्याचे संकेत दिसत असतील त्या शेअर्समधे गुंतवणूक केली पाहिजे. थोडक्यात जिथे फायदा जास्त प्रमाणात मिळालेला आहे तो रोखीत परावर्तित करून आलेले पैसे ज्या शेअर्सच्या किंमती काही तात्पुरत्या कारणामुळे कमी झालेल्या आहेत व भविष्यात जर ते परत वाढण्याची शक्यता असेल तर ते स्टॉक तुम्ही खरेदी केले पाहिजेत.
वारंवार क्षेत्रीयपरिभ्रमण होण्याचे महत्वाची दोन कारणे असतात एक म्हणजे भीती आणि दुसरे असणारी पैशांची हाव, या दोन गोष्टींमुळेच बाजारात नियमितपणे काहीतरी कारण शोधून चढ उतार होत असतात आणि हेच कारण कारण असते की एका क्षेत्रातून संधी संपली असे वाटू लागते आणि मग दुसऱ्या क्षेत्राचा शोध सुरु होतो. म्हणून गुंतवणूकदाराच्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर त्याने शेअर्स खरेदी करताना त्याची योग्य किंमत काय आहे हे विश्लेषण करून नंतरच ते खरेदी केले पाहिजेत. बाजारात अनेक वेळा तुम्हाला असे शेअर्स दिसतील की त्यांचा पीई १०० पेक्षा सुद्धा जास्त आहे तर काही फंडामेंटली मजबूत शेअर्सचा पीई १० पेक्षा सुद्धा कमी असू शकतो.
अनेक ट्रेडर्स तेजी असणाऱ्या शेअर्सच्या, झटपट जास्त पैसे मिळवण्यासाठी मागे धावत असतात आणि ते अशा शेअर्सकडे दुर्लक्ष करत असतात की जे हळू हळू पण स्थिरपणे वाढत असतात. यामुळे होते काय की जेव्हा जास्त तेजीवाले स्टॉक आपटतात तेव्हा त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात खाली येतात आणि जे स्टॉक हळू हळू स्थिरपणे वाढत असतात त्यांच्या किंमती तेव्हा कमी प्रमाणात खाली येतात हे वास्तव आहे. जेव्हा अपेक्षेप्रमाणे कंपन्यांची कमाई वाढणे थांबते तेव्हा त्यांच्या किंमती या कमी होत असतात मात्र हा विचार तेजी असणाऱ्या शेअर्सबाबत कोणी करताना दिसत नाही आणि मग ते आपल्या नशिबाला दोष देत बसतात. म्हणून कोणतेही शेअर्स घेताना सारे रेशोज तपासूनच शेअर्सची खरेदी केली पाहिजे.
येथे हा उद्देश नाही की मी फक्त बँकिंग, फार्मा किंवा एफएमजीसी चे शेअर्स घ्या असा सल्ला देत आहे तर तुम्हाला बाजारात होत असलेल्या क्षेत्रीय परिभ्रमणाची कल्पना असावी व फक्त फंडामेंटल जे कधी बदलत नसते त्याचा विचार करून सोबत इक्विटीचे अर्निंग्सशी असलेले प्रमाण यावरच कोणत्याही शेअरची किंमत ठरत असते हे तुमच्या लक्षात आणून देणे हा उद्देश आहे. म्हणून ज्या ज्या क्षेत्रात तुम्हाला रस असेल त्या क्षेत्रातील कंपन्यांची कामगीरी तपासा आणि थोडे थोडे शेअर्स घेत एक चांगला पोर्टफोलिओ बनवा. शेअर्स घेताना असे घ्या की जरी त्यांच्या किंमती काही तात्पुरत्या कर्णमुकले कमी झाल्या तरी परत चांगली परिस्थिती निर्माण झाली की त्यांच्या किंमती परत वेगाने वाढू लागतील आणि दीर्घ काळाचा विचार केला तर निश्चितच त्यातून चांगला फायदा मिळाला पाहिजे. शेअर बाजार हा अल्प काळात थोडे पैसे मिळवण्यासाठी नसून तो दीर्घ मुदतीत भरीव संपत्ती निर्माण करण्यासाठी आहे हे लक्षात ठेवा. त्यासाठी स्वप्ने मोठी पहा त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा आणि संयम बाळगा.
शेअर बाजारातून पैसे मिळवण्यासाठी ३ गोष्टी आवश्यक आहेत, वेळ (Time), ज्ञान (Knowledge) आणि खात्री (Conviction).
वेळ: संपत्ती निर्माण होण्यासाठी वेळ द्या, चांगले शेअर्स खरेदी करा आणि परत परत नेहमी खरेदी करत रहा. हे असेच दीर्घकाळ करत रहा. संपत्ती आपोआप निर्माण होईल हा विश्वास ठेवा.
ज्ञान: शेअर्स खरेदी करण्यापूर्वी संबंधित कंपनीचे पूर्ण विश्लेषण करा. त्यासाठी आजकाल अनेक साधने नेटवर मोफत उपलब्ध आहेत त्यांचा वापर करा.
खात्री: पूर्ण विश्लेषण केल्यावर पूर्ण खात्री झाल्यावरच शेअर्सची खरेदी करा हे करताना पुढील १० ते १५ वर्षांचा विचार करा.
हे अजिबात करू नका: आणि एक महत्वाचे म्हणजे कोणाकडून टिप्स वगैरे विकत घेऊ नका हा एक धंदा आहे, एक लक्षात ठेवा जर ती व्यक्ती तुम्हाला टीप देऊन पैसे मिळवून देऊ शकते तर ते ज्ञान स्वतःसाठी वापरून तो पैसे नाही का मिळविणार? आज देशात जे मोठे श्रीमंत गुंतवणूकदार आहेत ते तुम्हाला आमच्याकडून टिप्स विकत घ्या असे कधी सांगताना तुम्ही पहिले आहे काय? टीव्हीवर टीप देणे हा सुद्धा एक धंदाच आहे. खोटं वाटत असेल तर खात्री करून घ्या, ते जे तुम्हाला सल्ला म्हणून देतात तो एका वहीत लिहून ठेवा आणि परिणाम पाहत रहा, मी काय सांगतो आहे ते तुमच्या लक्षात येईल याहून जास्त मी इथे काही सांगू शकत नाही.