१३. गगनाला गवसणी घालणारे शेअर्स – योग्य किंमत कशी ठरवावी?
बरेचवेळा असे होते कि बाजारात, एखादया शेअरमध्ये तेजी असते तेव्हा प्रत्येकालाच तो शेअर विकत घ्यावयाचा असतो मात्र त्याची असणारी किंमत मात्र जास्त वाटत असते, म्हणून तो घ्यावा कि न घ्यावा हा त्याचा गोंधळ उडालेला असतो. यावेळी काही शेअर्सची किंमत योग्य असते तर काही शेअर्सची किंमत त्याच्या योग्यतेपेक्षा जास्त किंवा कमी असते. आता हे कसे ओळखावे?
एखादया शेअरची किंमत कमी किंवा जास्त असते यासाठी काहीतरी कारण हे असतेच बहुतांशी वेळा ते कारण म्हणजे वाजवीपेक्षा जास्त असणाऱ्या अपेक्षा हेच असते. गुंतवणूकदाराची अपेक्षा असते कि संबंधित कंपनी हि दोन प्रकाराने आपला फायदा करून देईल: एक म्हणजे महसुलात वाढ आणि दुसरे म्हणजे कमाई मध्ये वाढ या दोन महत्वाच्या अपेक्षा एखादा शेअर खरेदी करताना असतात. यावेळी गुंतवणूकदारसमोरील सर्वात मोठे आव्हान हे असते कि असे वेगाने वाढणारे शेअर्सच्या मागील कारण काय आहे हे ओळखणे हेच होय.
सातत्याने चांगली कामगीरी करणारे स्टॉक पहा. याचा अर्थ असा नव्हे कि तुम्ही ते फक्त खरेदी करा आणि पहात बसा. तर तुम्ही यातील काही शेअर्स पूर्वीच खरेदी केलेले असतील तर त्यांची कामगिरी नियमितपणे तपासली पाहिजे. आणि जेव्हा या शेअर्सची प्रति शेअर मिळणारे उत्पन्न कमी होते किंवा कमाई कमी होते तेव्हा ते लगेच विकून मोकळे झाले पाहिजे. आणि जेव्हा त्या शेअर्सची किंमत मोठ्या प्रमाणात कमी होते तेव्हा असे स्टॉक हेरले पाहिजेत आणि ते खरेदी केले पाहिजेत. यासाठी गरज असते ती आत्मसंयमाची. मग तुम्हाला असे वाटते काय कि कंपनी कोणतीच गोष्ट चुकीची करणार नाही आणि तुम्हाला ते शेअर परत खरेदी करण्याची संधीच मिळणार नाही. जर असे झाले तर ती जगातील एकमेव कंपनी असेल जी कधीच चूक करत नाही. कधी कधी असेही होते कि आपण जेव्हा शेअर खरेदी करतो तेव्हा वर्तमान भाव पातळीपेक्षा तो आपल्याला महाग वाटू शकतो परंतु खरे पाहता ते मूल्य बरेच चांगले असू शकते. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे झाले तर P/E सध्य पातळीपेक्षा कमी असतो.
आपण ज्या गोष्टींवर ध्यान दिले पाहिजे त्या:
१) प्रत्येक क्षेत्रातील आघाडीची कंपनी/न्या निवडा कि ज्यांनी सातत्याने बाजारात वर्चस्व गाजवलेले आहे. मोठ्या कंपनीला आणखीन मोठे व्हावयाचे असते, कारण त्या जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात तसेच त्या संशोधन आणि विकासावर जास्त पैसे खर्च करू शकतात. एक त्रिकाल बाधित सत्य तुम्हाला माहित असेलच कि पैसा हा नेहमी पैसेवाल्याकडे जातो आणि मोठा माणूसच आणखीन मोठा होत असतो.
२) कंपनीची कमाई प्रत्येक वर्षीच वाढत असली पाहिजे, आणि ती जास्त टक्केवारीत वाढत असली पाहिजे.
३) कंपनीच्या महसुलात सातत्याने वाढ होत असली पाहिजे. आणि वाढ त्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या महसुली वाढीच्या दरापेक्षा जास्त दराने होत असली पाहिजे.
४) कंपनीचे व्यवस्थापन मजबूत असले पाहिजे.
५) आणि त्या कंपनीने वाढत्या स्पर्धेला पुरून उरण्याची क्षमता बाळगली असली पाहिजे.
जेव्हा तुम्ही अशी एखादी कंपनी शोधता कि जिच्यामध्ये वरील सर्व गुण सामावलेले आहेत तेव्हा त्या शेअर्सची किंमत कमी असूच शकत नाही. आणि म्हणून जर तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये असावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त किंमत तो खरेदी करण्यासाठी मोजण्याची तयारी ठेवावीच लागेल. एका अर्थाने तुम्ही त्या कींपनीत प्रवेश करण्याचे मूल्यच देत असता असे समजले पाहिजे. आणि जर तुमच्याकडे संयम असेल तर कदाचित भविष्यात तो स्टॉक तुम्हाला कमी किंमतीत सुद्धा मिळू शकतो.
अशा कंपनीच्या शेअर्समधून मोठ्या प्रमाणावर जर तुम्हाला संपत्ती निर्माण करावयाची असेल तर ते स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये दीर्घ काळासाठी ठेवले पाहिजेत. शक्य असल्यास ते नियमितपणे जास्तीचे खरेदी करत राहिले पाहिजे, यामुळे तुम्ही त्या कंपनीच्या वाढीमध्ये तुम्हालासुद्धा वाढण्याची संधी देत असता. जरी तुम्ही अश्या चांगल्या कंपनीचे थोडे जरी स्टॉक घेऊन ठेवलेत तरी, काही काळाने बोनस आणि स्प्लिट च्या माध्यमातून तुमच्याकडील शेअर्सची संख्या वाढत जाते आणि परत परत तुमचे गुंतवणूक मूल्यसुद्धा वाढत जाते, याप्रकारे तुम्ही संपत्ती निर्माण करू शकता. तुम्हाला माहित आहे का इन्फोसिस या कंपनीचे ज्यांनी १० किंवा त्या पटीत शेअर्स पूर्वी घेतले होते आज त्यांच्याकडे त्यांनी घेतलेल्या शेअर्सच्या संख्येत अनेक पटीने वाढ झालेली आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कम्पनीचे काही शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे काही प्रमाणात मालक होत असता. आणि म्हणूनच एखाद्या कमी भावाच्या कंपनीच्या जास्त शेअर्स पेक्षा एखाद्या मोठ्या व चांगल्या कंपनीचे कमी शेअर्स बाळगणे हे केव्हाही चांगले असते. म्हणून जर तुम्हाला जास्त फायदा व्हावा असे वाटत असेल तर जास्त भावाचे चांगल्या कंपनीचे शेअर्स तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये बाळगले पाहिजेत.
जर तुमच्याकडे असलेल्या शेअरची किंमत सतत वाढत असेल तर ते आणखीन खरेदी करावेत काय?
जर तुम्ही बाळगून असलेल्या शेअर्सची किंमत २०% ते २५% किंवा जास्त जर ८ आठवड्याच्या आत वाढली असेल तर तुम्ही त्या शेअरमध्ये आणखीन खरेदी केली पाहिजे. मात्र त्या स्टॉक मध्ये मजबुती चालूच असली पाहिजे. कारण जेव्हा अशी किंमत वाढू लागते तेव्हा लवकरच त्या कंपंनी बाबत एखादी बातमी येणार असते.
बातमी प्रकाशित झाली कि काय करावे?
एखाद्या कंपनी संबंधित चांगली बातमी टीव्ही, वर्तमान पत्रे इ. माध्यमातून प्रसारित झाली कि लगेच आपल्या कडे असणारे शेअर्स विकून टाकावेत आणि त्यांची किंमत कमी झाली कि तेच स्टॉक परत विकत घेतले पाहिजेत. It is principal that sale on news.