१२. बाजाराची दिशा ओळखा
१२. बाजाराची दिशा ओळखा
बाजार कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे हे वेळीच ओळखता आले पाहिजे.
बाजारात मंदी येण्याचे संकेत आहेत काय?
यासाठी तुम्ही NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स चा चार्ट नियमितपणे बारकाईने पहिला पाहिजे. हा चार्ट पाहत असताना किंमतीतील बदल आणि त्यातील उलाढाल या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजेत. काही वेळा बाजार वर जात असतानासुद्धा काही शेअर्सच्या किंमती कमी होत असतात. यासाठी बाजारातील सरासरीचा अभ्यास करून चालत नाही. जेव्हा मंदी येणार असते तेव्हा अचानक बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये विक्रीची उलाढाल वाढते. जर असा मंदीचा कल दर्शवला जात असेल तर आपल्या पोर्टफोलो मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे शेअर्स आपण प्रथम विकले पाहिजीत. जर बाजार आणखीन खाली जाण्याचे संकेत दिसत असतील तर तुमच्याकडील जास्तीत जास्त शेअर्स हे तुम्ही आणखीन वाट न पाहता विकले पाहिजेत. आणि जर बाजार परत सुधारण्याचे संकेत देत नसेल तर तुम्ही सगळेच शेअर्स विकून मोकळे झाले पाहिजे. जर तुम्ही खरेदी केलेला शेअर जर खरेदी किंमतीपेक्षा ८% कमी किंमतीला ट्रेड करत असेल तर तो तुम्ही लगेचच विकून टाकला पाहिजे. मात्र तुम्हाला जर त्या कंपनीबद्दल जबरदस्त विश्वास असेल तर तुम्ही ते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेऊ शकता आणि शक्य असल्यास प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर त्यात नियमितपणे खरेदी करतही राहू शकता. मात्र हे सूत्र फक्त आघाडीच्या पहिल्या १०० कंपन्यानाच लागू होते.
बाजार वर जाण्याचे संकेत देत आहे काय?
एकदा का बाजारात फार मोठी मंदी झाली कि बाजार परत उसळी मारण्याचा प्रयत्न करू लागतो. पण हा तेजीचा कल आहे कि नाही हे तुम्ही एक दोन दिवसातील बाजारातील घडामोडींवर ठरवू शकत नाही कारण तो कल फसवा असू शकतो. यासाठी तुम्ही थोडे थांबून बाजारात तेजी सुरु झाल्याची खात्री करून घेतली पाहिजे. जर बाजारातील रॅली सलग ३/४ दिवस सतत मजबुती दाखवत असेल व निफ्टी १% पेक्षा जास्तने सलगपणे बंद होत असेल आणि प्रत्येक दिवशी उलाढाल सुद्धा नियमितपणे वाढत असेल तर समजावे कि बाजारात परत तेजी अवतीर्ण झालेली आहे. जोरदार तेजी हि सलग ६ ते ७ दिवस सतत दिसली तर तो कल खरा मानावा. कधी कधी हा तेजीचा कला खरे पाहतां १० ते १५ दिवसात दर्शवतो, पण असे झाल्यास ती तेजी फसवी असू शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. बाजार कोसळताना तो विक्रीतील जास्त उलाढाल पहिले काही दिवस कायम ठेवतो. जेव्हा बाजारात तेजी सुरु होते तेव्हा एकदम सगळेच शेअर्सच्या किंमती लगेच वाढत नसतात तर प्रथम काही ठराविक शेअर्सच्या किंमती वाढू लागतात व नंतर ती तेजी बाजारात सर्वत्र पसरू लागते. आणि मग सर्वंकष तेजीचा माहौल तयार होतो.
या आघाडीच्या कंपन्यांचा गृहपाठ करून आपल्या यशाची मुहूर्तमेढ रोवू शकतात. शेअर्सची निवड करताना ते शेअर्स कोणत्या किंमतीपासून खाली आलेले आहेत हे पाहून जर त्यांनी योग्य वेळी तेजी सुरु होतानाच खरेदी करणे सुरु केले तर ते मोठा फायदा मिळवू शकतात कारण एकदा का मंदी संपून परत तेजी सुरु झाली कि असे शेअर्स भराभर वर जाऊ लागतात. हि संधी बरेच वेळा म्युच्युअल फंड व्यव्यस्थापक लवकर साधत असतात म्हणून आघाडीच्या म्युच्युअल फंड योजनांचा पोर्टफोलिओ नियमितपणे फॉलो केला पाहिजे. जेव्हा एखादा शेअर त्याच्या नीचांकी स्थरापासून २५% वर जातो तेव्हा तो एक पायरी पूर्ण करतो त्यानंतर तो स्थिर होऊ लागतो. यावेळी बरेच गुंतवणूकदार बाजारात परत प्रवेश करू लागतात. परंतु अनेक छोटे गुंतवणूकदार गुंतवणुकीची चांगली संधी गमावून बसतात. तेजीच्या कालखंडात बरेच छोटे गुंतवणूकदार साधारणपणे १०% नफा झाला कि तो शेअर विकून फायदा मिळवतात मात्र ते पुढे मिळणाऱ्या मोठया फायदयाला यामुळे मुकतात. कारण ते या वेळेला शेअरची दुसरी पायरी समजण्याची चूक करत असतात. खरे पाहता तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात बाजारात उडी मारणारे जास्त लोकं असतात जे नुकसान करून घेत असतात. या चौथ्या स्थरावर कंपनीचा सगळीकडे बराच बोलबाला होऊ लागतो. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक टीव्ही वर झळकू लागतात आणि सामान्य गुंतवणूकदाराला वाटू लागत कि आपणही या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन फायदा मिळवू, आणि ते जोराने तो स्टॉक खरेदी करू लागत मात्र यावेळी म्युच्युअल फंड व्यवस्थापक, मोठे व हुशार गुंतवणूकदार त्या शेअर्सची विक्री करू लागतात आणि त्यामुळे काही काळातच त्या शेअरची किंमत कमी होऊ लागते व नव्याने बाजारात आलेले गुंतवणूकदार या सापळ्यात अडकून आपले नुकसान करून घेतात आणि आपल्या नशिबाला दोष देऊन किंवा शेअर बाजाराला जुगार समजून आपले शेअर्स कमी किंमतीला विकून बाहेर पडतात. हे असे ४/५ थरांचे चक्र बाजारात नियमितपणे चालू असते जे गुंतवणूकदार हे वेळीच समजून घेऊ शकतात त्यांना पैसे मिळतात बाकीचे पैसे घालवून बसतात.
बाजारातील मंदीची दिशा कशी ओळखावी?
सामान्यपणे बाजार सरासरी १५% ते २०% किंवा जास्त कोसळला कि समजावे बाजारात मंदीचा कल सुरु झाला आहे.
अस्थिर शेअर्स कधी खरेदी करावेत?
बाजारात जेव्हा अस्थिरता असते तेव्हा योग्य वेळी शेअर्सची खरेदी केली तरच चांगला फायदा अल्प किंवा मध्यम मुदतीत मिळवता येऊ शकतो. जेव्हा एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सची किंमत एकदम वाढू लागते तेव्हा तिच्या मागील खरेदीच्या बिंदू पेक्षा ५% जास्त किंमत असताताना तो खरेदी करण्यासाठी रांगा लावू नका. एखादा मोठा शेअर काही दिवसात किंवा काही आठवड्यात २० ते २५% इतकासुद्धा वाढू शकतो मात्र अशा वेळी तो खरेदी केला तर एखादी वाईट बातमी किंवा छोटी मंदी सुद्धा तुम्हाला मोठे नुकसान सोसण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. अस्थिर शेअर्सच्या बाबतीत हि जोखीम तर जास्तच वाढते.
बाजारातून सावधगिरीचे संकेत
शेअर बाजारातील पूर्वेतिहास पाहता बाजारातील सावधगिरीचे संकेत काही घटनांतून मिळू शकतात. ते कसे ते आता पाहूया. जेव्हा सगळेच गुंतवणूकदार शेअरबाजारात शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात तेव्हा बाजारात तेजीचा कल दिसून येत असतो. अशावेळी ज्यांनी पूर्वी शेअर्स खरेदी केलेले असतात ते त्यांनी घेतलेल्या शेअर्सच्या किंमती आणखीन वाढण्यासाठी वाट पहात असतात. अशावेळी अन्य लोकांनीसुद्धा त्यांनी घेतलेला शेअर घ्यावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. बरेचसे गुंतवणूकदार त्यांच्याकडे असणारे सारे पैसे एकदम गुंतवून मोकळे झालेले असतात. जोपर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सातत्याने गुंतवणुकीचा ओघ सुरु असतो तोपर्यंत सर्व काही आलबेल असते. यावेळी आपण बाजरात नेहमी लक्ष ठेवून राहिले पाहिजे, जेव्हा हा बाजारात सतत येणाऱ्या पैशांचा ओघ कमी होऊ लागतो तेव्हा बाजारातील खरेदी कमी होऊ लागते. यावेळी आपण गुंतवलेले पैसे शेअर्सची विक्री करून बाजारातून काढून घेणे इष्ट असते.
दुसरे म्हणजे आर्थिक किंवा राजकीय परिस्थिती: जेव्हा आर्थिक क्षेत्रात चोहोबाजूनी अस्थिरता असते, मंदीची चाहूल दिसू लागते किंवा देशात जर राजकीय अस्थिरता असेल तर तेव्हा बाजारात एकदम विक्रीचा जोर वाढू लागतो. हा बाजारात बाजारात मोठी मंदी येण्याचा संकेत असू शकतो.
तिसरे म्हणजे, जेव्हा सतत शेअरच्या किंमती वाढत असतात व रोज नवे नवे उच्यांक होत असतात तेव्हा समजावे हे फार काळ टिकू शकणार नाही. मुख्यत्वेकरून आयटी शेअर्सच्या बाबतीत हे जास्त वेळा घडून येत असते. अशावेळी संबंधित शेअर्सच्या किंमती या त्या शेअर्सपासून मिळणाऱ्या उपनांच्या पेक्षा जास्त प्रमाणात वाढत असतात. हि धोक्याची घंटा समजली पाहिजे. कारण जेव्हा वाजवीपेक्षा शेअरची किंमत वाढू लागते तेव्हा समजावे काहीतरी घोळ आहे.
चवथे म्हणजे, बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ चा भडीमार होतो. कारण जेव्हा बाजरात मोठी तेजी असते तेव्हा गुंतवणूकदारांकडून आयपीओ आणून भांडवल उभे करणे सोपे असते. यावेळी रोजच बाजार नवीन नवीन विक्रम करत असतो. बाजारात येणाऱ्या जवळपास सर्वच आयपीओना तुफानी प्रतिसाद मिळत असतो. अनेक पटीने आयपीओमध्ये गन तवणूक केली जात असते. हीसुद्धा धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ येऊ लागले कि नंतर मंदी येणार असे समजून जावे.
पाचवे म्हणजे, जेव्हा एफआयआय आणि डीआयआय दोघेही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करू लागतात तेव्हा बाजारावर मंदीचे ढग जमू लागले आहेत हे समजावे.
सहावे म्हणजे, जेव्हा मंदीच्या शेवटाला एफआयआय आणि डीआयआय दोघेही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची खरेदी करू लागले कि समजावे बाजारात मोठी तेजी येणार आहे.
- Published in Capital Market
११. काही महत्वाच्या टिप्स
११. काही महत्वाच्या टिप्स
शेअरबाजारा संबंधी काही महत्वाच्या टिप्स
- नवीन उत्पादन (प्रॉडक्ट), सेवा (सर्व्हिस) किंवा नेतृत्व (लीडरशिप). जर एखादी कंपनी एखादे अगदी नवीन उतपादन किंवा सेवा बाजारात आणत असेल किंवा एखादी अशी नवीन कल्पना ज्यामुळे अर्थव्यवस्थेत त्या कल्पनेमुळे हलचल निर्माण होणार अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर याचा त्या कम्पनीच्या बाजारातील शेअरच्या किंमतीवर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
- एखाद्या क्षेत्रातील अग्रगण्य स्टॉक. ज्यावेळी एखाद्या विशिष्ठ क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण संख्येपैकी जवळपास ५०% कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढत असतात. अशा वेळी त्या क्षेत्रातिल आघाडीच्या कंपनीच्या कामगिरीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि यातील काही चांगले शेअर्स खरेदी केले पाहिजेत. अशा वेळी त्या क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी असल्याचे पाहून तुम्हाला ते शेअर्स खरेदी करण्याचा मोह होऊ शकतो मात्र तो मोह टाळला पाहिजे आणि चांगली कामगीरी करणाऱ्या कंपन्यांचेच शेअर्स खरेदी केले पाहिजेत.
- उत्तम दर्जाच्या संस्थात्मक कंपन्यांनी प्रायोजित केलेले शेअर्स. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही स्टॉक असे असले पाहिजेत कि जे काही महत्वाच्या म्युच्युअल फंड योजनेत घेतलेले असतात. कारण असे शेअर्स हे बाजाराची वरची दिशा दाखवण्यासाठी समर्थ असतात
- नवीन उच्चांक. ज्या शेअर्सच्या किंमती उलाढालीतील वाढीसह नवीन नवीन उच्चांक करत असतात ते आणखीन वाढण्याचाच जास्त संभव असतो.
- काही असामान्य स्टॉक त्यांच्या किंमतीचे सूत्र बळकट करत असतात आणि त्यानंतर ते त्यांची कामगिरी उंचावत असतात. मात्र यावेळी त्या शेअर्सच्या खरेदी व विक्रीतील उलाढाल सुद्धा सतत वाढत असली पाहिजे.
- साकारात्मक बाजार. या काळात तुम्ही नेहमी चांगली कामगिरी करणारे शेअर्सच खरेदी केले पाहिजेत. परंतु जर बाजारात एकूणच मंदी असेल तर तुम्ही घेतलेल्या शेअर्सच्या किंमती सुद्धा कमी होण्याची शक्यता असते. म्हणून बाजारातील चांगले शेअर्स तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. यासाठी आम्ही बाजारातील कल ओळख हा लेख लिहिला आहे तो समजून घेतला पाहिजे.
- एक लक्षात ठेवा कि जर एखादा शेअर २५% खाली आला तर तो तेथून ३३% वाढल्यावरच फायद्यात येऊ शकतो आणि जर एखाद्या शेअरची किंमत ५०% कमी झालेली असेल तर तो १००% वाढल्यावरच परत फायद्यात येत असतो.
- Published in Capital Market
१०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही
१०. चांगले शेअर्स घ्या, संख्या महत्वाची नाही
नियमितपणे गुंतवणूक करत रहा, घाबरून जाऊ नका
माझ्याकडून हीच सर्वात चांगली टीप तुमच्यासाठी आहे. शेअर्स निवडताना काळजी घ्या, पण एकदा का तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीचा स्टॉक खरेदी केलात आणि काही कारणाने जर शेअर बाजार खाली आला किंवा गडगडला आणि तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी झाले तर घाबरून जाऊन तो शेअर विकून मोकळे होऊ नका तर अशा वेळी नियमितपणे जमतील तेव्हढे जास्तीचे शेअर्स खरेदी करा. शेअर खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कि नेहमी चांगल्या कंपनीचेच शेअर्स विकत घ्या ती कंपनी काय निर्माण करते त्याची माहिती घ्या. कंपनी सुरु करणारी व्यक्ती कोण आहे, तिचा पूर्वेतिहास काय आहे. कंपनीचे व्यवस्थापन पारदर्शक आहे का, कंपनीची विक्री प्रत्येक वर्षी वाढणारी आहे कि नाही, बाजारात कंपनीची प्रतिष्ठा काय आहे, पीई नेहमी वाढणारा आहे का इ. कंपनी संबंधित माहिती करून घेऊन शेअर्स खरेदीचा निर्णय घ्या. एकदा शेअर्स खरेदी करून झाले आणि जर त्याची बाजारातील किंमत कमी झाली तरी घाबरून जाऊ नका कारण शेअर्सच्या मूल्यातील चढ उतार हा शेअर बाजाराचा स्थायी भाव आहे.
शेअरची किंमत कमी किंवा जास्त झाली तरी कंपनी आपले कामकाज चालूच ठेवत असते. जोपर्यंत कंपनीचे प्रवर्तक त्यांच्या मालकीचे शेअर्स विकत नाहीत तो पर्यंत तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. हा मात्र जर तुम्ही छोट्या आकाराच्या कंपनीचे शेअर्स घेतलेले असतील तर मात्र त्यांचा शेअर्सचा कमी झालेला भाव परत वाढेल कि नाही हे सांगणे अवघड असते. अनेकवेळा शेअर्सच्या किंमती कमी होण्याचे कारण हे भावनेवर आधारित असते आणि असे झाल्यास तो परिणाम तात्पुरता असतो. जर तुम्ही घेतलेल्या शेअर्सची किंमत कमी झाली तर खालील गोष्टी तपासा:
१) शेअर्सची किंमत अचानकपणे कमी होण्याचे कारण काय आहे? त्या कंपनी बाबत काही अफवा पसरली आहे काय? जर अफवा पसरली असेल तर त्याबाबत कंपनीचा खुलासा काय आलेला आहे ते तपासा.
२) स्टोकनी किंमत कमी झाल्यानंतर त्याबाबत कंपनीचे काही म्हणणे आहे का ते तपासा.
३) त्या कंपनीत काम करणारे अधिकारी शेअर्स खरेदी किंवा विक्री करत आहेत काय?
४) किंमत कमी झालेली असताना कंपनी शेअर्सची पुनर्खरेदी करत आहे काय?
जर कंपनी देत असलेला खुलासा तुम्हाला योग्य वाटला तर तुम्ही समभागांच्या घसरलेल्या किंमतीकडे दुर्लक्ष करणे हेच तुमच्या हिताचे असेल. मात्र काही योग्य कारणामुळे जर शेअर्सचा भाव पडलेला असेल व तो आणखीन खाली जाण्याची शक्यता असेल तर मात्र तुम्ही तो शेअर नुकसानीत सुद्धा विकून आलेल्या पैशातून अन्य चांगल्या कंपनीचा शेअर विकत घेण्याचा विचार केला पाहिजे. मात्र तुमचा कोण्तायी निर्णय हा कंपनी संबधीचा असला पाहिजे आणि तो शेअर्सच्या किंमतीशी करण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर स्टॉकची किंमत कमी येण्याचे कारण कंपनीच्या उलाढालीशी, नफा कमी होण्याशी निगडित नसेल तर ती किंमत परत वर जाऊ शकेल, आणि मग तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.
नेहमीच चांगल्या कंपनीचेच शेअर्स खरेदी करा:
बरेचवेळा शेअरबाजारात नवीनच गुंतवणूक करणारी व्यक्ती लवकरात लवकर जास्त पैसे मिळवावेत अशा मानसिकतेची असते. जर तुम्ही नशीबवान असाल तर असे कदाचित घडलंही. परंतु खरे पाहता तेच गुंतवणूकदार श्रीमंत होतात जे चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करून ते दीर्घ मुदतीसाठी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये बाळगून ठेवतात. बरेच लोकं कोणता शेअर स्वस्त आहे असे विचारत असतात. याचे एक कारण असते ते म्हणजे त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे नसतात मात्र त्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये हजारो शेअर्स असावेत असे वाटत असते ज्यायोगे जेव्हा त्या शेअरची किंमत वाढेल तेव्हा त्यांना असे वाटते कीं आपल्याला भरपूर पैसे मिळतील. पण समस्या अशी असते कि असे स्वस्त असणाऱ्या शेअर्सची किंमत कधी वाढतच नाही. आणि यदाकदाचित थोडी वाढली तरी ते विकले जातच नाहीत कारण ते खरेदी करायला कोणीच तयार नसते.
समजा तुमच्याकडे रु.१०००० आहेत व त्यातून हजारो कमी किंमतीचे शेअर्स घेण्याऐवजी तुम्ही जर एखाद्या चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेत तर भविष्यात त्याचे बरेच पैसे होऊ शकतात. याचे एक उदाहरण म्हणजे जर का तुम्ही रु.१०००० चे Infosys चे शेअर्स १९९१ साली खरेदी केले असतेत आणि आजपर्यंत बाळगून ठेवले असतेत तर आज मिळालेले बोनस शेअर्स अधिक स्प्लिट मुळे तुमच्याकडे हजारो शेअर्स झाले असते व आज त्याचे मूल्य काही कोटी रुपये झाले असते.
अर्थात मागील काळात ज्या कंपनीच्या शेअर्सनी असाधारण कामगिरी केली आहे हे समजणे फारच सोपे असते पण असे कोणते शेअर्स भविष्यात भरघोस प्राप्ती करून देऊ शकतील हे सांगणे मात्र कठीण काम असते. म्हणून सर्वात चांगली गोष्ट हि आहे कि तुम्ही एखाद्या तुम्हाला माहित असलेल्या चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या आणि विसरून जा. यामुळे काय होईल कि सुरुवातीला शेअर्स खरेदी करताना फक्त तुम्हाला ब्रोकरेज द्यावे लागेल आणि जर तुम्ही घेतलेले शेअर्स जर चालल्या कंपनीचे असतील तर ते भविष्यात चांगली कामगिरी करतीलच आणि जर ते अशी चांगली कामगिरी करत असतील तर ते विकण्याचा विचार तरी का करावयाचा बरे?
तुमच्याकडे असणाऱ्या रु.१०००० चे अनेक स्टॉक घेण्याच्या ऐवजी जरी एखाद्या चांगल्या कंपनीचा उदा. मारुती लिमिटेड चा जरी एक शेअर घेऊन ठेवलात आणि परत तुमच्या कडे जेव्हा पैसे जमतील तेव्हा परत एक जास्तीचा शेअर घेतलात असे दीर्घ मुदतीत करत राहिलात तर २०-२५ वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य अनेक पटीने वाढलेले तुम्हाला दिसून येईल. मारुती हे एक उदाहरण म्हणून सांगितले आहे, देशांत जवळपास २५० चांगल्या कंपन्या आहेत त्यातील तुम्हाला जी माहित असेल अशा कंपनीच्या शेअर्सची तुम्ही नियमितपणे खरेदी करू शकता.
तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये किती कंपन्यांचे शेअर्स असावेत
अनेक कंपन्यांचे शेअर्स घेण्यापेक्षा काही थोड्या चांगल्या कंपन्यांचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये धारण करणे हे केव्हाही चांगले असते ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवणे सोपे होते. तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या पैशांप्रमाणात किती कंपन्यांचे शेअर्स बाळ्गावेत हे खालील टेबल मध्ये मार्गदर्शन म्हणून पहा:
असणारी रक्कम | किती कंपन्यांचे शेअर्स बाळ्गावेत |
रु. २०००० पेक्षा कमी | १ ते २ |
रु. २०००० ते ५०००० | २ ते ३ |
रु. ५०००० ते २००००० | ३ ते ५ |
रु. २००००० ते ५००००० | ५ ते ७ |
रु. ५००००० पेक्षा जास्त | ७ ते १० |
- Published in Capital Market