मिळणाऱ्या सेवा
On- The – Move तुम्ही icicidirect.com च्या वेबसाईटचा वापर करून अति जलद ट्रेड करू शकता. यासाठी तुम्ही संगणक किंवा मोबाइलचा हि वापर करू शकता. डेटा कार्ड किंवा GPRS चा वापर करूनही ट्रेड करू शकता.
Call-n-Trade जर यदा कदाचित तुम्हाला लॉग इन करणे शक्य नसेल तर Call N Trade service व्दारे टेलिफोन वरूनही तुम्ही ट्रेडिंगची ऑर्डर देऊ शकता.
ICICISecurities Equity Advisory Services जर आपण जास्त रकमेची गुंतवणूक किंवा ट्रेडिंग साठी वापर करणार असाल तर तुम्हाला विशेष सेवा देण्यासाठी एक सल्लागार नेमून दिला जातो तो तुम्हाला तुमचे गुंतवणूक किंवा ट्रेडिंगचे व्यवहार करण्यासाठी मदत करतो अधिक माहितीसाठी equityadvisory@icicidirect.com येथे संपर्क करा
ICICIdirect Institute ICICIdirect Knowledge Programs या सुविधेचा लाभ तुम्ही घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला शेअर्स, वायदेबाजार, म्युचुअल फंड, आय.पी.ओ., स्मॉल सेव्हिंग्ज, विमा, रोखे या गुंतवणूक साधनांची विस्तृत माहिती घेता येऊ शकेल. यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय समजून उमजून घेऊ शकाल तसेच तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन सहजपणे करू शकाल.
High Quality Research ICICI Securities Ltd. तुम्हाला उत्तम दर्जेदार रिसर्च सुविधा प्रदान करते याचा वापर करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता. हे रिसर्च तुमच्या गरजेनुसार अल्पकाळासाठी, मध्यम कालावधीसाठी व दीर्घ कालावधीसाठी ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्यासाठी उपयुक्त आहे.
ICICI Securities ATS हि सुविधा ज्यांना पूर्ण रिसर्च करून गुंतवणूक करावयाची इच्छा असेल त्यांचेसाठी आहे अधिक माहितीसाठी मेल करा atshelpdesk@icicisecurities.in
- Published in Demat
म्युचुअल फंड म्हणजे काय?
“श्रद्धा और सबुरी – सबुरीका फल हमेशा मिठाहि होता है”.
म्युचुअलफंडाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल कि अनेक लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांचे कडे पैसे हि असतात मात्र त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेश्या प्रमाणात नसते अशांसाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे उत्तम माध्यम आहे. शेअर बाजारात स्वतः गुंतवणूक करण्यासाठी टेक्निकल्स अॅनेलिसीस व फंडामेंटल अॅनेलिसीस करता येणे गरजेचे असते, त्याच प्रमाणे केव्हा व कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व ते केव्हा विकावेत यासाठी नियमित अभ्यासाची गरज असते, यामुळे सर्वसामान्य माणसाला यासाठी वेळ देणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी, शेअरबाजाराचा दिर्घकालीन फायदा मिळवण्यासाठी म्युचुअल फंड हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम माध्यम आहे. कारण तज्ञ फंड व्यवस्थापक हे म्युचुअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असतात. या व्यतिरिक्त आपण शेअर बाजारात व्यवहार करत असताना जो खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्च म्युचुअल फंडात येत असतो.
आपल्या देशात प्रथमत: भारत सरकारचे सहभागाने युनिटट्रस्ट ऑफ इंडियाचा असेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना सन १९६४ मध्ये करण्यात आली. आपल्या पैकी बरेच जणांनी युनिट ६४ बाबत ऐकले असेलच. हीच भारतातील पहिली म्युचुअल फंड कंपनी. १९८६ मध्ये सार्वजनिक बँकांना म्युचुअल फंड स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली.१९९३ पासून खाजगी म्युचुअल फंडांना परवानगी मिळाली. सध्या आपल्या देशात ४३ म्युचुअल फंड कंपन्या कार्यरत आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा एकटे नसता.जेव्हा तुम्ही म्युचुअल फंडाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करता तेव्हा तुमच्या सारखी अनेकजण त्या योजनेत गुंतवणूक करत असतात यामुळे एक मोठी रक्कम (शेकडो करोड रुपये) त्यायोजनेत जमा होत असतात.यामुळे फंडमॅनेजरला अनेकविविध क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात. यामुळेच दीर्घ मुदतीत म्युचुअल फंडातून गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळालेला आहे.
तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक केली कि तुमच्या सारख्या ध्येय असणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैशा सोबत तुमचे पैसे एकत्र केले जातात. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीच्या बदल्यात तुम्हाला युनिट्स अदा केली जातात. (तुम्ही केलेली गुंतवणूक रुपये / त्या दिवशीचे गुंतवणूक मूल्य म्हणजेच NAV = तुम्हाला अदा केलेली युनिट्स) मग हे पैसे म्युचुअल फंड कंपनीचा फंड मॅनेजर शेअर्स, डिबेंचर्स ते मनीमार्केट पर्यंतच्या वेगवेगळ्या सिक्युरिटीज मध्ये गुंतवतात. त्याला कॅार्पस किंवा असेटस अंडर मॅनेजमेंट या नावानेही ओळखले जाते. रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणुकीचे मुल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मूल्य (NAV) जाहीर केले जाते. म्युचुअल फंडाची संपूर्ण माहिती AMFI च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Units = म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर मिळणारा तुमच्या वाट्याचा भाग (शेअर ), गुंतवणुकदार या युनिट्सचा मालक असतो.
NAV = Net Asset value म्हणजे एका युनिटचे रोजच्या रोज बदलले जाणारे मूल्य.
Value = गुंतवणुकीचे मूल्य = Number of Units X NAV
शेअर बाजार वर गेला कि NAV वाढते व आपल्या गुंतवणुकीचे मुल्यांकन सुद्धा वाढते, या उलट जर शेअर बाजाराखाली आला तर NAV कमी होते व आपल्या गुंतवणुकीचे मूल्यांकन सुद्धा कमी होते. हि अशी मूल्य वृद्धी किंवा मूल्य घट शेअर बाजाराच्या काळाप्रमाणे नियमित पणे होतच असते, मात्र दीर्घ मुदतीत शेअर बाजारात वृद्धी हि होतेच व त्यामुळेच दीर्घ मुदतीत गुंतवणूकदाराला फायदाच होत असतो. म्हणून रोजच्या रोज आपल्या गुंतवणुकीचे मूल्य पाहत बसू नये तर वर्ष सहामहिन्यातून कधी तरी एकदाच पहावे. म्युचुअलफंडात गुंतवणूक केल्यावर संयमाची आवश्यकता असते. यासाठी श्री साईबाबांचे एक वचन श्रद्धा और सबुरी हे कायम लक्षात ठेवावे. जर का तुम्ही म्युचुअल फंडात गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी केली तर प्रत्येकालाच येथे पैसे मिळतात, नशीब वैगरे काही लागत नाही. म्युचुअल फंडात गुंतवणूक करताना ती किमान ५ वर्षांसाठी करावी व शक्य असेल व पैशांची अगदी गरज नसेल तर ती गुंतवणूक जास्तीत जास्त काळ ठेवावी. म्युचुअल फंडात नियमित दर महिना SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करत राहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.तेजी मंदी हा शेअर बाजारचा अविभाज्य भागच आहे मात्र दीर्घ मुदतीत तोवरच जात असतो. एक लक्ष्यात ठेवा कि सेन्सेक्स १९७९ साली १०० अंकांनी सुरु झाला तो दिनांक 20 जुलै २०१८ रोजी ३६४९६ च्या पेक्ष्या जास्त झाला होता. गेल्या ३८ वर्ष्यात सेन्सेक्सने वार्षिक १७% चक्रवाढ दराने परतावा दिलेला आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे कि जरी सेन्सेक्सचा प्रवास १०० ते ३७५०० असा झालेला असला तरी तो सतत वर गेलेला नाही.या कालखंडात बाजाराने अनेक मोठे चढ उतार पाहिलेले आहेत.तसे पहिले तर बाजार रोजच वर खाली होतच असतो त्यामुळे तुम्ही केलेल्या गुंतवणुकीचे मुल्यसुद्धा रोजच कमी जास्त होत असते. सेन्सेक्सच्या प्रवासातील महत्वाचे काही टप्पे:
१) सेन्सेक्सची सुरुवात वर्ष १९७९-१०० अंक
२) वर्ष १९९२ मसली सेन्सेक्सने ४५०० अंकांचा टप्पा पार केला, येथे हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीला आला व अल्पावधीतच तो १५०० अंकांपर्यंत खाली आला पण त्याच वर्षी तो परत २५०० पर्यंत वाढत गेला. बाजारातील हि मोठी तेजी व मंदी.
३) वर्ष २००० सेन्सेक्सने ६३०० अंकांचा टप्पा पार केला, येथे जागतिक स्तरावर आयटी बबल फुटला व अल्पावधीतच तो २१०० अंकांपर्यंत खाली आला. बाजारातील हि दुसरी मोठी तेजी व मंदी.
४) वर्ष २००० ते जानेवारी २००८ पर्यंत सेन्सेक्सने २१०० ते २१००० अंक हा टप्पा पार करत गुंतवणूकदारांना फक्त ७/८ वर्षातच १० पट परतावा दिला. याला अर्थात मोठे कारण होते ते म्हणजे FII (परकीय संस्थात्मिक गुंतवणुकदार) ची भारतीय शेअर बाजारातील मोठा सहभाग. २००८ साली अमेरिकेतील सब-प्राइम घोटाळाबाहेर पडला, यामध्ये लेहमन ब्रदर्स सारखी १५० वर्षे जुनी अर्थसंस्थासुद्धा दिवाळखोरीत निघाली,अनेक बँका अडचणीत आल्या, याचा परिणाम जगातील सर्वच शेअर बाजारावर झाला व आपल्याकडील FII (परकीय संस्थात्मिक गुंतवणुकदार) यांनी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली याचा परिणाम स्वरूप मार्च २००९ मध्ये सेन्सेक्सची ७६०० अनाकांपर्यंत घसरण झाली. बाजारातील हि तिसरी मोठी तेजी व मंदी.
५) वर्ष २००९ मध्ये एप्रिल महिन्यात अमेरिकन सरकारने बँकांना मोठ्या प्रमाणावर बेलआउट पॅकेज दिले तसेच भारतात श्री. मनमोहनसिंग यांचे नेतृत्वाखालील स्थिर सरकार आले याचा सकारात्मक परिणाम होऊन वर्ष २००९ अखेरपर्यंत बाजाराने १८००० अंकांचा टप्पा परत एकदा पार केला.
६) यानंतर वर्ष २०१० ते २०१३ या कालखंडात संपूर्ण जगातच एकूण मंदीचे वातावरण होते याला जोड मिळाली ती आपल्या देशातील राजकीय परिस्थितीची, यामुळे या काळात सेन्सेक्स १५००० ते २१००० या दरम्याने वर खाली होत होता.
७) वर्ष २०१३-१४ मध्ये राजकीय परिस्थिती बदलली व बाजारात परत तेजीचा माहोल सुरु झाला व २०१६ मध्ये सेन्सेक्सने २९००० पेक्षा जास्तची उच्चतम पटली सर केली. याचवेळी जागतिक बाजारात कामोडीटीच्या किमतीनी नीचांक गाठला, क्रुडऑइलच्या किंमती तर २५ डॅालर प्रती बॅरल पर्यंत खाली उतरल्या,याला भर म्हणून चीनमध्ये मंदी आली, चीनची अर्थव्यवस्था प्रम्य्ख्याने एक्सपोर्टवर अवलंबून आहे व जागतिक बाजारात चीनी उत्पादनाना मागणी कमी झाली, एक्सपोर्टला आधार मिळावा म्हणून चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केले,जागतिक बाजाराने हे निगेटिव्ह घेतले परिणाम स्वरूप सेन्सेक्स २०००० पर्यंत खाली आला.
८) वर्ष २०१७ च्या अखेरीला बाजारात परत एकदा तेजी सुरु झाली व जानेवारी २०१८ अखेरीला सेन्सेक्सने ३६५०० ची उच्चतम पातळी पार केली याच वेळी भारत सरकारने बजेट २०१८ मध्ये LTCG कर सुरु केला आणि अमेरिकेतही बॉड यील्ड वाढले या दोन गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून तो ३२५०० पर्यंत खाली आला व आज तो ३६५०० च्या आसपास आहे.
तर हा असा राहिला सेन्सेक्सचा प्रवास, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेलच कि दीर्घ मुदतीत सेन्सेक्सचा आलेख चढतच राहिलेला असून, तेजी-मंदीच्या एका आवर्तनांनंतर आलेल्या पुढील तेजीत प्रत्येक वेळीच सेन्सेक्सने मागील उच्चांक मोडून एक नवीन उच्चांक सर केलेला आहे. आणि म्हणूनच प्रत्येकानेच शेअर बाजारात म्युचुअल फंडाच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्यासाठी व गुंतवणुकीच्या इतर साधनांपेक्षा जास्त परतावा मिळावा म्हणून दीर्घ मुदतीत गुंतवणूक केलीच पाहिजे.
- Published in About Mutual Fund
७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?
प्रकरण ७ वे
७. निरनिराळ्या रेशोंचे विश्लेषण कसे करावे?
कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी त्या कंपनीच्या संबधीत विवीध रेशो पहाणे गरजेचे असते. विवीध रेशोंचे विश्लेषण करताना त्या कंपनीची एकंदर कामगिरीचे मोजमाप करता येते व सर्वच रेशो जर गणितीदृष्ट्या योग्य असतील तर गुंतवणूक करताना आपली खात्री होते कि आपला गुंतवणूकीचा निर्णय योग्य असून आपण त्या शेअरच्या किंमतीत होणा-या चढ उतारामुळे आपले मन विचलीत होत नाही व चुकीच्या वेळी शेअर खरेदी अथवा विक्रीचा निर्णय आपण घेत नाही. उलट अशा शेअरची किंमत जर कमी झाली तर ती एक चांगली संधी समजून आपण त्या शेअरमध्ये अधिक गुंतवणूक करतो व तेजीच्या काळात जास्त फायदा मिळवतो. दुसरा फायदा म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक हि दिर्घ मुदतीसाठीच जास्तकरुन फायदेशीर होते हे आपणास कळते व तसे आपण निर्णय घेतो.
पीएसआर (प्राइज टू सेल्स रेशो):
हा रेशो ३ पेक्षा कमी असलाच पाहिजे, खरं म्हणजे तो १ पेक्षाही कमी असेल तर चांगले. याच्यामुळे कंपनीच्या शेअरची किंमत व प्रती शेअर विक्री यांची तुलना करता येते. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे कि जर का पीएसआर ३ पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान होण्याचीच शक्यता (खात्रीच म्हणाना) जास्त असते व जर हा रेशो १ पेक्षा कमी असेल तर फायदा होण्याची शक्यता जास्त असते.
पीएसआर = शेअरची किंमत / प्रती शेअर मिळणारे मागील १२ महिन्याचे विक्रीचे उत्पन्न
उदा.: क्ष लि. ची गेल्या १२ महिन्यातील एकूण विक्री = रु.१०० कोटी
कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या १ कोटी
म्हणून प्रती शेअर विक्रीचे उत्पन्न रु.१००
कंपनीच्या शेअरचे बाजार मुल्य रु.७५ प्रती शेअर
पीएसआर = ७५/१००
= ०.७५
रिटर्न ऑन इक्वीटी:
याचा अर्थ तुमच्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो, वॉरेन बफेट म्हणतो जर का तुम्हाला २०% च्या दरम्याने मिळत असेल तर तो चांगला समजावा.
Return on Equity = Net Income/Shareholder’s Equity
डेब्ट – इक्वीटी रेशो:
हा रेशो कंपनीच्या स्वत:च्या भांडवलाशी कर्जाचे प्रमाण दाखवतो. कंपनीचे एकूण कर्ज / कंपनीचे एकूण शेअर भांडवल या सुत्राने हा काढला जातो. हा किमान ०.५ पेक्षा तरी कमी असणे उत्तम, परंतु १ असला तरी चालू शकते. मात्र जर का तो २ पेक्षा जास्त असेल तर धोक्याची घंटा समजावी. याचा अर्थ कंपनीला जास्त प्रमाणात कर्जावर व्याज द्यावे लागेल व त्यामुळे कंपनीच्या निव्वळ नफा मिळवण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल. म्हणून सगळेच कर्ज वाइट असते असे नव्हे जर का कर्जावरील व्याजाची फेड करुनही जर का कंपनीचा फायदा चांगल्या प्रमाणात होत असेल तर कंपनी कर्जाचा उपयोग विस्तारीकरणावर किंवा उलाढाल वाढीसाठी प्रभावीपणे करत आहे असे समजले जाते. मात्र पायाभूत सुवीधा पुरवणा-या कंपन्यांचे बाबत हा रेशो वापरणे योग्य नसते कारण त्यांची उभारणीच मुळी उच्च डेब्ट इक्वीटी रेशोवर केलेली असते कारण त्याना लागणारे भांडवलाचे प्रमाणच जास्त असते.
बेटा:
इंडेक्सच्या तुलनेत शेअरची किंमत किती अस्थीर आहे हे बेटा फँक्टरमुळे कळू शकते. जेवढा बेटा जास्त तेवढे शेअरच्या किंमतीत जास्त चढ-उतार संभवतात. तर जर बेटा उणे असेल तर समजावे कि तो बाजाराच्या कलाविरुध्द वाढ घट दाखवेल म्हणजेच जेव्हा बाजारात तेजी असेल तेव्हा अशा शेअरची किंमत मात्र कमी होते व बाजार खाली जात असताना याची किंमत वाढते. ह्याची गणना करणे हे फारच किचकट असल्यामुळे मी याचे सुत्र येथे देत नाही मात्र तो बीएसईच्या साईटवर रोजच्या रोज उपलब्ध असतो,
https://www.bseindia.com/indices/betavalues.aspx या संकेतस्थळावर तुम्हाला कंपनीचा बेटा पाहाता येईल.
प्रतीशेअर उत्पन्न(Earning per share – EPS)
याच्यामुळे कंपनी प्रतीशेअर किती उत्पन्न मिळवते हे समजून येते आणि गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मिळणारे प्रती शेअर उत्पन्न हेच जास्त महत्वाचे असते. इपीएस = कंपनीचा निव्वळ नफा / कंपनीच्या एकूण शेअर्सची संख्या या सुत्राने इपीएस काढला जातो. उदा. क्ष लि. चे २ कोटी शेअर्स आहेत व नफा जर रु.६ कोटी असेल तर इपीएस होईल रु.३ प्रती शेअर. याच्यामुळे कंपनी अल्पकाळात व दिर्घ काळात कशी ग्रोथ (वृध्दी) त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत करते हे समजून येते. म्हणून गुंतवणूक करण्यापुर्वी त्या सेक्टरमधील सर्व कंपन्याचा इपीएसची तुलना करणे अत्यावश्यक आहे.
पी / इ रेशो
कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करताना फक्त इपीएस पाहून चालत नाही तर त्याच बरोबर त्याची तुलना शेअरच्या बाजारभावाशी करणेसुध्दा अत्यावश्यक असते. यासाठी पी ई रेशो पहाणे महत्वाचे असते. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना पी / ई रेशो हा महत्वाचा घटक असल्यामुळे आपण याची येथे जरा विस्ताराने व उदाहरणासह चर्चा करुया. पी / ई रेशो = शेअरचे बाजार मुल्य (किंमत) / गेल्या ४ तिमाहितील इपीएस उदा. क्ष लि. च्या शेअरचे बाजारमुल्य आहे रु.१०० आणि त्याचा इपीएस आहे रु.२० प्रती शेअर तर त्या शेअरचा पी ई होतो ५. कंपनीच्या इपीएस मध्ये नियमीतपणे जर मोठ्या प्रमाणावर वाढ होत असेल त्या शेअरची किंमतही वाढण्याचे ते एक महत्वाचे कारण होते. जर का त्याच क्षेत्रातील (सेक्टर) अन्य कंपन्याच्या तुलनेत एखाद्या कंपनीच्या शेअरचा पी ई रेशो जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तो स्टॉक महाग असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. तेच जर पी ई कमी असेल तर तो शेअर गुंतवणूकीसाठी योग्य आहे असे बहुतांश गुंतवणूकदार समजतात. मात्र मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर ज्या शेअरचा पी ई रेशो जास्त आहे अशा शेअरची कामगिरी जास्त चांगली झालेली दिसून आलेली आहे. क्ष ह्या कंपनीचे सध्याचे प्रती शेअर उत्पन्न रु.१ असून त्या कंपनीची अपेक्षा आहे कि हे उत्पन्न भविष्यात वार्षीक २०% दराने वाढेल हे गृहित धरल्यास ५ वर्षानंतर कंपनीचे प्रती शेअर उत्पन्न असेल रु.२.५०. आता असे धरुया कि या क्षेत्रानुसार कंपनीचा पी / ई रेशो १५ हा गुंतवणूकदाराचे दृष्टीने योन्य आहे. म्हणून हा शेअर अपेक्षीत २.५० च्या इपीएस नुसार १५ पटीने विकला जाईल (२.५० गुणीले १५) म्हणजेच रु.३७.५० या किंमतीला विकला जाईल तो होतो चालू वर्षाच्या इपीएसच्या ३७.५० पट. येथे कंपनी २०% वार्षीक दराने उत्पन्नात वाढ अपेक्षीत असल्यामुळे (व या कंपनीची मागिल कामगिरीही सतत चांगली राहिलेली असल्यामुळे) गुंतवणूकदार हा शेअर भविष्यात मिळणा-या उत्पन्नावर अवलंबून जास्त किंमतीला तो शेअर खरेदी करण्यास तयार असतो. अशा वेळी तो शेअर उच्च पी / ई (या वर्षीच्या तुलनेत) असूनही खरेदी केला जातो. याचाच दुसरा अर्थ चांगल्या व्यवस्थानाखालील, चांगल्या कामगिरीचा इतिहास असलेल्या व भविष्यात आकर्षक उत्पन्न देऊ शकणा-या म्हणजेच थोडक्यात गुंतवणूकदारांच्या दृष्टीने चांगल्या (वेलनोन) कंपनीच्या शेअरला तो जास्त किंमत मोजण्यास तयार असतो.
रेशोंचे विश्लेषण आजकाल इंटरनेटवर अनेक साईटसवर उपलब्ध असते, प्रामुख्याने काही चांगल्या ब्रोकरच्या साईटवर, बीएसई व एनएसीच्या साईटवरही हे उपलब्ध असते या सुवीधेचा वापर शेअर बाजारात गुंतवणूक करु इच्छिणा-या प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.
मात्र जर तुमच्याकडे अजिबात वेळच नसेल व हे काम तुमच्यावतीने तज्ञ व्यक्तीने करुन तुम्हाला दिर्घ मुदतीत शेअर बाजारापासून मिळणार फायदा मिळवण्याची इच्छा असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या एखाद्या चांगल्या वेग वेगळ्या क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाणा-या म्हणजेच डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत नियमीत दर महा एसआयपीच्या माध्यमातून दिर्घ मुदतीसाठी (साधारण ५ वर्षापेक्षा जास्त व उत्तम परताव्यासाठी १५ ते २० वर्षे) करणे हे अतिशय फायदेशीर होते. अशाप्रकारच्या चांगल्या योजनानी सरासरी वार्षीक २५% चक्रवाढ दराने १५ पेक्षा अधीक वर्षाचे काळात उत्पन्न दिलेले आहे. आणि अजून किमान ३० ते ४० वर्षे ते याच दराने मिळण्याची शक्यता आहे.
रेशोंप्रमाणेचे कंपनीच्या फंडामेंटलचे विश्लेषण करणेही तेवढेच किंबहुना अधीक महत्वाचे आहे त्याबाबत आपण पुढील प्रकरणात चर्चा करुया.
- Published in Capital Market
६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?
प्रकरण ६ वे
६. तुम्ही शेअरबाजाराचे तज्ञ होऊ शकता का?
सर्वसामान्य माणूस शेअर बाजारातील तज्ञ होऊ शकतो काय?
होय, निश्र्चितच होऊ शकतो.
लोकांचा मात्र असा समज असतो कि सध्याच्या अस्थीर बाजारात काय आपला निभाव लागणे शक्य नाही. तसाच दुसरा असा समज आहे कि हे काम फक्त तज्ञ व्यक्तीच करु शकतात, माझे ते काम नव्हे, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर हि गोष्ट खरीच आहे, अशावेळी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हेच तुमच्यासाठी योग्य होईल कारण तज्ञ फंड मँनेजर तुमच्यावतीने तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करत असतो, मात्र त्याच्यावर काही बंधने असतात, त्यातील महत्वाचे म्हणजे योजनेच्या उदिष्ठांनुसारच त्याला गुंतवणूक व्यवस्थापन करावे लागते, म्हणूनच म्युच्युअल फंडाची योजना निवडताना तिचे उदिष्ठ व मागील कामगीरी तपासून पहा. यासाठी चांगल्या म्युच्युअल फंड वितरकाची मदत घ्या.
मात्र जर तुम्ही स्वत: तुमच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करण्यास वेळ देऊ शकत असाल तर तुम्हीच तज्ञाप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. तुम्ही हे निश्र्चितच करु शकता. त्यासाठी ह्या लेखातील व या पुढे मी देत असलेले लेख काळजीपुर्वक वाचा व त्याचा उपयोग तुमच्या गुंतवणूक व्यवस्थापनासाठी करा. प्रथमत: तुम्ही ज्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करु इच्छित आहात त्याची माहिती नीट होण्यासाठी खालील बाबी कशा तपासाव्या हे मी तुम्हाला प्रथम सांगतो.
विक्रीतील वाढ
कंपनीची विक्रीत दर वर्षी होणारी वाढ हा एक महत्वाचा घटक आहे. मागील वर्षापेक्षा किती टक्के विक्री वाढली आहे हे तपासा. नियमीत वाढ हे कंपनीच्या चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण आहे. जर विक्रीत घट झाली असेल तर त्याचे कारण तपासा, हा बदल तात्पुरता आहे कि दिर्घकाळ परिणाम करणारा आहे याची माहीती घ्या. विक्रीत होणा-या वाढीचा दर हा प्रत्येक सेक्टरसाठी वेगवेगळा असू शकतो उदा. एफएमसीजी सेक्टरमधील कंपन्याच्या विक्रीची वाढ हि १०% दराने साधारणपणे होत असल्यास चांगली समजली जाते तर आयटी कंपनीची वाढ हि २०% पेक्षा जास्त असणे चांगले समजले जाते. हा निकष प्रत्येक सेक्टरसाठी वेग-वेगळा असतो. विक्रीच्या वाढ/घटीचा परिणाम शेअर्सच्या किंमती कमी/जास्त होण्याशी असतो. अपवाद बाजारातील तात्तपुर्ती तेजी/मंदी. नेहमी विक्रीत वाढ होणारी कंपनी तुम्हाला दिर्घकाळात तुमच्या गुंतवणूकीवर चांगला परतावा देऊ शकते. मात्र विक्रीतील वाढ एवढा एकच निकष पुरेसा नाही अन्य गोष्टी सुध्दा तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्या आता एक एक करुन पाहुया.
बॉटम लाईन ग्रोथ
बॉटम लाईन ग्रोथ म्हणजेच कंपनीच्या निव्वळ (नेट) नफ्यात होणारी वाढ. निव्वळ नफ्यात नियमीतपणे होणारी वाढ कंपनीची प्रगती दाखवते व याचा परिणाम शेअर्सच्या किंमतीत वाढ होण्यात होतो. नफ्यातील वाढ हिसुध्दा सेक्टरनुसार वेगवेगळी असते. उदा. आयटी सेक्टरमधील चांगल्या कंपनीच्या नफ्यातील वाढ हि गेल्या वर्षीच्या तुलनेत ६५ ते ७०% असू शकते तर एफएमसीजी व जुन्या कंपन्यांच्या बाबत हि वाढ १० ते १५% सुध्दा चांगली मानली जाते.
आरओआय – रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट अर्थात गुंतवणूकीवरील परतावा:
म्हणजेच कंपनीने गुंतवलेल्या भांडवलाच्या प्रमाणात किती परतावा मिळाला हे पहाणे. जर का एखाद्या कंपनीने रु.१०० कोटी मशिनरी, जमीन,मनुष्यबळ व अन्यत्र भांडवली गुंतवणूक केलेली असेल व जर त्या कंपनीला निव्वळ नफा रु.२५ कोटी वर्षात झालेला असेल तर आरओआय होईल २५%. परत आरओआय हा सुध्दा कंपनीच्या प्रकारावर पाहिला पाहिजे. आयटीसाठी तो ३५ ते ४० टक्के चांगला असेल तर भांडवली पीएसयुसाठी तो १० ते १५% चांगला समजला जातो.
व्हॉल्युम (उलाढाल):
काही तज्ञ कंपनीच्या शेअर्सच्या बाजारातील होणा-या रोजच्या रोजच्या व वर्षातील दररोजच्या सरासरी उलाढालीला महत्व देतात. यामुळे असे कळते कि त्या कंपनीच्या शेअर्सची रोज खरेदी विक्री किती संखेत होते. जर कंपनीच्या संबंधी एखादी महत्वाची बातमी बाजारात येते तेव्हा अचानकपणे त्या कंपनीच्या शेअर्सची उलाढाल वाढते कारण मागणी एकतर चांगली बातमी असली तर वाढते व वाईट बातमी असेल तर मागणी कमी होते व याचा परिणाम शेअरच्या किंमतीत होणा-या वाढ-घटीवर होतो. शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या संखेने हेही समजते कि त्या शेअरची तरलता किती आहे. ज्या शेअरची मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असे शेअर विकणेही सुलभ असते (कारण गि-हाईक समोर असते) तसेच यांच्या खरेदीवर होणारा खर्चही अल्प असतो. याच्या उलट ज्या शेअर्सची कमी किंवा क्वचीतच उलाढाल होते अशा शेअर्सच्या किंमतीत होणारा बदलही मोठा असतो म्हणून अश्या शेअर्सच्या शक्यतो वाटेलाच जाऊ नये. उलाढालीमुळे शेअर्सच्या मागणी व पुरवठ्याचीसुध्दा कल्पना येते ज्यामुळे किंमत कमी होणार आहे कि वाढणार आहे याचा प्राथमीक अंदाज येतो. जेव्हा अचानकपणे एखाद्या शेअरची किंमत वाढू लागली कि त्याचे कारण तपासले पाहिजे, एक कारण असे असू शकते कि कोणतातरी संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअर्सची खरेदी करु लागला असेल. तसेच किंमत कमी होण्याचे कारण याच्या उलट असते, तेव्हा संस्थात्मक गुंतवणूकदार त्या शेअरची मोठ्या प्रमाणावर विक्री करत असतात.
मार्केट कँपिटलाझेशन (भांडवली बाजार मुल्य)
कंपनीच्या सर्व मिळून शेअर्सचे होणारे त्या वेळचे बाजार मुल्य (एकूण शेअर्स गुणीले प्रती शेअरचा दर). यामुळे कंपनी मोठी, मध्यम कि लहान आहे हे कळते. तसेच त्या शेअरची तरलतासुध्दा यामुळे अजमावता येते, जेवढे भांडवली बाजार मुल्य जास्त तेवढी तरलता जास्त असण्याची शक्यता असते. आपल्याला जर नियमीत व स्थिर परतावे मिळावे असे वाटत असेल म्हणजेचे तुलनेत कमी जोखीम स्विकारावयाची असेल तर ज्या कंपनीचे भांडवली बाजार मुल्य सर्वात जास्त आहे अशा कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत, जर मध्यम जोखीम घ्यावयाची असेल तर मध्यम आकाराच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावेत व जर जास्तच जोखीम घ्याव्याची असेल तर लहान कंपन्याचे शेअर्स घ्यावेत. म्हणजेच भांडवली बाजारमुल्य आपणास शेअर खरेदी करताना आपली जोखीम ठरविण्यास मदत करते.
कंपनी व्यवस्थापन
खरे पहाता कंपनीचे व्यवस्थापन कोणत्या व्यक्तींच्या किंवा समुहाच्या हाती आहे हे पहाणे सर्वात महत्वाचे असते. यामुळे या व्यवस्थापनाच्या अन्य कंपन्या असल्यास त्यांची कामगिरी तुलनेसाठी फारच उपयुक्त ठरते. कंपनीचे व्यवहार किती पारदर्शक आहेत हे त्या कंपनीच्या व्यवस्थापनावरुनच समजते. त्यांची कंपनीकडे पहाण्याची दृष्टी कशी आहे हेही फार महत्वाचे असते. म्हणूनच टाटा, बिर्ला, या समुहाला सर्वमान्यता जास्त असते. कंपनी कशी चालवावी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे श्री. नारायण मुर्ती यानी चालवलेली इन्फोसीस हि कंपनी व व्यवस्थापन कसे नसावे याचे उदा. सत्यम कंपनी (आता ती महिंद्र गृपने घेतल्याने जुन्या भागधारकाना दिलासा मिळाला हि गोष्ट वेगळी). कंपनी कामगिरी कशी करणार हे पुर्णत: व्यवस्थापनावरच अवलंबून असते. जर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असणा-या व्यक्ती या कार्यकुशल, प्रामाणिक व विश्वासार्ह असतील व ते जर अन्य चांगल्या कार्यरत असणा-या कंपनीच्या व्यवस्थापनेचा भाग असतील तर अशा कंपनीला मोठे गुंतवणूकदार नेहमीच प्राधान्य देत असतात. तसेच कंपनीचा एमडी कोण आहे हे जाणून घेणे अतिशय महत्वाचे असते. यामुळेच आपण शेअर्स खरेदी करताना व्यवस्थापन कोणाचे आहे याला प्राधान्य दिले पाहिजे.
आता पुढील प्रकरणात आपण महत्वाचे रेशो कसे पहावेत याची माहिती घेऊ.
- Published in Capital Market
४. शेअर बाजाराची प्राथमिक माहिती
प्रकरण ४ थे
४. शेअर बाजाराची प्राथमिक माहिती
शेअर बाजाराचे कामकाज
शेअर बाजारातून पैसे कसे मिळवता येऊ शकतात हे जर का तुम्हाला समजून घ्यावयाचे असेल तर तुम्हाला शेअर बाजाराचे कामकाज कशा प्रकारे चालते हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे. शेअरबाजारात व्यवहार करण्यासाठी आजकाल तुमच्याकडे डिमँट खाते असणे गरजेचे असते, असे डिमँट खाते तुम्ही कोणत्याही ब्रोकरमार्फत उघडू शकता. शक्यतो नावाजलेल्या मोठा ब्रोकरमार्फत खाते उघडणे चांगले कारण फसवणूक होत नाही, काही छोट्या ब्रोकरनी यापूर्वी गुंतवणूकदरांचे शेअर्स परस्पर विकल्याच्या घटना घडलेल्या आहेत म्हणून तुमचे डिमँट खात्यातील शेअर्स आहेत कि नाहीत हे नियमितपणे तपासा.
आता ज्या व्यक्तीला शेअर्सची खरेदी किंवा विक्री बाजारात करावयाची असेल तर त्याला प्रथमत: ब्रोकरकडे ऑर्डर नोंदवणे गरजेचे असते. जेव्हा अशाप्रकारे शेअर्सच्या खरेदीची ऑर्डर ब्रोकरकडे नोंदवली जाते तेव्हा ब्रोकर त्याच्या सिस्टीमव्दारे तीसंबधित एक्सचेंजकडे पाठवण्याचे काम करतो. त्यानंतर ती एक्सचेंजच्या सिस्टीममध्ये रांगेत (क्यू) उभी रहाते व त्यानंतर ती सिस्टीममध्ये लॉग झाल्यानंतर तिची सिस्टीममध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणा-या शेअर्समधून खरेदीच्या व्यवहाराची पुर्तता केली जाते. अशाप्रकारे व्यवहार झाल्यानंतर ते शेअर्स ब्रोकरच्या मार्फत खरेदीदाराच्या डिमँट खात्यात वर्ग (जमा) केले जातात (किंवा पेपर रुपात खरेदीदाराला प्रत्यक्ष दिले जातात).
भारतीय शेअर बाजार – एक धावती नजर
मुंबई (बॉंम्बे) स्टॉक एक्सचेंज (बीएसई) व नँशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) हि दोन प्राथमीक एक्सचेंजेस् भारतात अस्तित्वात आहेत. या व्यतरिक्त २२ प्रादेशीक स्टॉक एक्सचेंजेस् कार्यरत आहेत. परंतु बीएसई व एनएसी हिच महत्वाची दोन एक्सचेंजेस् असून भारतातील ८०% व्यवहार हे या दोन एक्सचेंजेस् च्या माध्यमातून दर दिवशी केले जातात. दोन्ही एक्सचेंजेस् वर जवळपास सारख्यास संख्येत रोजच्या व्यवहारांची उलाढाल होत असते. सन १९९७-९८ मध्ये रोजची सरासरी उलाढाल रु.८५१ कोटी होती, ती २०१७-१८ सालात रु.४ लाख कोटी एवढी वाढली आहे. एनएसी मध्ये २५०० पेक्षा जास्त कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.१२० लाख कोटी पेक्षा जास्त आहे. बीएसई मध्ये ५१३३ पेक्षा जास्त कंपन्याचे शेअर्स नोंदवले गेलेले असून त्या सर्वांचे मिळून एकूण बाजारमुल्य रु.१२५ लाख कोटी एवढे आहे. बहुतांशी प्रमुख कंपन्याचे शेअर्स हे दोन्ही स्टॉक एक्सचेंजीस् वर नोंदवलेले असल्यामुळे त्यांचे व्यवहार दोन्ही ठिकाणी केले जात असतात त्यामुळे गुंतवणूकदार दोन्ही पैकी कोणत्याही एका ठिकाणी त्याचे व्यवहार करु शकतो. दोन्ही एक्सचेंजीसची व्यवहार पुर्ततेचा कालावधी थोडा वेगवेगळा असल्यामुळे गुंतवणूकदार त्यांची पोझीशन शिफ्ट करु शकतो. मुंबई स्टॉक एक्सचेंजचा प्राथमीक इंडेक्स बीएसई सेनेक्समध्ये ३० कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. तर एनएसई चा एस अँड पी एनएसई ५० इंडेक्स (निफ्टी) मध्ये पन्नास कंपन्याचे शेअर्स समाविष्ठ आहेत. बीएसई सेनेक्स हा एक जुना इंडेक्स असून तोच जास्तकरुन गुंतवणूकदारांमध्ये प्रचलीत आहे. दोन्ही कडील इंडेक्सचे अंश (indices) हे त्यामध्ये समाविष्ठ असलेल्या सर्व कंपन्यांच्या मिळून एकत्रीत भांडवली मुल्यावर व रोजचे रोज प्रत्येक क्षणी गणले जातात. दर शनिवार व रविवारी शेअर बाजाराचे व्यवहार बंद असतात. दोन्हीकडे आता स्वयंचलीत पुर्णत: संगणकीकृत थेट (Online) व्यवहार केले जातात त्याला बोल्ट (BSE on Line Trading) आणि नीट (National Exchange Automated Trading) सिस्टीम म्हणून ओळखले जाते. यामुळे अत्यंत प्रभावीपणे व वेगाने सर्व व्यवहार केले जातात ज्यामध्ये स्वयंचलीतपणे ऑर्डर जुळवली जाणे,व्यवहारांची वेगवान पुर्तता केली तर जातेच परंतु महत्वाचे म्हणजे या सर्व व्यवहारात पारदर्शकता ठेवली जाते. बीएसई वर ज्या शेअर्सचे व्यवहार केले जातात त्यांचे ‘A’, ‘B1’, ‘B2’ ‘C’ ‘F’ व ‘Z’ या विभागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. यातील ‘A’ या विभागात असे शेअर्स असतात कि जे बदला (Carry Forward) मध्ये समाविष्ठ असतात. ‘F’ विभागात कर्जरोखे बाजाराचे निश्र्चित उत्पन्न साधनांची नोंद केली जाते (Debt Market – Fixed Income Securities) व यांचे व्यवहार केले जातात. ‘Z’ या विभागात काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्याचे शेअर्स असतात. ‘C’ विभागात ‘A’, ‘B1’, ‘B2’ मधील ज्या सिक्युरिटीजचे ऑड लॉट मध्ये व्यवहार केले जातात अशा सिक्युरिटीजची नोंद केलेली असते. सर्व स्टॉक एक्सचे्जीस्, ब्रोकर (दलाल), डिपॉझीटरीज, डिपॉझीटरी पार्टीसीपन्टस्, म्युच्युअल फंडस्, परदेशी अर्थसंस्था आणि अन्य सर्व सहभागीदार जे भारतातील प्राथमीक व दुय्यम भांडवली बाजारात सहभागी होतात त्या सर्वांवर सेबी (Securities and Exchange Board of India) या नियंत्रक संस्थेचे नियंत्रण असते.
रोलींग सिस्टीम सायकल
रोलींग सिस्टीममध्ये, व्यवहाराचा प्रत्येक दिवस हा व्यवहाराचा काळ समजला जातो आणि अशा दिवसात केलेले सर्व व्यवहार हे त्या दिवसाचे निव्वळ देयक (Net obligation) समजून त्या व्यवहारांची पुर्तता केली जाते. एनएसई व बीएसई वर रोलींग सिस्टीममध्ये व्यवहार टी+२ या सुत्रानुसार म्हणजेच व्यवहाराच्या दुस-या दिवशी पुरे केले जातात. पुर्तता दिवस निश्र्चित करण्यासाठी सर्व शनिवार, रविवार, सुट्ट्यांचे दिवस ज्यामध्ये बँक हॉलीडेज, एक्सचेंज हॉलीडेज इ. वगळले जातात. उदा. मंगळवारच्या व्यवहारांची पुर्तता बुधवारी व शुक्रवारच्या व्यवहारांची पुर्तता सोमवारी केली जाते.
खरेदीची मर्यादा
समजा तुम्ही काही शेअर्स एनएसई वर विकले आहात आणि त्याचे पैसे जर तुम्हाला दुस-या सेटमेंट सायकलमध्ये वापरून परत एनएसई अथवा बीएसई वर शेअर्स खरेदी करण्यासाठी वापरावयाचे असतील तर त्यासाठी तुमचा ब्रोकर तुम्हाला खरेदीची काही मर्यादा वापरण्यास देतो तिलाच खरेदीची मर्यादा म्हणतात. समजा तुम्ही तुमच्या ब्रोकरकडे रु.५००००/- तुमच्या बँक खात्याव्दारा जमा केले आहात तर ब्रोकर तुम्हाला तेवढ्याच रकमेच्या किंमतीएवढे शेअर्स खरेदी करण्याची परवानगी देईल. आता समजा सोमवारी तुम्ही रु.१,००,०००/- किंमतीचे शेअर्स विकलेत तर त्या क्षणापासून तुम्ही रु.१,५०,०००/- पर्यंतचे शेअर्स एनएसई किंवा बीएसई वर खरेदी करु शकता. आता मंगळवारी तुम्ही रु.७५,०००/- चे शेअर्स खरेदी केलेत तर शिल्लक मर्यादा राहील रु.७५,००००/- ची. म्हणजेच थोडक्यात खरेदी मर्यादा म्हणजे तुम्ही ब्रोकरकडे जमा केलेली रक्कम अधीक तुम्ही विकलेल्या शेअर्सची किंमत.
डिमटेरिअलाझेशन म्हणजे काय?
डिमटेरिअलाझेशन म्हणजेच डिमँट ज्यामध्ये गुंतवणूकदार त्याच्याकडे असणारे प्रत्यक्ष सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स,डिपॉझीटरी पार्टिसिपण्टकडे इलेक्टॉनीक स्वरुपात ठेवल्या जाणा-या प्रणालीत बदली करुन घेऊ शकतो. गुंतवणूकदार त्याच्या नांवावर असणा-या सिक्युरिटीज सर्टिफिकेट ज्या डिपॉझीटरी पार्टिसिपण्टकडे डिमटेरिअलाझेशन साठी पुर्वी नोंदवलेल्या असतात त्याच फक्त डिमँट करु शकतो.
डिपॉझीटरी
अशी एक संस्था जी गुंतवणूकदारांच्या सिक्युरिटीज इलेक्टॉनीक स्वरुपात सांभाळून ठेवीत असते तिला डिपॉझीटरी म्हणून संबोधीले जाते. म्हणूनच हिला सिक्युरिटीज बँक असेही म्हणता येईल. भारतात एनएसडिएल व सिडीएसएल अशा दोन संस्था हे काम करतात. डिपॉझीटरी प्रणाली हि बँकेप्रमाणेच काम करते फरक एवढाच असतो कि बँक तुमचे पैसे हाताळते तर डिपॉझीटरीज् तुमच्या शेअर्स व अन्य भांडवली सिक्युरिटीज हाताळत असते. जो गुंतवणूकदार या संस्थाच्या सेवेचा वापर करुन घेऊ इच्छितो त्याला या संस्थेकडे एक खाते डिपॉझीटरी पार्टीसिपंटचे मार्फत उघडावे लागते, हेच डिमँट खाते.
डिपॉझीटरी पार्टीसीपंट (डिपी)
भांडवली बाजारातील मध्यस्त ज्याच्यामार्फत गुंतवणूकदाराला डिपॉझीटरी सर्व्हिसेस घेता येतात त्याला डिपॉझीटरी पार्टीसीपंट म्हणतात. सेबीच्या नियमानुसार डिपी म्हणजे अशी संस्था जी आर्थीक सेवा देते उदा. बँक, ब्रोकर्स, कस्टोडिअनस्, इ. या डिपींच्या वितरण व्यवस्थापनाच्या माध्यमातून डिपॉझीटरीला संपुर्ण देशभर विखुरलेल्या गुंतवणूकदारांपर्यत कमी खर्चात पोहोचण्याची सुवीधा मिळते. डिपीची नियुक्ती हि अनेक बाबींची पुर्तता व सेबीच्या मान्यतेनंतर डिपॉझीटरी करत असते. यासाठी कठोर नियमाली असते. या व्यवसायाची व्याप्ती विचारात घेऊनच अनेक बँका, आर्थीक संस्था, ब्रोकर्स हे डिपी म्हणून संपुर्ण देशभर काम करत आहेत.
डिपॉझीटरी प्रणालीचे फायदे
डिमँट मधून केलेल्या व्यवहारांमुळे होणारे फायदे:
१) वाईट व्यवहाराना पुर्णत: पायबंद बसतो.
२) शेअर ट्रान्सफरच्या वेळी 0.5% स्टँप ड्युटीची बचत.
३) कुरिअर/पोस्टेजचा खर्च नाही.
४) ड्युप्लीकेट सर्टिफिकेटसाठी ब्रोकरबरोबर पाठपुरावा करण्याची गरज नाही.
५) सर्टिफकेट हरवण्याचा धोका नाही.
६) तत्काळ ट्रान्सफर होत असल्यामुळे तरलता सुलभ.
७) कमी दलाली खर्च.
८) बोनस व राईट शेअर्स डिमँट खात्यात विनाविलंब जमा होतात.
९) डिमँट स्वरुपातील शेअर्स गहाण ठेवून कर्ज घेतल्यास कमी व्याज दराचा फायदा मिळतो.
१०) जास्त कर्ज मिळते, किंमतीच्या ७५% पर्यंत विनासायास.
डिमँट खाते कसे उघडावे
बँकेत बचत खाते सुरु करण्याइतकेच डिमँट खाते उघडने सोपे व सुलभ आहे. तुम्ही कोणत्याही डिपी बरोबर खाते काढू शकता.
१) तुमच्या आवडीच्या डिपीकडे असणारा फॉर्म भरा, फोटो चिकटवा, सह्या करा.
२) डिपी बरोबरच्या करारपत्रावर, ते वाचून नंतर सह्या करा.
३) पँन कार्ड, रहाण्याचा पुरावा, बँक खाते पुरावा, फिचा चेक इ. कागदपत्रांच्या छायांकीत प्रती स्वसाक्षांकीत जोडा.
४) डिपीकडे वरीलप्रमाणे सर्व कागदपत्र जमा करा.
५) डिपी तुम्हाला ग्राहक खाते क्रमांक व डिपी आयडी प्रदान करेल ज्याची नोंद डिपॉझीटरीकडे असेल.
६) तुम्ही कितीही डिमँट खाती उघडू शकता.
७) जर तुमच्याकडे सर्टि. स्वरुपात जॉईंट नांवाने शेअर्स असतील तर त्यावर ज्या क्रमाने नांवे असतील त्याच क्रमाने डिमँट खाते उघडणे श्रेयस्कर होते.
तुमच्याकडील सर्टिफिकेट स्वरुपातील शेअर्स डिमँट कसे करावेत?
डिमटेरिअलायझेशनचा फॉर्म भरा. सोबत शेअर सर्टिफिकेटवर (Surrendered for Demat) असे लहून सोबत जोडा. १५ दिवसात तुमच्या खात्यात शेअर्स जमा होतील.
याचप्रमाणे एका डिमँट मधील शेअर्स दुस-या डिमँट मध्ये वर्ग करता येतात.
डिमँट खात्यातून व्यवहार करणे
सेबीने ७६१ कंपन्याचे शेअर्सचा व्यवहार हा डिमँटमधूनच करणे बंधनकारक केलेले आहे.
शॉर्ट सेलींग जर तुमच्या खात्यात शेअर्स नसतानाही जर तुम्ही शेअर्सची विक्री केली तर अशा व्यवहाराला शॉर्ट सेलींग असे म्हणतात. जेव्हा एखाद्या ट्रेडरला वाटते कि एक विशिष्ठ शेअरची किंमत त्या दिवशी कमी होणार आहे तर तो असे करतो, मात्र अशा व्यवहाराची पुर्तता त्याच दिवशी बाजार बंद होण्यापुर्वी करावी लागते (काही डिपी ते स्वयंचलीत प्रणालीचा वापर करुन करतात तर काही करत नाहीत मात्र नंतर अश्या व्यवहारांचा लिलाव ते करतात व ज्यात १००% तुमचे प्रचंड नुकसान होते).मी स्वत: असे व्यवहार कधीच करत नाही व तुम्ही सुध्दा हे करण्यात फारच जोखीम असते हे लक्षात ठेवावे. हा एक डे ट्रेडिंगमधला व्यवहार असून यात ९५% पेक्षा जास्त लोकांचे नुकसानच होते. तुमचा निर्णय तुम्ही घ्या.मार्जीन ट्रेडिंग वस्तुत: शेअर खरेदी करण्यासाठी तुमच्या डिमँट खात्यात पैसे शिल्लक हवेत व विक्री करण्यासाठी शेअर्स जमा हवेत. मात्र बहुतांशी ब्रोकर (डिपी) तुमच्या डिमँट खात्यात असणा-या शेअर्स अथवा रोख जमा रकमेच्या अगदी १० पटीपर्यंत किंमतीचे व्यवहार करण्याची मुभा देतात. उदा. तुमच्या खात्यात रु.एक लाख जमा आहेत तर ब्रोकर तुम्हाला १० लाख रु. किंमतीचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याची मुभा देतो. समजा अ कंपनीच्या शेअरचा भाव रु.१०००० आहे तर रु.एक लाखात तुम्ही १० शेअर्स घेऊ शकता, मात्र ब्रोकर तुम्हाला ते १०० घेण्याची परवानगी देतो. जर नंतर भाव त्याच दिवशी रु.११००० झाला तर तुम्हाला एका दिवसात तुमच्या एक लाखावर एक लाख रु. फायदा होतो, तेच भाव ९००० झाला तर संपुर्ण एक लाख रुपये नुकसान होते. या सुविधेलाच मार्जीन ट्रेडिंग असे म्हणतात.मी हि सुवीधा कधीच वापरत नाही. यात फारच मोठा धोका असतो. ९५% पेंक्षा जास्त लोकांचे अशा व्यवहारात (एकूणच डे ट्रेडिंग मध्ये) नुकसानच होते. तुमचा निर्णय तुम्ही घ्या.अमेरिकन शेअर बाजारात ह्या प्रकाराला परवानगीच नाही.ऑर्डरचे प्रकारलिमीट ऑर्डर: एक दराची मर्यादा घालून प्लेस केलेली ऑर्डर. समजा रिलायन्सच्या शेअरची आस्क किंमत रु. १०१०, परंतु तुम्हाला तो रु.१००० ला घेणे योग्य वाटत असेल तर तुम्ही रु.१००० च्या दराने लिमीट ऑर्डर नोंदवू शकता. जर त्या शेअरची किंमत १००० किंवा त्यापेक्षा कमी झाली तरच तुमच्या ऑर्डरची पुर्तता होऊन शेअर्स तुमच्या खात्यात जमा होतील. समजा त्या दिवशी रिलायन्सची किंमत रु.९९० झाली व त्यावेळी जर आस्क किंमत रु.९९४ असेल तर तुमच्या खात्यात ९९४ च्या दराने शेअर्स जमा होतील. याचप्रकारे तुम्ही विक्रीसाठीसुध्दा लिमीट ऑर्डर नोंदवू शकता. उदा. तुमच्याकडे ९९४ ने खरेदी केलेला रिलायन्सचे शेअर्स आहेत व तुम्हाला वाटते जर रु.१०१२ किंमत मिळाली तर तो विकावा, तर तुम्ही रु.१०१२ च्या लिमीट ऑर्डर नोंदवा, दर १०१२ किंवा अधीक झाला तर व्यवहार पुर्तता होईल. यालाच लिमीट ऑर्डर म्हणतात.मार्केट ऑर्डर: त्या क्षणी असणा-या दराने दिलेली खरेदी-विक्रीची ऑर्डर. अशा वेळी ऑर्डर पुर्ततेच्या क्षणी असणा-या दराने ऑर्डरची पुर्तता केली जाते. मग ती कमी अथवा जास्तसुध्दा होऊ शकते.स्टॉप लॉस ऑर्डर: यालाच ट्रिगर प्राईज ऑर्डर असेही म्हणातात, याचा उपयोग संभाव्य नुकसान मर्यादित करण्यासाठी केला जातो. याचा वापर अत्यंत हुशारीने करावा. |
सर्किट फिल्टर व ट्रेडिंग बँडस्बाजारातील चढ उतारावर (अस्थीरतेवर) मर्यादा असावी म्हणून सेबीने काही नियम केलेले आहेत व किंमतीनुसार दिवसातील कमाल व किमान दरातील फरक ठरविलेला आहे. त्यानुसार ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.१० ते रु.२० च्या दरम्याने आहे त्यांची किंमत दिवसात २५% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.१० पेक्षा आहे त्यांची किंमत दिवसात ५०% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. ज्या शेअर्स/सिक्युरिटीजचा दर रु.२० पेक्षा जास्त आहे त्यांची किंमत दिवसात ८% पर्यंतच कमी किंवा जास्त होऊ शकते. मात्र १०० निवडक शेअर्सचे बाबत ८% च्या नियम ८% व एक तासानंतर परत ८% असा शिथील केलेला आहे. या गणणेसाठी आदल्या दिवसाचा बंद भाव आधारभूत ठेवलेला आहे. एनएसई व बीएसई वरील बंद भाव वेगवेगळा असू शकतो म्हणून दोन्हीकडचे सर्किटही वेगळे असू शकते.बदलाबदला म्हणजे कशाच्यातरी बदल्यात सौदे पुढे चालू ठेवणे (Carry Forward). बदला हि एक प्रकारची सौदे पुढे चालू ठेवण्यासाठी दिलेली फि (आकार) असते. हे एक हेजींगचे माध्यम आहे ज्यामध्ये गुंतवणूकदार प्रत्यक्ष शेअर्सचा ताबा न घेता त्या शेअर्समध्ये आपला सहभाग (Position) चालू ठेवू शकतो. या साठी त्याला थोडी फि द्यावी लागते. हे झाले शेअर्सच्या खरेदीबाबत पण तेच जर का त्याला शेअर्सचे शॉर्ट सेलींग करावयाचे असेल तर त्यासाठी द्याव्या लागणा-या फिला उंधा बदला असे म्हणतात. या बदला प्रकारामुळे ३ प्रकारच्या गरजा भागवल्या जातात:१) क्वसी हेजींग: जर गुंतवणूकदाराला वाटत असेल कि एखाद्या शेअरची किंमत पुढील काही काळात वाढणार/घटणार आहे, तर अशा वेळी शेअर्स प्रत्यक्षात न घेता/देता तो या पद्धतीने व्यवहार करून अस्थीर बाजारात सहभागी होऊ शकतो.२) शेअर गहाणवट (Stock Lending): जर त्याला प्रत्यक्ष विक्रीसाठी शेअर्स नसतानासुध्दा शॉर्ट सेलींग करावयाचे असेल तर त्यासाठी काही आकार घेऊन हे करण्यास तयार असणारे शेअर्स सावकार (स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच) त्याला हि सुवीधा उपलब्ध करुन देतात.३) कर्ज व्यवहार (Financing Mechanism) : जर तुम्हाला शेअर्सची पुर्ण किंमत दिल्याशिवाय ते खरेदी करावयाचे असतील तर शेअर्स सावकार (स्टॉक एक्सचेंजच्या मार्फतच) त्याला यासाठी पैसे काही आकार (व्याज) घेऊन पुरवतात. या व्यवहाराला “व्याज बदला” किंवा “बदला” म्हणतात.हा व्यवहार समजून घेण्यासाठी आपण एक उदाहण पाहूया. क्ष या व्यक्तीने इंफोसीसचे १००० शेअर्स खरेदी केलेले आहेत मात्र त्याचा ताबा घेण्यासाठी त्याला त्याची पुर्ण किंमत देणे आवश्यक आहे परंतु क्ष कडे तेवढे पैसे खात्यात शिल्लक नाहित, अशावेळी तो शेअर बाजारात उपलब्ध असलेल्या “बदला” व्यवस्थेची सुवीधा वापरु शकतो. आता काय होते कि जी व्यक्ती क्ष ला बदला व्यवस्थेतून हा खरेदीचा व्यवहार पुर्ण करण्यासाठी पैसे देण्यास तयार असते ती व्यक्ती क्षच्या वतीने ते शेअर्स खरेदी करते आणि क्ष ला त्याने कर्जाऊ घेतलेल्या रकमेवर फक्त व्याज द्यावे लागते. याच्या उलट जर का क्ष कडे शेअर नसतानासुध्दा त्याने विक्री केलेली असेल तर त्याच्याकडे दुस-याला डिलेव्हरी देण्यासाठी शेअर्स नसतात म्हणून स्टॉक एक्सचेंज मार्फत तो ज्याच्याकडे शेअर्स असतात अश्या व्यक्तीकडून ते उधार घेतो व त्यासाठी त्याला व्याज (बदला) द्यावा लागतो. गुंतवणूकदार म्हणून तुम्ही बदला सेवा घेऊ किंवा देऊ शकता. जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही हि सेवा व्याज भरुन घेता व जर तुमच्य़ाकडे पैसे किंवा शेअर्स असतील तर व्याज (बदला) घेऊन हे सेवा तुम्ही स्टॉक एक्सचेंज मार्फत दुस-याला देऊ शकता. दर शनिवारी बीएसई मध्ये बदला व्यवस्थेसाठी एक सत्र चालते ज्यात या व्यवहारात ज्या शेअर्स/सिक्युरिटिजचे पोटी उधार व्यवहार असतात त्यांची यादी तयार केली जाते. बाजारात उपलब्ध असणा-या रोखतेवर व्याजाचे (बदल्याचे) दर ठरतात. जेव्हा बाजारात जास्त खरेदी होते तेव्हा बदला दर जास्त असतो व जेव्हा बाजारात विक्री जास्त होते तेव्हा बदला दर कमी असतो. बदला व्यवहारांसाठी फक्त ‘A’ विभागातील शेअर्स, ज्यांचा डिव्हीडंड जास्त व नियमीत मिळण्याचा पुर्वेतिहास आहे, ज्याना उच्च तरलता (Liquidity) असते, ज्यांची रोजच मोठ्या प्रमाणावर उलाढाल होते असेच ए गृपमधील शेअर्स विचारात घेतले जातात. गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळावा म्हणुन या व्यवहारांसाठी कोणते शेअर्स ग्राह्य धरले जातील हे अगोदर जाहिर केले जात नाही. या प्रकारातील सौदे पुर्ण केले जाण्याची खात्री असते व त्यासाठी ट्रेड गँरण्टी फंड ऑफ बीएसई हा निर्माण केलेला आहे, त्यामुळे अशा व्यवहारात सौदा पुर्तीची जवळपास जोखीम नसते, फक्त जर का तुमचा ब्रोकरने दिवाळखोरी जाहिर केली तरच जोखीम येऊ शकते ज्याची शक्यता जवळपास नसते. आणि जरी ब्रोकरने दिवाळखोरी जाहिर केली तरी शेअर्स तुमच्याच मालकीचे असतात ते तुम्ही केव्हाही विकू शकता, फक्त बाजाराच्या अस्थिरतेची अशा वेळी जोखीम राहिल.सिक्युरिटी लेंडिंगहि व्यवस्था एनएसईची असून हि बीएसईच्या बदल्याप्रमाणेच काम करते फक्त यात सौदे पुढे चालू ठेवण्याची मुभा नसते.इनसायडर ट्रेडिंगभारतात इनसायडर ट्रेडिंगवर बंदी आहे. जी माहिती संवेदनशील आहे व ज्यामुळे शेअरच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो व ती माहिती, माहितीच्या नियमीत स्त्रोतापेक्षा अन्य ठिकाणापेक्षा (कंपनीच्या अंतर्गत) मिळवून स्वत:च्या फायद्यासाठी कंपनीच्या पदाधीका-यानी वापरुन त्या माहितीचा उपयोग करुन शेअर ट्रेडिंग करणे याला बंदी आहे. या बाबत सेबीचे कायदे अत्यंत कडक आहेत. या बाबत अधीक माहिती सेबीच्या https://www.sebi.gov.in/ साईटवर आहे. |
- Published in Capital Market
२. अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय
प्रकरण २ रे
२. अर्थव्यवस्थापन व गुंतवणूकीचे पर्याय.
व्यक्तीगत अर्थव्यवस्थापन – काय काळजी घ्यावी?
प्रत्येक गोष्टीची सुरुवात करताना ती गोष्ट ती गोष्ट नवीनच असते हेच सुत्र गुंतवणूकीलाही लागू पडते. गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे अतीरिक्त रक्कम असणे आवश्यक आहे. कर्ज काढून कधीही गुंतवणूक करु नये. तुम्हाला जर दर महिना तुमच्या उत्पन्नापैकी काही रक्कम बचत करण्याची सवय नसेल तर तुम्ही गुंतवणूक करु शकत नाही, म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे कि खालीलप्रमाणे सवयी लावून घेणे आवश्यक आहे:१) अचानक उद्भवणा-या गरजेसाठी प्रथमत: तुम्ही तुमच्या ४ ते ५ महिन्याच्या उत्पन्नाएवढी रक्कम तुमच्या बँकेच्या बचत खात्यात किंवा म्युचुअल फंडाच्या लिक्विड योजनेत कायम शिल्लक ठेवली पाहिजे. यालाच इमर्जन्सी फंड असेही म्हणतात. या रकमेचा उपयोग कोणत्याही गुंतवणूक साधनात करु नका. हे पैसे केव्हाही उपयोगात आणण्यासाठी उपलब्ध असले पाहिजेत, म्हणूनच ते मुदत ठेवीत,शेअर्स अथवा कोणत्याही दिर्घ मुदतीच्या साधनात गुंतवू नका. ज्या बचत खात्याचे एटिएम कार्ड तुमच्याकडे असेल अशाच खात्याशी हि रक्कम निगडीत असली पाहिजे. अगदी इमर्जन्सीच्या वेळीच या रकमेचा उपयोग करा. अशी रक्कम ठेवण्याचा उद्देश एखाद्या आजारपणात होऊ शकतो, अपघात झाल्यास होऊ शकतो किंवा काही कारणाने नियमीत उत्पन्नाचे साधन काही काळ बंद झाल्यास होऊ शकतो.२) तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ३० ते ३५ टक्के रक्कम नियमीतपणे बचत करण्याची सवय लाऊन घ्या व हा नियम काटेकोरपणे पालन करा. तसेच बचतीचे प्रमाण वाढवण्याची सवय स्वत:ला लावा. जसे उत्पन्न वाढत जाईल तशी बचतही वाढवत न्या. अचानक बोनस किंवा अन्य मार्गाने पैसे मिळाल्यास त्यातील बहुतांश रकमेची बचत करा. काटकसरीची सवय लावणे यासाठी उपयुक्त होते.३) अनावश्यक खर्च टाळा. ऐश करण्याची प्रवृत्ती न ठेवणे भविष्यात फायदेशिर होते. महागड्या हॉटेलात जाणे टाळा. अशाप्रकारे पैसे वाचवून ते गुंतवणूकीसाठी वापरण्याची सवय लावा.४) तुमच्या विवाहाच्या वर्षदिनी, तुमच्या वाढदिवशी तसेच घरातील अन्य व्यक्तींचे वाढ दिवशी तुम्ही काही शेअर्स विकत घ्या हि तुमची स्वत:ला दिलेली सर्वोत्तम भेट भविष्यात उपयोगी पडणार आहे.५) एखाद्या खर्चीक प्रवासाला किंवा सहलीवर उगाचच पैसे उडवण्याऐवजी त्या पैशांचे चांगल्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या किंवा म्युचुअल फंडाच्या मल्टी कॅप योजनेत गुंतवा.६) तुम्ही अशाप्रकारे केलेल्या बचतीतून जास्त व्याज द्यावे लागणारी काही कर्जे, क्रेडिट कार्डचे देणे वगैरे प्रथमत: फेडून टाका कारण अशा प्रकारच्या कर्जावर २४ ते ३६% व्याज आकारले जाते. मी शेअर बाजारात गुंतवणूक करुन त्यातून भरपूर फायदा मिळवीन व अशी कर्जे फेडिन असे म्हणणे हा तद्दन मुर्खपणाच आहे. तेव्हा तुमच्याकडे असणारी कितीही छोटी किंवा मोठी रक्कम प्रथमत: तुमचे अतिरिक्त व जास्त व्याजाचे कर्ज फेडण्यासाठीच वापरा.७) निवृत्तीनंतर जे पैसे मिळणार असतात जसे कि पीएफ वगैरे त्या पैशाना अजिबात हात लावू नका,असे करणे म्हणजे म्हातारपण कष्टात जाणार हे लक्षात ठेवा. हे पैसे काढले तर तुमचा मालक जे तुमच्या बचतीएवढीच जी रक्कम त्यात भरत असल्यामुळे जी दिर्घ मुदतीत चांगला फायदा होण्याची संधी असते ती तुम्ही गमावून बसता. तसेच हि रक्कम जर तुम्हाला वाढीव पगार म्हणून देण्याची ऑफर आली तर ती कधीच स्विकारु नका.गुंतवणूकीचे विविध पर्याय व त्यापासून मिळणारा सरासरी परतावा.तुमच्यासमोर गुंतवणूकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, त्यापैकी योग्य तोच पर्याय तुम्ही तुमची जोखीम स्विकारण्याची मानसीक तयारी, गुंतवणूकीसाठी किती काळ देणे शक्य आहे वगैरे गोष्टी विचारात घेऊनच गुंतवणूकीचा पर्याय निवडला पाहिजे. जर शेअर बाजारातील चढ उतार तुम्ही पचवू शकता असे वाटत असेल तर शेअर्स खरेदी करा. जर तुम्ही बाजाराच्या चढ उताराला घाबरत असाल व जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीवर निश्र्चित नियमीत दराने उत्पन्न हवे असेल तर निश्र्चित उत्पन्न देणा-या साधनातच गुंतवणूक केलेली चांगले असते. मात्र एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा कि उत्पन्न व जोखीम हे हातात हात घालूनच चालत असतात म्हणजे ज्या गुंतवणूकीत जास्त जोखीम असते तेथे उत्पन्न सुध्दा जास्त मिळण्याची शक्यता असते. आता काही उपलब्ध पर्याय पाहुया: १) शेअर्स – एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेणे म्हणजेच त्या कंपनीची त्या प्रमाणात भागिदारी स्विकारण्यासारखेच असते. शेअर्स हे एक्सचेंज मार्फत तुमच्या डिमँट खात्यात विकत घेता येतात किंवा जेव्हा ती कंपनी प्रथमच भांडवली बाजारात उतरते तेव्हा आयपीओ मधूनही विकत घेता येतात. जर तुम्ही दिर्घ काळासाठी (१५/२० वर्षांसाठी) गुंतवणूकीचा विचार करत असाल तर शेअर्स खरेदी करणे अतिशय फायदेशिर होते. अशा गुंतवणूकीत बाजाराच्या चढ उताराची जोखीम असते मात्र दिर्घ मुदतीत, एकूणच अर्थव्यवस्थेत होणा-या नियमीत वाढीमध्ये हि जोखीम सामावून घेण्याची ताकद असते. अशाप्रकारे केलेल्या गुंतवणूकीतून दोन प्रकारचे लाभ मिळतात – अ) लाभांश – कंपनीला होणा-या निव्वळ नफ्यापैकी काही रक्कम भागधारकाना लाभांश स्वरुपात वाटली जाते. मिळणारा लाभांशचे मिळणारे उत्पन्न करमुक्त असते. लाभांश हा वर्षात एकदा किंवा जास्त वेळा सुध्दा वाटला जातो. ब) मुल्य वृध्दी – कंपनी जस जशी तिच्या उलाढालीच्या माध्यमातून ताकदवान होत जाते तस तसे तिच्या शेअर्सचे मुल्य वाढत जाते. हा फायदाही तुम्हाला मिळतो.सर्वसाधारणपणे दिर्घ मुदतीत आघाडिच्या भारतीय कंपन्यांचे शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणूकीवर वार्षीक सरासरी २५% च्या दरम्याने उत्पन्न मिळते. तेच जर का तुम्ही तुमचा शेअर्सचा पोर्टफोलीओचे व्यवस्थापन हुषारीने केलेत तर हेच उत्पन्न वार्षीक ४०% पर्यंत तुम्ही वाढवू शकता. यासाठी तुम्हाला योग्य वेळी बाजारातून शेअर्स खरेदी करावे लागतील तसेच अपेक्षीत नफा झाल्यावर योग्य वेळी ते तुम्हाला विकावेसुध्दा लागतील. |
२) कर्ज रोखे (बॉण्डस्): केंद्र व राज्य सरकार, महामंडळ आणि त्याप्रकारच्या संस्था भांडवल उभारणीसाठी अशा प्रकारचे कर्जरोखे बाजारात विक्रीसाठी आणत असतात. यांची मुदत हि एक वर्षापेक्षा जास्त काळाची असते व या कर्जरोख्यांवर ठरावीक दराने व्याज दिले जाते. सर्वसाधारणपणे कर्जरोख्याच्या माध्यमातून असे वचन दिले जाते कि मुद्दल अधिक ठरलेल्या वाजदराची रक्कम ठरावीक दिवशी परत करण्याची हमी दिलेली असते. काही कर्ज रोखे हे करमुक्त व्याज देतात तर काही कर्जरोख्यांवरील व्याजावर कर भरावा लागतो. भारतात कर्जरोख्यांवर मिळणारा परतावा हा साधारणपणे ८ ते १० टक्के या दरम्याने असतो, मात्र कराचा विचार केल्यास यातील गुंतवणूक जास्त फायदेशीर होते. ३) बँक ठेवी: बँक ठेवी, पोष्टाच्या ठेवी यात ठरावीक मुदतीसाठी ठरावीक व्याज दराने पैसे गुंतवता येतात. यापासून मिळणारे व्याजाचे उत्पन्न हे करपात्र असते. मिळणारे व्याज हे मुदतीनुसार ४% ते७.५०% या दरम्याने असते. मात्र कराचा विचार केल्यास हातात मिळणारे उत्पन्न कराचे दराप्रमाणे १० ते ३०% कमी होते. ४)म्युच्युअल फंड: अ) समभाग (इक्वीटी) आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि शेअर बाजारात केली जाते. गुंतवणूकीसाठी अनेक प्रकारच्या योजना विविध उदिष्ठांनुसार असतात. या योजनेत केलेल्या गुंतवणूकीत शेअरबाजाराची जोखीम असते. अशा योजना दिर्घकाळासाठी फायदेशिर असतात. दिर्घ मुदतीत १८ ते ३०% वार्षीक परतावा या योजनेतून मिळालेला आहे.आ) कर्जरोखे (डेब्ट फंड) आधारीत योजना: या प्रकारच्या योजनेतील गुंतवणूक हि प्रामुख्याने कर्जरोखे (बॉण्डस्), मनी मार्केट, सी.डी./सीपी या साधनात केली जाते. शेअर बाजाराची जोखीम नसते मात्र व्याज दर बदलाची व पत बदलाची थोडी जोखीम असते. अल्प काळासाठी व दिर्घ काळासाठी वेगवेगळ्या योजना असताता. सरासरी परतावा ७% ते १०% वार्षीक मिळतो. |
५) रोख स्वरुपातील: यामध्ये उच्च तरलता असते. ट्रेझरी बिल, मनी मार्केट फंड, लिक्वीड फंड हे प्रकार यात मोडतात. सरासरी परतावा ७% मिळतो. पैसे केव्हाही काढता येतात हा यातील फायदा असतो. ६) जमिन-जुमला: जागा जमिनीत गुंतवलेल्या पैशावरही दिर्घ मुदतीत चांगला परतावा मिळतो मात्र गुंतवणूक कोणत्या ठिकाणी केली आहे यानुसार परतावा ठरतो. या गुंतवणूकीची एक मर्यादा म्हणजे रोखीकरण हवे तेव्हा करता येत नाही कारण विकत घेणारा उपलब्ध असणे आवश्यक असते, यामुळेच यातील गुंतवणूक लिक्विड (तरल) नसते. ७) सोने: मुख्यत्वेकरुन हि भावनीक गुंतवणूक आहे, गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे कि नाही याबाबत वेगवेगळे मत-प्रवाह आहेत. ८) अन्य पर्याय: कमोडिटीज्, जुन्या वस्तू, परदेशी चलन इ. |
- Published in Capital Market
शेअर ट्रेडिंग मधून फायदा कसा मिळवावा?
शेअर ट्रेडिंग मधून फायदा कसा मिळवावा?
शेअर बाजारात ट्रेडिंग करून अल्प, मध्यम किंवा दीर्घ मुदतीत फायदा मिळवून जास्तीच्या खर्चाला हातभार लावावा किंवा तो फायदा दीर्घ मुदतीसाठी गुंतवून संपत्ती निर्माण करावी असे वाटते काय.. जर तुम्हाला खरोखर असे वाटत असेल तर या पानावरील माहिती शांतपणे वाचून घ्या, समजून घ्या.
प्रश्न – १: शेअर बाजारात ट्रेडिंग करून किती लोकांना फायदा होतो?
उत्तर: तुमच्या आजूबाजूचे बहुतांशी लोक तुम्हाला सांगतील कि शेअर बाजार म्हणजे एक जुगार आहे. यातून पैसे मिळत नाहीत तर जातात म्हणजेच नुकसान होते. शेअर बाजारात ट्रेडिंग करणार्यांपैकी बहुतांशी लोकांना नुकसानच होते कारण ते चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या वेळी व कोणाच्या तरी सांगण्यावरून शेअर बाजारात उडी घेतात, कोणत्यातरी माहित नसलेल्या कंपनीचा शेअर विकत घेतात, त्याचा भाव गडगडला कि विकून बाहेर पडतात व नुकसान सोसतात आणि मग त्याची दुषणे शेअर बाजाराला देतात. अनेक सर्व्हे असे दाखवतात कि जेव्हा बाजारात पूर्ण तेजी असते व जेव्हा तो उच्चतम पातळीवर असतो त्यावेळी बहुतांशी लोकं बाजारात गुंतवणूक करतात. तेजी नंतर मंदी व मंदी नंतर तेजी अशी आवर्तने सदैव बाजारात चालू असतात. सर्वसाधारणपणे बाजारात नेहमीच चढ उतार हे असतातच, आणि ते तसे असतात म्हणूनच तर ट्रेडिंग करून फायदा मिळवता येतो. एका सर्व्हेक्षणानुसार असे सिद्ध झालेले आहे कि गेल्या पन्नास वर्षात बाजारात तेजीचा कालखंड हा साधारणपणे ३ ते ५ वर्षे टिकून असतो, अशा सततच्या तेजीचे कालखंडा नंतर मंदी हि येतेच मात्र अशा मंदीचा सरासरी कालखंड हा ९ महिने एवढाच असतो. खरे पाहता अशी मंदी म्हणजे अल्प काळात उत्तम नफा मिळवण्याची संधी असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बाजारात जेव्हा मंदीचा कालखंड संपून परत तेजीचा कालखंड सुरु होतो तेव्हा बाजार मागील तेजीतील उच्चतम पातळी ओलांडून एक नवीन उच्चतम पातळी तयार करत असतो असा इतिहास आहे.
वरील गोष्ट समजून घेण्यासाठी आता आपण BSE सेन्सेक्स मधील काही महत्वाचे चढ उतार समजून घेऊया. सेन्सेक्स १९७९ साली सुरु झाला व तो आज दि. १८ ऑक्टोबर २०१७ ला ३२५८४ एवढा आहे म्हणजेच जर का तुम्ही १९७९ साली रुपये १०० सेन्सेक्स मध्ये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य रु.३२,५८४/- एवढे झाले असते. परंतु या कालखंडात तो सतत वरच गेला आहे का? याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. १९९२ साली सेन्सेक्स ने त्यावेळची उच्चतम पातळी ४५०० गाठली, त्यानंतर हर्षद मेहता चा घोटाळा उघड झाला व सेन्सेक्स १५०० पर्यंत खाली आला, हि बाजारातील पहिली मोठी तेजी मंदी. यानंतर २००० साली त्याने मागील उच्चतम पातळी तोडून ६३०० ची उच्चतम पातळी त्याने तयार केली,यानंतर आय.टी. बबल फुटला आणि तो २१०० पर्यंत खाली आला. हि दुसरी मोठी तेजी मंदी. यानंतर जानेवारी २००८ मध्ये सेन्सेक्स ने मागील उच्चतम पातळी ओलांडून २१२३२ ची नवीन उच्चतम पातळी निर्माण केली. यानंतर अमेरिकेत सब-प्राईम घोटाळा बाहेर पडला, तिकडे अनेक आर्थिक संस्था, बँका अडचणीत आल्या, त्यातील काही बुडाल्या व सेन्सेक्स मार्च २००९ मध्ये ७६०० च्या नीचतम पातळीवर येऊन पोहोचला,पुढे ८ महिन्यातच तो परत १८००० पार करून गेला, २०१३ मध्ये परत तेजी सुरु झाली व २०१४-१५ मध्ये त्याने ३०००० ची उच्चतम पातळी पार केली. २०१५-१६ मध्ये चीन मध्ये आर्थिक संकट आले त्याच्या परिणाम स्वरूप बाजार २०००० पर्यंत खाली आला व सध्या तो ३२५८४ च्या जवळ आहे.
मात्र खरे पाहता बाजाराची मुलतत्वे वापरून जर का तुम्ही गुंतवणूक/ट्रेडिंग केले तर निश्चितच चांगला फायदा होऊ शकतो. फ्युचर्स, ऑप्शन,इंट्रा दे यांचे नादी लागला नाहीत, चांगल्या मोठ्या नामांकित कंपन्यांचे शेअर्सची किंमत जेव्हा खाली येते तेव्हा ते जर का तुम्ही खरेदी केले व ते वाढल्यावरच विकावयाचे असे धोरण ठेवले तरच तुम्हाला निश्चित व चांगला नफा होऊ शकतो. यासाठी सर्वात महत्वाचे आहे स्वत:चे निर्णयावर ठाम राहणे, विश्वास ठेवणे व संयम पाळणे.
अर्थशास्त्राचा एक नियम आहे ज्या वस्तूची किंमत वाढते ती कालांतराने कमी होते व ज्या वस्तूची किंमत कमी होते ती कालांतराने वाढतेच,जगात सारे काही किंमतीतील चढ उतार हे मागणी व पुरवठा या न्यायाने होत असतात. जेव्हा उपलब्धता कमी होऊन मागणी वाढते तेव्हा किंमत वाढते व जेव्हा उपलब्धता भरपूर होते, सारेच लोक विकावयास लागतात तेव्हा साहजिकच मागणी कमी होते व किंमतही कमी होते. म्हणून तर काधीतरी कांदा १० रुपये किलो असतो तर कधी तो १०० रुपये किलोने विकला जातो. हेच सूत्र शेअर बाजारालाही लागू पडते.अर्थशास्त्राचा हा नियम शेअर बाजाराला व मुख्यत्वे करून मोठ्या कंपन्यांना तंतोतंत लागू पडतो.
जेव्हा जेव्हा एखादा शेअर त्याचे वर्षातील नीचतम पातळीच्या जवळ येतो तेव्हा तो त्या पातळीपासून १०% ते २०% या रेंज मध्ये अनेक वेळा वर खाली होत असतो, हि वेळ शेअर्स ट्रेडिंग करून पैसे मिळवण्यासाठी चांगली होऊ शकते.
ट्रेडिंग करताना किती कालावधीसाठी गुंतवणूक करणार आहोत हे महत्वाचे असते:
अल्पकालीन दृष्टिकोन: हा साधारणपणे एक आठवडा ते ३ महिने असावा, या काळात शेअर निवडताना टेक्नीकल, सध्याचा ट्रेंड व फंडामेंटल यांचा एकत्रित विचार करून तो शेअर खरेदी करावा आणि त्याचे किंमतीत ट्रेंड प्रमाणे ३% ते १५% या दरम्याने नफा झाला असताना तो विकून टाकावा. जर तो या काळात सतत वाढत असेल तर, विकण्याची घाई न करता जास्तीत जास्त नफा मिळवून घ्यावा. जर तो जास्तच व्होलाटाईल असेल तर कमी फायद्यात ३ ते ५% बाहेर पडावे व दुसरी संधी पहावी.
मध्यम कालीन दृष्टीकोन: हा साधारणपणे एक महिना ते सहा महिने एवढा असावा. या काळात शेअर निवडताना टेक्नीकल, सध्याचा ट्रेंड व फंडामेंटल यांचा एकत्रित विचार करून तो शेअर खरेदी करावा आणि त्याचे किंमतीत ट्रेंड प्रमाणे ८% ते २०% या दरम्याने नफा झाला असताना तो विकून टाकावा. जर तो या काळात सतत वाढत असेल तर, विकण्याची घाई न करता जास्तीत जास्त नफा मिळवून घ्यावा. जर तो जास्तच व्होलाटाईल असेल तर कमी फायद्यात ३ ते ५% बाहेर पडावे व दुसरी संधी पहावी.
दीर्घकालीन दृष्टीकोन: हा साधारणपणे ६ महिने ते एक वर्ष किंवा जास्तच असू शकतो. या कालावधीत नफ्याची अपेक्षा १०% ते २५% एवढी असावी.
जर आपण घेतलेला शेअरची किंमत कमी होत असेल तर ती १०% कमी होईपर्यंत काहीच करू नये मात्र जर ती १०% पेक्षा जास्त खाली आली तर परत तेव्हढेच शेअर खरेदी करून सरासरी करावी. नॉर्मल कोर्स मध्ये अशी सरासरी एक ते दोन वेळाच करावी लागते, नंतर नफ्यात विकण्याची संधी मिळते ती मात्र सोडू नये.
शेअर निवडताना कंपनीची पूर्ण माहिती मिळवावी चांगला व्यवसाय करणारी, सातत्यपूर्ण नफा मिळवणारी, पहिल्या १०० मधील कंपनी शक्यतो निवडावी, EPS, P/E हे अवश्य पाहावेत.
वरीलप्रमाणे पथ्य पाळल्यास तुम्हाला निश्चितच चांगला नफा वर्षोनुवर्षे नियमितपणे मिळू सकतो. मात्र ८ ते १० वर्षात जेव्हा मोठी मंदी येते तेव्हा तुम्हाला कदाचित एक ते दीड वर्षे नफ्यात येण्यासाठी थांबावे लागू शकते हे विसरू नये, अशा मंदीचे कालखंडात सतत जास्तीची खरेदी करून सरासरी करत राहावे, तुम्हाला संधी हि मिळणारच आहे.
जर तुमची ३ ते ५ वर्षे थांबण्याची तयारी असेल तर ज्या चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सची किंमत ५०% ते ६०% कमी झालेली असेल ते शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकता असे शेअर्स तुम्हाला ३ ते ५ वर्षात २०० ते ३००% सुद्धा फायदा मिळवून देऊ शकतात. सध्या अनेक फार्मा कंपन्यांच्या शेअर्सचे भाव असे खाली आलेले आहेत. उदा. सन फार्मा या दिग्गज औषधी कंपनीचा शेअर वर्ष दोन वर्षापूर्वी १२०० पेक्षा जास्त होता, सध्या तो ५४० च्या आसपास आहे, १४ ऑगस्ट २०१७ ला तर तो ४३२ पर्यंत खाली आला होता. याला यु.एस.एफ.डी.ए., इ. अनेक कारणे असतात. पण हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही असे शेअर्स खरेदी केले पाहिजेत व ते वाढण्याची वाट पहिली पाहिजे तर तुम्हाला अतिशय चांगला फायदा मध्यम मुदतीत मिळत असतो.
बाजारात तेजीवाले व मंदीवाले असे दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात, जेव्हा मोठी तेजी असते तेव्हा तेजीवाले सतत ओरडत राहतात कि बाजार आणखीन वर जाणार आहे खरेदी करा, पैसे मिळवा, तर बाजारात जेव्हा मोठी मंदी असते तेव्हा मंदीवाले सतत ओरडत राहतात कि बाजार आणखीन खाली जाणार आहे विकून टाका, बाहेर पडा. खरे म्हणजे ते तुम्हाला उल्लू बनवत असतात व स्वत: पैसे मिळवत असतात. शहाणे व्हा पैसे निश्चित मिळतील.
- Published in Capital Market
गुंतवणूकीचे साधे नियम
गुंतवणूकीचे साधे नियम
गुंतवणूक म्हटले म्हणजे काही तरी किचकट प्रकार आहे असा समज आपण उगाचच करुन घेतो. साधे व सोपे नियम पाळले तर हिच गोष्ट फारच सोपी आहे हे समजून येईल. साधी गोष्ट हि आहे कि गुंतवणूकीचे साधे व सोपे नियम पाळून कोणतीही व्यक्ती चांगला गुंतवणूकदार होऊ शकते, ज्यामुळे मोठ्या चुकासुध्दा टाळता येतात. येथे मी तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठीचे साधे व सोपे नियम सांगणार आहे.प्रथमत: प्लान तयार करा:प्रथमतः तुमच्या जोखीम घेण्याच्या तयारीनुसारच तुमच्या गुंतवणुकीचे नियोजन करा. गुंतवलेल्या रकमेपैकी जी रक्कमतुम्हाला पुढील २ ते ३ वर्षात लागणार असेल अशी रक्कम म्युच्युअल फंडाच्या लिक्वीड, मनी मार्केट, फ्लोटींग इंटरेस्ट रेट अथवा अल्प मुदतीच्या बॉण्ड मध्ये गुंतवा. जर तुम्ही या पुर्वी अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची गुंतवणूक जास्त जोखमीच्या योजनेत केलेली असेल व जर ती फायद्यात असेल तर अथवा ती फायद्यात येताच रक्कम काढून घ्या व वर सांगितलेल्या योजनेपैकी योग्य त्या योजनेत गुंतवा. हे सांगावयाची गरज नाही कि बाजाराचा निचांक काय असेल अथवा उच्चांक काय असणार आहे याचे ठोकताळे बांधत बसू नका. प्रथमत: हे लक्षात ठेवा कि अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम सुरक्षीत ठेवण्याला प्राधान्य द्या. तुमच्या दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतच गुंतवणूक करा. यासाठी, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, संतुलित (Balanced Schemes and Balanced Advantage Fund) व इक्विटी सेव्हिंग्ज स्कीम अशा प्रकारच्या योजना उपलब्ध आहेत, योग्य योजनेची निवड करण्यासाठी तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. म्युचुअल फंड किंवा शेअरबाजारात गुंतवणूक करतना नेहमीच गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला महत्वपूर्ण असतो कारण तो त्याच्या अनुभवाचा वापर करून तुम्हाला सल्ला देत असतो.साधी गोष्ट:दिर्घ मुदतीच्या उदिष्टांसाठी समभाग योजनेतच गुंतवणूक करा व त्यासाठी डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेची (शक्यतो लार्ज कँप किंवा लार्ज अँड मिड कँप फंड योजना) निवड करा. अल्प मुदतीच्या उदिष्टांकरीताची रक्कम फ्लोटींग रेट बॉण्ड फंड योजनेत गुंतवा. हे गुंतवणूकीचे मुळ नियम आहेत ते काटेकोरपणे पाळणेच तुमच्या हिताचे असते. तुमच्यासमोर गुंतवणूकीचे बरेच काही पर्याय उपलब्ध आहेत अथवा ते तुम्हाला सांगीतले जातील, जसे कि पेट्रो फंड, एमएनसी फंड, गिल्ट इ. स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजना असतात व त्यात गैर कहिही नाही. परंतु नविन गुंतवणूकदाराने चांगल्या म्युच्युअल फंड हाऊसच्या डायव्हर्सीफाईड इक्वीटी योजनेतच गुंतवणूक करण्याचा साधा नियम पाळावा. दिर्घ मुदतीत अशा योजना अत्यंत फायदेशीर होतात. जर एखाद्या तिमाहीत २५% पेक्षा जास्त नुकसान सहन करण्याची तुमची तयारी नसेल तर स्पेशँलीटी अथवा सेक्टोरल फंडाच्या योजनांपासून दुर रहाणेच शहाणपणाचे असते.हॉट स्टॉक व फंड योजना टाळा:जर तुम्ही या वर्षातील सर्वात चांगली कामगिरी करणा-या म्युच्युअल फंड योजनेत व समभागात गुंतवणूक केली असेल तर पुढिल वर्षी त्याच्या निचांकी कामगिरीची तयारी ठेवा. कारण साधा नियम लक्षात ठेवा ज्या गोष्टीची किंमत वर जाते ती खाली येणारच. यासाठीच Reversion to the Mean (परत मध्य गाठलाच जातो) हा नियम आहे.नियमित गुंतवणूक करत रहा:आपल्या गुंतवणूक करण्याच्या क्षमतेनुसार कमी अथवा जास्त रक्कम दर महा ठरावीक तारखेला गुंतवत रहाणे हाच जोखीम कमी करण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण बाजार उच्चांकी असताना गुंतवणूक करण्याचे या प्रकारेच टाळू शकता. शिवाय अशी सर्वकालीन शहाणी व हुशार व्यक्ती शोधूनही सापडणार नाही कि जी बाजाराचा कल, तेजीचा किंवा मंदीचा कालावधी (timing) बरोबर साधू शकेल.गुंतवणूक करा पण विकू नका:अल्प काळासाठी (वरचेवर) केलेले व्यवहार (trading) हे गुंतवणूकदारापेंक्षा फक्त ब्रोकरलाच श्रीमंत करतात. तसेच हि प्रवृत्ती आयकर विभागालाही आवडते. जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटलात, कि जो असे सांगतो आहे कि मी अल्प काळाचे व्यवहार (trading) करुन भरपूर पैसे मिळवले आहेत, व तुम्ही याबाबत त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलात तर मनाची तयारी ठेवा कि लवकरच तो या विषयावार बोलण्याचे टाळून दुस-याच एखाद्या विषयाला महत्व देऊ लागेल व ते तुम्हाला ऐकून घ्यावे लागेल. म्हणून साधा नियम पाळा कि फंडात अथवा स्टॉक मध्ये नियमीत गुंतवणूक करत रहा व ती विसरुन जा. यालाच म्हणतात Buy and Hold.टिपवर विश्वास ठेवून गुंतवणूक करु नका:कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्यातरी योजनेत गुंतवणूक करू नका. अनुभवी गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याप्रमाणेच गुंतवणूक कारणे तुम्हाला फायदेशीर होईल.जास्त व्याजाच्या मोहाला बळी पडू नका:जास्त व्याचाचे आमिष आहे म्हणून सहकारी पतसंस्था वगैरे ठिकाणी गुंतवणूक करू नका, कारण यातील एखादा संचालक जरी लबाडी करणारा निघाला तरी अशी संस्था बुडू शकते व तुमचे पैसेही बुडण्याची शक्यता असते.MLM, भीशी, चीट फंड इ. योजनांपासून दूर रहा:अशाप्रकारच्या योजनेतून फक्त सुरुवातीच्या लोकांनाच फायदा मिळतो व नंतर सामील होणाऱ्या सर्वच लोकांना नुकसान सोसावे लागते म्हणून अशा योजना जरी तुमचा जवळचा मित्र किंवा अगदी नातेवाईक घेऊन आला तरी त्याला नाही म्हणायला शिका हाच भविष्यात होणाऱ्या नुकसानीला टाळण्याचा एकच मार्ग आहे. एक लक्षात ठेवा जगात अशी कोणतीही योजना नसते कि जी तुम्हाला अल्प काळात श्रीमंत बनवू शकेल.शेअर बाजारातील डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग आदी मोहांपासून दूर रहा.डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून झटपट पैसे मिळवण्याचे आमिष दाखवले जाते पण एक लक्षात ठेवा कि हा एक प्रकारचा सरकारमान्य जुगारच आहे व जुगार खेळून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही, जुगार चालवणारा मात्र श्रीमंत होतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. डे-ट्रेडिंग, वायदेबाजार, कमोडीटी ट्रेडिंग यातून कधीतरी अल्प काळात भरपूर फायदा होऊ शकतो मात्र तो एकदा का मिळाला कि याचे एकप्रकारे व्यसनच लागते, जे सुटता सुटत नाही व मग यात मिळालेला फायदा तर जातोच परत मुद्दलहि जाते, येथे लाखाचे बारा हजार होणे हि म्हण तंतोतंत लागू पडते.लवकर सुरुवात करा:एक गोष्ट कायम लक्षात ठेवा कि शेअर बाजारातून फक्त दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारालाच उत्तम प्रकारचा फायदा हमखासपणे मिळत असतो म्हणून गुंतवणूकदार व्हा, ट्रेडर होऊ नका. सर्वसामान्य माणसासाठी म्युचुअल फंड हे शेअरबाजारात गुंतवणूक करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे.शेअरबाजारात गुंतवणूक करण्यासाठी वेळ महत्वाची नसून तुम्ही किती काळ नियमीत गुंतवणूक करत रहाता हे महत्वाचे असते. नियमितपणे गुंतवणूक केल्यामुळे सरासरीचा फायदा होतो. चक्रवाढीची ताकद हि एक जादूच आहे असे समजा, यामुळे तुम्ही गुंतवलेली रक्कम दीर्घ काळानंतर अत्यंत वेगाने वाढू लागते हे लक्षात ठेवा. म्युच्युअल फंडाच्या समभाग योजनेतील गुंतवणूक हि नियमीतपणे व दिर्घ मुदतीसाठीच करत रहावयास हवी. गुंतवणूक करतानाच काळजी घ्या, तुमची उदिष्ठ लक्षात ठेवा, तुमच्या जोखीम स्विकारण्याच्या क्षमतेचे पुन:रअवलोकन करा, आणि महत्वाचे म्हणजे रोजच्या रोज शेअर बाजारावर केल्या जाणा-या टीका टिपणीला फार महत्व देऊ नका. तुमच्या भावना काबूत ठेवावयास शिकले पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे त्यावर ठाम रहा. म्हणूनच जर तुम्ही अजून गुंतवणूकीला सुरुवात केली नसेल तर लगेचच वेळ फुकट न घालवता सुरुवात करा. |
विमा हि गुंतवणूक नाही:
एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे कि जीवन विमा व गुंतवणूक हे पूर्णतः स्वतंत्र विषय आहेत याची गल्लत करू नका. विमा अत्यावश्यकच आहे परंतु तो गुंतवणूक म्हणून समजू नका. विमा फक्त टर्म इन्शुरन्स या प्रकारचाच घेतला पाहिजे.
देशात विमा व्यवसायाचे खाजगीकरण झाल्यापासून अनेक विमा कंपन्या अस्तित्वात आल्या असून त्यांनी जागोजागी त्यांच्या शाखा उघडलेल्या आहेत. सर्वच विमा कंपन्यांनी युनिट लिंक्ड इन्शुअरन्स प्लॅन अर्थात युलिप हे प्रॉडक्ट बाजारात आणलेली आहेत. अशी केलेली गुंतवणूक किमान ५ वर्ष पुर्ण झाल्याशिवाय काढता येत नाही, तसेच दर वर्षी किमान ५ वर्ष हप्ते भरावे लागतात. असेच अशा योजनेत अनेक प्रकारचे चार्जेस असतात ते समजून घेतलेत तर तुम्ही यात कधीही गुंतवणूक करणार नाही. कारण हे चार्जेस सारा फायदा खाऊन टाकतात. यातील चार्जेसवसुलीसाठी तुमची युनिट्स कमी होतात.
म्युच्युअल फंडात मात्र केव्हाही गुंतवणूक करता येते व केव्हाही काढता येते. तसेच गुंतवलेली संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. यातील सर्वमिळून चार्जेस हे २.५% पेक्षा जास्त नसतात. युनिट्स पैसे काढल्याशिवाय कधीही कमी होत नाहीत. गरजेचेवेळी ५ दिवसात खात्यात पैसे जमा होतात.फक्त फायद्यात असताना गुंतवणूक काढण्याचे पथ्थ पाळणे हिताचे असते.
जर आपला अकाली मृत्यू झाला तर आपल्या पश्चात आपल्या प्रियजनांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विमा हा प्रत्येकालाच अत्यावश्यक आहे. मात्र तो टर्म इन्शुअरन्स स्वरूपात घेणे हे फायदेशीर असते. टर्म इन्शुअरन्समध्ये ३० वर्षे वयाच्या व्यक्तीला वार्षिक रु.७५०० मध्ये रु.५० लाखाचा विमा मिळतो. असा टर्म इन्शुअरन्स घेऊन बाकी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवणे हेच ग्राहकाच्या हिताचे असते. म्युच्युअल फंड व टर्म इंशुरन्स चे एकत्रीकरण करुन विमा संरक्षण व गुंतवणूक वृध्दी असे उदिष्ट साध्य करता येऊ शकते व तेच फायदेशीर असते.
कोणतीही गुंतवणूक जर दीर्घ काळासाठी केली तर चक्रवाढ पद्धतीने मिळणाऱ्या व्याजाचा जास्तीत जास्त फायदा मिळतो. म्युचुअल फंडाच्या अनेक योजनांनी गेल्या २५ वर्षात सरासरी २०% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिलेला आहे, म्हणूनच काही योजनेत १९९५/९६ सालात ज्यांनी रु.१ लाख रुपयांची गुंतवणूक केलेली होती त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य रु.५० लाख ते रु.१ कोटी ३५ लाख इतके झालेले आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी गेले २५ वर्षे नियमित दर महा रु.५००० एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांची आजपर्यंत एकूण गुंतवणूक रु.१५ लाख इतकी झालेली आहे मात्र त्या गुंतवणुकीचे आजचे मूल्य सुमारे रु.३ कोटी ५० लाख इतके झालेले आहे. म्हणून गुंतवणूक करताना दीर्घ कालीनच विचार केला पाहिजे. बाजारात तेजी नंतर मंदी व मंदी नंतर परत तेजी हि आवर्तने चालूच असतात. मात्र शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीत दीर्घ काळात तेजी मंदीवर मात करून उत्तम परतावा देण्याची ताकद असते हे लक्षात ठेवले पाहिजे.
तुम्हाला जर आयकर कलम ८०-सी चा फायदा मिळण्यासाठी गुंतवणूक करावयाची असेल तर जीवन विमा, ५ वर्षांची बँक ठेव, पी.पी.एफ. याचेपेक्षा म्युचुअल फंडाच्या Equity Savings Schemes चा आपण विचार केला पाहिजे कारण यातून जास्त परतावा तर मिळतोच परत तीन वर्षे पूर्ण झाल्यावर पैसे काढण्याची सुविधासुद्धा उपलब्ध असते.
- Published in Articles
भविष्याची तरतुद
भविष्याची तरतूद:
भविष्याची तरतूद करण्यास म्युच्युअल फंडात नियमित व दीर्घकाळ गुंतवणूक करीत राहणे हाच एक उत्तम पर्याय आहे. लवकरात लवकर निर्णय घेऊन ताबडतोब सुरुवात करा.
तरुणपणात मौज मजेसाठी खर्च करण्याची मनोवृत्ती असतेच त्यात काही चूक आहे असं आम्ही म्हणत नाही मात्र थोडीशी काटकसर करून व अनावश्यक खर्चात थोडी कपात करून तुम्ही जर म्युच्युअल फंडात नियमितपणे गुंतवणूक केलीत तर तुमच्या अचानक उद्भवणा-या गरजांना या बचतीचा उपयोगच होईल.
बाजाराचे पुढील अगदी पांच वर्षांचेसुद्धा भविष्य कोणीच करू शकत नाही. जो कोणी असे सांगतो तो कदाचित जास्त आशावादी असेल. बाजारात गुंतवणूक करताना ती नियमितपणे व काही दशकांसाठी करत रहाण्याराला मात्र उत्तमोत्तम परतावा मिळतो. गुंतवणूक करताना शक्यतो वर्षांचा विचार करू नका, किमान एक दशकाचा व शक्यतो दोन/तीन दश्कांचाच विचार करा. तुम्ही जर नोकरी करत असाल तर जेवढी वर्षे तुम्हाला निवृत्त होण्यासाठी असतील तेवढी वर्षे नियमित गुंतवणूक करत रहा. जर वार्षिक २०% पेक्षा चाक्रवाढीने फायदा झालेला असेल तर त्यातली काही रक्कम काढून आपल्या गरजा, हौस/मौज जरूर पूर्ण करा.
- Published in Articles
गुंतवणूक कशी करावी?
सध्याचे परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करावी?
जर आपण अवलोकन केले तर असे दिसून येते कि गेल्या दिड वर्षात सेन्सेक्स १८००० पासून जवळपास २९००० पर्यत वर गेलेला आहे अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यात काय फायदा असा विचार अनेकांच्या मनात येत असतो. बाजार १५ हजार असताना गुंतवणूक केली असती तर बरे झाले असते मग गुंतवणूक यात करावी कि नाही असे वाटणे सहाजीकच आहे. पण ज्याना दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यानी ती केव्हाही सुरु करावी असा नियम आहे.
अर्थशास्त्राच्या नियमानुसार कोणत्याही वस्तुची किंमत जेव्हा वर जाते तेव्हा ती परत खाली येतेच व परत जेव्हा खाली येते तेव्हा ती नंतर परत वर जातेच. जेव्हा सर्वच लोकांना एखादी वस्तू काहि कारणाने महाग होईल असे वाटू लागते तेव्हा बरेच लोकं ती वस्तू खरेदी करण्यासाठी उताविळ होतात व त्या वस्तूची किंमत वाढू लागते या उलट जेव्हा सर्वानाच वाटू लागते कि आता आपणाजवळ असणारी वस्तूची किंमत कमी होणार आहे व ते सारेच ती विकण्याच्या मागे लागतात व किंमत कमी होऊ लागते. अर्थशास्त्राचा दुसरा नियम हा वस्तूची किंमत हि वस्तूच्या मागणी व उपलब्धतेवर अवलंबून असते, जेव्हा बाजारात एखाद्या वस्तुची उपलब्धता कमी असते व तिची मागणी जास्त असते तेव्हा तीची किंमत वाढते व उपलब्धता जास्त झाली व मागणी कमी झाली कि किंमत कमी होते. हे चक्र अव्याहतपणे चालूच असते, आणि म्हणूनच शेअर बाजारातही कधी तेजी असते तर कधी मंदी असते. मात्र कधीही कायम तेजी अथवा मंदी रहात नाही, राहूच शकत नाही. मात्र सध्या जर आपणास एक रकमी गुंतवणूक करावयाची असेल तर आपण ती रक्कम म्युच्युअल फंडाच्या–लिक्वीड योजनेत गुंतवावी (या योजनेतील गुंतवणूक हि प्रामुख्याने ९० दिवसांचे निश्र्चित उत्पन्न देणा-या गुंतवणूक साधनात केली जात असते) –
या योजनेत सध्या व्याजदर चढे असल्यामुळे वार्षीक सरासरी ८.५% ते ९% च्या दरम्याने परतावा मिळत आहे व तेथून एसटीपी (सिस्टीमँटीक ट्रान्सफर प्लान) व्दारे डायव्हर्सिफाईड इक्वीटी योजनेत साप्ताहीक तत्वावर वर्ग करण्याचा पर्याय निवडावा, मुदत साधारणपणे ३ ते ५ वर्षाची असावी. याचा फायदा असा होतो कि लिक्वीड फंड योजनेतील गुंतवणूकीवर तुम्हाला ८.५०% ते ९% दराने परतावा मिळत राहील व एसटिपीव्दारे बाजाराच्या सर्वच स्तरावर तुमची गुंतवणूक होत राहिल्यामुळे दिर्घ मुदती तुम्हाला फारच आकर्षक परतावा मिळू शकेल.
दुसरे म्हणजे या परिस्थितीत एसआयपी (सिस्टिमँटीक इंन्व्हेस्टमेंट प्लान) माध्यमातून दर महा ठरावीक तारखेला दिर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करत रहाणे, यातही तुम्ही साप्ताहिक गुंतवणूकीचा पर्याय निवडू शकता. तुमच्या बँकेच्या बचत खात्यात पैसे शिल्लक ठेवलेत कि झाले. तुमच्या मासिक उत्पन्नातील काही भाग तुम्ही या प्रकारे गुंतवून जेव्हा बाजारात परत तेजी येईल तेव्हा आकर्षक परतावा मिळवू शकाल.
थोडक्यात नियमीत गुंतवणूक, दिर्घ मुदत, थोडा संयम व आपल्या गुंतवणूकीच्या निर्णयाची ठामपणे अंमलबजावणी याव्दारे तुम्ही भविष्यात चांगले उत्पन्न मिळवू शकाल.
तुमच्या गरजेप्रमाणे सर्वप्रकारच्या योजनाम्युच्युअल फंडात असतात. समभाग आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम असते तर कर्ज रोखे आधारित योजनेत शेअर बाजाराची जोखीम नसते मात्र व्याजाचे चढ उताराची व पत मानांकनाची जोखीम असते, मात्र हि जोखीम लिक्विड फंड योजनेत सर्वात कमी, म्हणजे नाहीचे बरोबरच, असते. म्युचुअल फंड योजनेत केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन तज्ञ फंड मॅनेजर्स करत असतात हा सर्वात मोठा फायदा असतो.
- Published in About Mutual Fund
- 1
- 2