टॅक्स सेव्हिंग योजनेचे फायदेच फायदे
जर तुम्हाला आयकर कलम ८०-सी अंतर्गत, रु.१.५० लाखापर्यंत गुंतवणूक करुन करबचत करावयाची असेल, तर म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत गुंतवणूक करावी. हे करणे अन्य सर्व आयकर कलम ८०-सी खालील गुंतवणूक पर्यायांपेक्षा खूपच फायदेशीर असते, ते कसे ते आता समजून घेऊया.
भारतीय करकायद्या अंतर्गत करबचतीसाठी अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. असे असुनही फारच थोडया व्यक्ती उपलब्ध असणा-या सर्व पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करुन त्यांच्या करबचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. ब-याचश्या व्यक्ती करबचतीसाठी कोणताही विचार न करता कोणत्यातरी दीर्घ मुदतीच्या साधनात पैसे गुंतवण्याऐवजी खरे म्हणजे अडकवत असतात.महागाईचा विचार केल्यास अशा साधनातून काहीच फायदा हाती लागत नाही. जेव्हा हे पैसे त्याच्या हातात परत मिळतात, तेव्हा त्यापैशांची खरेदीची क्षमता नगण्य झालेली असते.
उदा. जेव्हा तुम्ही करबचतीसाठी एखादी विमा योजना विकत घेता, तेव्हा त्यातील सर्वाधिक फायदा हा विमा एजंट कमिशनच्या स्वरुपात खाऊन टाकत असतो. तुम्हाला काय मिळते? तर अत्यल्प विमा संरक्षण. जर तुमचे काही बरे वाईट झाले, तर मिळणारी तुटपुंजी रक्कमतुमच्या वारसाची गरज भागवू शकणार नाही. तसेच मुदतपूर्तीनंतर मिळणारी तुटपुंजी रक्कम तुमची भविष्यातील आर्थिक गरजहि भागवू शकणार नाही. पारंपरिक विमा साधनातून मिळणारा परतावा हा, वार्षीक चक्रवाढीने ५% पेक्षा जास्त कधीच मिळत नाही. युलीपमध्ये पैसे गुंतवणे म्हणजे अधिक नुकसान करून घेण्यासारखे आहे.
जर तुम्ही बँकेच्या पांच वर्षाच्या ठेवीत गुंतवणूक करत असाल तर, एक तर तुमचे पैसे ५ वर्षे अडकून रहातात, व दुसरे म्हणजे जे काही व्याज ६% च्या दरम्याने मिळते तेही करपात्र असते. आणि उरलेल्या लाभातून महागाईचा दर वजा केल्यास खरे म्हणजे तुम्ही तुमचे पैसे सुरक्क्षित ठेवण्यासाठी, मिळणा-या अतिरिक्त फायद्यावर पाणी सोडत असता. अत्यंत थोड्या व्यक्ती कर बचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किमचा, गुंतवणुकीसाठी विचार करतात.
हे असे का घडते? सर्वसाधारणपणे याचे एक प्रमुख कारण म्हणजे करबचत व गुंतवणूक याबाबत असणारा गोंधळ किंवा अज्ञान किंवा दुर्लक्ष करणे हेच आहे. सर्वसामान्य गुंतवणुकदार याबाबतचा निर्णय उशीरा म्हणजे अगदी मार्च महिना संपत आला की घेतो ते सुध्दा, जर त्याच्या कर सल्लागाराने सांगितले तर. किंवा एखादा एजंट त्याच्या हे गळी उतरवतो की “बाबारे, आता वर्ष अखेर आलेली आहे तेव्हा मी सांगतो त्याच साधनात (बहुतांशी विमा योजना) तू आता गुंतव”. तेव्हा तो याबाबतचा निर्णय घेतो. म्हणजेच आपण कोणत्यातरी कर बचतीच्या साधनात गुंतवणूक करुन मोकळे होतो व जेव्हा केव्हा पैसे परत मिळण्याची वेळ येते तेव्हा लक्षात येते की आपण फक्त कर बचतच केली बाकी हाती उरले एक मोठे शून्य.
हा परिणाम असतो कर व गुंतवणूक यातील वैचारिक गोंधळाचा. त्यामुळे होत काय, की विचारपूर्वक निर्णय न घेतल्यामुळे तो हमखास चुकीचा घेतला जातो. जेव्हा आपण कर बचतीसाठी किंवा अन्य कोणत्याही उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करतो तेव्हा त्या साधनाची आपण परिपुर्ण माहीती करुन घेतली पाहिजे.
यासाठी आपण गुंतवणूक कशासाठी करणार आहोत? त्याचे प्रमुख कारण काय? यातून मिळणारा फायदा किती? मिळणारा फायदा करपात्र आहे की करमुक्त आहे? पैसे किती काळ अडकून रहाणार आहेत? गुंतवणुकीसाठी किती पर्याय उपलब्ध आहेत? व यातील मला कोणता पर्याय योग्य आहे? जर एजंट मार्फत गुंतवणूक करणार असाल तर त्याला किती कमिशन मिळते? ते कमिशन वाजवी आहे का? जाणारे कमिशन तुमच्या गुंतवणुकीची रक्कम कमी करते काय? ही सर्व माहिती विचारपूर्वक मिळवून, लागल्यास त्यासाठी यातील खरोखर जाणकार असणा-या व्यक्तीची मदत घेऊन जर तुम्ही गुंतवणुकीचा निर्णय घेतलात तर तुमच्यावर पश्चातापाची वेळच येणार नाही.
त्याचप्रमाणे करबचतीचा व गुंतवणुकीच्या निर्णयाची चाल ढकल करु नका. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला खरं म्हणजे माहीत असते की या वर्षी माझे एकूण उत्पन्न किती होणार आहे व यावर किती कर देय होणार आहे? जर आवश्यक असेल तर कर बचतीसाठी किती गुंतवणूक केली पाहीजे याचे नियोजन वर्षारंभीच करुन, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा निर्णय करु शकता.
म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम हा अतिशय उत्तम पर्याय करबचतीसाठी आहेच पण गुंतवणूक करण्यासाठी सुध्दा आहे.जर तुम्ही या योजनांचा पुर्वेतिहास पाहीला तर या योजनेत एसआयपीव्दारे गुंतवणूक करणे हे नेहमीच फायदेशीर ठरलेले आहे. यातील प्रमुख फायदे म्हणजे लॉक-इन पिरिअड फक्त ३ वर्षे असतो. पहिली तीन वर्षे सलग गुंतवणूक करुन, त्यातूनच नंतर पैसे काढून पुनर्गुंतवणुकीचाही फायदा घेता येतो. गुंतवणूक करताना कोणतेही चार्जेस वजा होत नाहीत. त्यामुळे संपूर्ण रक्कम गुंतवली जाते. शेअर बाजारातील चढ उतार हे जोखीम न समजता संधीच समजली पाहीजे. चढ उतार आहेत म्हणूनच जास्त उत्पन्न मिळते. गेल्या २० वर्षातअशा योजनांनी वार्षिक सरासरी २०% चक्रवाढ पध्दतीने परतावा दिलेला आहे. हा परतावा पूर्णपणे करमुक्त असतो. निवृत्तीपर्यंत नियमितपणे या योजनेत (ग्रोथ ऑप्शनमध्ये) गुंतवणूक करत राहून, नंतर डिव्हिडंड पेआऊटचा पर्याय स्विकारुन, कायम स्वरुपी वार्षिक/मासिक कर मुक्त आकर्षक परतावाही मिळवू शकता. या योजनेतून मिळणारा डिव्हिंडंड वार्षिक सरासरी १२% किंवा अधिक मिळत असतो.यातील काही योजनांमध्ये ज्यानी २० वर्षापूर्वी गुंतवणूक केली आहे, त्याना गेले ७ ते ८ वर्षे दरवर्षी वार्षीक सरासरी ७०% या दराने लाभांश मिळत असून मुद्दलातही जवळपास ७ ते ८ पट वाढ झालेली आहे. गरज आहे ती चांगल्या योजनेची काळजीपूर्वक निवड करुन, त्या योजनेत नियमितपणे दरमहिना एसआयपी माध्यमातून दीर्घ काळासाठी विश्वासपूर्वक गुंतवणूक करत रहाण्याची.
तुम्ही निवडत असलेले गुंतवणुकीचे साधन हे प्रथम योग्य गुंतवणूक साधनच असले पाहिजे. म्हणजेच करबचतीच्या लाभाचा पर्याय नसला तरी गुंतवणूक करावी असे ते प्रभावी साधन असले पाहीजे. नंतर त्यात जर कर बचतीच्या लाभाचाही समावेश असेल तर तो दुग्ध-शर्करा योग समजला पाहीजे. आणि हे सर्वच म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम ला लागू पडत असते.
म्हणूनच प्रत्येक करदात्याने आयकर कलम ८०-सी अंतर्गत करबचतीसाठी म्युच्युअल फंडाच्या इक्वीटी लिंक सेव्हिंग स्किम योजनांचा वापर केला पाहीजे. सोबतच टर्म इन्शुरन्सव्दारे जास्तीत जास्त जेवढे विमा संरक्षण मिळू शकत असेल तेवढे अवश्य घ्यावे. २८ वर्षाच्या व्यक्तीला मासिक साधारण रु.५०० ते ६०० म्हणजे दिवसाला २० रु. पेक्षाही कमी (२० रुपयात आजकाल एक कप चहाही मिळत नाही) भरुन एक कोटी रुपयाचे विमा संरक्षण मिळते. यासोबत थोडा जास्त हप्ता भरुन तुम्हाला जास्तिचे अपघात विमा संरक्षण, कायम स्वरुपी अंपगत्व संरक्षण इ. घेता येते. तसेच हा टर्म इन्शुरन्स नवरा व बायको या दोघांच्या नांवे संयुक्त घेता येतो, ज्यात एकाचा मृत्यु झाल्यास त्याच्या विम्याची रक्कम मिळून उरलेल्या जोडिदाराचे विमा संरक्षणही पुढे चालू राहू शकते. परत टर्म इन्शुरन्सचा हप्ताही कलम ८०-सी अंतर्गत वजावटीस पात्र असतो.