९. शेअर्सचे प्रकार व विश्लेषण
प्रामुख्याने शेअर्स विकत घेताना तीन उद्देश असतात म्हणून शेअर्सचे तीन प्रकारात वर्गीकरण केले जाऊ शकते ते असे Value (मूल्य), Growth (वाढ), Income (उत्पन्न) आणि यावर आधारित त्यांचे विश्लेषण केले जाते.
Growth Stocks (वृद्धी स्टॉक):
या प्रकारातील शेअर्स खरेदी करताना अशा कंपनीचे शेअर्स खरेदी केले जातात कि ज्या कंपन्यांची विक्री नियमितपणे वाढत रहाण्याची शक्यता असते आणि प्रति शेअर उत्पन्न वाढत असते अश्या कंपनीचे शेअर्स ग्रोथ स्टॉक म्हणून समजले जातात. ह्या प्रकारातील कंपन्या या अन्य कंपन्यांच्या तुलनेत जास्त वेगाने वाढत असतात किंवा त्या क्षेत्रातील अन्य कंपन्यांच्या तुलनेतही जास्त वेगाने वाढत असतात. या प्रकारातील कंपन्या अतिशय कमी लाभांश देतात किंवा अजिबात देत सुद्धा नाहीत कारण या कंपन्या असा लाभांश देण्यापेक्षा तो पैसा परत व्यवसायात गुंतवणे पसंत करत असतात. आणि म्हणून ज्या लोकांना अशा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावयाची असेल त्यांनी ती अनेक वर्षांसाठी करण्याची तयारी असेल तरच करावी. कंपनीची निवड करताना त्या कंपनीचे व्यवस्थापन चांगले नामांकित असले पाहिजे. HLL, Nestle, Infosys, Wipro अशा काही नामांकित कंपन्या या प्रकारात गणल्या गेलेल्या आहेत, ज्यांनी गेली वर्ष-नु- वर्षे अनेक वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी नोंदवलेली आहे व गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करून दिलेली आहे. अनेक मोठे गुंतवणूकदार अशा कंपनीत केलेली गुंतवणूक कधी काढत नसतात.
Value Stocks (लपलेले मूल्य असणारे शेअर्स)
बाजारात अशा काही कंपन्या असतात ज्यांच्या शेअर्सचे बाजारमूल्य काही तात्पुरत्या कारणाने कमी झालेले असते किंवा त्यांच्याकडे अन्य गुंतवणुकदारांचे दुर्लक्ष झालेले असते मात्र अशा कंपन्यांकडे एक “लपलेले मूल्य” (hidden value) असते. अशा कंपन्यांच्या स्टॉकचे मूल्य काही खराब/वाईट बातमीमुळे बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असते. जरी अशा कंपन्यांचे शेअर्सचे बाजार मूल्य कमी झालेले असले तरी त्यांचा व्यवसाय नीटपणे चालू असतो. पूर्वीची कामगिरी चांगली असते. त्या कंपन्यांच्या मालकीची मोठी मालमत्ता, मोक्याच्या ठिकाणी जमीन, इमारत असते, तसेच मोठ्या प्रमाणावर स्टॉक असतो किंवा त्या कंपनीच्या अन्य सहयोगी कंपन्या असतात ज्या उत्तम कामगिरी करत असतात, ज्यामध्ये या कंपनीची शेअर्स मध्ये गुंतवणूक असते. या सर्वांचे मिळून एक चांगले मूल्य असते मात्र ते शेअर्सच्या किंमती मध्ये दिसत नसते. यामुळेच काही हुशार गुंतवणूकदार तसे लपलेले मूल्य असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स त्याची किंमत कमी झालेली असताना खरेदी करतात आणि बाजाराला त्या कंपनीचे खरे मूल्य समजून येऊन परत शेअर्सची किंमत वाढेपर्यंत ते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ठेऊन देत असतात. व्हॅल्यू स्टॉक हे असे स्टॉक असतात कीं ज्यांचे मूल्य त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी झालेले असते आणि त्यांचे मूल्य पुढील काही काळात एखादी चांगली बातमी आली कि मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असते. अर्थात जरी या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती कमी झालेल्या असल्या तरी या कंपन्यांचे मूलभूत मूल्य हे मजबूतच असते. हे ठरवताना काही गोष्टी आवर्जून पहिल्या जातात त्या म्हणजे त्यांचा पीइ रेशो हा त्याच्या उच्चतम पातळी पासून किती खाली आलेला आहे, लाभांशाचे उत्पन्न तुलनेने किती प्रमाणात वाढलेले आहे, कंपनीची विक्री पातळी किती प्रमाणात वर खाली झालेली आहे या गोष्टी व्हॅल्यू स्टॉक खरेदी करताना पहिल्या जातात. फ्रँकलिन म्युच्युअल फंड हे धोरण राबवण्यात प्रसिद्ध आहे.
अनेकवेळा ग्रोथ स्टॉक हे सुद्धा काही काळासाठी व्हॅल्यू स्टॉक मध्ये परावर्तित होत असतात.
Income (लाभांश देणारे शेअर्स)शेअर्स खरेदी करताना मुख्य उद्देश हा शेअर्सचे भाव वाढावेत हा असतो. मात्र काही गुंतवणूकदार हे त्यापासून मिळणारा लाभांशचे उत्पन्न मिळावे म्हणून शेअर्स मध्ये गुंतवणूक करत असतात. असे गुंतवणूकदार अशा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात कि ज्या कंपन्या नियमितपणे जास्त लाभांश देत असतात, त्या साठी त्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीं जरी जास्त वाढ झाली नाही तरी त्याची त्यांना पर्वा नसते. नियमितपणे जास्त लाभांश मिळावा हाच त्यांचा उद्देश असतो. असे जास्त लाभांश देणारे स्टॉकस हे इन्कम स्टॉक म्हणून समजले जातात. ज्या क्षेत्रातील कंपन्यांची वाढ हि कमी प्रमाणात होत असते अशा कंपन्या मुख्यत्वेकरून जास्त प्रमाणात लाभांश देत असतात.