म्युचुअल फंडाचे वेगवेगळे प्रकार
तुम्हाला किती काळासाठी पैसे गुंतवायचे आहेत, किती जोखीम तुम्ही स्वीकारू शकता या गोष्टींवर अवलंबून तुम्ही म्युचुअल फंडाची योजना निवडली पाहिजे.
म्युचुअल फंडामध्ये प्रामुख्याने दोन प्रकारच्या योजना असतात :
१) ओपेन एन्डेड:अशा प्रकारच्या योजनेत केव्हाही गुंतवणूक करता येते त्याचप्रमाणे केव्हाही पैसे काढता येतात.
२) क्लोज एन्डेड:अशा प्रकारच्या योजनेतती योजना ज्यावेळी जाहीर होते,तेव्हाच कोणत्या तारखेपर्यंत गुंतवणूक करता येईल हे जाहीर केले जाते व त्या तारखेपर्यंतच गुंतवणूक करता येते. या योजनेतील पैसे मुदत संपल्यावर थेट आपल्या बँक खात्यात जमा होतात.
योजनांचे प्रकार
१) समभाग आधारित योजना :यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॅाल कॅप, मल्टी कॅप, बॅलन्सड, क्षेत्रीय व विशिष्ट उद्देश आधारित योजना असतात. अशा प्रकारच्या योजनेतील काही ठराविक प्रमाणातील रक्कम हि शेअर बाजारात व उर्वरित निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवली जाते. अशा योजनेत शेअर बाजारातील चढ उतारांची जोखीम अंतर्भूत असते. मात्र अशी जोखीम असते म्हणूनच अशा योजनेतून सर्वाधिक परतावा ( योजनेच्या स्वरूपानुसार वार्षिक सरासरी १२% ते ३०% पर्यंत ) गेल्या दोनशे वर्षात मिळालेला आहे. अशा प्रकारच्या योजना या दीर्घ काळासाठी गुंतवणूक करण्यासठी सर्वोत्तम मानल्या जातात. या प्रकारच्या योजनेतून मिळणारा परतावा हा एक वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणूक केल्यास पूर्णपणे करमुक्त असतो. या प्रकारच्या योजनेत ग्रोथ व लाभांश असे दोन पर्याय उपलब्ध असतात. काही योजनेत मासिक लाभांश दिला जातो, तर काही योजनेत त्रैमासिक /वार्षिक तत्वावर लाभांश दिला जातो. मिळणारा लाभांश पूर्णपणे करमुक्त असतो.
२) बॅलन्सड(संतुलित ) योजना: या प्रकारातील योजनेतील पैशांची गुंतवणूक हि सामान्यतः किमान ६५% शेअर बाजारात व उर्वरित ३५% हि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात केली जाते.मात्र जर शेअर बाजारात तेजी असेल तर हेच प्रमाण निधी व्यवस्थापक ८५% पर्यंत वाढवू शकतो, ज्यामुळे गुंतवणूकदाराला शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळून जास्त परतावा मिळू शकतो. जर शेअर बाजारात मंदीचा कल असेल, तर शेअर बाजारातील गुंतवणूक तो ६५% पर्यंत कमी करू शकतो. ज्यामुळे निश्चित उत्त्पन्न देणाऱ्या साधनातून जास्त परतावा मिळेल व शेअर बाजारातून होणारे नुकसान थोडे भरून निघू शकेल. म्हणूनच या योजनेला संतुलित योजना म्हंटले जाते.गेल्या 20 वर्षातील अशा योजनेचा परतावा पाहिल्यास तो लार्ज कॅप योजनेतील परताव्यापेक्षाही जास्तच मिळालेला दिसून येतो. अशा योजनेतून दीर्घ मुदतीत १२% ते १५% दराने परतावा मिळू शकतो. या प्रकारातील योजनेत गुंतवणूकदाराला वृद्धी व लाभांश असे पर्याय उपलब्ध असतात. अशा प्रकारातील अनेक योजना गेले काही वर्षे नियमित दरमहा लाभांश देत आहेत. काही योजनांचा वार्षिक लाभांश गुंतवणुकीवर सरासरी 11% ते १२% दराने नियमित मिळत आहे. य व्यतिरिक्त दीर्घ मुदतीत मुद्दलसुद्धा काही पटीत वाढलेले आहे. या योजनेतून मिळणारा सर्व प्रकारचा हा आयकर मुक्त असतो.
३) बॅलन्सड अॅडव्हॅंटेज योजना : या प्रकारातील निधी, हा शेअर बाजार व निश्चित उत्त्पन्न देणाऱ्या साधनात ठराविक प्रमाणात गुंतवला जातो, जो तेजीच्या काळात जास्तीत जास्त ८५% एवढा असू शकतो व `मंदीच्या काळात तो ३०% पर्यंत कमी केला जाऊ शक्रो. परत या योजनेतील शेअर्स व बाँड मधील प्रमाण हे रोजच्या रोज नियंत्रित केले जाते म्हणजे जर शेअर बाजार वाढला व जास्त फायदा झाला तर तो बाँड मध्ये वर्ग केला जातो व उलट जर शेअर बाजारात तोटा झाला तर डेट मधील गुंतवणूक कमी करून ती शेअर बाजारात वर्ग केली जाते. या योजनेतील जोखीम हि फारच कमी असते. या प्रकारातील योजनेतून १०% ते १२% चा वार्षिक परतावा अपेक्षिला जावू शकतो. हि योजना ३ ते ५ वर्षाच्या बँक ठेवींसाठी उत्तम पर्याय मानली जाते. पैसे केव्हाही काढता येतात. या प्रकारातील योजनत गुंतवणूकदाराला वृद्धी व लाभांश असे पर्याय उपलब्ध असतात. या योजनेतून मिळणारा सर्व प्रकारचा परतावा हा आयकर मुक्त असतो.
४) कर्जरोखे आधारित योजना: या प्रकारातील योजनेतील पैसे पूर्णपणे हे निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनात गुंतवले जातात, यामुळे अशा प्रकारच्या योजनेत मुद्दल कमी होण्याचे प्रमाण जवळपास नसते. या प्रकारच्या योजनेतील पैसे शेअर बाजारात गुंतवले जात नसल्यामुळे शेअर बाजाराचे चढ उतारांची जोखीम नसते. ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची भीती वाटते मात्र बँकेच्या व्याजापेक्षा जास्त परतावा मिळावा असे वाटते त्यांचेसाठी या योजना उत्तम पर्याय मानल्या जात्तात. या योजनेत व्याज दरातील फरकानुसार मिळणारा परतावा बदलत असतो. जर आर. बी. आय. ने व्याज दारात वाढ केली तर मिळणारा परतावा कमी होतो व जर व्याज दरात कपात केली तर मिळणारा परतावा वाढतो. याचप्रमाणे या योजनेत क्रेडीट रेटिंग्जमधील बदल पर्ताव्यावर परिणाम करतात. जर एखादा ऋणको अवसानीत गेला तर परतावा कमी होऊ शकतो.