१६. शेअर्स कधी विकावेत
शेअर्स कधी विकावे हा एक प्रश्न प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात केव्हा ना केव्हा तरी येतोच. यासंबंधी काही महत्वाचे घटक समजून घेऊया.
शेअर्स खरेदी कधी करावेत हे आपण मागील काही लेखात पहिले असेल. कोणते शेअर्स खरेदी करावेत हे पाहणे तसे सोपे आहे, खरेदी केलेले शेअर्स कधी विकावेत हा जास्त कठीण प्रश्न आहे. पण इथे मी तुम्हाला काही टिप्स देण्याचा प्रयत्न करतो याचा वापर करून तुम्ही शेअर्स विक्रीचा निर्णय करू शकता. एक लक्षात ठेवा येथे दिलेल्या एक सूचनेचा वापर करून शेअर्स विक्री करायची नसून या सर्व सूचनांचा एकत्रितपणे विचार करूनच विक्रीचा निर्णय करावयाचा आहे.
१) जर तुम्ही खरेदी केलेला शेअर तुमच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत नसेल किंवा तुम्ही भविष्यात काही घोषणा होईल या अपेक्षेने शेअर्स खरेदी केले असतील व घोषणाच जर होत नसेल तर विक्री केली पाहिजे. बरेच फार्मा कंपन्यांचे शेअर्स यामध्ये मोडतात. एखादया नवीन औषध बाजारात आणण्याची चर्चा सुरु होते पण ते तसे आणलेच जात नाही. किंवा US FDA काही कंपन्यांना औषध निर्मितीवर आणलेली बंधने लवकरच उठवणार आहे अशी हवा झालेली असते पण तसं होताना दिसत नाही तेव्हा त्या शेअरची किंम्मत कमी होऊ लागते कारण बरेच गुंतवणूकदार तो विकण्याच्या मागे लागतात अशा वेळी आणखीन जास्त नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्याकडील ते स्टॉक विकणे योग्य निर्णय असू शकतो.
२) जर एखाद्या शेअरची किंमत ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली असेल आणि जर तुम्हाला फार मोठा फायदा होत असेल. तुम्ही ज्यावेळी शेअर्स खरेदी केले होतेत तेव्हाच्या किंमतीत ५ ते १० पट किंवा जास्त वाढ झालेली असेल तर तुम्ही किमान तुमची गुंतवलेली रक्कम अधिक वार्षिक २०% दराने होणारा नफा इतक्या रकमेचे शेअर्स विकून बाकीचे आणखीन फायदा मिळावा या हेतूने ठेऊ शकता. काही वेळा परिस्थितीचा अंदाज घेऊन आपल्याकडील असामान्य फायदा झालेले सर्वच शेअर्स विकून तो शेअर परत खाली येण्याची वाट पाहणे हे सुद्धा जास्त फायदेशीर होऊ शकते. पण फंडामेंटल मध्ये बदल झालेला नसेल तर शक्यतो सर्व शेअर्स न विकता काही शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणे चांगले असते.
3) जेव्हा सध्याची शेअरची किंमत हि भविष्यातील अपेक्षित उत्पन्नाची शाश्वती देत नसेल किंवा जेव्हा ईपीएस कमी होऊ लागते तेव्हा त्याची विक्री केली पाहिजे. जेव्हा विक्रीचा निर्णय करावयाचा असतो तेव्हा सुद्धा खरेदी करताना आपण जे रेशो तपासले होते ते परत तपासले पाहिजेत व त्यातून जर शेअरचे भविष्य आशादायक नसेल तर ते विकलेच पाहिजेत.
४) आपल्याकडील असणारे शेअर्स विकून येणाऱ्या पैशातून अन्य दुसऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे हे जास्त फायदेशीर होऊ शकते अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा हा निर्णय केला पाहिजे.
५) जर कधी शेअर विकून कर वाचवता येणार असेल तर असे करून चालू शकते. समजा तुम्हाला तुमच्याकडील शेअर्स विकून भरपूर लॉन्ग टर्म कॅपिटल गेन झालेला आहे अशा वेळी तुम्ही दुसरा एखादा असा शेअर खरेदी केला पाहिजे कि ज्यामध्ये लवकरच लाभांश दिला जाणार आहे आणि जेव्हा तो लाभांश दिला जातो त्यानंतर तो विकला पाहिजे यामुळे तुम्हाला होणारे भांडवली नुकसान पूर्वीच्या भांडवली फायद्यातून तुम्ही वजा करून आयकर वाचवू शकता.
६) जर कंपनीच्या कामगिरीत किंवा फंडामेंटल्समध्ये काही महत्वाचे बदल झाले आहेत कि ज्यामुळे त्या शेअरची किंमत कमी होऊ शकते तो शेअर विकला पाहिजे. काही वेळा तुमच्याकडे ज्या कंपनीचे शेअर्स असतात ती कंपनी एखादया नवीन व्यवसायाची घोषणा करते मात्र तो व्यवसाय प्रत्यक्षात सुरु होऊन त्यापासून फायदा मिळण्यासाठी जर बराच काळ जाणार असले तर अशा वेळी त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत काही काळासाठी खाली येण्याची शक्यता असते, अशा वेळी आपल्याकडील शेअर्स विकून पैसे मोकळे करावेत आणि त्या शेअरची किंमत पुरेशा प्रमाणात कमी होऊन त्यात परत तेजीचे संकेत दिसू लागले कि तो शेअर परत खरेदी करावा.
७) ज्या शेअरची किंमत सतत वाढत असते त्या कंपनीचे उत्पन्न, विक्री, नफा इ. सुद्धा त्याच प्रमाणात वाढत राहिले पाहिजे, मात्र जर नुसतीच किंमत वाढत असेल व परतावा २ ते ३ तिमाही निकालात सुद्धा पुरेशी वाढ दाखवत नसेल तर त्या शेअरची किंमत कमी होण्याची शक्यता वाढते, अशा वेळी तो विकून टाकावा.
८) योग्य वेळी नुकसान कमी करण्यासाठी सुद्धा शेअर्स विकावे लागतात. पण घाबरून जाऊन मात्र शेअर्स विकू नका. सर्वसाधारणपणे असा एक नियम आहे कि जर तुम्ही घेतलेल्या शेअरची किंमत ८% किंवा जास्त कमी झाली तर तो शेअर आणखीन खाली जाण्याचे संकेत देत असतो अशावेळी पुढे होणारे मोठे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या कडील असणारे शेअर्स विकून लॉस बुक करावा. यामुळे तुमचे पैसे मोकळे तर होतातच परत तुम्ही दुसरी गुंतवणुकीची चांगली संधी साधून झालेले नुकसान भरून काढू शकता. पण हे प्रत्येक वेळेलाच बरोबर ठरेल असेही नसते. काही वेळा तो शेअर ८% ते १०% कोसळून परत उसळी घेऊ शकतो म्हणून सर्व रेशो तपासूनच विक्रीचा निर्णय घेतला पाहिजे.
तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची माहिती नियमितपणे करून घेत रहा. नियमितपणे प्रत्येक ३ महिन्यांनी जाहीर होणारे निकाल काळजीपूर्वक पडताळून पहा. सर्व रेशो नियमितपणे तपासा. संबंधित कंपनीची पूर्ण माहिती मिळावा. ती कोणते उत्पादन किंवा सेवा विकत असते त्याची बाजारातील उपयुक्तता आणि खप तपासा. खप सतत वाढत असेल तर चिंता करू नका. काही वेळा चांगल्या कंपनीचे शेअर्स जेव्हा खाली येतात तेव्हा ते जास्तीचे खरेदी करून सरासरी करत राहून जेव्हा ते असामान्य फायदा मिळवून देतात तो पर्यंत थांबणे योग्य होऊ शकते.