होय तुम्हीसुद्धा अब्जोपती बनू शकता.
या जगात प्रत्येक व्यक्तीचीच श्रीमंत बनण्याची इच्छा असते कोणी ती व्यक्त करतो तर कोणी असे बोलण्यासाठी कचरतो. आज काल महागाई एवढी वाढलेली आहे कि करोडपती होऊनही तुम्ही तुमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकत नाही हि वस्तुस्थिती आहे. म्हणूनच आता आपण करोडपती नव्हे तर अब्जोपती कसे बनू शकू याचा विचार केला पाहिजे. परंतु होत काय कि जर आपण मध्यमवर्गीय असलो तर आपल्याला असे स्वप्न पाहण्याची सुद्धा भीती वाटते. हे मुळी अशक्यच आहे असच काहीस आपल्याला वाटत असत. परंतु जरी तुम्ही मध्यम वर्गीय असलात तरी सुद्धा तुम्ही निश्चितच अब्जोपती होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकता. हे कसे शक्य आहे हेच या लेखात आपण पाहणार आहोत.
जर तुमची खरोखर श्रीमंत होण्याची इच्छा असेल व त्यासाठी थोडी काटकसर व नियमित शहाणपणाने गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर हे निश्चित साध्य होऊ शकते. एक लक्षात घेतले पाहिजे कि आपल्या देशात जे काही अब्जोपती लोक आहेत ते काही एका दिवसात श्रीमंत झालेले नाहीत. त्यासाठी काही पिढ्या त्यांना कष्ट व नियमित व्यवसाय करावा लागलेला आहे. काही व्यक्ती दोन पिढ्यानंतर हे इप्सित साध्य करू शकलेल्या आहेत. फारच थोड्या व्यक्ती हे त्यांच्या जीवनातच अब्जोपती बनण्यात यशस्वी झालेल्या आहेत. आपण सुद्धा जर असा विचार केला कि ठीक आहे मी शक्यतो याच जन्मात अब्जोपती होण्याचा प्रयत्न करीन पण जर का ते नाही जमलं तर माझ कुटुंब पुढील पिढीत तरी अब्जोपती झालेलं असेलच हा विचार आपल्याला केला पाहिजे.
म्युचुअल फंड हे सर्वसामान्य लोकांसाठी गुंतवणूकिचे एक सर्वोत्तम माध्यम आहे. यातील इक्विटी स्कीम्स मधील गुंतवणूक ही शेअर बाजारात केली जाते. आपल्यापैकी बरेच जणांचे असे गैर समज असतात कि शेअर बाजार म्हणजे जुगार, हा जणूकाही आपल्यासाठी नाहीच. खर म्हणजे शेअर बाजार हाच संपत्ती निर्माण करण्यासाठी एक सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय आहे. परंतु शेअर बाजारात ट्रेडिंग अथवा गुंतवणूक करण्यासाठी त्याचे ज्ञान असणे आवश्यक असते मात्र ते सर्वांकडे असू शकत नाही व आपल्या नोकरी धंद्यातून तेवढा वेळ काढणेही सर्वांनाच शक्य होत हि नाही, हि वस्तुस्थिती आहे. अशा लोकांसाठीच तर म्युचुअल फंड आहे ना. कारण म्युचुअल फंड योजनांचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांच्याकडे तज्ञ असा फंड मॅनेजर असतो ज्याला सहाय्य करण्यासाठी रिसर्च टीम असते जी शेअर बाजारातील घडामोडींचा बारकाईने अभ्यास करून आपला रिपोर्ट फंड मॅनेजरला देत असते, त्याच्यावर विचार करून फंड मॅनेजर शेअर बाजारात कोणत्या कंपनीचे शेअर्स कधी व किती प्रमाणात व किती काळासाठी विकत घ्यावयाचे किंवा योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये असणारे कोणते शेअर्स सध्या विकावयाचे याचा निर्णय वेळोवेळी घेत असतो. काही कंपन्याच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यकता असल्यास टीम त्या कंपनीला भेट देऊन कंपनीची अधिक माहिती जमा करते. यासाठी कंपनीचे फंडामेंटल विश्लेषण केले जाते, भविष्यात त्या कंपनीला किती ऑर्डर्स मिळणार आहेत त्यातून किती नफा होऊ शकेल आदी सर्व गोष्टींचा विचार गुंतवणुकीचा निर्णय करण्यापूर्वी केला जातो. यामुळे भविष्यात त्या कंपनीच्या शेअरचा भाव किती प्रमाणात वाढू शकेल याचाही विचार केला जातो. या सर्व प्रक्रियेनंतरच प्रत्यक्ष गुंतवणूक कंपनीच्या शेअर्स मध्ये योग्य त्या प्रमाणात केली जाते. याशिवाय एका कंपनीत किती प्रमाणात गुंतवणूक करावयाची यासाठी काही नियम असतात त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. एखाद्या योजनेतील गुंतवणूक शेअर बाजारात किती प्रमाणात करावयाची किती प्रमाणात कर्जरोख्यात करावयाची याबाबत योजना जाहीर करण्यापूर्वीच ते जाहीर केले जाते व याचे पालन होते आहे कि नाही हे ए.एम.सी. व सेबी मार्फत वेळोवेळी तपासले जाते. कोणकोणत्या शेअर्स मध्ये व किती प्रमाणात गुंतवणूक करावयाची याचेही नियम ठरलेले असतात व त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाते. या सर्वच गोष्टींमुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीची जोखीम म्युचुअल फंडात कमी होते. आपल्याला माहित असेलच जगात व आपल्या देशातही शेअर बाजाराला गेल्या २०० वर्षांपेक्षा जास्त काळाचा इतिहास आहे व असे दिसून आलेले आहे कि शेअर बाजारात दीर्घ मुद्तीत नेहमीच फायदा होतो. असे सिद्ध झालेले आहे कि कोणत्याही ५० वर्षात शेअर बाजारातील गुंतवणुकीवर सरासरी १२०००% एवढा प्रचंड नफा जगात सर्वत्रच झालेला आहे. म्हणूनच जगातील महान गुंतवणूक गुरु वॉरेन बफे असे सांगतो कि जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता तेव्हा वर्षांचा नव्हे तर ४ ते ५ दशकांचाच विचार केला पाहिजे.
हे सत्य आहे कि शेअर बाजारात नेहमीच चढ उतार होतच असतात व यामुळे जर अल्पकाळाचा विचार केला तर शेअर बाजारात नफा किंवा नुकसान जास्त प्रमणात होण्याची शक्यता असते मात्र जर आपले उदिष्ट २० किंवा अधिक वर्षांचे असेल तर नेहमीच शेअर बाजारातील गुंतवणुकीतून फायदाच होत असतो आणि म्हणूनच शेअर बाजारातील चढ उतार हि जोखीम न समजता एक उत्तम संधी म्हणूनच पाहिले पाहिजे. म्युचुअल फंडाच्या अनेक चांगल्या योजनेतून गेल्या वीस वर्षात सरासरी २०% ते २५% वार्षिक चक्रवाढ पद्धतीने गुंतवणुकीवर परतावा मिळालेला आहे. आता हेच पहाना आपला सेन्सेक्स १९७९ साली सुरु झाला तेव्हा तो १०० होता आता तो ३२७०० च्या आसपास आहे, म्हणजेच सरासरी वार्षिक १८% चक्रवाढ पद्धतीने उत्पन्न सेन्सेक्सने गेल्या ३८वर्षात दिलेले आहे, व म्युचुअल फंडाने तर याहून जास्त दिलेले आहे कारण त्यांनी ते तसे दिले तरच त्या फंड मॅनेजरची हुशारी मानली जाते.
म्युचुअल फंडाच्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फार मोठी रक्कमही लागत नाही. दर महा अगदी रु.१००० पासून कितीही रक्कम गुंतवता येते. ज्यांनी गेले २० वर्षे नियमित दर महा रु.१००० काही चांगल्या योजनेत एस.आय.पी. माध्यमातून गुंतवलेले आहेत त्यांचे आजपर्यंत रु.२.४० लाख रक्कम गुंत्वावून झाली व आज त्याचे मूल्य रु.४५ लाख ते ५० लाख एवढे झालेले आहे.
आता असा विचार केला पाहिजे कि म्युचुअल फंडात दीर्घकाळ व नियमितपणे दरमहिना गुंतवणूक करण्याची माझी तयारी असेल तर मला भविष्यात चक्रवाढ पद्धतीने सरासरी किती उत्पन्न वार्षिक मिळू शकेल व यासाठी काही गणितीय सूत्र आहे काय? होय असे ढोबळमानाने सांगता येते कि देशाचा जो जी.डी.पी. (ठोकळ उत्पनाचा दर) असतो त्यात जर आपण वार्षिक महागाईचा दर मिळवला तर जेवढी संख्या येईल तेवढे किमान उत्पन्न गुंतवणूकदाराला म्युचुअल फंडातून मिळाले पाहिजे. जेव्हा आर्थिक प्रगती कमी असते तेव्हा जी.डी.पी. कमी असतो व महागाईचा दर जास्त असतो व जेव्हा देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढू लागतो तेव्हा महागाईचा दर कमी होतो. सध्या आपल्या देशात जी.डी.पी. चा दर सरासरी ६% आहे व महागाईचा दर आहे ५% म्हणजेच तुम्हाला म्युचुअल फंडाच्या डायव्हरसिफाइड इक्वीटी योजनेतून वार्षिक किमान ११% पेक्षा जास्त जास्त उत्पन्न वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळू शकेल, मागील इतिहास पाहता ते सरासरी १५% दराने मिळू शकेल. बहुतांशी हे तुम्हाला जास्तच मिळणार आहे पण १५% हे सुद्धा काही कमी नाही कारण बँकेत तुम्हाला ७% एवढेच व्याज मिळत असते, त्यातूनही महागाई व कर वजा केला तर निव्वळ आपले पैसे सुरक्षीत ठेवण्यासाठीच आपण बँकेत पैसे ठेवत असतो.
आता जर तुम्हाला अब्जोपती बनवायचे असेल तर दर महिना किती रक्कम गुंतवली पाहिजे व ती किती काळासाठी गुंतवली पाहिजे हे पाहूया. आता जर कर का तुम्ही दर महा फक्त रु.१००० गुंतवणार असाल व मिळणारा चक्रवाढ व्याजाचा वार्षिक दर १५% गृहीत धरला तर तुम्हाला ६३ वर्षे नियमित दर महा रु.१००० ची गुंतवणूक केली पाहिजे म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.१०० कोटी म्हणजेच एक अब्ज एवढे होईल. पण हेच जर का तुम्ही दर महा रु.१०००० ची गुंतवणूक केली तर ४८ वर्षात तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य रु.१०० कोटी (एक अब्ज) होईल. आता हा काळ कमी करण्यासाठी काय केले पाहिजे? सुमारे ५० वर्षापूर्वी एखादी व्यक्ती जेव्हा नवीन नोकरीला लागायची तेव्हा त्याचा सुरुवातीचा पगार असायचा सुमारे रु.१२५/- दर महा, तेच जर आज पाहिले तर सुरुवातीचा पगार असतो साधारण रु.२५००० महिना. याचे कारण दर वर्षीच महागाई वाढत असते व त्यामुळे चलनाची किंमत कमी होते तर त्यामुळे दर वर्षीच पगार किंवा आपले उत्पन्न सरासरी १०% ते २०% वाढत असते आणि म्हणूनच गुंतवणूक करतानासुद्धा आपण दर वर्षी आपल्या गुंतवणुकीत वाढ केलीच पाहिजे, ती किती करावी तर किमान दर वर्षी १०% दराने केली पाहिजी. आता असे केले तर काय होईल ते पहा. जर का वरील उदाहरणात दर महा रु.१००० वार्षिक १०% वाढ करीत गुंतवले तर ५७ वर्षात रु.१०० कोटी होतील किंवा दर महा रु.१०००० वार्षिक १०% वाढ करीत गुंतवले तर ४२ वर्षात रु.१०० कोटी होतील.
मागील २५ वर्षात म्युचुअल फंडाच्या डायव्हरसिफाइड इक्वीटी योजनेत एस.आय.पी. माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक चक्रवाढ पद्धतीने मिळालेला परतावा सरासरी २३% एवढा आहे म्हणूनच खालील तक्त्यामध्ये, रु.१०० कोटी होण्यासाठी वार्षिक १०% दराने एस.आय.पी. मध्ये वाढ केल्यास वार्षिक १५% व वार्षिक २०% दराने परतावा मिळाल्यास किती वर्षे लागतील त्याचे गणित दिलेले आहे. याच बरोबर एक लक्षात ठेवले पाहिजे कि प्रत्येक वर्षीच महागाई काही प्रमाणात वाढतच असते व ज्यामुळे रुपयाची खरेदीची क्षमता कमी होत असते म्हणूनच मुदतीअखेर, वार्षिक ५% टक्के दराने महागाई वाढल्यास, रु.१०० कोटी रुपयांचे खरे मूल्य किती असेल ते हि दिले आहे. जर का तुम्हाला/तुमच्या कुटुंबाला अब्जोपती बनावयाचे असेल तर खालील तक्ता तुम्हाला गुंतवणुकीचे नियोजन करण्यास उपयुक्त होऊ शकेल. जर का आपल्या कुटुंबात एका पेक्षा जास्त व्यक्ती मिळवत्या असतील तर हे उदिष्ट लवकर साध्य करता येऊ शकेल, कारण तुम्ही जास्त रकमेची नियमितपणे गुंतवणूक करू शकाल.
जर का तुम्ही आज ३० वर्षाचे असाल तर तुमच्या मनात असे येऊ शकते कि, मी सतत काटकसर करून नियमितपणे गुंतवणूक करत रहावयाचे व अजून ४० वर्षांनी जर का मी अब्जोपती होणार असेन तर त्याचा मला काय फायदा कारण तेव्हा मी असेन ७० वर्षांचा,पण एक लक्षात घ्या हाच विचार जर ज्या आपल्या पूर्वजांनी केला असता तर त्यांनी कधीच माणगावी नारळाचे झाड कधीच लावले नसते कारण ते फळधारणा करण्यासाठी १५ ते २० वर्षे घेते, पण त्यांनी हा विचार न करता कृती केल्यामुळेच आपण आज अशी अनेक फळ आपण खात आहोत. तुम्ही जर असे केलेत तर तुमच्या म्हातारपणी तरी तुमची कदाचित सारी स्वप्न पूर्ण होऊ शकतील, किंवा तुमची पुढील पिढी तरी आर्थिक चिंतामुक्त जीवन जगू शकेल. कारण प्रत्येकाचीच एक इच्छा असते कि आपल एक चांगल घर असावे, गाडी असावी व आर्थिक चिंता मुक्त जीवन असावे हे तुमच्या बाबत किंवा तुमच्या पुढच्या पिढीला तरी भाग्य लाभेल.
म्युचुअल फंडात दर महा एस.आय.पी. रु. | वार्षिक १०% एस.आय.पी. मध्ये वाढ केली तर १०० कोटी रुपये मूल्य होण्यास लागणारी वर्षे (परतावा १५%) | वार्षिक ५% महागाईचा दर वजा केल्यावर १०० कोटी रुपयांचे मुदती अखेर खरे मूल्य कोटी रुपये | वार्षिक १०% एस.आय.पी. मध्ये वाढ केली तर १०० कोटी रुपये मूल्य होण्यास लागणारी वर्षे (परतावा २०%) | वार्षिक ५% महागाईचा दर वजा केल्यावर १०० कोटी रुपयांचे मुदती अखेर खरे मूल्य कोटी रुपये |
१००० | ५७ | ५.९० | ५० | ८.७२ |
५००० | ५० | ८.७२ | ४१ | १३.५२ |
१०००० | ४५ | ११.१३ | ३८ | १५.६६ |
१५००० | ४२ | १२.८८ | ३५ | १८.१३ |
२०००० | ४० | १४.२० | ३४ | १९.०४ |
२५००० | ३९ | १४.९१ | ३२ | २०.९८ |
३०००० | ३८ | १५.६६ | ३१ | २२.०४ |
४०००० | ३६ | १७.२६ | ३० | २३.१३ |
५०००० | ३४ | १९.०३ | २९ | २४.२९ |
६०००० | ३३ | १९.९८ | २८ | २५.५० |
१००००० | २८ | ४५.८१ | २५ | ५०.५० |