३. भविष्यात बदलणाऱ्या किंमतीबाबत करार (What are Forward Contracts?)
Derivatives म्हणजेच वायदेबाजार म्हणजे एक जटिल आणि किचकट गणितीय समीकरणांचा वापर करून त्याचा वापर सट्टा खेळण्यासाठी सुद्धा केला जात असतो. याला सभ्य भाषेत हुशार व्यक्तींनी ज्यांना आर्थिक भाषेत आर्थिक विषयातील तज्ञ व्यावसाईक असे संबोधले जाते, अशांकडून याचा वापर लवकर श्रीमंत होण्यासाठी केला जात असतो. अर्थात ते कितपत तसे श्रीमंत होऊ शकतात हा संशोधनाचाच विषय आहे. खरे पाहता हे असे नसते हि वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्षात वायदेबाजाराचा प्रभावी वापर हा जोखीम कमी करण्यासाठी करावयाचा असतो. वायदेबाजारातील सिक्युरिटीजची किंमत हि संबंधित सिक्युरिटीजच्या रोखीच्या बाजारातील किंमतीतील चढ उतारावर अवलंबून असतात. आपण येथे फक्त शेअरबाजारासंबंधित वायदेबाजार समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
फ्युचर ट्रेडिंगसाठी अनेक प्रकारचे इंडेक्स उदा. निफ्टी ५०, सेन्सेक्स, निफ्टी बँकेस्क, बीएसइ फार्मा, बीएसइ आयटी किंवा फ्युचर्समध्ये सहभागी असलेला कोणताही शेअर या मध्ये आपण फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट, ऑप्शन्स किंवा स्वॅप व्दारे वायदेबाजाराचे व्यवहार करू शकतो. यासाठी किमान एक लॉट खरेदी किंवा विक्री करावा लागतो. वेगवेगळ्या इंडेक्स आणि वेगवेगळ्या शेअर्ससाठी लॉटमधील संख्या ठरलेली असते. उदा.निफ्टी चा लॉट हा ७५ आहे, म्हणून आज २ मे २०१९ रोजी क्लोजिंग निफ्टी आहे ११७२४ याचाच अर्थ जर तुम्हाला एक लॉट निफ्टी घ्यावयाचा असेल तर त्याची एकूण किंमत होते ७५ X ११७२४ = ८७९३०० रुपये याचाच अर्थ जर तुम्हाला निफ्टी चा एक लॉट रोखीत घ्यावयाचा असेल तर तुम्हाला एकूण रु.८७९३०० एवढे गुंतवावे लागतील. परंतु तुम्ही जर निफ्टीचा एक लॉट फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये घ्यावयाचा असेल तर इंट्रा डे साठी साधारण १६५०० रुपयाचे मार्जिन भरावे लागेल आणि जर तुम्हाला तुमची पोझिशन कॅरी करावयाची असेल तर साधारण ५५ ते ६० हजार रुपयांचे मार्जिन भरावे लागेल. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी फ्युचर्सचे कॉन्ट्रॅक्ट संपते व नवीन सुरु होत असते.
यासाठी आपण एक सोपे उदाहरण पाहूया:
श्री ने आज रु. ५५००० मार्जिन भरून ११७२४ चा निफ्टी चा एक लॉट खरेदी केला
जर तो पुढील काही दिवसात १२००० झाला तर श्री ला खालील प्रमाणे फायदा होईल
७५ X १२००० = ९०००००
वजा ७५ X ११७२४ = ८७९३००
नफा रु. २०७००
मात्र जर निफ्टी ११००० झाला तर त्याला खालील प्रमाणे तोटा होईल
७५ X ११७२४ = ८७९३००
वजा ७५ X ११००० = ८२५०००
नुकसान रु. ५४३००
आणि यासाठी त्याला प्रत्येक दिवशी जेवढे वाढीव मार्जिन असेल तेव्हढे रोजच्या रोज भरावे लागेल.
येथे तुम्हाला समजले असेल कि जशी निफ्टीची किंमत वर खाली होईल तसे फ्युचर्सच्या कॉन्ट्रॅक्टची किंमत कमी जास्त होईल. येथे निफ्टी हा संबंधित ऍसेट आहे. याच प्रमाणे कोणत्याही शेअर्स बाबत होत असते.
वायदेबाजारात तीन प्रकारे काँट्रॅक्टचे व्यवहार होऊ शकतात
१. फ्युचर्स किंवा फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट
२. ऑप्शन्स
३. स्वॅप
फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट
वायदे बाजारात फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट हा सर्वात सोपा प्रकार आहे. यामध्ये एखाद्या मालमत्तेच्या खरेदी किंवा विक्रीचे कॉन्ट्रॅक्ट केले जाते ज्यामध्ये एका ठराविक काळानंतर एका ठराविक किंमतीने व्यवहार करण्याचे ठरवले जाते.जेव्हा कॉन्ट्रॅक्ट केले जाते तेव्हा कोणताही रोखीचा व्यवहार केला जात नाही. मात्र टोकन म्हणून काही रक्कम दिली किंवा घेतली जाऊ शकते, हे संबंधित व्यक्तींवर अवलंबून असते.
उदाहरण १:
शाम याला एक टीव्ही विकत घ्यावयाचा आहे ज्याची बाजारात किंमत आहे रु. ५०००० परंतु आज त्याच्याकडे तो टीव्ही खरेदी करण्यासाठी संपूर्ण रक्कम उपलब्ध नाही मात्र त्याला ३ महिन्यानंतर काही रक्कम मिळणार असते त्यातून तो ५०००० रुपयांचा टीव्ही खरेदी करू शकतो. मात्र त्याला एक भीती असते कि ३ महिन्यांनी कदाचित त्या टीव्हीची किंमत वाढेल व त्याला जास्त पैसे भरावे लागतील. आता तो काय करेल कि टीव्ही डिलरकडे जाईल आणि त्याला सांगेल कि मला हा रु. ५०००० चा टीव्ही ३ महिन्यांनी विकत घ्यावयाचा आहे त्यासाठी हा मी आज आपल्याकडे बुक करू इच्छितो आणि त्यासाठी आपण एक करार करूया. या करारात किती रक्कम आगाऊ भरावयाची, ३ महिन्याचे व्याज किती लागेल, कोणत्या तारखेला टीव्ही पूर्ण रक्कम भरून घेतला पाहिजे इ बाबींची नोंद असेल. आता ३ महिन्यांनी शाम त्या डिलरकडे जाऊन बुक केलेला टीव्ही रु. ५०००० + ३ महिन्यांचे ठरलेले व्याज वजा आगाऊ दिलेली रक्कम यानुसार होणारी रक्कम भरून टीव्ही घेऊन जाईल. या दरम्याने जर टीव्हीची किंमत कमी झाली तर श्यामचे नुकसान असेल आणि जर टीव्हीची किंमत वाढली तर त्याचा फायदा असेल.
उदाहरण २:
राम हा एक आयातदार आहे त्याने जो माल आयात केलेला आहे त्याचे पैसे त्याला ६ महिन्यांनी द्यावयाचे आहेत. हे पैसे त्याला डॉलर्समध्ये द्यावयाचे आहेत आता मधल्या ६ महिन्यात डॉलर आणि रुपयाचा दर बदलू शकतो परंतु त्याला आपण आयात करत असलेल्या मालमध्ये नुकसान होऊ नये असे वाटत असते म्हणून तो बँकेत जाईल आणि ६ महिन्यानंतरच्या ठराविक तारखेला ठराविक डॉलर्स ठराविक किंमतीला विकत घेण्याचा करार करेल. या करारात परकीय चलन हे संबधीत माध्यम आहे.
वरील दोन्ही उदाहरणे हि भविष्यात ठराविक वेळात पूर्ण करावयाची असल्यामुळे याला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात.
शेअर आणि वायदा यातील फरक म्हणजे, शेअर किंवा सिक्युरिटी हि मालमत्ता आहे आणि वायदा हा करार आहे.
फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही जरी समजा स्टेट बँकेचे १०००० शेअर्स घेतले तरी तो एक करार असल्यामुळे स्टेट बँकेचे शेअर्स हे तुमच्या मालकीचे नसतात व तो फक्त एक वायदा असल्यामुळे ठराविक काळानंतर तुम्हाला तो पूर्ण करून नफा किंवा नुकसान होऊन व्यवहार पुरा करावा लागतो. मात्र जे काही तुम्ही स्टेट बँकेचे शेअर्स रोख पैसे भरून विकत घेतलेले असतात त्याचे तुम्ही मालक असता व ते केव्हा विकाव्याचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा असतो. थोडक्यात रोखीत खरेदी केलेल्या शेअर्सचे तुम्ही मालक असता आणि वायदेबाजारात घेतलेल्या शेअर्सची तुमच्याकडे कोणतीही मालकी नसून ती फक्त एक पोझिशन असते.