१२. बाजाराची दिशा ओळखा
बाजार कोणत्या दिशेने मार्गक्रमण करत आहे हे वेळीच ओळखता आले पाहिजे.
बाजारात मंदी येण्याचे संकेत आहेत काय?
यासाठी तुम्ही NSE निफ्टी आणि BSE सेन्सेक्स चा चार्ट नियमितपणे बारकाईने पहिला पाहिजे. हा चार्ट पाहत असताना किंमतीतील बदल आणि त्यातील उलाढाल या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजेत. काही वेळा बाजार वर जात असतानासुद्धा काही शेअर्सच्या किंमती कमी होत असतात. यासाठी बाजारातील सरासरीचा अभ्यास करून चालत नाही. जेव्हा मंदी येणार असते तेव्हा अचानक बाजारातील मोठ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये विक्रीची उलाढाल वाढते. जर असा मंदीचा कल दर्शवला जात असेल तर आपल्या पोर्टफोलो मध्ये सर्वात वाईट कामगिरी करणारे शेअर्स आपण प्रथम विकले पाहिजीत. जर बाजार आणखीन खाली जाण्याचे संकेत दिसत असतील तर तुमच्याकडील जास्तीत जास्त शेअर्स हे तुम्ही आणखीन वाट न पाहता विकले पाहिजेत. आणि जर बाजार परत सुधारण्याचे संकेत देत नसेल तर तुम्ही सगळेच शेअर्स विकून मोकळे झाले पाहिजे. जर तुम्ही खरेदी केलेला शेअर जर खरेदी किंमतीपेक्षा ८% कमी किंमतीला ट्रेड करत असेल तर तो तुम्ही लगेचच विकून टाकला पाहिजे. मात्र तुम्हाला जर त्या कंपनीबद्दल जबरदस्त विश्वास असेल तर तुम्ही ते शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेऊ शकता आणि शक्य असल्यास प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर त्यात नियमितपणे खरेदी करतही राहू शकता. मात्र हे सूत्र फक्त आघाडीच्या पहिल्या १०० कंपन्यानाच लागू होते.
बाजार वर जाण्याचे संकेत देत आहे काय?
एकदा का बाजारात फार मोठी मंदी झाली कि बाजार परत उसळी मारण्याचा प्रयत्न करू लागतो. पण हा तेजीचा कल आहे कि नाही हे तुम्ही एक दोन दिवसातील बाजारातील घडामोडींवर ठरवू शकत नाही कारण तो कल फसवा असू शकतो. यासाठी तुम्ही थोडे थांबून बाजारात तेजी सुरु झाल्याची खात्री करून घेतली पाहिजे. जर बाजारातील रॅली सलग ३/४ दिवस सतत मजबुती दाखवत असेल व निफ्टी १% पेक्षा जास्तने सलगपणे बंद होत असेल आणि प्रत्येक दिवशी उलाढाल सुद्धा नियमितपणे वाढत असेल तर समजावे कि बाजारात परत तेजी अवतीर्ण झालेली आहे. जोरदार तेजी हि सलग ६ ते ७ दिवस सतत दिसली तर तो कल खरा मानावा. कधी कधी हा तेजीचा कला खरे पाहतां १० ते १५ दिवसात दर्शवतो, पण असे झाल्यास ती तेजी फसवी असू शकते हे लक्षात ठेवले पाहिजे. बाजार कोसळताना तो विक्रीतील जास्त उलाढाल पहिले काही दिवस कायम ठेवतो. जेव्हा बाजारात तेजी सुरु होते तेव्हा एकदम सगळेच शेअर्सच्या किंमती लगेच वाढत नसतात तर प्रथम काही ठराविक शेअर्सच्या किंमती वाढू लागतात व नंतर ती तेजी बाजारात सर्वत्र पसरू लागते. आणि मग सर्वंकष तेजीचा माहौल तयार होतो.
या आघाडीच्या कंपन्यांचा गृहपाठ करून आपल्या यशाची मुहूर्तमेढ रोवू शकतात. शेअर्सची निवड करताना ते शेअर्स कोणत्या किंमतीपासून खाली आलेले आहेत हे पाहून जर त्यांनी योग्य वेळी तेजी सुरु होतानाच खरेदी करणे सुरु केले तर ते मोठा फायदा मिळवू शकतात कारण एकदा का मंदी संपून परत तेजी सुरु झाली कि असे शेअर्स भराभर वर जाऊ लागतात. हि संधी बरेच वेळा म्युच्युअल फंड व्यव्यस्थापक लवकर साधत असतात म्हणून आघाडीच्या म्युच्युअल फंड योजनांचा पोर्टफोलिओ नियमितपणे फॉलो केला पाहिजे. जेव्हा एखादा शेअर त्याच्या नीचांकी स्थरापासून २५% वर जातो तेव्हा तो एक पायरी पूर्ण करतो त्यानंतर तो स्थिर होऊ लागतो. यावेळी बरेच गुंतवणूकदार बाजारात परत प्रवेश करू लागतात. परंतु अनेक छोटे गुंतवणूकदार गुंतवणुकीची चांगली संधी गमावून बसतात. तेजीच्या कालखंडात बरेच छोटे गुंतवणूकदार साधारणपणे १०% नफा झाला कि तो शेअर विकून फायदा मिळवतात मात्र ते पुढे मिळणाऱ्या मोठया फायदयाला यामुळे मुकतात. कारण ते या वेळेला शेअरची दुसरी पायरी समजण्याची चूक करत असतात. खरे पाहता तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात बाजारात उडी मारणारे जास्त लोकं असतात जे नुकसान करून घेत असतात. या चौथ्या स्थरावर कंपनीचा सगळीकडे बराच बोलबाला होऊ लागतो. कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक टीव्ही वर झळकू लागतात आणि सामान्य गुंतवणूकदाराला वाटू लागत कि आपणही या कंपनीचे शेअर्स विकत घेऊन फायदा मिळवू, आणि ते जोराने तो स्टॉक खरेदी करू लागत मात्र यावेळी म्युच्युअल फंड व्यवस्थापक, मोठे व हुशार गुंतवणूकदार त्या शेअर्सची विक्री करू लागतात आणि त्यामुळे काही काळातच त्या शेअरची किंमत कमी होऊ लागते व नव्याने बाजारात आलेले गुंतवणूकदार या सापळ्यात अडकून आपले नुकसान करून घेतात आणि आपल्या नशिबाला दोष देऊन किंवा शेअर बाजाराला जुगार समजून आपले शेअर्स कमी किंमतीला विकून बाहेर पडतात. हे असे ४/५ थरांचे चक्र बाजारात नियमितपणे चालू असते जे गुंतवणूकदार हे वेळीच समजून घेऊ शकतात त्यांना पैसे मिळतात बाकीचे पैसे घालवून बसतात.
बाजारातील मंदीची दिशा कशी ओळखावी?
सामान्यपणे बाजार सरासरी १५% ते २०% किंवा जास्त कोसळला कि समजावे बाजारात मंदीचा कल सुरु झाला आहे.
अस्थिर शेअर्स कधी खरेदी करावेत?
बाजारात जेव्हा अस्थिरता असते तेव्हा योग्य वेळी शेअर्सची खरेदी केली तरच चांगला फायदा अल्प किंवा मध्यम मुदतीत मिळवता येऊ शकतो. जेव्हा एखाद्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सची किंमत एकदम वाढू लागते तेव्हा तिच्या मागील खरेदीच्या बिंदू पेक्षा ५% जास्त किंमत असताताना तो खरेदी करण्यासाठी रांगा लावू नका. एखादा मोठा शेअर काही दिवसात किंवा काही आठवड्यात २० ते २५% इतकासुद्धा वाढू शकतो मात्र अशा वेळी तो खरेदी केला तर एखादी वाईट बातमी किंवा छोटी मंदी सुद्धा तुम्हाला मोठे नुकसान सोसण्यासाठी कारणीभूत होऊ शकते. अस्थिर शेअर्सच्या बाबतीत हि जोखीम तर जास्तच वाढते.
बाजारातून सावधगिरीचे संकेत
शेअर बाजारातील पूर्वेतिहास पाहता बाजारातील सावधगिरीचे संकेत काही घटनांतून मिळू शकतात. ते कसे ते आता पाहूया. जेव्हा सगळेच गुंतवणूकदार शेअरबाजारात शेअर्स खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात तेव्हा बाजारात तेजीचा कल दिसून येत असतो. अशावेळी ज्यांनी पूर्वी शेअर्स खरेदी केलेले असतात ते त्यांनी घेतलेल्या शेअर्सच्या किंमती आणखीन वाढण्यासाठी वाट पहात असतात. अशावेळी अन्य लोकांनीसुद्धा त्यांनी घेतलेला शेअर घ्यावा यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. बरेचसे गुंतवणूकदार त्यांच्याकडे असणारे सारे पैसे एकदम गुंतवून मोकळे झालेले असतात. जोपर्यंत इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये सातत्याने गुंतवणुकीचा ओघ सुरु असतो तोपर्यंत सर्व काही आलबेल असते. यावेळी आपण बाजरात नेहमी लक्ष ठेवून राहिले पाहिजे, जेव्हा हा बाजारात सतत येणाऱ्या पैशांचा ओघ कमी होऊ लागतो तेव्हा बाजारातील खरेदी कमी होऊ लागते. यावेळी आपण गुंतवलेले पैसे शेअर्सची विक्री करून बाजारातून काढून घेणे इष्ट असते.
दुसरे म्हणजे आर्थिक किंवा राजकीय परिस्थिती: जेव्हा आर्थिक क्षेत्रात चोहोबाजूनी अस्थिरता असते, मंदीची चाहूल दिसू लागते किंवा देशात जर राजकीय अस्थिरता असेल तर तेव्हा बाजारात एकदम विक्रीचा जोर वाढू लागतो. हा बाजारात बाजारात मोठी मंदी येण्याचा संकेत असू शकतो.
तिसरे म्हणजे, जेव्हा सतत शेअरच्या किंमती वाढत असतात व रोज नवे नवे उच्यांक होत असतात तेव्हा समजावे हे फार काळ टिकू शकणार नाही. मुख्यत्वेकरून आयटी शेअर्सच्या बाबतीत हे जास्त वेळा घडून येत असते. अशावेळी संबंधित शेअर्सच्या किंमती या त्या शेअर्सपासून मिळणाऱ्या उपनांच्या पेक्षा जास्त प्रमाणात वाढत असतात. हि धोक्याची घंटा समजली पाहिजे. कारण जेव्हा वाजवीपेक्षा शेअरची किंमत वाढू लागते तेव्हा समजावे काहीतरी घोळ आहे.
चवथे म्हणजे, बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ चा भडीमार होतो. कारण जेव्हा बाजरात मोठी तेजी असते तेव्हा गुंतवणूकदारांकडून आयपीओ आणून भांडवल उभे करणे सोपे असते. यावेळी रोजच बाजार नवीन नवीन विक्रम करत असतो. बाजारात येणाऱ्या जवळपास सर्वच आयपीओना तुफानी प्रतिसाद मिळत असतो. अनेक पटीने आयपीओमध्ये गन तवणूक केली जात असते. हीसुद्धा धोक्याची घंटा असू शकते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर आयपीओ येऊ लागले कि नंतर मंदी येणार असे समजून जावे.
पाचवे म्हणजे, जेव्हा एफआयआय आणि डीआयआय दोघेही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री करू लागतात तेव्हा बाजारावर मंदीचे ढग जमू लागले आहेत हे समजावे.
सहावे म्हणजे, जेव्हा मंदीच्या शेवटाला एफआयआय आणि डीआयआय दोघेही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची खरेदी करू लागले कि समजावे बाजारात मोठी तेजी येणार आहे.