प्रकरण ३ रे
३. शेअर बाजारात गुंतवणूक का करावी?
भांडवाली बाजारातील गुंतवणूकीची ओळख
बहुतांशी व्यक्ती शेअर बाजारातील गुंतवणूकीची सुरुवात चुकीच्या पध्दतीने करतात:
१) त्याना एखाद्या कंपनीच्या शेअर्सबाबत एखादी बातमी/अफवा एक तर त्यांच्या ब्रोकर (दलाल) मार्फत किंवा त्यांच्या मित्राकडून मिळते,सांगणारा सांगतो कि हि अगदी हॉट टिप आहे.
२) त्या बातमी किंवा अफवेवर विसंबून ते लोकं त्या कंपनीचे शेअर्स अगदी डोळे झाकून कोणताही विचार नकरता विकत घेतात.
३) खरेदी करुन झाल्यावर काही दिवसांनी त्यांनाच आश्र्चर्य वाटू लागते कि मी हा शेअर का खरेदी केला व ते डोक्याला हात लावून बसतात.
अशाप्रकारे गुंतवणूकीची सुरुवात करणा-या व्यक्तीना काय म्हणायचे? खरं पहाता अशी कोणतीही बातमी तुम्हाला समजली तर तुम्ही त्याची खातरजमा केली पाहिजे. बातमीचे खरेपण तुम्ही www.nseindia.com किंवा www.bseindia.com या पैकी कोणत्याही संकेतस्थळाला भेट देऊन करू शकता, कारण स्टॉक एक्सचेंजवर नोंदणी झालेल्या कोणत्याही कंपनीबाबत कोणतीही बातमी जर असेल तर ती या संकेतस्थळावर दाखवली जाते. मग ती बातमी कंपनीच्या एखाद्या घोषणेबाबत असो किंवा डिव्हीडंड बाबत असो अथवा एखाद्या दुस-या कंपनीत विलीनीकरणची असो नाहीतर दुसरी एखादी कंपनी ताब्यात घेण्याबाबतची असो, अशी कोणतीही बातमी या दोन्ही किंवा ज्या स्टॉक एक्सचेंजवर कंपनीची नोंदणी झालेली असेल त्याच्या संकेतस्थळावर हि बातमी लगेचच दाखवली जाते.
त्यानंतर पुढील गणिती बाबीं तपासून पहा. संबंधीत कंपनीच्या प्रती शेअर मिळतीच्या वाढीचा अभ्यास टक्केवारी व आलेखाव्दारे करा, हि माहिती तुमच्या ब्रोकरच्या संकेतस्थळावर दिलेली असते. हे कसे करावे याची माहिती “तांत्रीक (टेक्नीकल) विश्लेषण” या लेखात दिली जाणार आहे. पी/ई रेशो (किंमत व मिळकत यांचे गुणोत्तर – Price to Earning Ratio), भांडवलाचे बाजारी मुल्य व विक्री यांचे गुणोत्तर – (Market Capitalization to Sales Ratio), इपीएस (प्रतीशेअर मिळकतिचे गुणोत्तर -Earnings Per Share), पुढील तिमाहीमध्ये होणा-या मिळकतीतील संभाव्य वाढ. त्यानंतर तपासा कंपनीची मागील कामगिरी ज्यामुळे समजेल कि भूतकाळात कंपनीची आर्थीक वाटचाला कशी झाली होती. आता तपासून पहा कि सध्या त्या शेअरची बाजारातील वाटचाल कशी आहे यासाठी तपासले पाहिजे ते रिअल-टाईम कोट, प्रतीदिन सरासरी होणारे खरेदि-विक्रीचे व्यवहार, किती शेअर्सच्या मुल्याचे भरणा होणे बाकी आहे, लाभांशाचा इतिहास,दिवसातील कमाल व किमान भाव पातळी, ५२ आठवड्यातील कमाल व किमान भाव पातळी. हे असे केल्याने तुम्हाला संबंधीत कंपनीच्या कामकाजाची व शेअर्सच्या वाटचालीचा अंदाज येतो. तसेच तुम्हाला खालील बाबींची माहिती असणे आवश्यक असते:
कमाल (High): दिवसातील शेअरची कमाल किंमत.
किमान (Low): दिवसातील शेअरची किमान किंमत.
बंद (Close): दिवस अखेरची शेअरची किंमत किंवा बंद भाव
बदल (Change): लागोपाठच्या दोन दिवसातील शेअरच्या बंद भावातील फरक.
उत्पन्न (Yield): मागिल दिला गेलेला लाभांश (टक्केवारी) भागिले एका शेअरची किंमत.
मागणी पुरवठा किंमत (Bid & Ask – Offer – Price):
जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअरच्या खरेदीची मागणी नोंदवता किंवा जेव्हा तुम्हाला तुमच्याकडील शेअर विकावयाचा असेल तर तुम्हाला त्या शेअरची “बीड” व “आस्क” किंमत माहित असणे अत्यावश्यक असते. आता याचा अर्थ काय?
“बीड” म्हणजे खरेदीदाराने ठरवलेली सदर शेअरची किंमत. तुम्ही जेव्हा शेअरची विक्री करु इच्छित असाल तेव्हा तुम्हाला हि किंमत माहित असलीच पाहिजे. बीड म्हणजे ज्या किंमतीला/दराने तो शेअर खरेदी करावयास दुसरी व्यक्ती म्हणजेच खरेदीदार तयार असतो.
“आस्क” (ऑफर) बाबत तुम्हाला माहिती असावयाला हवी जेव्हा तुम्हाला एखादा शेअर खरेदी करावयाचा असतो, तेव्हा कारण आस्क म्हणजे अशी किंमत कि ज्या किंमतीला दुसरी व्यक्ती म्हणजेच विक्रेता हा त्याच्याकडील एखादा शेअर विकावयास तयार असतो. विक्रेता त्याला त्याने ठरविलेल्या “आस्क” किंमतीला शेअरची विक्री करत असतो.
बीड व आस्क चा आकार (Bid Size & Ask – Offer Size):
जर तुम्ही तुमच्या संगणकाच्या पडद्यावर उदा. एबीसी लि. या कंपनीची या बाबतची माहिती पहात असाल तर ती तुम्हाला खालील प्रमाणे दिसेल:
बीड किंमत: २४५०
आस्क (ऑफर) किंमत: २४९५
बीड नग: ३५ टी
आस्क (ऑफर) नग: १८ टी
याचा सरळ अर्थ असा आहे कि, एबीसी या कंपनीच्या ३५००० शेअर्सची मागणी प्रती शेअर रु.२४५० या दराने आहे. मात्र त्या कंपनीचे फक्त २०००० शेअर्स रु.२४९५ या दराने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मागणी व पुरवठा हा महत्वाचा घटक आहे कारण त्या आधाराने समजते कि शेअरची किंमत कोणत्या दिशेने जाणार आहे.
तुम्हाला एकदा का हि माहिती मिळाल्यावर तुम्हाला एखादा चांगला शेअर खरेदी करण्याची संधी साधता येऊ शकते. पण थांबा घाई करु नका,थोडी अधिक माहिती मिळवूनच निर्णय घ्या, आता हे तपासून पहा कि कोण हा शेअर खरेदी करण्यास तयार आहेत (परदेशी अर्थसंस्था,म्युच्युअल फंडस्, मोठी औद्योगीक संस्था, या पैकी कोण? या बाबतची माहिती कशी मिळवावी हे पुढील काही प्रकरणातून मी देणार आहे). नंतर दर दिवसाची संबंधीत शेअरची उलाढाल म्हणजेच सरासरी प्रतीदिन उलाढाल किती आहे ते तपासा. जर हि गेल्या अनेक दिवसातील सरासरीपेक्षा जास्त असेल तर कोणीतरी हे शेअर्स जास्तप्रमाणात जमा करत असू शकेल.
यापुढे ज्यावेळी तुम्हाला एखादी “हॉट टिप” मिळेल तेव्हा वर सांगितल्याप्रमाणे त्याबाबत तपासणी करुन मगच त्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घ्या. एकदा का तुम्हाला अभ्यास करण्याची सवय लागली कि तुम्हाला तेजीचा अंदाज अनेकवेळा अगोदरच येईल.